‘लगे रहो मुन्नाभाई’ हा चित्रपट बघताना मला सारखं वाटत होतं, की संजय दत्त आणि अर्शद वारशीच्या तोंडी इतकी मधाळ गाणी काय कामाची? तसे ते सभ्य असले तरी मुळात ते दोघे ‘भाई’ आहेत. त्यांच्या तोंडी ‘हिप-हॉप’च पाहिजे! न्यूयॉर्कमधल्या काळ्या माणसांच्या गल्ल्यांमध्ये जन्मलेलं ते नादावर उडय़ा मारणारं संगीत, त्यामधलं ‘रॅप’ आणि तो रेकॉर्ड घुमवणारा डी. जे. हे आपल्याकडंही तसं अपरिचित चित्र राहिलेलं नाही. निदान ‘हिप-हॉप’ हा शब्द तरी पुष्कळांनी ऐकलेला असतो. तो शब्द टी.व्ही.वरच्या नृत्यस्पर्धामध्ये आपण ऐकलेला असतो. ‘हिप-हॉप डान्स’ आपण तेव्हा बघितलेला असतो. पण ‘हिप-हॉप’ ही संज्ञा फार व्यापक आहे. हिप-हॉप नृत्यशैली हा त्याचा एक भाग झाला. भिंतीवर रंगांच्या स्प्रेनं चितारलेली मोठमोठी चित्रं आणि अक्षरं मिरवणारी ‘ग्रॅफिती’ हेही हिप-हॉपचंच एक अंग आहे. ‘ब्रेक-डान्सिंग’ हाही आपला परिचित शब्द.. तोही हिप-हॉपमधलाच. आणि ठेका धरून नुसते शब्द म्हणणारं ‘रॅप’ गाणं आपण हिंदी-मराठीतही ऐकलेलं आहे. ते म्हणजे तर हिप-हॉपचा प्राणच! तालाच्या आवर्तनाशी खेळणारं, काळी पाच किंवा मायनर एफ्  वगैरेची चिंता न करणारं ते शब्द-गाणं! हिप-हॉपमध्ये जितकं शब्द-प्राधान्य दिसतं तितकं क्वचितच कुठल्या संगीतप्रकारामध्ये आढळत असेल. शब्दांचा तालासोबत चाललेला दंगा हिप-हॉपमध्ये असतो. त्याला ‘चाल’ अशी नसते. पण मागे सुरावटीला वाद्यं एखादी धून वाजवत राहतात. ते गाणं नेहमीच द्रुतलयीत नसतं, तर संथ लयीत आरामात चालणारं रॅपही पुष्कळदा दिसतं. हे मी एवढय़ासाठीच सांगितलं, कारण आपल्याकडे ‘रॅप’ हे जोरजोरात, जलद ठेक्यावर, घाईघाईत, श्वास न घेता गायचं गाणं असल्याची चुकीची समजूत बऱ्याचजणांची झालेली दिसते.
