आमच्या घरात माझे आई-बाबा, बहीण शोभाताई आणि मी, आम्हा सगळ्यांना गाणं गायला आणि ऐकायलाही आवडायचं. घरात रेडिओ आल्यावर मग काय विचारता! शास्त्रीय संगीतापासून फिल्मी संगीतापर्यंत व्हाया लोकसंगीत (विविध भारती केंद्रावरचा चौबारा कार्यक्रम किंवा पुणे केंद्रावरचं पोतराजाची गाणी, धनगरी ओव्या किंवा गोंधळ, भारूड वगैरे जानपद संगीत) आणि हो, कीर्तनसुद्धा.. सगळ्यांचं आम्हाला अप्रूप. बहिणीचा ओढा ललित संगीताकडे जास्त. त्यामुळे नवं गाणं आवडल्यावर ते आत्मसात करायला, गाणं ऐकता ऐकता त्याचे शब्द लिहून घेण्याची तिची कोण धडपड चाले. मिळेल तो कोरा कागद आणि पेन अगर पेन्सिल घेऊन गाणं उतरवून घेणं आणि नंतर गाण्याच्या वहीमध्ये सुवाच्य अक्षरांत ते पुन्हा लिहिणं.. पुढे लग्न होऊन ती सासरी गेली, तोपर्यंत मी तो वसा उचलला होता. दोनशे पानी दोन वहय़ांमध्ये हिंदी, मराठी गाणी मी गोळा केली होती. त्याच्या जोडीला चित्रपटगीतांच्या पद्यावल्या.. माझा एक छांदिष्ट आतेभाऊ होता. रामभाऊ नावाचा. उत्तम हार्मोनियम वाजवायचा. माझ्याहून २५ वर्षांनी मोठा. त्यानं मला त्याच्याजवळच्या ३०-३५ चित्रपटांच्या गाण्यांच्या पद्यावल्या दिल्या.

विदर्भात मराठीपेक्षा हिंदी-उर्दूचाच माहौल. त्यामुळे हिंदी चित्रपट आणि त्यातलं संगीत प्रचंड लोकप्रिय. भुसावळ आणि अमरावती येथे चित्रपटांची वितरण व्यवस्था एकवटलेली. त्यामुळे सर्वात आधी हिंदी चित्रपट विदर्भात प्रदर्शित व्हायचे. या आगामी चित्रपटाच्या जाहिरातीचे बोर्ड चित्रपटगृहाच्या आवारातल्या भिंतींवर प्रदर्शनपूर्व सहा महिने ते वर्ष वर्ष आधी झळकत असायचे. याच प्रसिद्धीचा भाग म्हणून की काय, या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी किंवा थोडं आधी या चित्रपटगीतांच्या पद्यावल्या प्रकाशित होत. प्रकाशक एफ. बी. बुऱ्हानपूरवाला सेन्ट्रल प्रकाशन, सिंप्लेक्स बिल्िंडग, पाववाला स्ट्रीट, कृष्ण सिनेमा, न्यू चर्नी रोड, मुंबई-४ आणि प्रकाशक एस. युसूफ, मिनव्‍‌र्हा बुक डेपो, महात्मा फुले मार्केट, पुणे-२ येथून प्रकाशित होणाऱ्या या पद्यावल्यांची किंमत एक आणा, ६ नये पैसेपासून बदलत्या काळाबरोबर २५ पैशांपर्यंत वाढत गेली. साधारणपणे ४ इंच बाय ५ इंच साईझच्या चार पानांवर पाठपोट छापलेल्या पद्यावलीत चित्रपटातली ११-१२ गाणी असत.

Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
ग्रामविकासाची कहाणी
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी

