|| कमलाकर नाडकर्णी

एकेकाळी जिवाची मुंबई करण्यासाठी येणाऱ्यांना (आणि मुंबईकरांनासुद्धा!) मुंबईचे खास आकर्षण वाटणाऱ्या ‘व्हिक्टोरिया’ (घोडागाडी) आता इतिहासजमा होत आहेत. त्यांच्या जागी बॅटरीवर चालणाऱ्या बग्ग्या येत आहेत. त्यानिमित्ताने त्याकाळच्या व्हिक्टोरियाचे हे फिरते पुन:स्मरण..

Confirmed Rohit Sharma does not stay with Mumbai Indians team in Mumbai
रोहित शर्माने सांगितलं मुंबई इंडियन्सच्या संघासह न राहण्याचं कारण; म्हणाला, “आता माझ्या हातात तर..”
salman khan firing accused Sagar pal father reaction
सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या आरोपीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “तो खूप…”
IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”
Hardik Malinga Pushing Video Viral
MI vs SRH : हार्दिक पंड्याने लसिथ मलिंगाला ढकलल्याने चाहते संतापले, VIDEO होतोय व्हायरल

अठ्ठावनच्या सुमारास दादरच्या गोखले रोडवर रात्री अकराला सामसूम असायचं. रस्त्याच्या बाजूलाच चाळ होती आणि आमचे वसतिस्थान त्याच चाळीत होते. निद्राधीन असताना केव्हातरी घोडय़ांच्या टापांचा आवाज ऐकू यायचा. पोर्तुगीज चर्चपासून तो आवाज लहान-मोठा होत सिटीलाइट सिनेमापर्यंत अंधुक होत लुप्त व्हायचा तेव्हा कधीकाळी पाहिलेल्या एखाद् दुसऱ्या इंग्रजी सिनेमाची आठवण व्हायची. त्यातल्या दगडी रस्त्यावरच्या घोडय़ांच्या टापा डांबरी रस्त्यावरच्या टापांच्या आवाजात मिसळायच्या. गोखल रोडवरची रात्रीची घोडागाडी इंग्रजी सिनेमात घुसायची. न कळलेला सिनेमा टप्प्याटप्प्याने कळायचा.

राणीच्या आगमनाप्रीत्यर्थ घोडागाडीची ‘व्हिक्टोरिया’ झाली, पण बसणारे मात्र बिनराज्याचे! शाळेत धडा वाचताना ‘श्रीमंत’ या शब्दाचा अर्थ गुरुजी ‘मोटारवाला’ असा सांगत. त्यावेळी ‘गाडीने आलो’ म्हणजे ‘ट्रेनने आलो’ असा त्याचा अर्थ असे. तास तास उभं राहूनही बस यायची नाही आणि तरीदेखील तिला बस का म्हणायचे, हे मला कळायचे नाही. त्यामुळे ही सगळी वाहनं माझ्यासाठी नापास होती. व्हिक्टोरिया मात्र माझी गुणाची होती. पण ती केव्हा जवळ येईल, ते मात्र सांगणं कठीण होतं. दादर ते वांद्रे ही तर त्यावेळची चालणाऱ्यांचे भाग्य उदयाला आणणारी ठिकाणं होती. लालबाग, परळ, गिरगाव या प्रवासाला कदाचित व्हिक्टोरिया राणीचा विचार व्हायचा. तेसुद्धा काही सामान असलं तरच! आणि एका सुदिनी मला सामानातला एक बोजा व्हायची संधी  मिळाली. मी व्हिक्टोरियाने म्हणजेच टांग्याने प्रवास करणार, या कल्पनेनेच माझा आनंद कुठेच- अगदी टांग्यातदेखील मावेना!

