मदनमोहन हा एक स्वतंत्र पुस्तकाचा विषय आहे. इतकं सगळं विचारमंथन करूनही मदनमोहन पूर्णपणे गवसलाय असं होत नाही. याचं कारण त्याच्या गाण्यांतल्या बारकाव्यांची चर्चा करताना अगणित पलू समोर येत असतात. शास्त्रीय संगीतज्ञांना त्यानं केलेल्या रागमिश्रणाची भूल पडते, तर पाश्चात्य संगीतज्ञांना मेजर- मायनर कॉर्डच्या विलोभनीय कॉम्बिनेशन्सची. सोनिक ओमी, केरसी लॉर्ड आदी मातब्बर मंडळींनी वाद्यवृंद संयोजनात केलेले प्रयोग हा आणखीनच एक वेगळा विषय. आणि रईस खाँची सितार हाही स्वतंत्र भाग..
तर, ‘दिल ढूंढता है फिर वही.’ आणि ‘रूके रूके से कदम’ (गुलजार- ‘मौसम’) ही गाणी ऐकताना जाणवतं की, यातली शब्दांची मांडणी फार वैशिष्टय़पूर्ण आहे. आपण आपले हरवलेले निवांत क्षण शोधताना मागे वळून बघतो, थबकतो, पुन्हा चालायला लागतो. कारण आयुष्य निरंतर प्रवाहाप्रमाणे चालूच राहणार आहे..
‘दिल ढूंढता है । फिर वही । फुरसत के । रात दिन..’
अशी मांडणी केल्यामुळे त्यात थबकणं आलं.. मागे वळून बघणं आलं. या संपूर्ण कवितेत असलेल्या प्रतिमा.. ‘जाडों की नर्म धूप..’, ‘गर्मियों की रात जो पुरवाईयाँ चले..’, ‘वादी में गूंजती हुई खामोशीयाँ..’ अनुभवायला सुधीर मोघ्यांच्या शब्दांत ‘उसळणारं मन’ हवं. या गाण्यातल्या दोन्ही व्हर्शन्स किती उत्कट, किती खोल आहेत! द्वंद्वगीतात भूपेन्द्र फक्त ध्रुवपदातच गातो. पण आवाजाच्या भरीवपणामुळे, त्या घनगंभीर टोनमुळे तो अंतराच गातोय असं वाटतं. पुरुष गायकानं फक्त ध्रुवपदातच ‘डोकावणं’ याआधी ‘आँखों ही आँखों में इशारा’ (‘सीआयडी’- ओ. पी. नय्यर) या गाण्यात दिसलं होतं. ‘रूके रूके से कदम..’मधल्यासुद्धा ‘रूके रूके । बार । बार । चले’ या मांडणीतून पावलांचं अडखळणं ‘जाणवतं.’ पण ‘करार देके’ या ओळीवर ‘करार’ शब्द मात्र ठामपणा, संयम घेऊन येतो.
‘दिल ढूँढता है फिर वही’ (द्वंद्वगीत) मध्ये तालाची काही विलक्षण किमया आहे. जाणकारांना विचारता हे समजलं, की हा एक ‘उलटा’ (दादरा) ताल आहे. लताबाईंनी तर हे गाणं तालावर संपूर्णपणे ‘वर्चस्व’ गाजवत म्हटलंय. तालाला धरून न गाता तालच त्यांच्याबरोबर चालत राहतो. शेवटच्या अंतऱ्यात ‘किसी भी पहाडपर’ हे शब्द ‘नियोजित’ वेळेपेक्षा कितीतरी आधी येतात. पण लयीच्या विलक्षण अंदाजाने ‘लम्हें’ शब्द कमालीच्या सुंदरतेने खाली रिषभापर्यंत आणून जी काही करामत लताबाई करतात.. कुठेही तालाच्या कप्प्यात शब्द बसवण्याची धडपड तर नाहीच, उलट एक स्वच्छंदपणा आहे.. स्वत:च्याच मस्तीत असणं आहे.. ताल येईलच मागून. प्रत्येक गायकाने अभ्यास करावा अशीच ही खासियत आहे.
मदनमोहनच्या काही ‘वेगळ्या’ गाण्यांचा आज आस्वाद घेऊया..
