वयाच्या आठव्या वर्षी माझं पहिलं पुस्तक ‘मुलांचा मेवा’ प्रसिद्ध झालं. हा माझ्या प्रतिभेचा आविष्कार म्हणण्यापेक्षा आईच्या (माझ्या ठायी असलेल्या) उदंड आत्मविश्वासाची किमया म्हणता येईल. हे माझं lok01परीकथांचं पुस्तक छापून झाल्यानंतर मी लेखन आणि कलाक्षेत्रात काहीबाही करीत राहणार, हे जणू ठरूनच गेलं. हे भाकीत मी खोटं पडू दिलं नाही. लेखन, नाटक, सिनेमा, टी. व्ही. या वेगवेगळ्या माध्यमांमध्ये झपाटल्याप्रमाणे मी धडक मारीत राहिले. पुष्कळ काही बरं-वाईट प्रसवलं. खूप काही बसवलं. जे कमअस्सल होतं ते आपोआप विस्मृतीच्या पडद्याआड गेलं. पण दु:ख असं, की जे खरोखरच चांगलं होतं तेही बरंचसं विरून गेलं. नाहीसं झालं. याला एकमेव कारण म्हणजे माझी लापरवाही. हलगर्जीपणा. एकदा का निर्मिती कागदावर किंवा मंचावर किंवा पडद्यावर उतरवून तिचा नैवेद्य रसिकांना दाखवला, की तिचे इतिकर्तव्य संपले अशी माझी धारणा असे. झालं-गेलं गंगेला मिळालं. मग वापरून झालेली बापुडवाणी रिळं, टेप्स, यूमॅटिक्स इकडेतिकडे विखुरली जात आणि हळूहळू काळाच्या उदरात गडप होत. बरं लिखाण तरी शाबूत राहील? कसं राहणार? कारण संहिताच्या संहिता मी स्वत: टरकावल्या आहेत. एकदा पडद्यावर झळकल्यावर उगाचच कागदांची रद्दी कशाला, या माझ्या विचित्र सवयीमुळे ‘प्रकाशवाणी’साठी मी केलेले बरेचसे काम अंधारात गेले आहे. नशीब, की माझ्या गोतावळ्यातली काही जागरूक मित्रमंडळी आणि नागेश्वर (गेली वीस-पंचवीस वर्षे माझी देखभाल करणारा सहकारी) यांनी वृत्तपत्रांमध्ये आलेली परीक्षणे, बातमीपत्रे, मुलाखती, वार्ताटिपणं आणि फोटो जपून ठेवले आहेत. असंख्य फायली धड आहेत. आणि त्यांच्या आधारानेच ही ‘सय’ जागविणे शक्य झाले आहे. या सगळ्या फायली एका संदूकनुमा पोकळ दिवाणामध्ये दाटीवाटीने ठासून भरल्या आहेत. त्या पुन्हा नजरेखालून घालण्याचं मी ठरवलं. ‘तिळा उघड’ म्हणताच अलिबाबाच्या गुहेप्रमाणे दिवाणाने ‘आ’ वासला आणि ‘पार्टीयाना’चा अवघा खजिना आतून लखलखला.
ही शृंखला मी १९९५ च्या मध्यावर लिहिली आणि चित्रित केली. एवढंच नव्हे, तर निर्मिती पण मीच केली. म्हणजे निढळाच्या घामाचा पैसा त्यात ओतून हा अव्यापारेषु व्यापार केला. दूरदर्शनची प्रेमळ आमंत्रणे आता बंद झाली होती. कारण आता जो- तो टेलिमालिका बनवू लागला होता. तेव्हा ‘गरज सरो, वैद्य मरो’ अशी टी. व्ही. अधिकाऱ्यांची वृत्ती झाली होती. प्रायोजक शोधण्याचा फंदात मी पडले नाही. विषय पसंत करून घ्या, स्क्रिप्ट दाखवा, कलाकारांच्या निवडीबद्दल वादावादी करा आणि मग व्यवहाराची चर्चा करा- या सर्व कटकटी मला टाळायच्या होत्या. नवनिर्मितीच्या धुंदीमध्ये मी व्यवहाराची दखलच घेतली नाही. तेव्हा त्या काळात नाही, आणि खरं तर नंतरही माझ्या एकूण कला-कारकीर्दीत कधीच नाही.
