|| राजेश्वरी देशपांडे

‘बोहेमिअन राप्सडी’, ‘अ स्टार इज बॉर्न’, ‘ग्रीन बुक’ आणि ‘गली बॉय’ या सगळ्या चित्रपटांमध्ये एक समान दुवा आहे. तो संगीताच्या माध्यमातून मुक्ती मिळवण्याच्या धडपडीविषयीचा. जगाच्या कानाकोपऱ्यात आणि कितीतरी निरनिराळ्या सामाजिक आणि ऐतिहासिक संदर्भामध्ये वावरणाऱ्या या चित्रपटाच्या नायिकांना ‘मुक्ती कोन पथे?’चा सनातन प्रश्न तितक्याच निरनिराळ्या व्यक्तिगत आणि सामाजिक पातळीवर भेडसावतो आहे आणि त्यांचा आपापला मोक्षप्राप्तीचा शोध संगीताच्या वाटेने चालला आहे..

संगीताभोवती गुंफलेल्या तीन चित्रपटांनी यंदाचा ऑस्कर सोहळा गाजवला. फ्रेडी मक्र्युरी ऊर्फ फारोख बलसारा या अद्वितीय गायकाचे आणि त्याच्या ‘क्वीन’ या जगप्रसिद्ध बँडचे चरित्र मांडणारा ‘बोहेमिअन राप्सडी’, लेडी गागा आणि ब्रॅडले कूपर या जोडगोळीचा ‘अ स्टार इज बॉर्न’ हा एका उभरत्या गायिकेविषयीचा आणि मुख्य म्हणजे मानवी नात्यांविषयीचा चित्रपट. आणि ज्याला उत्कृष्ट चित्रपटाचे ऑस्कर (बऱ्याचशा अनपेक्षित रीतीने आणि बऱ्याचशा नाराजीनंतर) मिळाले तो ‘ग्रीन बुक’ हा कृष्णवर्णीय पियानोवादकाच्या वर्णद्वेष्टय़ा दक्षिण अमेरिकेतल्या प्रवासाविषयीचा चित्रपट. हॉलीवूडमध्ये हे चित्रपट गाजताहेत तेव्हाच आपला देशी ‘गली बॉय’ही दिमाखात पडद्यावर अवतरला, हा काही निव्वळ योगायोग मानता येणार नाही.

या सगळ्या चित्रपटांमध्ये एक समान दुवा आहे. तो संगीताच्या माध्यमातून मुक्ती मिळवण्याच्या धडपडीविषयीचा. जगाच्या कानाकोपऱ्यात आणि कितीतरी निरनिराळ्या सामाजिक आणि ऐतिहासिक संदर्भामध्ये वावरणाऱ्या या चित्रपटाच्या नायिकांना ‘मुक्ती कोन पथे?’चा सनातन प्रश्न तितक्याच निरनिराळ्या व्यक्तिगत आणि सामाजिक पातळीवर भेडसावतो आहे आणि त्यांचा आपापला मोक्षप्राप्तीचा शोध संगीताच्या वाटेने चालला आहे.

‘ऑस्कर’ मिळवलेला ‘ग्रीन बुक’ हा खरोखरच या सांगीतिक प्रवासातला अगदी कच्चा दुवा. एका प्रथितयश पियानोवादकाच्या आयुष्याची पाश्र्वभूमी त्याला मिळाली असली, तरी प्रत्यक्षात ती कहाणी काळ्या-गोऱ्यांमधल्या विद्वेषाची; म्हणजे या विद्वेषाच्या कृतक निराकरणाची कहाणी आहे. वांशिक विद्वेषाने आत्ताआत्तापर्यंत होरपळणाऱ्या दक्षिण अमेरिकेत एक गरीब गोरा, एका श्रीमंत, प्रसिद्ध काळ्याचा रक्षणकर्ता कसा ठरतो याची गोष्ट ‘ग्रीन बुक’ने सांगितली. त्याला संगीताची निव्वळ ठळक पाश्र्वभूमी लाभली.

