डॉ. चैतन्य कुंटे

गतिशीलतेत चैतन्य असते, स्थितीशीलतेत नव्हे. प्रवाहित असण्यात जिवंतपणा असतो, साचलेपणात नव्हे. आणि अवस्थांतर, क्रियांतर आणि मार्गातर योग्य प्रकारे स्वीकारण्यात शहाणपण असते, आडमुठा विरोध करण्यात नव्हे! ‘परंपरा’ म्हणून जी काही बाब आहे, ती आपल्याला अभिसरणाचे महत्त्व शिकवते. नदीचे पाणी वाहते असते तेव्हाच ते उपयुक्त राहते, ते साचले की नासते. शरीरातील रक्ताचे अभिसरण योग्य असेल तर माणूस निरोगी राहतो हे जसे खरे; तसेच धर्माच्या, संगीताच्या बाबतीतही सत्य आहे.

prarthana behere tie knot of pooja sawant and siddhesh chavan
प्रार्थना बेहेरेने पतीसह बांधली पूजा-सिद्धेशची लग्नगाठ! लाडक्या मैत्रिणीच्या लग्नात अभिनेत्री झालेली भावुक, म्हणाली…
Sita & Akbar: How names of two lions became the reason for a plea in Calcutta High Court
अकबराची बहीण लक्ष्मी? अकबर, सीता, तेंडुलकर आदी नावं प्राण्यांना द्यायची पद्धत कशी पडली?
secularism in india conception of secularism in indian constitution
संविधानभान : भारतीय धर्मनिरपेक्षतेचे प्रारूप
loksatta kutuhal article about perfect artificial intelligence
कुतूहल : परिपूर्ण बुद्धिमत्तेचे धोके

धर्माचे असो वा संगीताचे असो- अभिसरण म्हणजे नेमके काय? सोप्या शब्दांत सांगायचे तर ‘वाहते होणे आणि वाहते राहणे’! एका व्यक्तीकडून दुसरीकडे, समुदायाकडे, तसेच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे धर्म वा संगीत पोचवणे आणि विविध स्थळी, भौगोलिक कक्षांमध्ये त्याचा प्रचार व प्रसार होणे ही अभिसरणाची एक अवस्था झाली. व्यक्तीकडून समष्टीच्या पातळीवर, विविध समाजांत आणि मोठय़ा भूभागात हा प्रसार झाल्यावर त्याचा परिणाम म्हणा वा प्रतिसाद म्हणा, धर्म आणि संगीतातही काही बदल होतात. असे बदल होणे ही अभिसरणाची दुसरी अवस्था. त्या- त्या समाजाच्या सांस्कृतिक घडणीनुसार, अभिरुचीनुसार समाज धर्माचरण करतो. संगीताचा वापर करताना आपापल्या परीने धर्माच्या, संगीताच्या आधीच्या स्वरूपाला मुरड घालतो, आपल्या सोयीनुसार बदलतो. ‘सोयीचे शास्त्र’ तयार होऊ लागते. आणि मग धर्माच्या मूळ चौकटीला, संगीताच्या आधीच्या घडणीला या बदलांची दखल घेऊन त्यांना पोटात घेणे, समावेशक होणे भाग पडते. अभिसरणाच्या दुसऱ्या अवस्थेत झालेल्या बदलांना स्वीकारून त्यांना नव्याने शास्त्रसंमत करणे व आपली चौकट व्यापक करणे, ही झाली अभिसरणाची तिसरी अवस्था. अभिसरणातून अशी परिवर्तनाची निरंतर प्रक्रिया चालूच असते. अभिसरणाच्या प्रक्रियेत काही घटक बदलत राहतात, तर काही घटकांचे मात्र मूळ स्वरूपात, किंचितही बदल न करता, अस्सलपणे आणि कट्टरपणेही जतन केले जाते. म्हणूनच अभिसरण झाले तरीही परंपरा टिकून असल्याचा प्रत्यय येत राहतो. मूळ स्वरूपाचाच पूर्णत: कायापालट झाला तर मात्र त्याला अभिसरण न म्हणता ‘स्थित्यंतर’ म्हणावे लागेल.

