मदनमोहन म्हणजे अक्षय कारुण्याचा झरा. अश्वत्थाम्यासारखी अखंड भळभळणारी जखम घेऊनच तो वावरला. ‘जिन्दगी में मजा नहीं आ रहा यार..’ असे म्हणत रडणारा मदनमोहन जेव्हा ‘माई री मैं कासे कहूँ पीर’सारखी चाल जन्माला घालतो तेव्हा ते केवळ बौद्धिक सृजन नसतं. ते असतं- भावनिक संघर्षांतून निर्माण होणारं अद्वितीय स्वरशिल्प!
कलाकाराचा स्वत:शी, स्वत:च्या कलेशी, जगाशी जो सतत मानसिक संघर्ष चालू असतो, तो कुठेतरी त्याच्या निर्मितीत डोकावल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे ‘ये दुनिया, ये महफिल मेरे काम की नहीं..’ हे स्वत: मदनमोहनच्याच आयुष्याचं वर्णन वाटतं. ‘इथे’ असूनही तो ‘परका’च राहिला. दु:ख झोकून सुखांशी भांडत राहिला.
मदनमोहनच्या गाण्यांमधून प्रकर्षांने जाणवणारा विशेष म्हणजे स्वरांच्या लगावाचा, विशिष्ट दर्जाने स्वर लावण्याचा अभ्यास! स्वराची विशिष्ट श्रुती वापरणं ही शास्त्रीय संगीताची मक्तेदारी न मानता मदनमोहनजींनी या गोष्टीचा उपयोग शब्दांचा अर्थ गहिरा करण्यासाठी केलेला दिसतो. शास्त्रीय संगीतात रागाच्या अनुषंगाने स्वरांचे विशिष्ट लगाव असतात, विशिष्ट स्थाने असतात. त्यातून रागाची मूर्ती स्पष्ट उभी राहते.. रागाचा भाव निर्माण होतो- स्वर कोमल किंवा अतिकोमल, चढे असल्याचा- यासंदर्भात खूप फरक पडतो.
‘आज सोचा तो आंसू भर आए
मुद्दते हो गयी मुस्कुराए..’
यात, ‘आज’ शब्दाचा जो स्वर आहे (कोमल निषाद) तो अतिकोमल, किंचित ऋ’ं३ लावून आयुष्याचा अधुरेपणा कसा व्यक्त केलाय, ते पाहा.. ‘वो भूली दास्ताँ’मध्येसुद्धा गाण्याच्या शेवटी असणारा ‘दास्ताँ’चा रिषभसुद्धा असाच विलक्षण हलवणारा. अतिकोमल.
थेट स्वर लावण्याचं सौंदर्य काही वेगळंच असतं. कुठल्याही स्वराचा आधार न घेता थेटपणे एखादा स्वर जेव्हा लागतो तेव्हा तो तीक्ष्ण बाणासारखा ‘घुसतो.’ ‘वो चूप रहे तो मेरे दिल के दाग जलते हैं’सारख्या गाण्यात ते प्रत्ययाला येतं.
‘कहो बुझे के जले?
हम अपनी राह चलें, या तुम्हारी राह चले?’
या ‘कहो..’नंतरचं सूक्ष्म थबकणं आठवा. आणि ‘या तुम्हारी राह चले?’ या प्रश्नानंतर थेट कोमल निषादावर ‘बुझे तो ऐसे के किसी गरीब का दिल’ अशी जहरी आणि जखमी भावना जाळत जाते आणि ‘किसी गरीब का दिल’वर ती खास ‘मदनमोहनी’ जागा घेऊन खालच्या शुद्ध निषादावर येऊन थांबते. दोन निषादांचा हा जीवघेणा खेळ पूर्ण गाण्यात सुरू राहतो.. आपल्याला अस्वस्थ करत राहतो.
‘जब जब तुम्हें भुलाया’ (जहाँआरा) या गाण्याच्या आधीचा शेर म्हणजे थेट स्वराच्या ताकदीचं आणखी एक उदाहरण. ‘मं तेरी नजर का सुरूर हूँ..’ ही लताबाईंच्या आवाजातली सुरुवात ऐका..
‘मं तेरी नजर का सुरूर हूँ,
तुझे याद हो के न याद हो
तेरे पास रहके भी दूर हूँ
तुझे याद हो के न याद हो..’
यात ‘दूर’चा गंधार इतका टोकदार, की क्या कहने. असं जवळ असून दूर असणं न साहवणारंच. पुढे, ‘तेरे दिल में मं भी जरूर हूँ..’ हा आत्मविश्वास ‘जरूर’वरच्या थेट गंधारानं जागवलाय.
शब्दांची मांडणी, त्यात विशिष्ट अक्षरावर जोर देणं या आणि अशा अनेक सूक्ष्म गोष्टींमुळे मदनमोहनजींची
शैली सजली.
‘दिल की नाजुक रगें टूटती है,
याद इतना भी कोई न आए..’