‘चला है कहाँ’ (‘संजोग’)
मदनमोहनची जलद लयीतली गाणी कमी आहेत. अशा गाण्यांपकी खूप चतन्यमय असं हे गाणं.‘चला है कहाँऽऽ’  अशी साद घातल्यानंतर किंचित विरामानंतर ‘दुनिया इधर है तेरी’ला सुरू होणारा तबला.. ‘आजा, आजा’ म्हणताना तो ‘हो’ किती नाजूक! आणि अंतऱ्याच्या शेवटी तर प्रत्येक शब्दावर पेरलेल्या छोटय़ा दाणेदार ताना. प्रत्येक स्वर तेजस्वी.
मेंडोलीन आणि फ्लूट इतकं सुंदर रुंजी घालतं, त्या ओळीभोवती. जणू एखाद्याला म्हणावं- ‘अरे बघ, काय सुंदर समा आहे. आता तर या कळीचं फूल झालंय. तू असा कोरडा राहिलास तर ही बहार मलाच हसेल. आता कुठे ही पायल छमछमतेय. (इथे खरंच घुंगरू वाजतात.) आणि तू चाललास?’
प्रत्येक वेळी या ताना ‘सा’ र पोचल्याक्षणी निघून लगेच ‘चला है कहाँ’चं निषादावर झेपावणं.. खूप अवघड आहे असं ‘सुचणं’.. असं ‘गाणं’!
‘चाँद मध्धम है , आसमां चूप है
नींद की गोद में जहाँ चूप है..’ (‘रेल्वे प्लॅटफॉर्म’)
खूप वेगळी चाल. थोडीशी गूढ. ‘जहाँ चूप है’ म्हणताना ‘जहाँ’ मोती घरंगळल्यासारखा खाली येतो. खूप कमी वाद्यं.. फक्त स्पॅनिश गिटारची साथ.. सौम्य व्हायोलिन्स.. दुसरा अंतरा खूप वेगळ्या चालीचा. आतापर्यंत कोमल गंधार वातावरण गंभीर करत असताना शुक्राच्या चांदणीसारखा शुद्ध गंधार दिलासा देतो.
‘इन बहारों के साये में आजा
फिर मुहब्बत जवाँ रहे ना रहे
जिन्दगी तेरे ना मुरादों पर
कल तलक महरबाँ रहे ना रहे..’
यात ‘जिन्दगी’ या शब्दावरची मध्य सप्तकातल्या गंधारापासून तार सप्तकातल्या गंधारावरची झेप अस्वस्थ करते. ‘चाँद’ म्हणताना एक वेगळीच श्रुती लताबाई लावतात- जी लिहिणं अशक्य आहे. फक्त कानातून हृदयापर्यंत झिरपू द्यायचं हे गाणं.. एखाद्या उदास, रम्य रात्री.
‘रोज की तरह आज भी तारे
सुबह की गर्द में न खो जाएँ
आ तेरे गम में जागती आँखे
कमसे कम एक रात सो जाए..!
‘दो दिल टूटे, दो दिल हारे’ (‘हीर रांझा’)
एक तळतळाट. एका दुखावलेल्या प्रेमिकेचा तडफडणारा जीव. गाण्याच्या सुरुवातीला चक्क एक उसासा ऐकू येतो. ‘दुनियावालोंऽऽ’ म्हणताना आवाज इतका भेदक, तीव्र होतो, की ‘हेच हवं होतं ना तुम्हाला? दोन मनांच्या चिंधडय़ा उडवून काय मिळालं तुम्हाला?’ हा आक्रोश स्वच्छ ऐकू येतो. सतार आणि (अ)शुभसूचक शहनाई या सगळ्या विलापात आणखी भर घालतात. प्रत्येक ओळीनंतर बासरी हळुवार फुंकर घालते.
तिसरा अंतरा या सगळ्याहून वेगळाच.. ‘प्यार तुम्हारा देखा’चे स्वर मध्य सप्तकातल्या शुद्ध धवतावर जातात. ‘दिल का तोडना’ म्हणताना ‘तो’वर दिलेला हलका जोर, ‘तडपोगे तुम भी’ची ती शापवाणी.. एका दुखऱ्या काळजात उमटलेली वेदना- अशी आत आत जखमी करते ऐकणाऱ्याला.