अभिसरणाच्या या तीन अवस्था वास्तविक कोणत्याही मानवी देवघेवीला लागू पडतात. अशा प्रक्रिया समाज, अर्थकारण, मानसिक उलाढाली इत्यादी बाबतींतही सर्वानाच जाणवत असतील, नाही? नक्कीच जाणवत असतील. कारण अभिसरण हे स्वाभाविकच असते. अभिसरणाचे अनेक मार्ग आहेत. एकमेकांशी बोलणे हा तर अगदी मूलभूत मार्ग झाला. आज डिजिटल युगात माणसाने प्रत्यक्ष आणि भाषिक संवादाच्या व्यतिरिक्त अप्रत्यक्ष, निर्भाषिक, दृक्श्राव्य अशा पातळ्यांवरचा मोठाच संपर्क-व्यूह तयार केला आहे. संभाषणाखेरीज एकमेकांसह आहार, विहार करणे हेही अभिसरणाचे एक प्रभावी माध्यम ठरले आहे. प्राचीन काळापासून आजवरचा आढावा घेतला तर लक्षात येते की व्यापार, धर्म आणि संगीत या तीन घटकांतून अभिसरण प्रचंड प्रमाणात होत राहिले आहे. आणि हे तीन घटकही एकमेकांच्या आधारे स्वत:स हवे तसे अभिसरण करण्याचे धोरण बांधत गेले. आता हेच पाहा ना, व्यापारासाठी म्हणून भारताच्या पश्चिमी क्षेत्रात अगदी प्राचीन काळापासून मध्यपूर्वेतील समुदाय येत राहिले, त्यांच्याबरोबर त्यांचे धर्म आणि संगीतही भारतात रुजत गेले. याचा दाखला ११-१२ व्या शतकातील संगीतविषयक संस्कृत ग्रंथांत ‘तुरुष्कप्रिय राग’ अशा उल्लेखात मिळतो. या व्यापारी वर्गाद्वारेच भारतात प्रथम ख्रिस्ती आणि मुस्लीम धर्माचा शिरकाव झाला- काहीसा चोरपावलांनी; आणि तथाकथित धार्मिक आक्रमणे आणि राजसत्तेच्या वापराच्या बराच पूर्वी!

धर्माचे अभिसरण कसे होते?

ते अनेक परीने होते. धर्माच्या अभिसरणाची अनेक रूपे आहेत- पंथोपपंथांची घडण व निर्मिती, प्रचार, प्रसार, लोकधर्माचे बृहद्धर्मात रूपांतर, लोकदेवतांचे उन्नयन, धर्माचे स्थलांतर, धर्मातील आंतरिक आणि बा संघर्ष व सामंजस्य, व्यक्तीचे वा समूहाचे धर्मातर.. अशी कितीतरी. एका व्यक्तीने दुसऱ्यास वा अनेकांस दीक्षा देणे अथवा समूहास प्रवचनाने उपदेश करणे हे धर्माभिसरणाचे आम मार्ग झाले. धर्मोपदेशकाचे दिव्य वचन ऐकून, त्याचा विलक्षण प्रभाव घडून पंथात प्रवेश करण्याच्या घटना इतिहासात पुष्कळ आहेत. भगवान गौतम बुद्धांचे केवळ काही शब्द ऐकून ‘प्रत्यभिज्ञान’ प्राप्त झाल्याचे व संघात सामील झाल्याचे अनेक प्रसंग बौद्ध साहित्यात वर्णिले आहेत. असेच प्रसंग हिंदू संतपुरुष, इस्लामी चिश्ती वा फकीर, ख्रिस्ती धर्मोपदेशक यांच्या संदर्भात विपुल प्रमाणात नोंदले गेले आहेत. मंदिर, विहार, गुरुद्वारा, चर्च, सिनेगॉग, अग्यारी, मशीद, इ. प्रार्थनास्थळे आणि मठ, मदरसे इ. धार्मिक शिक्षण देणारी केंद्रे ही तर धर्मप्रसाराचे कार्य करतातच; शिवाय यात्रा, धार्मिक उत्सवांच्या वेळी काढल्या जाणाऱ्या मिरवणुका, जत्रा, मेळे अशा उपक्रमांतूनही धर्माचे अभिसरण होत असते.