इतर तीन चित्रपटांचे मात्र तसे नाही. त्यात संगीत मुक्तीदायी बनून अवतरते. ‘अ स्टार इज बॉर्न’ या चित्रपटाचा यंदाचा- १९३७ नंतरचा तिसरा की चौथा रिमेक. म्हणजे गेल्या शतकभरात अनेकदा या कथेने अमेरिकन प्रेक्षकांना रिझवले. आपलेसे केले. दिमाखदार संगीत कारकीर्द असणाऱ्या परंतु एकटेपणाच्या आणि ड्रग्जच्या विळख्यात सापडलेल्या एका नामवंत रॉकस्टारला तितकीच दिमाखदार गाणारी शिष्या, मैत्रीण आणि जिवाभावाची सहचारिणी सापडते; आणि संगीताच्या दुनियेत एक नवा तारा उदयाला येतो त्याची ही गोष्ट. पण खरे म्हणजे, ही गोष्ट इतक्या चार ओळीत संपत नाही. तिच्यात नायक-नायिका दोघांच्याही व्यक्तिगत आणि सामाजिक गुंतागुंतीचे अनेक धागे मिसळले आहेत आणि त्यातून जीवनाचा तळ सापडता सापडू नये अशी जीवघेणी उलघाल तयार झाली आहे. ‘अ स्टार इज बॉर्न’ मध्ये या उलघालीला संगीत वेढून राहते. त्यात नायक-नायिकेची, नात्यांची आणि आयुष्यांची ओढाताण जशी शब्दबद्ध आणि स्वरबद्ध होते तितकीच त्या ओढाताणीतून मुक्तीची त्यांना लागलेली आस! ‘लेडी गागा’ने आपल्या दमदार आवाजातील गाण्यांनी या चित्रपटाला एका अनोख्या उंचीवर नेऊन ठेवले.

ब्रॅडले कूपरने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट सामाजिकतेला स्पर्श करत असला तरी तो गुरू आणि त्याची शिष्या- त्याची प्रेयसी.. त्याचे सर्वस्व यांच्यातल्या अनेकपदरी व्यक्तिगत नात्यांभोवती विणला आहे. ‘क्वीन’च्या बोहेमियन राप्सडीत सामाजिकता अधिक ठळक, अधिक उघडय़ावाघडय़ा पद्धतीने येते. ‘क्वीन’ या सत्तरच्या दशकातील जगप्रसिद्ध बँडचा शोमन- बँडचा मुख्य गायक- फारोख बलसारानामक मूळचा भारतीय. परंतु टांझानियामार्गे ब्रिटनमध्ये स्थायिक झालेला एक परिघावरचा स्थलांतरित. चित्रपटाच्या सुरुवातीलाच त्याला ‘पाकी’ म्हणून त्याचे गरीब सहकारी हिणवतात. ते पुरेसे नाही म्हणून की काय, आपल्या (सम) लैंगिकतेतून झालेली घुसमट नेमकी कशी हाताळायची या प्रश्नानेही फारोख ऊर्फ फ्रेडीला घेरले आहे. पण या सामाजिक आणि त्यातून तयार झालेल्या व्यक्तिगत नात्यांच्या गुंतागुंतीला फ्रेडीने बेदरकारपणे शिंगावर घेतले, ते आपल्या स्वर्गीय संगीताच्या जोरावर. ‘मी जन्मलोच नसतो तर बरे झाले असते,’ अशी व्यथा आपल्या गाण्यातून कधीमधी मांडतानाच; आपल्या संगीताच्या धगीने जगाला भाजून काढणारा ‘मि. फॅरेनाईट’ म्हणूनही फ्रेडी दिमाखाने सुमारे दोन दशके जगभर वावरला. इतकेच नव्हे, तर ‘वी आर द चॅम्पियन्स’ अशी त्याने आपल्यासमवेतच्या रॉक संगीताच्या जादूत हरवलेल्या जगभरातल्या तत्कालीन तरुणांचीही खात्री पटवून दिली. ‘बोहेमिअन राप्सडी’ने रामी मलिक याला एक गुणी नट म्हणून तर पुढे आणलेच, पण ‘फ्रेडी’च्या आणि ‘क्वीन’च्या संगीतातून ज्या मुक्तिदायी वाटेचे दिशादिग्दर्शन झाले, त्या वाटेची आशादेखील पुन्हा एकदा जागी केली.