‘सपनो में अगर मेरे’ (‘दुल्हन एक रात की’)
विलक्षण लाडिक चाल. अतिशय निरागस, उच्च अभिरुचीसंपन्न, सुंदर, संयमी प्रणय व्यक्त करणारं हे गाणं.  कुठेही अभिनिवेश नाही. ‘तुम आओ’वरचा षड्ज असा काही तीक्ष्ण लागतो.. तिथेच ताल सुरू. ‘सो जाऊँ’वरची तान कशी सुचली असावी? आणि दुसऱ्या वेळी हीच ओळ घेताना ‘तुम’वरची जागा खासच. ‘गरेसाग’ एवढय़ाच स्वरातली गंमत आहे ती. दोन्ही अंतऱ्यांच्या वेगवेगळ्या चाली बांधताना प्रतिभेचा प्रचंड आवाका तर दिसतोच; पण लताबाईंच्या ‘सो जाऊँ’चा उच्चार अगणित वेळा ऐकावा, तरी प्रत्येक वेळी वेगळी अर्थछटा घेऊन येणारा. हे गाणं एखाद्या लाडावलेल्या, जगातल्या दु:खांशी, संघर्षांशी दुरान्वयानेही परिचय नसलेल्या, स्वत:च्याच विश्वात रममाण असलेल्या युवतीचं वाटतं. ‘मी झोपी जाईन, पण तू स्वप्नात येणार असलास तरच! ‘बाहों की मुझे माला पहनाऊँ तो सो जाऊँ..’
‘माई री मं कासे कहूँ’ (दस्तक)
हे गाणं आहे, बंदिश आहे, भजन आहे, की लोकगीत आहे? नेमकं काय आहे? इतक्या वेगळ्या पोताची ही रचना आहे, की ज्यात शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीताचा एक सुंदर मिलाफ आहे. गंमत म्हणजे ‘मदनमोहनजींच्याच आवाजात हे गाणं जास्त आवडतं,’ असं सांगणाऱ्या रसिकांची संख्या कमी नाही. त्यांचा तो किंचित वेगळीच धार असलेला टोन, तो भाव.. खास अस्सल या मातीतला गंध घेऊन येतो. ‘माई, मया’ असे सुंदर गोडवा असलेले शब्द. ‘पा कर भी नहीं उनको मं पाती’ ही ओळ इतक्या विलक्षण रीतीने खाली येऊन ‘माई री’ला मिळते.. असं एकजीव होणारं ‘’्रल्ल‘ंॠी’ फार क्वचित दिसून येतं. तिसऱ्या अंतऱ्यात ‘दुख ये मीलन का लेके’मध्ये कोमल धवत हलकेच थोपटून जातो..
याशिवाय भव्य आणि प्रयोगशील ऑर्केस्ट्रेशनचं ‘तुम जो मिल गए हो..’, गाण्याच्या पहिल्याच अक्षरावर बारीकसा खटका असणारं (बहुधा एकमेव) गाणं.. ‘आपकी नजरोंने समझा’, मूळची गझल, पण तिचं कव्वालीत केलेलं रूपांतर ‘कभी ए हकीकते मुंतजर’, आशाबाईंच्या आवाजात थंडीची हुडहुडी भरवणारं ‘शोख नजर की बिजलीयाँ’, ‘सबा से ये कह दो’, वेगळ्या ठसक्याचं ‘झुमका गिरा रे..’ अशी किती गाणी आस्वादावीत!
काही गाणी तालाच्या चौकटीला सोडून मुक्तछंदात बांधल्यासारखी.. ‘मुझे ले चलो’ किंवा ‘मं ये सोचकर’ हे तर गाण्याच्या पलीकडे जाणारं ‘कथन’ आहे. विमनस्क आवाजात गायलेलं रफी-आशाचं‘हमसफर साथ अपना छोड चले..’ म्हणजे कायमच्या विरहाचा शेवटचा हुंदकाच. ‘जाना था हमसे दूर..’मध्ये प्रत्येक शब्द गदगदून येतो तो त्या खास उच्चारामुळे. आणि ‘ठिकाने बनाऽऽ लिये’वरचा लांबवलेला कोमल निषाद त्या दूरतेची तीव्रतर जाणीव करून देतो.