पण हिप-हॉपमध्ये शब्दांचा केवळ नाद नाही, तर अर्थही फार मोलाचा असतो. न्यूयॉर्कच्या उपनगरांमधल्या त्या काळ्या माणसांच्या वसाहती, तिथलं दारिद्रय़, गुन्हेगारी, चोऱ्यामाऱ्या, दादागिरी, अमली पदार्थाचं सेवन आणि व्यापार हे सारं जर हिप-हॉप नसतं तर गोऱ्या अमेरिकेसमोर समर्थपणे आलंच नसतं. रॉक संगीत हेदेखील सामाजिक आशय मांडणारं आहे; पण ‘हिप-हॉप’ म्हणजे समूर्त समाज! हिप-हॉपमध्ये शिवराळ भाषा असावी, थोडा उथळपणा असावा यात काही आश्चर्य नाही. ते थेटपणे संवेदन मांडणारं गाणं आहे. ‘एमिनेम’ या गायकाचं हे गाणं बघा ना! तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बुश यांच्यावर नावानिशी थेट हल्ला चढवणारं ते गाणं आहे. एमिनेमचं हिप-हॉप हे डार्क ह्य़ुमरचं, हिंसेचं, उपरोधाचं तऱ्हेवाईक रसायन आहे. या गाण्याच्या व्हिडीओमध्ये शाळांमधली मुलं राष्ट्रशपथ घेताना सुरुवातीला दाखवली आहेत. (ते किती सुंदर, कलात्मक उपयोजन आहे!) त्या निरागसांच्या राष्ट्रशपथेचं आणि वर्तमानाचं काही नातंच राहिलं नसल्याचं एमिनेम किती सहज दाखवतो. मग आपल्याला दिसतो एक भव्य मोर्चा. त्वेषानं मुठी वळवून घोषणा देणारा. तो मोर्चा बघता बघता वाढत जातो. बुशच्या युद्धखोर भूमिकेवर टीका करतो. शेवटाला तो मतदान केंद्रात जातो आणि मत देऊन मोर्चाचं विसर्जन होतं. (तो मोर्चा इतका आक्रमक आहे, की दुसऱ्या देशात त्यानं बहुदा राष्ट्राध्यक्षाचं घर जाळलंच असतं!) आणि हे त्या मोर्चाच्या तोंडी असलेले शब्द :
‘Stomp, push, shove, mush, Fuck Bush
Untill they bring our troops home’
(गर्जा, ढकला, चिरडा- फक्  बुश!
सारं सैन्य परतल्यावरच होऊ आम्ही खूश!)
त्यामधल्या ‘फक्  बुश’ या अभिव्यक्तीबाबत मी विचार करतो आहे. भारतात निवडणूक प्रचारामध्येही पंतप्रधानाला थेट शिवीनं संबोधणारं प्रचारगीत माझ्या ऐकिवात नाही. अमेरिकेमधला संतप्त काळा तरुण तसं करू शकतो. ते चांगलं की वाईट, या वादात पडण्यापेक्षा मला ही वस्तुस्थिती मांडायची आहे, इतकंच. आणि हेही मला मांडायचं आहे- ही अशी अभिव्यक्ती पॉपमध्ये अशा सहजतेनं येऊ शकत नाही. हिप-हॉपमध्ये अपशब्द ज्या सहजतेने येतात, त्यामुळे ते खटकत नाहीत. ते तसं असणं नैसर्गिकच असतं. खेरीज, एखाद्याला तशा शब्दांचं वावडं असेल तरी हिप-हॉप स्वत:च्या लयबद्धतेनं त्याला जिंकून घेतं. ती मघाचीच ओळ पाहा ना.. ‘स्टॉम्प, पुश, शोव्ह, मुश, फक्  बुश’ या एका ओळीत केवढी यमकं आहेत.. केवढी नादवत्ता आहे!
