हेमंत प्रकाश राजोपाध्ये

rajopadhyehemant@gmail.com

‘‘फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका गावात..’’ या किंवा अशाच ओळींनी आपल्या सर्वाच्या कळत्या आयुष्याची सुरुवात झालेली असते. आयुष्याचं चक्र सुरू झालं की कुंभाराची अनुभवी, कसलेली बोटं चाकावरच्या गोळ्यावर फिरावी, तसे हे शब्द आजी-आजोबांच्या, आई-वडिलांच्या अनुभवी बोलातून बालगोपाळांच्या कानावर पडतात. या गोष्टी सांगण्यामागचा हेतू प्रामुख्याने मनोरंजन हा असला तरी व्यवहारज्ञान, सामाजिक नैतिकता, मूल्यभान वगैरे गोष्टी मनावर बिंबवणे हा उद्देश यातून नकळत साध्य केला जातो, असा आपल्याकडे एक साधारण समज आहे. मिथकांचा परिचय कळत-नकळत आपल्याला होतो तो असा. मिथक म्हणजे काहीतरी अतिंद्रिय, अतिमानवी घटकांची रेलचेल असलेल्या कपोलकल्पित कहाण्यांचं प्रारूप असा बुद्धिजीवी वर्गातील एक ढोबळ समज आहे. मिथकशास्त्राचे (mythology) आधुनिक अभ्यासक मात्र या ढोबळ व्याख्येमध्ये न अडकता मिथकांना नकारार्थी, कपोलकल्पित, मिथ्यात्मक चौकटीच्या पलीकडे जाऊन पाहणं गरजेचं असल्याचं सांगतात.

या अभ्यासकांच्या मते, मिथक म्हणजे केवळ आधुनिकतेच्या धारणांनुसार कपोलकल्पित, असत्य कथा इतकेच नाही. वेंडी डॉनिजर या ज्येष्ठ अभ्यासिका म्हणतात त्यानुसार, ‘पारंपरिक समाजात मिथकाची मुख्य भूमिका आपला उगम शोधणारे व आपल्या अस्तित्वाला ओळख, सर्वोच्च अर्थ व उद्देश प्रदान करणारे पवित्र संभाषित (sacred narrative) अशी असते.’ अर्थात, मिथक म्हणजे केवळ असत्य, कपोलकल्पित कहाण्या नाहीत असं म्हटलं तरीही दैनंदिन अर्थानं ज्याला आपण व्यवहार्य, भौतिक निकषांवरील सत्य असं मानतो, त्या चौकटीत मिथकं बसत नाहीत ही जाणीव अभ्यासक नाकारत नाहीत. मात्र आपल्या मानवी समाजातील विशिष्ट सामूहिक धारणांमागच्या काहीशा अप्राप्य किंवा आकलनदृष्टय़ा काहीशा क्लिष्ट अशा आयामांच्या खिडक्या मिथकांद्वारे खुल्या होतात असे आपल्याला म्हणावे लागते. मिच्र्या एलियादे या धर्माभ्यासकाने म्हटल्यानुसार, ‘मिथक म्हणजे खरं तर अद्भुतरम्य श्रेष्ठ अशा आदिम काळाचा अतिमानवी, अतिंद्रिय शक्तींद्वारे संचलित असा ‘खरा इतिहास’च असतो.’ मात्र हा खरा इतिहास आपल्याला इंद्रियगम्य, बुद्धिप्रामाण्यपूरक अशा भौतिक पुराव्यांचे दाखले मात्र देऊ शकत नाही. पर्सी कोहेन या अभ्यासकांनी म्हटल्यानुसार, ‘‘मिथक’ म्हणजे पावित्र्यमूल्य लाभलेले, पवित्र मानल्या गेलेल्या घटनांवर बेतलेले, पवित्रतेच्या विश्वातील प्रतीकात्मक संपर्कमाध्यम. अशा मिथकांत रंगवलेल्या घटना या मिथकांच्या विश्वाबाहेर प्रत्यक्षात कधीही घडत नसल्या तरी वास्तव जगात मोठे बदल घडविण्याचे किंवा मोठय़ा बदलांना गती देण्याचे सामर्थ्य या घटनांमध्ये असते.’