प्रामुख्याने स्त्रीस्वरात गाणी देणाऱ्या मदनमोहनला गझलचा बादशहा बनवलं ते तलतच्या मखमली आवाजातल्या हळुवार, उत्कट गाण्यांनी.. ‘फिर वही शाम’, ‘हमसे आया न गया’ ही गाणी नव्हेत, मखमली डबीत जपून ठेवलेली एकेक रत्नं आहेत. ‘कौन आया’ (मन्ना डे) आणि ‘आपके पहलू में..’ (रफी) यांना या गायकांच्या कारकीर्दीत फार महत्त्व आहे. आपके पहलू में..’ ऐकताना काळीज चरचरतं.
मदनमोहननी ‘देख कबीरा रोया’ आणि ‘गझल’ या चित्रपटांत ‘३१्रस्र्’ी३२’ दिली. तीन गाण्यांची ही अनोखी गुंफण इतकी सुंदर.. प्रत्येक गाणं टप्पोरा मोतीच जणू. ‘मेरी वीणा तुम बिन.,’ ‘अश्कों से तेरी हमने’ आणि ‘तू प्यार करे या ठुकराए..’ यात अहिर भरव, पहाडी आणि भरवीत स्वतंत्र अस्तित्व असलेल्या, तरी एकमेकीशी गुंतलेल्या रचना दिसतात. तर ‘गझल’मध्ये ‘नगमा ओ शेर’, ‘रंग और नूर की’ आणि ‘इश्क की गर्मिये’ या गाण्यांत एकाच ‘पेश करूं’ला कमालीच्या वैविध्यांनी नटवणारा साहिर.. आणि त्यांना तशाच वेगवेगळ्या चाली देताना तोडीस तोड प्रतिभा पणाला लावणारा मदनमोहन यांची जुगलबंदीच. प्रतिभेचं कोठार ठासून भरलेलं असलं की उधारउसनवार करावीच लागत नाही. तरीही सज्जाद हुसेनच्या ‘ये हवा, ये रात, ये चाँदनी’ने भारून जाऊन ‘तुझे क्या सुनाऊँ मं दिलरुबा’  बांधल्याचं मदनमोहननी प्रांजळपणे कबूल केलंय.
मदनमोहनजींनी १४ जुल १९७५ ला या दुनियेला अखेरचा सलाम केला. नाहीतरी त्यांचं मन रमत नव्हतंच इथे. कितीतरी शल्यं.. सिनेसृष्टीतलं घृणास्पद राजकारण, प्रतिभा कुस्करणारी स्पर्धा, स्वत:ची मुलंसुद्धा पिकनिकला जाताना दुसऱ्या संगीतकारांची गाणी म्हणताहेत.. कळेल का त्यांना कधी, की आपल्या वडिलांनी काळाच्या पुढचं,- नव्हे, त्याला पुरून उरणारं संगीत दिलं!.. हे सगळं सोडून हा ‘इथला’ नसणारा, क्रिकेटवर, खाण्या-खिलवण्यावर मनापासून प्रेम करणारा, विलक्षण देखणा संगीतकार स्वत:च्या वेगळ्या दुनियेत कायमचा निघून गेला. अगदी ‘वीर झारा’सुद्धा आपल्या ‘त्या’ मदनमोहनला परत नाही आणू शकला. ‘तो’ हरवलाच..
‘जाना था हम से दूर बहाने बना लिये
अब तुमने कितने दूर ठिकाने बना लिये..’
पाणावलेल्या पापण्यांचा सलाम, मदनमोहनजी!       

upsc exam preparation guidance
UPSC ची तयारी : अर्थशास्त्र: आर्थिक एकात्मता
NCERT tweaks Class 12th History book: Harappans indigenous, doubts over Aryan migration
एनसीईआरटी अभ्यासक्रमात बदल; ‘आता आर्य भारतातलेच’, काय सांगते नवे संशोधन?
peter higgs
अन्वयार्थ: ‘देव कणा’मागचा द्रष्टा!
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips
यूपीएससीची तयारी :  भूगोल (भाग २)