मालिकेच्या मथळ्यावरून सूचित होते त्याप्रमाणे ‘पार्टी’ या विषयावर ती शृंखला मी बेतली होती. दर प्रकरण हा एक वेगळा आनंदोत्सव. माणूस हा उत्सवप्रिय प्राणी आहे. आपल्या सवंगडय़ांबरोबर, लाडक्या व्यक्तींबरोबर एखादा मोक्याचा प्रसंग साजरा करायला, त्यानिमित्ताने मौजमजा करायला तो नित्य नवे कारण शोधतच असतो. ‘पार्टीयाना’मध्ये अशी कितीतरी चित्रविचित्र कारणे आम्ही हुडकून काढली होती. दरवेळी अगदी भिन्न पाश्र्वभूमी, अनोखे वातावरण आणि वेगळेच आनंदयात्री असत. प्रत्येक पार्टीला एक नवा यजमान असे. नावाजलेला. तो (किंवा ती) दर्शकांचे प्रेमभरे स्वागत करीत असे. सूत्रसंचालन करीत असे.
‘पार्टीयाना’ मी इंग्रजीमधून लिहिली आणि बसवली. ‘पार्टी’ ही मूळ संकल्पना साहेबाची. तेव्हा साहेबाची भाषाच बरी- असा विचार केला. शिवाय प्रत्येक प्रकरणात नाच-गाणी, खेळ, कोडी, नाटय़, नकला, गंमत यांची एवढी रेलचेल होती, की भाषेची अडचण भासायला वावच नव्हता.
पहिली पार्टी आम्ही दिल्लीला साजरी केली. एक छानशी बरसाती (गच्चीवरचा फ्लॅट) आम्हाला शूटिंगसाठी मिळाली. त्या सुमाराला रोशन सेठ हा लंडनवासी प्रसिद्ध नट दिल्लीला आला होता. रोशनने ब्रिटिश रंगभूमी आणि टेलिव्हिजनवर खूप काम केलं होतं. हॉलीवूडच्यासुद्धा एक-दोन चित्रपटांतून तो चमकला होता. श्याम बेनेगलच्या टी. व्ही. मालिकेत नेहरूंची भूमिका त्याने केली होती. रोशनने ‘चष्मेबद्दूर’ पाहिला होता आणि त्यातल्या ‘चमको’च्या प्रवेशावर तो बेहद्द फिदा होता. तेव्हा त्याने आढेवेढे न घेता माझ्या पहिल्या पार्टीयानाचा यजमान होण्याचं मान्य केलं. त्याला मदतनीस म्हणून लव्हलीन मिश्रा या तरुण अभिनेत्रीनं काम केलं. ती ‘हमलोग’ या लोकप्रिय सीरिअलमध्ये छुटकीच्या भूमिकेत प्रचंड गाजली होती. तिने प्रो. गोविंद आणि माणिक देशपांडे या आमच्या अतिशय निकटच्या दाम्पत्याच्या मुलाशी- सुधन्वाशी लग्न केलं होतं. तेव्हा ती घरचीच असल्यासारखी होती. माझ्याशी ती आवर्जून मराठीतून (चुकतमाकत) बोलायची, हे छान आठवतं. इतर कलाकार दिल्लीचेच होते. या प्रकरणाची कल्पना अशी की, पार्टीला भलतेच पाहुणे येऊन थडकतात. निमंत्रणाचा काहीतरी घोळ झालेला असतो. त्यातून अचानक रोशनची म्हातारी मावशी आपला बाडबिस्तरा घेऊन टपकते. वर ‘मला घ्यायला स्टेशनवर का आला नाहीस?’ म्हणून त्याला दटावते. ही ब्याद कशाला उपटली, म्हणून तो वैतागतो. पण मावशीबाई पार्टीमध्ये जान भरतात. गाणी म्हणतात. नकला करतात. गावाकडून आणलेला खाऊ वाटतात. पार्टी भलतीच रंगते. आणि मग वाट चुकलेले मुशाफिर- म्हणजे रास्त आमंत्रित पाहुणे हाशहुश करीत पोहोचतात. या खटय़ाळ मावशीचे काम करायला आम्हाला ‘स्टार’ नव्हे, तर ‘सुपरस्टार’ मिळाली होती- झोरा सहगल. नव्वदी पार केलेल्या झोराबाईंचा जोश एखाद्या षोडशेला लाजवील असा होता. अचंबा करावा असा त्यांचा आवाका होता. उदयशंकरच्या नृत्यसंघामधली मानांकित नृत्यांगना, पृथ्वीराज कपूरच्या नाटय़संचात महत्त्वाचे स्थान (‘पठाण’, ‘दीवार’, ‘गद्दार’, ‘किसान’, ‘पैसा’ या नाटकांमधून प्रमुख भूमिका), इंग्लंडमध्ये यशस्वी नाटय़सेवा, बी. बी. सी.