लाल, निळ्या, हिरव्या, गडद तपकिरी अगर काळ्या अशा कुठल्या तरी एका रंगात चित्रपटातल्या तारे-तारकांच्या फोटोसह चित्रपटाचे नाव किंवा श्रेयनामावलीसह जाहिरातच मुखपृष्ठावर असे. कमी गाणी असतील तर दोन चित्रपटांची गाणी त्यात अंतर्भूत केली जात. मुखपृष्ठाच्या मागल्या बाजूस चित्रपटाच्या कथेचे सार/ पूर्वपीठिका (एका पानात मावेल तेवढीच) अपूर्ण दिले असायचे आणि ‘आगे पर्दे पे देखिये’ किंवा मराठी चित्रपटाच्या पद्यावलीत ‘पुढील भाग प्रत्यक्ष पडद्यावर पाहा’ असा अनाहूत सल्लाही. गाणं गाणाऱ्या गायक/गायिकांची नावं किंवा कथेतल्या पात्रांची नावं गाण्याच्या शीर्षस्थानी दिलेली असत अन्यथा त्या त्या ओळींच्या आधी गाणाऱ्या आवाजाचा लडका (पुरुष स्वर) किंवा लडकी (स्त्री स्वर) असाही गमतीदार उल्लेख आवर्जून केलेला असे. गाणी छापून जागा उरल्यास प्रकाशकाच्या इतर प्रकाशनांच्या किंवा अन्य जाहिराती असत. उदाहरणार्थ, तलत मेहमूद के खास गाने, मुकेश के गीत, कु. लता मंगेशकर व सौ. आशा भोसले यांनी गायलेली अनमोल भावगीते, कमजोर क्यो रहते हो (मोंगा फार्मसी, अमृतसर), ए-वन इंग्लिश टीचर (भाग १ ते ४८).

आमच्या अकोल्याला ताजना पेठेतल्या मुख्य रस्त्यावर दुतर्फा-अकोल्यातली माणेक, प्लाझा, श्याम, रिगल, शालिनी, चित्रा अशी सहा आणि चित्रा टॉकिजला काटकोनात असलेलं वसंत अशी एकूण सात चित्रपटगृहे होती. रिगलच्या बाहेर फुटपाथवर गाण्याच्या पद्यावल्या विकणारा बसे. मी त्याचं खास गिऱ्हाईक. माझ्या फर्माईशीवरून तो कुठून कुठून मला जुन्या चित्रपटांच्या पद्यावल्या आणून देई. ‘चोरी चोरी’ या चित्रपटाची पद्यावली तर त्यानं प्रथम प्रदर्शनाच्या वेळी चित्रपटाच्या गाण्यांची जी पुस्तिका एव्हीएम या मद्रासच्या चित्रनिर्मिती संस्थेनं छापली होती, ती कुठून तरी मिळवून मला दिली होती. चित्रपटातल्या गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका निघत, पण त्या विकत घेण्याची ऐपत नसलेल्या माझ्यासारख्या लाखो रसिकांना ती गाणी रेडिओवर, सार्वजनिक लाऊड स्पीकरवर ऐकून अधुरी राहिलेली तहान या पद्यावल्यांच्या मदतीनं स्वत: गाऊन भागवावी लागे. मराठी-हिंदी गाण्यांच्या वहय़ा आणि शेकडय़ांनी जमवलेल्या चित्रपटगीतांच्या पद्यावल्या हा त्या वयातला माझा आनंदाचा अनमोल ठेवाच होता. हवं तेव्हा हव्या त्या गाण्याच्या विश्वात नेणारी ती जादुई वाट होती. क्रिकेटची छायाचित्रं आणि देशोदेशीची पोस्टाची तिकिटं गोळा करण्याचे छंद मागे सरून या गाण्यांच्या नादानं मी पूर्णपणे झपाटलो होतो.

त्यामुळे हिंदी चित्रपटांच्या गाण्यांमधले काव्यमूल्य, त्यातल्या शब्दकळाही मला मोहित करू लागल्या. साहिर लुधियानवी, शैलेंद्र यांसारख्या अभिजात कवी-गीतकारांची प्रतिभा चित्रपटगीतासारख्या उपयोजित माध्यमांच्या सीमित मर्यादांमध्येही कशी लखलखून प्रकटायची, हे जाणवताना थरारून जायचो. ‘छोटी बहेन’ चित्रपटाकरिता ‘जाऊ कहा बताए दिल, दुनिया बडी ही संगदिल’, ‘चांदनी आयी घर जलाने, सुझे न कोई मंझील’ असं गाणं लिहिताना ‘चांदनी आयी घर जलाने’सारखी विरोधाभास मांडणारी सुंदर प्रतिमा शैलेंद्र सहजपणे लिहून गेला. ‘घरसे चले थे हम तो खुशी की तलाश में, गम राह में खडेम् थे वोही साथ हो लिए’ असं लिहिणारा साहिर किंवा ‘सुख है एक छांव ढलती, आती है जाती हैं, दुख तो अपना साथी है’ असं मनाला समजावणारा मजरूह सुलतानपुरी यांच्या गीतांनी किती साध्या शब्दांत जगण्यातलं कठोर वास्तव मांडलं. शकील बदायुनी, राजेंद्र कृष्ण, हसरत जयपुरी, राजा मेहदी अली खान, प्रदीप, भरत व्यास, कैफ़ी आझमी, जाँ निस्सार अख्तर, इंदिवर, नीरज, गुलज़ार यांसारख्या अनेक नामवंत गीतकार-कवींनी हिंदी चित्रपटांकरिता कथेतल्या प्रसंगानुसार त्याचबरोबर कथेचा विषय, त्यातल्या पात्रांची संवाद बोली, स्थळ आणि काळ याचं भान ठेवून आणि कधीकधी संगीतकारांच्या तयार चालींवर चपखल बसतील असे नादमधुर आणि अर्थवाही शब्द लिहून सुंदर गीतस्वरूप काव्याची निर्मिती केली.