हे सारे मार्ग काहीसे मवाळ म्हणता येतील. कारण विविध धर्माच्या इतिहासात आक्रमक पद्धतीने धर्माचे अभिसरण झाल्याच्या घटनाही काही कमी नाहीत. विशिष्ट जनसमुदायाच्या आर्थिक वा सांस्कृतिक स्तराला हेरून त्या अनुषंगाने लौकिक बाबींची लालूच दाखवून पारलौकिकाचे गाजर दाखवण्याचा प्रकारही धर्मप्रचारकांनी केला. पद्धतशीर मोहीम आखून, रक्ताच्या नद्या वाहून झालेली धर्मातरे इतिहासात जशी दिसतात, तशीच अनाक्रमकपणे आपल्या धर्माच्या नीतितत्त्वाचे पालन करून शांतपणे, सलोख्याच्या मार्गाने धर्मातरे झाल्याचेही दाखले मिळतात.

संगीताचे अभिसरण कसे होते?

आदिमसंगीतातून लोकसंगीतापर्यंत आणि पुढे कलासंगीत अथवा अभिजात शास्त्रोक्त संगीतापर्यंत होणारे उन्नयन, विविध प्रांतिक संगीतप्रणालींचा उद्गम, लोकधुनांचे राग बनणे आणि लयछंदांचे तालांत रूपांतर होणे, संगीतपद्धतीनुसार वाद्ये, गीतप्रकार, विस्तारक्रिया, गानशैली इत्यादीचा विकास, संगीतकलेचे शास्त्र घडणे, शास्त्राची कलाविष्कारावरची पकड घट्ट झाल्यावर त्या बंधनातून मोकळे होण्याची कलाकारांनी केलेली धडपड व त्यातून झालेले मार्गातर, मग या मार्गातराचे पुन्हा शास्त्रसंमत होणे, संगीतप्रणालींची परस्परांतील देवघेव, संगीताचा विविध प्रांतांत आणि समाजस्तरांत होणारा प्रसार, एका संगीतप्रणालीतून दुसरीत वाद्ये, गीतप्रकार इ.चा होणारा अंगीकार व त्यामुळे त्यांत होणारे बदल, कलासंगीतातील रचनांचे वा रचनातत्त्वांचे जनसंगीतासाठी होणारे उपयोजन, उलटपक्षी जनसंगीताचा कलासंगीतावर होणारा परिणाम.. बाप रे! ही सूची अशी बरीच विस्तृत होऊ शकते बरं!

अभिसरण उभ्या आणि आडव्याही दिशेने होते.

म्हणजे असे की, अभिसरणाच्या प्रक्रियेत गुणात्मक आणि संख्यात्मक स्वरूपाचे बदल होतात. लोकधर्माचे अधिक प्रस्थापित वा नागर धर्मात उन्नयन होणे, लोकदेवतांना अथवा नवनव्या देवतांना मोठय़ा देवतासंघात सामील करणे, लोकमानसाने प्रस्थापित दैवतांची केलेली रूपांतरे आणि त्यांची प्रान्तीय उपासना पद्धती, इ. बाबी धर्माचे उभ्या दिशेचे अभिसरण सूचित करतात. कजरी, चैती अशा मुळात लोकसंगीतातील गीतांचे कलासंगीताच्या मंचावर सादरीकरण होणे, लोकवाद्यांना वा वेगळ्या संगीतप्रणालीतील वाद्यांना आपलेसे करून सांगीतिकदृष्टय़ा अधिक सक्षम अशा वाद्यांची निर्मिती होणे, त्यांची वादनपद्धती विकसित होणे, एखाद्या ठुमरीवरून नाटय़गीत बनणे व पुढे नाटय़गीतावरून भावगीत वा चित्रपटगीत बनणे, एखाद्या जनप्रिय रचनेतील धुनेतून प्रेरणा घेऊन नवा राग बनवणे, चलतीच्या चित्रपटगीताच्या चालींवर धार्मिक गीते बनणे अशी संगीतातील उभ्या अभिसरणाची उदाहरणे देता येतील. धर्माचा विस्तृत भूभागांत, जनसमुदायांत प्रसार आणि स्वीकार होणे अथवा अनेक धर्मपंथांचे रुजणे हे झाले धर्माच्या आडव्या दिशेचे अभिसरण. एखादे संगीत स्थळकाळाच्या सीमा ओलांडून प्रचलित होणे, मोठय़ा प्रमाणात कलाकारांकडून आविष्कृत होत राहणे, मोठय़ा संख्येने गीतरचना निर्माण होऊन संगीतसंच समृद्ध होणे ही संगीताच्या आडव्या अभिसरणाची लक्षणे म्हणता येतात.

