28 January 2020

News Flash

दमदार कथा

अनुवादक उमा कुलकर्णी यांनी आजवर कन्नड साहित्यातील यू. आर. अनंतमूर्ती, एस. एल. भैरप्पा, वैदेही, के. पी. पूर्णचंद्र तेजस्वी यांच्या कथा-कादंबऱ्यांचे मराठीमध्ये सुगम अनुवाद करून...

| July 28, 2013 01:01 am

अनुवादक उमा कुलकर्णी यांनी आजवर कन्नड साहित्यातील यू. आर. अनंतमूर्ती, एस. एल. भैरप्पा, वैदेही, के. पी. पूर्णचंद्र तेजस्वी यांच्या कथा-कादंबऱ्यांचे मराठीमध्ये सुगम अनुवाद करून हे मान्यवर साहित्यिक आणि त्यांचं साहित्य मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्याची बहुमोल कामगिरी केली आहे. याशिवाय त्यांनी वेळोवेळी कन्नड कथांचेही अनुवाद केले आहेत. त्यातील काही कथा या संग्रहात घेतल्या आहेत. यात यू. आर. अनंतमूर्ती यांच्या तीन, के. पी. पूर्णचंद्र तेजस्वी यांच्या पाच, वैदेही यांच्या तीन आणि माधव कुलकर्णी यांच्या चार अशा एकंदर १५ कथांचा समावेश आहे. या कथासंग्रहातून कर्नाटकाच्या लोकजीवनाचेही काही प्रमाणात दर्शन होते. महानगर आणि खेडं, समाजव्यवहार आणि कौटुंबिक जीवन, या दरम्यान यातील कथानाटय़ रंगत जातं. थोडक्यात कन्नड साहित्यातील हे आघाडीचे कथाकार आपल्या कथांमधून कुठले प्रश्न मांडू पाहत आहेत, जगण्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन नेमका कसा आहे, याची चुणूक या कथांमधून पाहायला मिळते.
‘निवडक कन्नड कथा’ – संपादन व अनुवाद : डॉ. उमा वि. कुलकर्णी, साकेत प्रकाशन, औरंगाबाद, पृष्ठे – १८४, मूल्य – २०० रुपये.

एका ‘राजा’ची गोष्ट
‘लाखाची गोष्ट’, ‘पेडगावचे शहाणे’, ‘जगाच्या पाठीवर’, ‘गाठ पडली ठका ठका’ हे चित्रपट म्हटले की, राजा परांजपे यांची आठवण येते. राजाभाऊंचा काळ हा मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळच होता. राजाभाऊ-गदिमा-सुधीर फडके या त्रयीने अनेक उत्तम चित्रपट तयार केले. भालजी पेंढारकरांचे शिष्य असलेले राजाभाऊ खरोखरच राजामाणूस होते. त्यांचे मराठी चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनाचा कब्जा घेतात. चित्रपट दिग्दर्शक व कलाकार म्हणून राजाभाऊंनी मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत २५-२७ र्वष काम केलं. त्यांनी २४ मराठी तर ५ हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केलं, तर ४१ मराठी तर सोळा हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. त्यांचं हे चरित्र सरधोपट असलं तरी एकदा वाचण्यासारखं नक्कीच आहे. भारतातले पॉलमुनी, दिलदार राजा आणि मराठी चित्रपटसृष्टीचे अनभिषिक्त सम्राट, अशी तीन विशेषणे त्यांच्यासाठी का वापरली जात, त्याचा यातून काही प्रमाणात उलगडा होऊ शकतो.
‘राजा’माणूस – अनिल बळेल, स्नेहल प्रकाशन, पुणे, पृष्ठे – १७६, मूल्य – २०० रुपये.