‘mythos’ या विशिष्ट सांस्कृतिक धारणा बनविण्यास उद्युक्त करणाऱ्या कथांसाठी ग्रीक महाकाव्यात वापरल्या जाणाऱ्या शब्दावरून ‘myth’ हा इंग्रजी शब्द बनला आहे. प्लेटो या विख्यात तत्त्वज्ञाने त्याच्या ‘रिपब्लिक’ या ग्रंथात ‘mythos’ या शब्दाची ‘जुन्या, मागास काळातील कवींनी रचलेल्या देवदेवतांच्या खोटय़ा, भाकड कहाण्या’ अशी व्याख्या करत ‘रक्तरंजित युद्धं, हिंस्र कथानके व देवदेवतांच्या कुटुंबातील, कबिल्यातील भानगडी’ अशी त्यावर टीका करत त्यांचा त्याग केला पाहिजे, अशी भूमिका मांडली. मात्र वरकरणी विरोधात्मक भूमिका घेत असतानाही ‘‘आबालतरुणांमध्ये योग्य अशी नीतिमूल्ये रुजवण्यासाठी, मूल्यवर्धनासाठी काही निवडक मिथकांचा वापर करायला हवा. चूक, असत्य गोष्टीदेखील अशा वेळी योग्य मानायला हरकत नाही,’’ असे प्लेटो म्हणतो.

या शब्दाला समांतर असा ‘मिथक’ हा  संस्कृत शब्द (cognate) रूढ मराठीसंदर्भात असत्य अशा अर्थाने योजिला जात असल्याने वरील तपशील लक्षात घेणे गरजेचे ठरते. पुढील काही वर्षांत बलवान होत गेलेल्या ख्रिस्ती धर्माच्या व चर्चच्या सत्तेच्या प्रसारासोबत myth हा शब्द बायबलमधील सत्य मानल्या गेलेल्या आख्यायिकांसमोर तुच्छ समजला जाऊ लागल्याने, या शब्दाचा ग्रीक पुराणांच्या संदर्भातील उरलासुरला सकारात्मक अर्थदेखील गमावला गेला.