(‘आज सोचा तो आँसू भर आए..’) म्हणताना विरहवेदना, काळजाच्या चिंध्या करणारं दु:ख काय असेल याची कल्पना येते. ‘तटातट काळजाचे हे तुटाया लागती धागे..’ (‘कळा ज्या लागल्या जीवा’- भा. रा. तांबे) म्हणजे तरी दुसरं काय? यात, ‘याद इतना भी कोई न आए’ म्हणताना ‘इतना’मधल्या ‘त’वर दिलेला जोर आठवा. त्याची अनुभूती वेगळी आहे. ‘दु:ख इतकं सुंदर कधीच वाटलं नव्हतं..’ कैफी आझमींच्या काळीज गलबलून टाकणाऱ्या या शब्दांची ताकद त्या दैवी सुरांमागे उभी आहे.
‘अपनेसे भी छुपायी थी
धडकन अपने सीने की
हमको जीना पडम्ता या
ख्वाइश कब थी जीने की?’
तू भेटेपर्यंत कसंतरी हे आयुष्य रेटत होते. जगावं लागत होतं. जगण्याची ऊर्मी नव्हतीच. स्वत:पासूनही लपवलेली ही काळजाची धडधड आता फक्त तुझ्याचसाठी. ‘बेताब दिल की’मधले कैफींचे शब्द इतके अंतर्मुख करतात. कैफींमधला रोमँटिक शायर हे असं गाणं लिहून जातो तेव्हा ‘कर चले हम फिदा’मध्ये-
‘जिंदा रहने के मौसम बहुत है मगर
जान देने की रुत रोज आती नहीं..’
असे निक्षून सांगणारा तो हाच का, असं वाटतं. याच गाण्यात शेवटी रामायणाचा संदर्भ देऊन कैफींनी कमाल केलीय. ‘देशभक्ती’ हा वापरून गुळगुळीत झालेला शब्द; पण या गाण्यातून सीमेवर लढणाऱ्या, शहीद होता होता कळवळून काहीतरी सांगणाऱ्या सनिकासाठी डोळे पाणावतात.
कैफी आझमी, राजा मेहदी अली खाँ, राजेन्द्र कृष्ण, मजरूह सुलतानपुरी, साहिर लुधियानवी, गुलजार, हसरत जयपुरी, नक्श ल्यालपुरी, कैफ इरफानी अशासारख्यांच्या शायरीचे चार चाँद मदनमोहनच्या स्वराकृतींना लागले नसते तर..? हा समसमा संयोग आपल्याला दिसला नसता. मदनमोहनसाठी लिहिताना या कवींनीसुद्धा त्याच्या ‘टेम्परामेंट’ला साजेसं लिहिल्याचं जाणवतं. तिकडे, ‘है इसी में प्यार की आबरू’मध्ये ‘मुझे गम भी उनका अजीज है, के उन्ही की दी हुई चीज है’ म्हणत राजा मेहदी अली खाँनी नेमकं वर्मावर बोट ठेवलंय. तू दिलेली प्रत्येक गोष्ट मला प्रिय आहे.. मग ते दु:ख का असेना.
‘है इसी में प्यार की आबरू
वो जफा करे मैं वफा करूँ.
जो न बन सके मं वो बात हूँ
जो न खत्म हो मं वो रात हूँ’
हे असंच चालणार.
‘ये लिखा है अब मेरी जिन्दगी
के मं शम्मा बनके जला करूँ..’
यातच प्रेमाची इज्जत आहे. स्वत:पेक्षा ‘प्रेम’ या कल्पनेवर प्रेम करणाऱ्यांचं गाणं.. ‘है इसी में प्यार की आबरू..’
‘जमाना कहे मेरी राहों मे आजा,
मुहब्बत कहे मेरी बाहों में आजा,
वो समझे न मजबूरियाँ अपनी क्या है..’
इतक्या कमी शब्दांत दोन्ही बाजूंनी होणारी कुतरओढ राजेन्द्र कृष्ण व्यक्त करतात. (‘न तुम बेवफा हो..’) तर-
‘दर्द में डूबे हुए नगमें हजारों है मगर
साजे दिल टूट गया हो तो सुनाएं कैसे?
बोझ होता जो गमों का तो उठाही लेते
जिन्दगी बोझ बनी हो तो उठाएँ कैसे?
(नक्श ल्यालपुरी- ‘रस्मे उल्फत’)
यावर काही भाष्य करण्याची गरज आहे का? त्यात ‘बोझ’ शब्दाचा ‘जड’ उच्चार, तीव्र मध्यमाचा धारदार टोन खूप काही सांगून जातात. प्रत्येक वेळी सगळ्यात महत्त्वाच्या शब्दावरच तो तीव्र मध्यम आहे. ‘टूट’, ‘बोझ’, ‘आग’ अशा शब्दांवर जेव्हा अचूक तीव्र मध्यम पडतो, तेव्हा काळजात कळ उठतेच.
‘इश्क की गर्मि ये जजबात किसें पेश करूँ,
नगमा ओ शेर की सौगात किसे पेश करूँ,
रंग और नूर की बारात किसे पेश करूँ’
ही खास ‘साहिरी’ मस्ती.. तर ‘दिल ढूँढता है, फिर वही फुरसत के रात दिन’ हा खास गुलजारी, तरल मखमली, हळवा मामला..
या गाण्यांबद्दल पुढच्या भागात..