चित्रपटगीतांच्या शब्दसामर्थ्यांची मला जाणीव करून द्यायला या पद्यावल्यांचा साऱ्या प्रवासात कळत नकळत खूप हातभार लागला.

चित्रपटाची पद्यावली घेऊन त्यातल्या गाण्यांची उजळणी करणं हा माझा फावल्या वेळातला छंद. पुढे हाती बुलबुल तरंग आणि नंतर हार्मोनियम आल्यावर मग अगदी सुरुवातीच्या संगीतखंड अगर शेरापासून शेवटपर्यंत गाणं बसवणं आणि वाजवून सोडणं हा ध्यासच जडला. त्यातूनच नकळत संगीतकारांच्या शैलींचा, त्यांच्या गाण्यांच्या रचनेमागच्या विचारांचा अभ्यास होत गेला. त्यांची वैशिष्टय़ं आणि महत्ता यांचं सम्यक दर्शन घडलं. त्यातून शिकायला मिळालं. अजूनही शिकतोय. पुण्यात आल्यावर सदाशिव पेठेतलं बाळासाहेब केतकरांचं ‘फ्रेंड्स म्युझिक सेंटर’ आणि फर्गसन रोडवरचं रिसबुडांचं ‘स्वरविहार’ या अलिबाबाच्या गुहा सापडल्या. पुढे मग चित्रपटगीतांच्या कॅसेट्स, ध्वनिफिती घेऊन संग्रहित करू लागलो. हवं ते गाणं हवं तेव्हा ऐकायची सोय झाली आणि खास कॅसेटकरिता लाकडाचं भिंतीवरलं कपाट अस्तित्वात आलं.

मध्यंतरीच्या काळात हिंदी, मराठी गाण्यांच्या वहय़ा कधी हरवल्या कळलंच नाही. मात्र गाण्यांच्या पद्यावल्या, मुकेश के दर्शभरे गीत आणि रफ़ी के यादगार नगमें असा ऐवज एका पिशवीत टिकून राहिले.

काळ बदलत राहिला. कालचं तंत्रज्ञान आज कालबाहय़ व्हायच्या या कॉम्प्युटर युगात कॅसेट्स जाऊन त्यांची जागा प्रथम सीडीज, एमपी-थ्री आणि आता पेनड्राईव्हज्नी घेतली. मोबाईल फोनवर हजारो गाणी लोड करण्याची सोय झाली. रस्त्यावर, प्रवासात, सर्व वाहनचालक किंवा पादचारी कानाला हेडफोन लावून वावरणारेच दिसतात. ऑक्सिजनइतकं संगीत हे जीवनावश्यक झालंय आणि कॉम्प्युटरवरच्या यूटय़ूबसारख्या असंख्य स्रोतातून साऱ्या विश्वातलं संगीत आता आपल्यासाठी क्षणार्धात उपलब्ध होतंय. यूटय़ूबवर क्लीक केलं की हवं ते गाणं त्याच्या शब्दांसह त्याच्या वेगवेगळ्या स्वरांतल्या आविष्कारासह उपलब्ध होतं.

परवा काहीतरी शोधताना अचानक ‘ती’ पिशवी हाती आली. आतल्या विविध हिंदी, मराठी चित्रपटांच्या पद्यावल्यांचा गठ्ठा बाहेर काढला. मुळात पांढऱ्या कागदावर छापलेल्या त्या पुस्तिकांचा कागद आता पिवळा आणि जीर्ण झालेला. पण अजूनही त्या सुंदर गाण्यांचे शब्द अंगावर वागवत वाचकांबरोबर त्याचं स्मरण जागवायला उत्सुक. मला ती पिशवी म्हणजे जुन्या मधुर गाण्यांनी ओथंबलेलं जणू मधाचं पोळंच वाटलं. मधाचं नव्हे.. गाण्यांचं पोळं..!