myth या शब्दाचा आणि mythology या ज्ञानशाखेचा भारतीय संदर्भात अभ्यास सुरू झाला तो जर्मन राष्ट्रवाद व स्वच्छंदतावाद (romanticism) यांचा उदय होण्याच्या काळात.. म्हणजे अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात. volk (folk) ही संकल्पना या स्वच्छंदतावाद चळवळीतून याच काळात पुढे येताना दिसत असली तरी ती या चळवळीचे अध्वर्यु असलेल्या मंडळींनी विशिष्ट वांशिक समुदायांनी जपून ठेवलेल्या सांस्कृतिक स्मृती- साहित्यासंदर्भात वापरल्याचं दिसून येतं. मात्र, स्वत:च्या ‘देशी’ folk’‘ विश्वाचा धांडोळा घेताना या मंडळींनी एक गमतीदार त्रांगडे घातल्याचे दिसून येते. जर्मन लोकविश्वाची बीजे शोधण्यासाठी या मंडळींनी आश्रय घेतला तो विल्यम जोन्स यांनी केलेल्या ‘अभिज्ञानशाकुंतल’ व एच. एच. विल्सन यांनी अनुवाद केलेल्या ‘हितोपदेशा’चा! योहान हेर्डर हे स्वच्छंदतावादी चळवळीच्या पहिल्या भरातील महत्त्वाचे नाव. त्यांनी जर्मनमध्ये अनुवादित झालेल्या संस्कृत अभिजात ग्रंथांच्या वाचनाने प्रभावित होऊन भारत आणि भारतीय संस्कृतीविषयी स्वप्नील, कल्पनारम्य अशी प्रतिमा उभी केली. प्राचीन भारतीय समाज शुद्ध, बालसुलभ निष्पाप अशा वृत्तीचा असून, मानवी इतिहासातील पहिला सुसंस्कृत समाज होता व या सुसंस्कृततेच्या पहिल्या टप्प्यानंतर ग्रीक-रोमन समाजाचा विकास होऊन युरोपीय सुसंस्कृत समाज निर्माण झाला, अशी मांडणी हेर्डर यांनी केली. वर उल्लेख केलेल्या विल्यम जोन्स यांनी संस्कृत भाषेविषयीच्या भारलेपणातून संस्कृत-ग्रीक-लॅटिन या भाषांच्या मूळ सामायिक स्रोताची कल्पना करणारा सिद्धांत  मांडला. या सिद्धांतानुसार, ‘‘संस्कृत भाषा ही संरचनेच्या दृष्टीने ग्रीकपेक्षा अधिक बांधीव, लॅटिनपेक्षा अधिक समृद्ध असली तरीही त्यांच्या क्रियापद-धातूंची मुळे, व्याकरणाची घडण यांच्यातील ठळक साधर्म्य लक्षात घेता या तिन्ही भाषा एकाच सामायिक उगमातून विकसित झालेल्या असाव्यात.’’ जोन्स यांनी नोंदवलेले हे निरीक्षण एका अर्थी अयोग्य नसले तरी जोन्स यांच्या मांडणीनुसार प्राचीन मानव हा एकाच ‘मूळ’ संस्कृतीच्या छत्राखाली राहत असावा, अशी धारणा स्वच्छंदतावादी जगात यातून रूढ झाली. त्यातूनच मानवी संस्कृतीच्या प्रारंभिक अवस्थेत अभिव्यक्त झालेलं मानवी भावविश्व, देवताविषयक जिज्ञासा व अन्य भावावस्था इत्यादी सारी तत्त्वे व त्यांचे मूळ वैदिक साहित्यात असल्याची धारणा रूढ झाली. वीर्यवान, शूर असा वीरदेव इंद्र, त्याने मारलेला वृत्र हा दैत्य, त्याची सोमरसाविषयीची अत्यधिक आसक्ती, सोम वनस्पतीला मिळालेलं पौरुष दैवतरूप, वेगवेगळे देवतावर्ग, विश्वनिर्मितीविषयीच्या कल्पना इत्यादी साऱ्या कल्पनांना समांतर अशा पाश्चात्त्य कल्पनांसोबत तुलना सुरू झाली.

वसाहतवादाविषयीच्या आपल्या लेखात चर्चा करताना पाश्चात्त्य धारणा आधुनिक इंग्रजी शिक्षणासोबत भारतीय समाजात कशा प्रकारे रुजली याचा परामर्श घेतला. ही अभ्यासपद्धती रुजताना पाश्चात्त्य शिष्टाचारांविषयीच्या सामाजिक धारणा आणि नैतिकतेच्या चौकटीदेखील देशी समाजात स्वीकारल्या गेल्या. या चौकटी ज्या अभिजन वर्गाने आत्मसात केल्या, त्याच वर्गाचे सांस्कृतिक विश्व या पाश्चात्त्य अभ्यासकांनी आणि शासकांनी भारतीय संस्कृतीचे प्रमाण स्वरूप मानले. स्वच्छंदतावादी चळवळीतून रूढ झालेल्या भारतीय साहित्याविषयीच्या धारणादेखील अभिजात संस्कृत साहित्यानुरूप बनत गेल्या. थोडक्यात, लोकसाहित्य म्हणून युरोपीय साहित्यातल्या धारणा आणि त्यांना अभिप्रेत असलेले भारतीय लोकजीवन आणि लोकश्रद्धा हे वास्तवात अभिजन चौकटींच्या पलीकडे जाऊच शकले नाही.