च्या आणि इतर ब्रिटिश चित्रपटांतून अव्वल भूमिका- अशा बऱ्याच आघाडय़ा गाजवल्यावर आता कुठेशीक ‘वय जाणवू लागले’ म्हणून मॅडम मायदेशी- लेकीकडे परतल्या होत्या. झोराने आमचा अख्ख्याच्या अख्खा एपिसोड खाऊन टाकला. तिच्या उत्स्फूर्त अभिनयाने सेटवरचे सगळे चकित झाले. लाघवी, मिठ्ठास स्वभावाची, लुकलुकत्या डोळ्यांची झोरा हे काही वेगळंच प्रकरण होतं. तिचं कौतुक केलं तेव्हा ती उसासून म्हणाली, ‘तरी तू मला आता इतक्या उशिरा पाहतेस- म्हातारी आणि कुरूप. तेव्हा पाह्य़ला हवं होतंस.. जेव्हा मी होते तरुण- आणि कुरूप!’ दिल्लीची ही कडी (श्रृंखला), आणि पार्टी साजरी करण्याची कल्पना दर्शकांना भावली. कुणी प्रायोजक मात्र पुढे आला नाही.
दुसरी कडी आम्ही मुंबईला चित्रित केली. या नव्या पार्टीचा सरंजाम जुहूच्या एका फिल्मी बंगल्यात आम्ही जमवला. हा बंगला माझ्या घराच्या अगदी जवळ असल्यामुळे माझ्या खास चहाची (अशक्त आणि कमी गोड) छान सोय झाली. थर्मास भरभरून चहा येत राहिला. या दुसऱ्या प्रकरणाला नाव दिलं ‘र्रेल्ल रं८२’ किंवा ‘शिवाजी म्हणतो-’ या पार्टीच्या उपस्थितांची भली लांबलचक यादी होती. विभिन्न पाश्र्वभूमीचे लोक आम्ही निवडले. आठवतात ते असे- लुकू सन्याल (इंग्रजीतून बातम्या), आशा बाला (भरतनाटय़म्निपुण), इंग्रजी रंगभूमीचे नोशेर जहांगीर आणि मिनू छॉय, हिंदी रंगभूमीचा आशीष चौधरी, गुजराती अभिनेत्री शेजल शहा (माझ्या ‘सख्खे शेजारी’च्या गुजराती अवतारातली निर्मल), शहनाझ आनंद (‘छोटे-बडे’च्या किटी पार्टीतून वेचून काढलेली), यदू संकालिया (कल्ल३ी१्र१ीि२्रॠल्ली१), राहुल चंदावरकर (एका मान्यवर कंपनीत अधिकारी), राजघराण्यातल्या एका सरदारजीबरोबर लग्न केलेली अमेरिकन गेल सिंह, ‘विच्छा’च्या इंग्रजी तमाशात काम केलेली सुजाता गोखले.. असे एकूण पंधरा-सोळा तरी ‘वलय’ असलेले पाहुणे या पार्टीत हजर होते. सूत्रधार होती किटू गिडवाणी. पार्टीला सगळे नटूनथटून, झकपक पोशाख, चकचक दागिने घालून आले होते.
सुरुवातीला सगळ्यांच्या चर्चेचा विषय एकच असतो- डाकूंचा हल्ला. उच्च श्रेणीच्या घरांमध्ये घुसून डाका घालणाऱ्या दोन पिस्तुलधारी डाकूंनी शहरात धुमाकूळ घातलेला असतो. वेद आणि कमला या दाम्पत्याचे जुळे मुलगे रोली आणि पोली पार्टीला येणार असतात. ते अद्याप उगवले नाहीत म्हणून आई-बाप अस्वस्थ असतात. इतर मेहमान मंडळी डाकूंच्या करामतींची रसभरित वर्णनं करून त्यांच्या काळजीत भरच घालतात.