रामी मलिकचा फ्रेडी जितका हवाहवासा, तितकाच एरवीच्या उल्लूमशाल रणवीर सिंगने साकारलेला ‘गली बॉय’ भारतीय प्रेक्षकांसाठी हवाहवासा होता. रणवीर सिंगमधल्या गुणी नटाला नेमके कसे हाताळायचे हे जोया अख्तर- रिमा कागती या दिग्दर्शक / निर्मात्या जोडगोळीला नेमके कळते. ‘दिल धडकने दो’सारख्या तद्दन फिल्मी चित्रपटातला रणवीर सिंगचा तरल अभिनय आठवून पाहा. ‘गली बॉय’मध्येदेखील नायकाच्या आणि सर्वाच्या व्यक्तिरेखेच्या सशक्त बांधणीतून गुंतागुंतीच्या समाजवास्तवाच्या संयत चित्रपटीय हाताळणीतून जोया आणि रिमाने एक अनवट चित्रपट तयार केला आहे. या चित्रपटाचे सर्वात महत्त्वाचे यश म्हणजे त्याचा शेवट. आपल्या भोवतीचे जे अस, जीवघेण्या ताण्याबाण्यांनी भरलेले वास्तविक जग आहे, ते तसेच्या तसे (किंबहुना अधिक गडद रंगात) चित्रपटात आणायचे तर खरे. पण त्याचा शेवट प्रेक्षकांसाठी त्यांच्या आशा जिवंत ठेवणाराही करायचा.. यातली कसरत भल्या भल्या दिग्दर्शकांनाही जमत नाही. (उदा. आठवा विशाल भारद्वाजचा ‘मकबूल’) जोयालाही ती आजवर जमली नव्हती (उदा. आठवा ‘लक बाय चान्स’). गली बॉयमध्ये मात्र सुदैवाने तसे घडले नाही. ‘धारावी’च्या आणि जगण्याच्या बजबजपुरीत अडकलेल्या मुरादला रॅप म्युझिकची मुक्तिदायी वाट सापडते खरी; पण या वाटेवरची वाटचालदेखील रोजच्या जगण्याइतकीच अवघड आहे याचे भानदेखील ‘गली बॉय’ला आहे. आणि ते भान त्याच्या एका नव्या सुरुवातीचे केवळ दिशादिग्दर्शन करणाऱ्या शेवटात व्यक्त होते.

२०१९ सालच्या आगेमागे, जगाच्या दोन टोकांना तयार झालेले हे तीनही- चारही चित्रपट ‘म्युझिक मुक्ती’च्या एका समान धाग्याने बांधले गेलेले असले तरी त्यांच्यात एक ठळक फरकही आहे. आणि त्या फरकामुळे त्यांच्या मुक्तिदायी वाटचालीचा पोतही बदलतो. ‘गली बॉय’वगळता हॉलिवूडमधले संगीताविषयीचे हे सगळे नवे चित्रपट खरे म्हणजे जुन्या काळात घडतात. ‘बोहेमिअन राप्सडी’मधील सामाजिकता सत्तरीतली आहे. ‘ग्रीन बुक’मधली त्याहून जुनी. आणि ‘अ स्टार इज बॉर्न’ला सामाजिकतेचे एक हलके कोंदण लाभलेले असल्याने शतकभराच्या काळात त्याची पुन्हा पुन्हा निर्मिती होऊ शकली.