पाश्चात्त्य सत्ताधीशांच्या काळात वेगवेगळ्या राजकीय-आर्थिक कारणांमुळे एकजिनसी होऊ पाहणाऱ्या देशी अस्मितादेखील अभिजन सौंदर्यशास्त्राच्या आणि काहीशा पाश्चात्त्याळलेल्या शुचिर्भूत मिथक-श्रद्धांच्या पलीकडे जाऊ शकल्या नाहीत. वैदिक साहित्य विशिष्ट समूहांच्या हितसंबंधप्रवण राजकारणामुळे सार्वत्रिक झाले नसल्याने वेदांना एक प्रकारच्या कृत्रिम अभिजाततेचा वर्ख चढला तरीही लोकश्रद्धा असे ज्याला म्हणता येईल अशा खऱ्या अर्थी सामान्यजनांच्या आयुष्यातील भाबडय़ा श्रद्धा व अन्य धारणांची विपुल रेलचेल ऋग्वेद व अथर्ववेदात दिसून येते. अगदी लैंगिक प्रतीकात्मकतेपासून ते वेगवेगळ्या चमत्कृतीपूर्ण मिथकांपर्यंत अनेक गोष्टी या साहित्यात दिसतात. त्यातून पुढे आज रूढ असलेल्या मिथकांचा विकास कसा होत गेला याची कल्पना आपल्याला येऊ शकेल. आकाश (द्यौ/ द्यू) आणि पृथ्वी यांना माता-पित्यांची उपमा देऊन सृष्टीनिर्मितीविषयीच्या कल्पनांना मानवी स्तरावर आणून मिथकनिर्मिती केल्याचं दिसून येतं. द्यू-पिता म्हणजे आकाश. पृथ्वीच्या गर्भात तो आपले वीर्य पर्जन्याच्या रूपात ठेवतो. त्यातून सुफलन होऊन पृथ्वी सुजल-सुफल होऊन जीवसृष्टीचे मातृत्व मिरवते, ही सृष्टीरहस्याचा वेध घेणारी मनोहारी कल्पना ऋग्वेदात दिसते. सीता म्हणजे पांढुरकी जमीन- म्हणजे पृथ्वीचे प्रतीक. तिच्यात हल- नांगर फिरवून जलसिंचन करत बीजारोपण केल्यावर त्यातून मिळणारे पीक, त्यातून  वाढणारे पशुधन इत्यादींना ‘लक्ष्मन्’ असा शब्द आहे. याची अधिष्ठात्री देवता ती लक्ष्मी. सूर्य या वैदिक देवतेचे एक स्वरूप आहे विष्णू. विश्- व्यापणे या धातूपासून बनलेला हा शब्द. सूर्य आपल्या तेजाने विश्व व्यापतो म्हणून तो विष्णू. हा सूर्य-विष्णू उदयाचल, माध्यान्ह आणि अस्ताचल या तीन पावलांनी विश्व व्यापतो म्हणून त्याला ‘त्रिविक्रम’ म्हटलं जातं. एखाद्या पक्ष्यासारखा तो आकाशात संचार करतो, म्हणून त्याला गरुत्मन (गरुत्: पंख, म्हणून गरुत्मन् म्हणजे पंख असलेला) असे म्हटले आहे. रुद्र म्हणजे निसर्गातील उग्र स्वरूपाचे प्रतीकात्मक देवतारूप. घनघोर करत वाहणारे सोसाटय़ाचे वारे किंवा उग्र, विध्वंसक वादळे हे रुद्राचे रूप. मरुत् या वायुगणाला रुद्र म्हणून संबोधिले जाते. क्वचितप्रसंगी मरुत् हे रुद्राचे पुत्र असल्याचे संदर्भदेखील ऋग्वेदात मिळतात. या रुद्रदेवतेमध्ये रोगनिवारक शक्ती आहे, तसेच भयंकर विध्वंसक शक्तीचाही तो अधिष्ठाता आहे. इंद्र ही ज्याप्रमाणे ऋग्वेदातील प्रमुख देवता, तशीच दुसरी महत्त्वाची देवता आहे वरुण. आपलं अभेद्य कवच घालून, हजारो हेररूपी डोळे असलेला वरुण आपल्या भोवती या हेरगणांना घेऊन बसतो व विश्वातील प्रत्येक घडामोडीकडे बारकाईने लक्ष देत संचालन करतो. पातकी- अपराधी लोकांना जलोदरासारख्या व्याधींद्वारे विश्वाचा पालक असलेला वरुण कडक शिक्षा करतो.