आई, बाबा, सामान आणि माझा बोजा.. आम्ही सगळे मामाच्या गावी म्हणजेच परळला चाललो होतो. मी टांग्यात मध्यभागी उभाच होतो. पळणाऱ्या घोडय़ाच्या टांगा मला दिसत होत्या. उंचावर आसनस्थ झालेल्या टांगेवाल्याच्या एका हातात घोडय़ाचे लगाम, दुसऱ्या हातात चाबूक, डोक्यावर लाल त्रिकोणी, उंच, काळ्या गोंडय़ाची टोपी. त्या टांगेवाल्यात मला चित्रातला कुरुक्षेत्रावरचा कृष्णच दिसत होता. मी अर्थातच अर्जुन! मी या टांगागाडीत इतका गुंगून गेलो होतो की मधेच मी ‘मामाची टांग’ असे ओरडलो. आई-बाबांनी माझ्याकडे चमकून पाहिलं. मी उगाचच मोठय़ाने हसलो. टांगेवाल्याला ‘मामा’ म्हणणारा मीच पहिला असेन. टांगेवाल्याची अखंड बडबड, ओरड चालूच होती. ‘ये बाई.. बाजू हो’, ‘ओ बुढे, किधर जाता है’, ‘छोकरी, थांब थांब..’ टांगेवाल्याचा तो तोंडाचा हॉर्न ऐकायलाही मजा येत होती. दोन्ही बाजूच्या इमारती मागे मागे जात होत्या (कधी कधी त्या अंगावरच यायच्या.), त्या अर्थी आम्ही नक्कीच पुढे जात होतो. टापांचा आवाज, टांगेवाल्याचा पुकारा यांचा एक लयबद्ध ध्वनीमेळच जमला होता. त्याला फटका देणारा एक आवाज रस्त्यावरच्या पोरांकडून आला.. ‘‘टांगेवाले, पिछे देख.’’ टांगेवाल्याने चाबूक मागे फडफडवला. मागे लोंबकळणारा गवत घेऊन रस्त्यावर पडला. पोरं फिदीफिदी हसायला लागली. गवत पळवणाऱ्याने इरसाल शिवी हाणली. पुढे जाणाऱ्या टांग्यात मला ती ऐकू आली. ती शिवी मी प्रथमच ऐकत होतो. तरीसुद्धा बाबा म्हणालेच, ‘‘होळी आलीय ना!’’

वाटेत जाताना एका फटफटीवाल्याने आमच्याशी शर्यतच लावली. पण आमचा टांगेवाला आणि घोडा त्या फिरत्या चाकाच्या यंत्राला जुमानणारे नव्हते. त्यांच्या अंगात चेवच आला. रस्त्यावरचे लोक बघतच राहिले. जणू महालक्ष्मीचे रेसकोर्सच. घोडय़ाने आपली हॉर्सपॉवर दाखवलीच; आणि  फटफटीवाल्याची नावाप्रमाणेच फट्फजिती केली.

त्यावेळी आजच्यासारखी टॅक्सीची मुबलकता नव्हती. धनिक लोक घोडागाडीतूनच फिरायचे. व्हिक्टोरियातूनच जीवाची मुंबई करायचे. बॉम्बे सेण्ट्रलपासून गिरगाव- मरिन लाइन्सपर्यंत त्यांचा भर असायचा. बॉम्बे सेण्ट्रलला तर घोडय़ांचा तबेलाच होता. तिकडचे लोक पत्ता विचारला तर ‘तबेल्याजवळ’अशीच खूण सांगायचे. घोडय़ांना काय वाटत असेल! माणसांचे तबेले समोर उभे होते; पण बोलणार कोण आणि कसे? मुकी बिचारी कुणीही हाका.. टांगेवाला बाका.

घोडागाडीत बसलं का कसं अगदी रथात बसल्यासारखं वाटायचं. आता यात्रेमुळे रथ बदनाम झालाय. तेव्हा ते जाऊ दे, पण व्हिक्टोरियाची ऐट काही न्यारीच! ऐश्वर्याची. गर्भश्रीमंतीची. तिचा दिमाखच ऐय्याशी. एकूण आकृती म्हणजे जणू आरामखुर्चीच. उघडी व्हिक्टोरिया मागून ओढून डोक्यावरून बंद करता यायची.. बाळाच्या डोक्यावरचं टोपरं ओढून घ्यावं ना, तसंच. मग व्हिक्टोरिया बुरख्यात जायची. पावसाची काय टाप आत येईल! आतल्या माणसांची गंमत..