प्रेरणादायी कहाणी
निष्णात प्लास्टिक सर्जन डॉ. आनंद जोशी यांच्याविषयीचं हे पुस्तक. गिरगावात एका सुखवस्तू घरात जन्मलेला मुलगा कष्ट, जिद्द आणि अभ्यासाच्या जोरावर प्लास्टिक सर्जरीत कसे प्रावीण्य मिळवतो याची ही प्रेरणादायी कहाणी आहे. मात्र या पुस्तकातील ७० पाने ही खुद्द डॉ. जोशी यांच्याच शब्दांत आहेत. त्यानंतर त्यांच्या पत्नीचा एक लेख आहे. आपल्या माहेरची पूर्वपिठिका सांगत त्यांनी सहजीवनाचे चित्र रेखाटले आहे. घरातल्या काही लोकांचे आणि मित्रांच्या आठवणी आहेत. त्यामुळे या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर डॉ. विजय ढवळे यांचा नामोल्लेख पुस्तकाचे लेखक असल्यासारखा का आहे, हे मात्र कळत नाही. त्यांनी फक्त शब्दांकनच केले असेल तर तसे स्पष्टपणे का म्हटले नाही?  त्यामुळे विनाकारण गैरसमज होतो.  असो. एका डॉक्टरची ही कहाणी वाचनीय आहे.
‘आधुनिक अश्विनीकुमार’ – डॉ. विजय ढवळे, नवचैतन्य प्रकाशन, मुंबई, पृष्ठे – १६३, मूल्य – १७५ रुपये.

फुल्यांची शिक्षणनीती
पुस्तकाच्या शीर्षकावरून हे प्राध्यापकीय समीक्षा पद्धतीचे पुस्तक नाही ना, अशी शंका येते. तसे ते काही प्रमाणात आहेही. म्हणजे हे पीएच.डी.च्या प्रबंधाचे पुस्तकरूप आहे. मात्र तसे असले तरी हे पुस्तक नुसते वाचनीयच नाही, तर महात्मा फुले यांच्या शिक्षणविचाराविषयी खऱ्या अर्थाने नवी मांडणी करणारे आहे. फुल्यांचा शिक्षणविचार नेमका कसा होता, याची लेखकाने त्या काळच्या परिस्थितीच्या संदर्भात आणि फुले यांचा विचारव्यूह व कार्यपद्धती या पाश्र्वभूमीवर मांडणी केल्याने फुले समजून घ्यायला मदत होते. डॉ. सदानंद मोरे यांनी या पुस्तकाला चिकित्सक प्रस्तावना लिहिली असून त्यांनी या पुस्तकाचे मोल नेमकेपणाने सांगितले आहे.
‘महात्मा फुले यांचा शिक्षणविचार’ – डॉ. द. के. गंधारे, पद्मगंधा प्रकाशन, पुणे,      पृष्ठे – १४४, मूल्य – १५० रुपये.

लडाखच्या वाटेवर…
लडाखमध्ये भ्रमंती करताना तेथील स्थानिक व्यक्ती, समाज, त्यांची जीवनशैली, संस्कृती आणि ऐतिहासिक संदर्भ जाणवले त्याचे वर्णन आत्माराम परब आणि नरेन्द्र प्रभू यांनी या पुस्तकात केले आहे. त्या प्रवासाचा थरारही पुस्तकात ओघवता भेटतो. त्यांचा गिर्यारोहणाचा श्रीगणेशा कसा झाला, सह्य़ाद्री आणि हिमालयातील साम्यभेद, मोटारसायकलवरून लडाख मोहिमेची तयारी, मोहिमेदरम्यान आलेले थरारक अनुभव, अनुभवलेले मृत्यूचे थैमान, मृत्यूच्या दाढेतून झालेली सुटका, उत्तुंग उत्तर सीमेवरील आनंदाचे क्षण, मोहीम सर करून परतताना पुढे आलेले मदतीचे हात असे विविध टप्प्यांतील अत्यंत भावपूर्ण, प्रेरणादायी आणि दाद देण्याजोगे असे हे प्रवासकथन आहे. पुस्तकाच्या दुसऱ्या भागात पर्यटकांचं नंदनवन असलेल्या लडाखचे वर्णन केलं आहे. विषयाला साजेशा रंगीत चित्रांचा समावेश हेदेखील पुस्तकाचं एक वैशिष्टय़ म्हणायला हवं. या पुस्तकातून लडाखचं चांगलं दर्शन होतं आणि लडाख पाहावंसंही वाटतं.
‘लडाख.. प्रवास अजून सुरू आहे’ – आत्माराम परब, नरेंद्र प्रभू, नवचैतन्य प्रकाशन, पृष्ठे – २११, मूल्य – २११ रुपये.

