हे पुस्तक महाराष्ट्रातल्या संत मांदियाळीतल्या संत नामदेव यांच्याविषयी आहे. त्यांचं व्यक्तित्व आणि कर्तृत्व यांची तोंडओळख या पुस्तकातून करून देण्याचा प्रयत्न केला आहे. यात एकंदर तीस लेखांचा समावेश आहे. त्यातील भालचंद्र नेमाडे, म. वा. धोंड यांचे लेख पुनर्मुद्रित आहेत. उर्वरित जवळपास सर्व लेख नव्याने लिहून घेतले आहेत. अशोक कामत, रामदास डांगे, मु. श्री. कानडे, अंजली मालकर, धवल पटेल यांचे लेख एकदा आवर्जून वाचावे असे आहेत. संत नामदेवांचं हिंगोली जिल्ह्य़ातील नरसी हे जन्मगाव, पंढरपूर, पंजाबमधील नामदेवांचा ज्या ज्या ठिकाणी वावर झाला ती ठिकाणं, राजधानी दिल्लीतील नामदेवांची मंदिरं, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या ठिकाणी जाऊन लिहिलेल्या वृत्तलेखांचाही समावेश केला आहे. संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे. ती अधिक वाचनीय आहे.
‘महानामा’ – संपादक : सचिन परब, श्रीरंग गायकवाड, मनोविकास प्रकाशन, पुणे, पृष्ठे – २५५,
मूल्य – २५० रुपये.

प्रबोधनकार आणि मार्मिककार
सरधोपट आणि बाळबोध म्हणावे असे हे पुस्तक आहे. यात प्रबोधनकार ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव बाळासाहेब ठाकरे यांची जीवनकहाणी सांगितली आहे. ‘‘प्रबोधनकार’ आणि ‘मार्मिककार’ यांच्या महत्त्वपूर्ण कार्याचा नव्या पिढीला परिचय या पुस्तकाने होईल असे वाटते’ असे मलपृष्ठावर म्हटले आहे. ते अर्धसत्य म्हणावे लागेल. बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी नवी पिढी अनभिज्ञ नाही. ती अनभिज्ञ आहे प्रबोधनकार ठाकरे यांच्याविषयी. त्यांच्याविषयीची स्थूल माहिती या पुस्तकाद्वारे त्यांच्यापर्यंत पोहचू शकेल. बाळासाहेब ठाकरे यांच्याही काही रूपांची माहिती होईलच.
‘‘प्रबोधन’कार ते ‘मार्मिक’कार’ – नीला पांढरे, उन्मेष प्रकाशन, पुणे, पृष्ठे- १०६, मूल्य- १०० रुपये.