हिप-हॉपचं सामाजिक वळण आपण समजू शकतो, पण त्याचा उपपंथ असलेल्या ‘गँगस्टा रॅप’चा दणका सगळ्यांना पेलणारा नाही. गँगस्टा रॅप १९८० च्या आसपास जन्माला आलं. ‘गँगस्टर’ या शब्दाचा तो बोलीभाषेमधला उच्चार होता. आणि न्यूयॉर्कच्या त्या काळ्या गल्ल्यांमध्ये तो केवळ उच्चार नव्हता, तर रोजची वस्तुस्थिती होती. गल्लोगल्लीचे भाई होते. त्यांचे ठरलेले हप्ते होते. स्मगलिंग होतं. आणि अमली पदार्थदेखील तिथे हजर होतेच. बंदुकांचे आवाज हे तिथल्या कोवळ्या पोरांना सरावाचे होते. आणि वर्षांला एखादा मुडदा तरी तिथे पडत असेच. टोळ्या फक्त काळ्यांच्याच नव्हत्या, गोरेही त्यात होतेच. (इथेच एक नोंद : अमेरिकन ‘ब्लॅक’ मंडळींना मराठीमध्ये ‘कृष्णवर्णीय’ असं संबोधतात. पण मी हेतूत:च ‘काळे’ असं म्हणतो आहे. ‘ब्लॅक’ शब्दामधलं वजन हे ‘कृष्णवर्णीय’ असा संस्कृतोद्भव शब्द वापरताना नाहीसंच होतं.) तर या काळ्या-गोऱ्यांच्या टोळ्या एकत्र कार्यरत असल्या तरी पोलीस खूपदा फक्त काळ्यांनाच पकडायचे. निदान असा काळ्या समाजाचा समज होता. मग त्या गाण्यातही हिंसा आली. खूनखराबा आला. अन्यायाची भावना उतरली. त्यात हिप-हॉपला नवा फाटाच फोडला गँगस्टा रॅपनं. गँगस्टा रॅप हे एकाएकी काळ्या माणसाचा प्रवक्ता बनून गेलं. (ते प्रस्थापित, सुशिक्षित काळ्या मंडळींना तितकंसं पसंत नसावं असं म्हणायला वाव दिसतो.) ब्रुकलिनच्या त्या गल्ल्यांमधली भकास आणि भंकस आयुष्य मजेत भोगणारी पोरटी गाऊ लागली..
‘A bunon of bad Brooklyn kids that always had pistols
Broken dreams and broken homes, we always had issues’
ब्रुकलिनमधले ते सदोदित बंदुका बघणारे किशोर, त्यांची उद्ध्वस्त घरं आणि उद्ध्वस्त स्वप्नं- आणि मग पैशासाठीची त्यांची ओढ, ते मिळवताना कुठलाही विधिनिषेध नसण्याचं त्यांचं तत्त्वज्ञान Steal money, kidnap money, kill money’) – हे सारं चित्र मला फार खरं वाटतं, बोलकं वाटतं. ते जगणं माझं नाहीच. माझ्या जवळचंही नाही. पण भारतात माझ्या वयाच्या अनेक तरुणांचं जगणं तशाच तऱ्हेचं आहे हे मला पक्कं ठाऊक आहे! ‘We always had issuesl’ हे वाक्य मग धारावीतला तरुणही म्हणूच शकतो. त्यांच्यामध्ये काळा-गोरा भेद आहे, तशीच आपल्याकडे जातीची उतरंड आहे. आणि त्यांच्याकडचं दारिद्रय़ हे आपल्या दारिद्रय़ापुढे मान खाली घालेल! पण मग आपल्या गल्ल्यांमधनं असं संगीत तयार झालं आहे का? की असंतोषाची अभिव्यक्ती ही गणपतीच्या पुढय़ात ‘काला कौआ काट खायेगा’ यासारख्या गाण्यावर नाचताना हरवून, विरून जाते? काळ्यांनी स्वत:च्या अनुभवांमधून स्वत:चं संगीत घडवलं आणि ते साऱ्या समाजापुढे (फक्त काळ्यांपुढे नव्हे!) नेलं, पोचवलं आणि गाजवलंही. आपल्या गल्ल्यांमधलं संगीत नक्की कुठलं आहे? की बॉलीवूडची प्रेमगीतंच तिथे नांदत आहेत? संगीत हे श्रवण‘सुख’ असल्याच्या भारतीय मानसिकतेचा तर तो परिणाम नसेल? वाचकांनो, कळवा तुम्हाला काय वाटतं ते!
तोवर मला आठवू दे- मी पाहिलेल्या गल्ल्या, वस्त्या, मोहल्ले; आर्थिक विषमता, गुन्हेगारी आणि असाक्षरता यांचं गरगर फिरणारं दुष्टचक्र; जन्मजात विषमतेपोटी उगवलेला उद्वेग आणि वैताग; अन् मग काळी पाच किंवा सहाची पर्वा न करता गाण्यातून उमटलेला तप्त नि:श्वास! ऐकू दे मला एखादं हिप-हॉप तोवर!    ल्ल