हिमालयाचा पहिला अनुभव
हिमालयात पहिल्यांदा गेलेल्या युवकाने हिमालयात केलेल्या प्रवासाचे वर्णन यात आहे. त्यात भोवतालच्या निसर्गसौंदर्याच्या वर्णनासोबत प्रवासातील बारकावे, तिथली माणसं, तिथल्या चालीरीती, आलेले थरारक अनुभव लेखकाने कथन केले आहेत. यूथ हॉस्टेलच्या संगतीने केलेल्या या सफरीचे वर्णन वाचनीय आहे. सरपासच्या मार्गक्रमणेच्या एकेका टप्प्यात आलेल्या अनुभवांवर एकेक प्रकरण बेतले आहे. साध्यासोप्या शब्दांत आणि शैलीत आपल्या गिर्यारोहण मोहिमेचा सांगितलेला हा रिपोर्ताज आहे.
‘पहिले पाऊल’ – पंकज घारे, संवेदना प्रकाशन, पृष्ठे – १४०, मूल्य – १६० रुपये.

‘बोधी’ इतिहासाचा आढावा
नाटककार प्रेमानंद गज्वी हे गेली काही वर्षे सातत्याने बोधी नाटय़ महोत्सव आणि बोधी नाटय़लेखन कार्यशाळा भरवत आहेत. बोधी म्हणजे ज्ञान. हा शब्द त्यांनी बौद्ध वाङ्मयातून घेतला आहे. नाटक या माध्यमातून गज्वी जो ज्ञानविषयक उपक्रम करू पाहत आहेत, तो स्तुत्य आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रस्तुत पुस्तकाचे लेखन त्यांनी केले आहे. सर्वसाधारणपणे असं मानलं जातं की, भारताचा सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक  इतिहास पाच हजार र्वष जुना आहे. सिंधू, वैदिक काळ, बौद्ध काळ, मुस्लीम काळ, ख्रिश्चन काळ ते स्वातंत्र्योत्तर काळ, असे त्याचे टप्पे गज्वी यांनी आपल्या मनोगतात नोंदवले आहेत. या प्रत्येक टप्प्यावर भारताचं सांस्कृतिक चित्र काय होतं, याचा आढावा या पुस्तकात घेतला आहे.
बोधी हा शब्द बौद्ध वाङ्मयातील असला तरी ज्याला गज्वी बोधी वाङ्मय म्हणतात, त्याला बौद्ध वाङ्मय म्हणता येत नाही, असा निर्वाळा ते आपली संकल्पना स्पष्ट करताना देतात, तसेच कलेने नुसतंच काय घडतंय एवढं सांगून थांबू नये, तर त्यावरचे उपायही सांगितले पाहिजेत. थोडक्यात ‘कलेसाठी कला की जीवनासाठी कला’ या वादाच्या भोवऱ्यात न पडता कला सर्वार्थानं ज्ञानपूर्ण असली पाहिजे, असे बोधी मानते, अशी मांडणी केली आहे. ज्ञानसंकल्पना मांडताना केवळ पूर्ण अभ्यासांती हाती आलेली निरीक्षणे, अनुमान आणि निष्कर्ष सांगायला हवेत. पण दलित साहित्यात जो वैदिक ब्राह्मणी वर्चस्वाविरुद्ध आणि जे जे प्रस्थापित ते ते त्याज्य, हा दृष्टीकोन दिसतो, तोच गज्वी यांच्या या लिखाणातही आहे. त्यातून त्यांना स्वत:लाच बाहेर पडता आलेले नाही. नवी संकल्पना मांडताना नव्या दृष्टीने विचार करायला हवा, मात्र तसे फार झालेले दिसत नाही. तरीही गज्वी २००३ पासून जी ‘बोधी’नामक संकल्पना मांडू पाहत आहेत, त्यामागची पूर्वपीठिका आणि विचार जाणून घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरू शकेल.
‘बोधी : कला-संस्कृती’ – प्रेमानंद गज्वी, सहित प्रकाशन, पुणे, पृष्ठे – १५२,    मूल्य – १८० रुपये.

First Published on July 28, 2013 1:01 am

Web Title: multipal short book reviews 2
Next Stories
1 धाव घेई विठू आता..
2 एका षड्यंत्राचा शोध
3 साहित्यिक प्रवास.. ‘वाङ्मयशोभा’चा!
Just Now!
X