ऋग्वेदातील काही देवतांची ही स्वरूपे संक्षेपात पाहताना काही ठळक गोष्टी डोळ्यांसमोर येणे स्वाभाविक आहे. धरती-आकाश-पर्जन्यरूपी वीर्य यांच्या संयोगातून होणारे सुफलन ही एक मालिका. सीता (माती- जमीन), कृषिधन असलेले लक्ष्मन्- त्याची अधिष्ठात्री लक्ष्मी ही दुसरी मालिका. जमिनीला लागवडीखाली आणायचे तर हल चालवावे लागते. नांगर चालवण्यास कठीण अशा जमिनीला ‘अहल्या’ असे म्हटले आहे. तिच्यात लागवड करायची असल्यास नांगर चालवणे गरजेचे. नांगर हे पुन्हा पुरुषाच्या जननेंद्रियाचे लक्षण. या तिन्ही मालिकांतून ऋग्वेदीय धारणांमध्ये रुजलेलं लैंगिक रूपक दिसून येतंच. पुढे पौराणिक-रामायणीय संदर्भाची बीजेही यात दिसून येतात. विष्णू हे सूर्यरूप विष्णू या स्वतंत्र देवतारूपात उन्नत होताना त्याच्या तीन पावलांत विश्व व्यापण्याच्या कल्पनेला व संबंधित त्रिविक्रम या विशेषणाला अनुस्यूत असलेली वामनाची पौराणिक कथा याचं बीज आपल्याला वेदात दिसून आलं. रुद्र या देवतेची अभिव्यक्ती शिव-शंकर रूपात होताना शिवाच्या रौद्र स्वभावाचे आणि विश्वसंहारस्वरूपाचे आदिम (PROTO) स्वरूप आपल्याला दिसून येतं. या वैदिक स्वरूपाचे पौराणिक देवतारूपांत उन्नयन होताना वेगवेगळ्या दैवतांची वैशिष्टय़े एकमेकांत मिसळून, उत्तरकालीन देवतेत एखादी देवता विलय होऊन त्या मूळ देवतेचा प्रभाव कमी झाल्याचे दिसून येते. या देवतांची रूपे हिंदू पौराणिक ग्रंथांप्रमाणेच जैन, बौद्ध, तिबेटी बौद्ध परंपरांतूनही वेगवेगळ्या प्रकारे कथानकांच्या वेगळ्या बाजांतून, वेगळ्या संस्करणांच्या रूपातून पुढे येतात. त्याचा एक दाखला ‘जादूई स्मृतींचे वास्तव’ या लेखात आपण पाहिला.