श्रीपाद कृष्णांपासून ते पुलंपर्यंतच्या सर्व विनोदकारांच्या लेखांनी टांग्यातून प्रवास केला आहे. ‘अंमलदार’ सिनेमात तर टांग्याच्या एका बाजूने अंमलदार चढतो आणि दुसऱ्या बाजूने उतरतो. आत बसायलाच विसरतो. शन्ना नवरे यांची एक कथा फोर्टमधल्या काळ्या घोडय़ाच्या पुतळ्यावर आहे. त्यात तिकडच्या सफाई कामगाराला दररोज सकाळी घोडय़ाची लीद  सापडते. जुन्या हिंदी चित्रपटांत टांग्यातलं एखादं तरी गाणं असायचंच. त्यात नायकाला गाडीवाल्याच्या पाठीला पाठ लावून बसावं लागत असे. त्यामुळे आजूबाजूचं सगळं उलटं जायचं. टांग्याची चाकंसुद्धा! ‘व्हिक्टोरिया नंबर २०३’ नावाचा चित्रपटच होता. नाटकांत बिनमाणशी वाहनांचे प्रकार बरेच आले. गरज असती तर बापूराव पेंढारकरांनी मोटारही रंगमंचावर आणली असती. त्यांना ड्रायव्हिंगचा छंद होता. त्यांनी १९२९ मध्ये गाडी घेतली होती. आपल्या नाटकातल्या मित्रांना त्या गाडीतून त्यांनी फिरवलं होतं. ‘श्री’ नाटकात घोडय़ाच्या रेसची फिल्म त्यांनी दाखवली होती. बाबाजीराव राणे यांनी आपल्या ‘संत तुकाराम’(१९११) या नाटकात सदेह वैकुंठगमन करणाऱ्या तुकारामांचे विमान आकाशातून उडताना दाखविले होते. सायकली आणि बाइक्स तर स्टेजवर आल्याच, पण अलीकडेच येऊन गेलेल्या ‘प्रपोजल’ या नाटकात ट्रेनही पात्रांसकट चालवली होती. रतन थिय्याम यांच्या ‘उत्तरप्रियदर्शी’ या मणिपुरी नाटकात आणि नानासाहेब शिरगोपीकर यांच्या ‘शाब्बास, बिरबल शाब्बास’ या नाटकात हत्तीनेही दर्शन दिलं होतं. टांगे प्रेक्षकांना नाटय़गृहापर्यंत घेऊन यायचे, पण घोडागाडीला मात्र मराठी रंगभूमी कधी बघायला मिळाली नाही. ‘जाणता राजा’च्या सादरीकरणात मैदानातून घोडा पळवायचे आणि मग महाराजांना घोडा विंगेत ठेवावा लागायचा. काय करणार? ब. मों.पुढे कुणाचं काही चालेना.

त्याकाळी टांगेवाला बसायचा त्याच्या डाव्या-उजव्या बाजूला दोन छान दिवे असायचे. छोटय़ा उभ्या कंदिलासारखे. त्यांची काच पिवळसर रंगाची असायची. गोड दिसायचे. जणू दिवाळीच! त्याचा वापर मोहन वाघांनी आपल्या एका रहस्य नाटकात केला होता.

परळच्या मामाकडून दादरला घरी परत येतानासुद्धा आम्ही टांग्यातूनच आलो. बाबांनी प्रथमच माझा हट्ट पुरवला. आई ‘नको’ म्हणत होती. तिचंही बरोबरच होतं म्हणा! मामानं काहीच बरोबर दिलं नव्हतं. उघडय़ा टांग्यात बाबांबरोबर बसणं तिला प्रशस्त वाटत नसावं. (वो जमाना अलग था!) पण बाबांपुढे फक्त टांगेवालाच बोलू शकत होता. दादरच्या मारुतीच्या गोल देवळाजवळ अचानक टांगा थांबला. काय झालं, मला कळेना. माझा जीव टांगेवाल्याच्या टोपीत अडकला. टांगेवाला हनुमानभक्त..? कसं शक्य आहे? उलगडा झाला. देवळाच्या डाव्या बाजूच्या गल्लीत तीन फूट उंचीची, दीड पुरुष लांबीची पाण्याची टाकी होती. ती खास घोडय़ांना पाणी पिण्यासाठी होती. आमच्या अश्वाची तृष्णा भागेपर्यत टांगा तिथे उभा राहिला आणि मग चालू लागला. माझा जीव टोपीतून बाहेर पडला. मी मारुतीला नमस्कार केला.

चित्रपटात कोलकाता दाखवतात तेव्हा माणसांकडून ओढली जाणारी रिक्षा बघून जीव गलबलतो. मुंबई इतकी निर्दय कधीच झाली नाही. माझ्या व्हिक्टोरिया-प्रीतीचं हेही एक कारण आहेच.

आता बॅटरीची बग्गी आली आहे. तिला घोडा गैरहजर आहे. म्हणजे टापांचा ठकठक ठेका नाही. छोटय़ा-मोठय़ा चाकांच्या चक्राची लय नाही. गाडीवाल्याच्या पुकाऱ्याच्या दिंडय़ा-साक्या नाहीत. गाण्याशिवाय आणि संवादाविना ‘सौभद्र’ कसे अनुभवायचे?

नाटकात नाटक ‘सौभद्र’.. गाडीत गाडी घोडागाडी.. व्हिक्टोरिया माझ्या प्रीतीची!

 kamalakarn74@gmail.com