धर्मसंगीताचेही अभिसरण होते ना! ते कसे?

धर्माच्या अभिसरणात संगीताचाही मोठा वाटा आहे. संगीताची विलक्षण संमोहक शक्ती ओळखून धर्माने संगीतास केवळ उपासनेचेच नव्हे, तर प्रसाराचेही एक महत्त्वपूर्ण साधन मानले. प्राचीन काळी गाथा गात बौद्ध भिक्खू भारतातून अगदी पूर्वेस चीन, जपानपर्यंत पोचले. जसा धर्मप्रसार झाला, तसेच भारतीय संगीतही तिथे पोचले आणि प्राचीन चिनी व जपानी संगीतावर भारतीय संगीताचा प्रभाव नोंदवला गेला. भारतात मध्ययुगातील विविध वैष्णव पंथांचे अभिसरण त्यांनी निर्माण केलेल्या कीर्तनप्रणालीद्वारे सहज झाले. चैतन्य महाप्रभूंचा संप्रदाय, पुष्टिमार्ग, महाराष्ट्रातला वारकरी पंथ या सर्वाच्या प्रसारात संगीताने निभावलेली भूमिका फारच महत्त्वाची आहे. १०-११ व्या शतकापासून भारतात सूफी पंथ पसरू लागला. एरवी ‘मौसिकी हराम’ म्हणणाऱ्या इस्लामच्या शिया, सुन्नी इ. पंथांनी प्रसारासाठी तलवारीला जवळ केले; मात्र सूफी पंथाने संगीताचा अंगीकार केला. सूफी पंथाने संगीताच्या माध्यमातून जे अभिसरण घडवले ते अधिक परिणामकारक होते. आता हेच पाहा ना, मुस्लीम नसलेले कित्येक गायक आज सूफी पदे, बंदिशी आवडीने गातात, अल्ला मौलाचा गजर करतात आणि नकळत सूफी तत्त्वांचा रंग पसरतोच. रक्तरंजित धर्मातराने जे साधणार नाही ते सूफी संगीताने नक्कीच साधले आहे.

भारतात ख्रिस्ती धर्मासह चर्चसंगीत रुजू झाले. मग भारतात निर्माण झालेल्या चर्चच्या परंपरांत येथील प्रांतीय संगीताचे रंग मिसळले गेले. केरळी चर्चसंगीतात मल्याळी भाषेतील गीते आणि भारतीय रागांचा वापर ऐकला की मजा वाटते. किंवा आपल्या महाराष्ट्रातील चर्चसंगीतात रेव्हरंड टिळकांसारख्या अनेक कवींची जी मराठी गीते आहेत, त्यांत नाटय़संगीताचा प्रभाव दिसतो. ख्रिस्ती धर्मसंगीतामुळे भारताला दोन महत्त्वाची वाद्ये मिळाली : ऑर्गन आणि व्हायोलिन. या वाद्यांना आपण भारतीय लोकांनी स्वीकारले हे खरे, पण आम्ही असे अट्टल, की ‘जसेच्या तसे’ ते घेतले नाही. त्यांच्या बांधणीत, वादनक्रियेत आमच्या सोयीनुसार बदल केले, ‘आमचे’ संगीत वाजवायला सोयीचे असावे अशी बैठक, वादनपद्धती तयार केली.

तर महाराजा, अशी कथा आहे ‘अभिसरणाची’- धर्माच्या आणि संगीताच्याही!

keshavchaitanya@gmail.com

(लेखक संगीतकार, संस्कृती-संगीतशास्त्राचे अभ्यासक व ‘डॉ. अशोक दा. रानडे अर्काईव्हज्’ या प्रयोगकला अध्ययन केंद्राचे संस्थापक-संचालक आहेत.)