मिथकांचे विश्व आणि त्याचा पसारा अफाट आहे. आपल्या माध्यमाच्या- जागेच्या मर्यादांमुळे मिथकांच्या विकसनाची चर्चा अधिक लांबवता येत नसली तरी मिथकशास्त्राचे सामाजिक-राजकीय वर्तुळातील महत्त्व लक्षात येण्यासाठी काही मुद्दे चर्चेत आणणे गरजेचे आहे. पुराण हा शब्द प्राचीन काळाचे सूचन करत असला तरी ‘पुरा नवम्’ म्हणजे प्राचीन-पुराणातील गोष्टी त्या- त्या वर्तमानातील घटनांच्या अनुषंगाने नव्याने सांगणे म्हणजे पुराण- अशी ‘पुराण’ या रचनाशैलीची व्याख्या परंपरेने केली आहे. यावरून त्या प्राचीन कथांना नवख्या बाजात कथन केले जात असल्याचे (अस्पष्टसे का होईना!) भान पुराणकारांना असावे असे म्हणायला पुरेशी जागा आहे. पुराण आणि इतिहास या शब्दांना परंपरेने एकाच तराजूत ठेवल्यामुळे आपल्याकडे पौराणिक गोष्टी आणि ऐतिहासिक तपशील यांच्यात दोन गोष्टी वेगळ्या ठेवता येणे अशक्य होईल अशी सरमिसळ झाली. मानववंशशास्त्रानुसार सादरीकरण (PERFORMANCE) ही कला सामाजिक-राजकीय स्थित्यंतराच्या प्रक्रियेत आत्यंतिक महत्त्वाची अशी राजकीय भूमिका बजावत असल्याचे दिसते. या कलेमध्ये पौराणिक कथानके महत्त्वाचे स्थान राखून असतात. समाजरचना करताना समाजातील राजकीय-सांस्कृतिक-सामाजिक हितसंबंधांना सामाजिक संमती (SANCTION) मिळावं यासाठी दैवी-अतिंद्रिय अशा वैशिष्टय़ांनी युक्त असलेल्या मिथकांचा वापर नेहमी होतो. चातुर्वण्र्य व्यवस्थेतील हितसंबंध असोत की पितृसत्ताक व्यवस्थेतील वर्चस्ववाद असो; मिथकांच्या आधारावर त्या- त्या व्यवस्थेचा लाभधारक वर्ग सामाजिक शोषणाच्या चौकटी उभारत असल्याची अनेक उदाहरणे आपल्याला मिळतात. या साऱ्या शोषक वर्तुळाला शह देण्यासाठी मिथकात्म रचनेचाच आधार घेत प्रतिक्रियात्मक अशा प्रतिमिथकांचा वापर करून COUNTER NARRATIVES बनवण्याची प्रक्रियादेखील वासाहतिक काळात उदय पावल्याचे दिसून येते. मिथकांच्या प्रभावाखाली जगणाऱ्या समाजाला राजकीय चळवळीचे व नव्या अस्मितांचे अधिष्ठान देताना प्रस्थापितविरोधी चळवळींकडून प्रस्थापितांच्या वैदिक-पौराणिक कथांतील हीन, निम्नस्तरीय, अमंगल किंवा प्रसंगी क्रूर अशा वैशिष्टय़ांनी रंगवलेली पात्रे ही शोषितांचे कल्पित पूर्वज असल्याचे संभाषित मांडले. शोषणवादी परंपरांतून रंगवलेली नकारात्मक पात्रे ही सांस्कृतिक- इतरेपणाच्या भावनांतून रंगवलेली गेली असली हे खरे असले तरीही अभ्यासकीय दृष्टीने त्या पात्रांचे शोषित समूहांशी असलेल्या जैव संबंधांविषयीच्या कल्पित धारणा राजकीय संघर्षांचे बलस्थान बनत आहेत.  ब्राह्मणी-जैन-बौद्ध मिथकविश्व, त्याची अभिजातता, त्या अभिजात विश्वाचे सौंदर्यशास्त्र आणि आधुनिक राजकीय चळवळीतून प्रसृत झालेल्या प्रतिवादात्मक धारणांमधील सामान्यीकरण (GENERALIZATION) या दोन्ही बाबींची अकादमिक पद्धतीने शास्त्रशुद्ध चिकित्सा होणे आज गरजेचे झाले आहे.

मिथकांच्या प्रभावातून दैनंदिन वास्तवातील त्रिविध तापांनी पिचलेला माणूस रंजन आणि दैववादी आशा व आपल्या हरवलेल्या किंवा नसलेल्या सामाजिक-सांस्कृतिक अस्मिता शोधत राहतो. त्यामुळे मिथके व कर्मकांडांसंबंधित सांस्कृतिक विश्वाचा प्रसार करण्याच्या प्रक्रियेसाठी अनुकूल असे स्थानिक एजंट्स बनवण्यासाठी उपयुक्त ठरतात. अस्मितांविषयीच्या टोकाच्या धारणा, नव्या वीर दैवतांचा, राजकीय वीरांचा उदय, त्यांच्याविषयीच्या नव्या मिथककथा, नवनवीन संत- गुरू, त्यांच्या संप्रदायांतून पसरणाऱ्या मिथकांचा पसारा यांचा चिकित्सक अभ्यास होताना वरील गोष्टींविषयीचे भान जागते ठेवणे महत्त्वाचे ठरते, ते यासाठीच.

(लेखक ‘ऑब्झव्‍‌र्हर रीसर्च फाउंडेशन’ या संस्थेत वरिष्ठ संशोधक म्हणून कार्यरत आहेत.)