सगळ्यांचे लक्ष दुसरीकडे वळवायला म्हणून किटू एक खेळ सुरू करते.. ‘सायमन सेज’! हा खेळ लहानपणी आपल्यापैकी बहुतेक सर्वजण खेळले असणार. फक्त प्रांताप्रमाणे आणि भाषेबरहुकूम ‘सायमन’चं नाव वेगळं असणार, एवढंच. माझ्या लहानपणी आम्ही ‘शिवाजी’ची आज्ञा मानत असू. या साध्या बाळबोध खेळाची कल्पना अशी की, म्होरक्याने भराभर आदेश द्यायचे. ‘सायमन म्हणतो टाळ्या वाजवा’ असं फर्मान सोडलं तरच टाळ्या वाजवायच्या. नुसत्याच ‘टाळ्या वाजवा’ म्हटलं तर नाही. खेळाला गती आली की हमखास परवलीचा शब्द हुकतो आणि चुका होतात. चुकणाऱ्याला काहीबाही शिक्षा दिली जाते. आमच्या खेळात आशा बालाला तीन मिनिटं भरतनाटय़म्ची झलक दाखविण्याची शिक्षा झाली. तिची पेशगी संपते- न संपते तो पार्टीत एकच गोंधळ उडाला. उघडय़ा दरवाजामधून दोन पिस्तुलधारी धटिंगण आता घुसले. त्यांनी डोक्यावरून तपकिरी कागदाच्या पिशव्या घातल्या होत्या, त्यामुळे त्यांचे चेहरे झाकलेले होते. डोळ्यांसाठी आणि तोंडासाठी फटी मात्र कापल्या होत्या. त्यांचे एकूण सोंग पाहून अमेरिकेत काळ्या रहिवाशांवर क्रूर अत्याचार करणाऱ्या ‘कू क्लुक्स क्लॅन’ची आठवण व्हावी. आपले पिस्तूल हवेत गोल फिरवीत एक डाकू ओरडला.. ‘ख-ख- खबरदार! जान प्यारी असेल तर सांगतो तसं ग- ग- ग- गुपचूप करा. आपले सगळे द- द- द दागिने उतरून या मधल्या टेबलावर ठेवा. त- त- त- ताबडतोब!’
आलेल्या पाहुण्यांपैकी एकजण भीतभीत म्हणतो- ‘काय आहे की, ‘सायमन म्हणतो’ असं म्हटल्याखेरीज आमच्यापैकी कुणीही ऐकणार नाही.’
मग ‘सायमन’ ही काय गोम आहे, हे कळल्यावर खिलाडू वृत्तीने दुसरा डाकू म्हणतो, ‘ओके, ओके. सायमन म्हणतो- आपली पाकिटं, घडय़ाळं, द- द- द दागिने उतरून टेबलावर ठेवा, नाहीतर नाहक बं- बं- बं- बंदुकीच्या ग- ग- ग- गोळीचे ब- ब- ब- बळी व्हाल.’
आता मात्र सर्व भरजरी पाहुणे भराभर आपली आभूषणे उतरवू लागतात. पण आश्चर्य! कमला एका डाकूच्या डोक्यावरच्या टोपीला हात घालून ती चक्क उचकटून काढते. हे दोघे डाकू म्हणजे तिचेच मुलगे- रोली आणि पोली निघतात.
‘त्यांच्या बोलण्यावरून मी त्यांना लगेचच ओळखलं..’ कमला अभिमानाने सांगते, ‘दोघेही तोतरे आहेत.’
पार्टीला रंगत यावी म्हणून या दोघांनी ही बिलंदर मखलाशी केलेली असते. अमीन आणि करीम या जुळ्या भावांनी या लुटुपुटूच्या भामटय़ांची अगदी झकास सोंगं वठवली. नंतर मात्र खरेखुरे डाकू अवतरतात (अरुण होर्णेकर आणि साथी नीलेश दिवेकर). त्यांना पार्टीकर मंडळी शिताफीने गारद करतात. (यात अतिविशाल महिलांचा मोठा वाटा!) किटू पोलिसांना फोन करते आणि मग मेजवानीच्या टेबलाकडे सगळ्यांचा मोर्चा वळतो.
इंग्रजी मालिका करण्याची आमची महत्त्वाकांक्षी मोहीम यशस्वी झाली म्हणायला हरकत नाही. ‘सायमनचं हे प्रकरण खूप मजेशीर आणि वेगळं वाटलं’, ‘छान कौटुंबिक करमणूक झाली’, ‘मुलं तर तद्दन खूश होती’- अशा आशयाची खूप पत्रं आली. कुणी प्रायोजक मात्र अद्याप दार ठोठावत नव्हता.
मी पुढच्या पार्टीच्या तयारीला लागले..     

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…