संगीतातून मोक्षप्राप्तीची कल्पना खरे म्हणजे काही नवी नाही. ती एक आदिम संवेदना आहे. परंतु या संवेदनेला तितक्याच संवेदनशील सामाजिकतेची जोड मिळाली तरच ते संगीत खऱ्या अर्थाने मुक्तिदायी, अर्थवाही बनते. स्थलांतरित म्हणून ब्रिटनमधले आपले अधांतरी अस्तित्व आपले (गाण्याला अनोखी फिरत देणारे, पण दिसायला बेढब) पुढे आलेले चार हात, आपली (जगाच्या नजरेत कुरूप असणारी) समलैंगिकता अशा सगळ्या व्यक्तिगत-सामाजिक ताण्याबाण्यांच्या नाकावर टिच्चून फ्रेडी मक्र्युरी एक बेदरकार, विलोभनीय आयुष्य स्वत:च्या अटींवर जगू शकला. इतकेच नव्हे, तर त्या बेदरकार आयुष्याची नशा त्याने जगभर पेरली ती सत्तरच्या दशकातल्या अशा बेदरकारपणाची संधी देऊ करणाऱ्या जागतिक पातळीवरील सामाजिकतेच्या जोरावर. सत्तरीतल्या त्या उदारमतवादी जगात स्थलांतरितांचे स्वागत होते. वैयक्तिक महत्त्वाकांक्षांच्या पूर्तीचे आश्वासन देणारी, समृद्धीचा आभास का होईना निर्माण करणारी सशक्त जागतिक भांडवली व्यवस्था होती. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या होरपळलेल्या जगात नांगी टाकलेला आणि म्हणून आंतरराष्ट्रीयवादाची भलामण करणारा सौम्य राष्ट्रवाद होता. आणि म्हणून फ्रेडी मक्र्युरीच्या संगीत स्वप्नांची पूर्तता लाखो रसिकांसमोर रंगलेल्या जागतिक मैफलीत आणि बोहेमिअन राप्सडीसारख्या त्याच्याइतक्याच अनवट सुरावटीत झाली. उपाहारगृहात परिचारिका म्हणून काम करणाऱ्या ‘अ स्टार इज बॉर्न’मधील ‘लेडी गागा’ला आपल्या सामान्य आयुष्यातून सुटकेचा मार्ग जसा संगीतात शोधता आला, तसाच संगीताच्या माध्यमातून वैयक्तिक नात्यांचा तळ शोधण्यासाठीचा अवसरही प्राप्त झाला.

‘गली बॉय’ला मात्र हे भाग्य नाही. तो आत्ताचा एका बेढब, कुरूप सामाजिकतेत साकारणारा चित्रपट आहे. मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधणारी, हिंदू-मुस्लीम शत्रुत्वसंबंधांना मध्यवर्ती मानणारी, जागतिकीकरणाच्या भंगलेल्या स्वप्नानंतर दुर्मुखलेल्या किरटय़ा भांडवलशाहीत वावरणारी ‘गली बॉय’ची सामाजिकता आहे. या सामाजिकतेत वास्तविक मुक्तीचे अवसर जसे मर्यादित होतात, तसेच संगीताचे मुक्तिदायी स्वरही अवघडतात. म्हणून ‘गली बॉय’ मुरादची महत्त्वाकांक्षा गल्लीतल्याच रॅमर जुगलबंदीपुरती जशी मर्यादित होते, तसाच चित्रपटाचा शेवटही वास्तविकच राहतो. गली बॉयच्या म्युझिक मुक्तीचे त्याच्या वास्तविक जगण्यातल्या मुक्तीशी नाते जुळेलच किंवा कसे याची अजिबातच खात्री नसल्याने (किंबहुना ते जुळणार नाही याचीच खात्री असल्याने) जोया-रिमांनी मुरादला ‘गली बॉय’च ठेवले आहे.

rajeshwari.deshpande@gmail.com