News Flash

निर्मळ आत्मकथन

‘फादर दिब्रिटो यांच्या ‘नाही मी एकला’ या आत्मकथनाबद्दल म्हणूनच उत्सुकता होती. फादर दिब्रिटो हे ख्रिस्ती समाजातलं मोठं नाव.

(संग्रहित छायाचित्र)

मोनिका गजेंद्रगडकर

आत्मचरित्र वा आत्मकथन हा मराठी साहित्यातला महत्त्वाचा वाचकप्रिय साहित्यप्रकार आहे. आपल्या आयुष्याकडे मागे वळून पाहणे, त्या आयुष्याचा आपल्याला समजलेला – न समजलेला अर्थ समजून घेत तो तटस्थपणे मांडणे हे एकीकडे सोपे वाटते; परंतु ते अत्यंत अवघड असते. कारण ते केवळ कथन ठरत नाही, तर तो ‘आत्मशोध’ असतो.

‘फादर दिब्रिटो यांच्या ‘नाही मी एकला’ या आत्मकथनाबद्दल म्हणूनच उत्सुकता होती. फादर दिब्रिटो हे ख्रिस्ती समाजातलं मोठं नाव. धर्मगुरू म्हणून या नावाला आदरभावनेची किनार आहे. शिवाय फादर दिब्रिटोंचं नाव ख्रिस्ती धर्मीयांपुरतंच मर्यादितही नाही. मराठी भाषा, संत परंपरा यावर नितांत प्रेम करणारा, केवळ हिंदूच नाही तर मुस्लीम, जैन, बौद्ध, शीख आदी धर्मीयांबद्दल, धर्माबद्दल तितकीच आत्मीयता बाळगणारं असं हे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या या व्यक्तिमत्त्वाला अस्तर आहे, ते त्यांच्या ऋजू, निर्मळ, ममताळू अशा वागणुकीचं, पण त्याहीपेक्षा धर्मापलीकडच्या उदारमतवादी अशा दृष्टिभानाचं.

‘नाही मी एकला’ हे आत्मकथन त्यांच्या जीवनाची गाथा असली, तरी तो प्रवास आहे, त्यांचे व्यक्तिमत्त्व व्यापक होत जाण्याचा!  आपण धर्मगुरू व्हायचं, हीच आपल्या आयुष्याची खरी दिशा आहे, हे फार लवकर ठरवून, त्या त्यागी जीवनाच्या दिशेने पावलं टाकत गेलेल्या त्यांच्या जन्मापासून या आत्मकथनाची सुरुवात होते. वसईसारख्या निसर्गरम्य परिसरातल्या त्यांच्या गावाशी – मातीशी – अगदी गावाच्या ऐतिहासिकतेशीही सदैव नाळ जोडलेला हा माणूस. त्यांचं बालपण आत्मकथनात सुरुवातीला येतं. धार्मिक, सोज्वळ अशा कुटुंबात- जिथे शिव्याशाप नव्हते, अमंगळ वागणं, बोलणंही वर्ज्य होतं अशा कुटुंबातला हा मुलगा. तीन भाऊ नि एक बहीण, आई-वडील असं गरिबीतही सुख मानणारं कुटुंब लाभलेला. मात्र त्यांच्या एकुलत्या बहिणीच्या कॅन्सरनं झालेल्या अकाली निधनामुळे या कुटुंबावर दु:खाचं सावट आलं. त्यानंतर त्यांच्या बाबांचा नि आईचा मृत्यूही त्यांच्या मनावर चरे उमटवून गेला आणि बरोबरीने त्यांच्या आजीचाही- ‘मामारशी बय’चाही.

सुरुवातीच्या या बालपणाच्या संमिश्र आठवणीतून एका ख्रिश्चन कुटुंबाचे, त्या कुटुंबातील चालीरितींचे, श्रद्धा-मूल्यांचे आणि आई-वडिलांच्या वत्सलतेचे दर्शन होते. पण त्यांचे हे बालपण, त्यांचे कुटुंब हे त्यांच्या वैयक्तिक आठवणींपुरतेच मर्यादित राहत नाही, तर ‘घर’ या संकल्पनेचाच खोलात जाऊन विचार मांडत जाते. त्यात ‘गावाची’ ही संकल्पना येते. संस्कृती येते, पाणवठा येतो, विहीर येते, शेकोटी येते आणि माणसा-माणसांतील ममत्वही येते. आणि हे सगळं चित्र डोळ्यापुढे जिवंत होत असताना फादर जागतिकीकरणासारख्या, शहरीकरणासारख्या आजच्या सामाजिक वास्तवाला स्पर्श करत, गावाच्या वेशीच्या पलीकडे शहर कसे एखाद्या रानरेडय़ाप्रमाणे गावाला ढुशी मारू लागले आहे आणि गावाचा कसा थरकाप उठतो आहे, या वास्तवाचा उल्लेख करून आपल्याला अंतर्मुख करू लागतात.

आत्मकथनाची सुरुवातीची प्रकरणं वाचताना प्रथम आपल्या मनावर ठसत जाते ती त्यांची कथनशैली. त्यात एक काव्यात्मकता आहे. मराठी भाषेतला गोडवा, सौंदर्य या कथनशैलीत आहे. परंतु त्या शैलीत एक अंगभूत असा ओलावाही आहे. याशिवाय मराठी भाषेवरचं त्यांचं प्रभुत्वही आपल्याला जाणवत राहतं. ‘नाही मी एकला’ची मांडणी प्रकरणांच्या अनुषंगाने, काळानुक्रमे केली असली, तरी अप्रत्यक्षपणे या आत्मकथनाचे ढोबळमानाने दोन भाग होतात. एकीकडे धर्मगुरुपदापर्यंतचा, धर्मगुरू झाल्यानंतरचा- एकूण ख्रिस्ती धर्मातील श्रद्धा, मूल्यविचार, रीतिरिवाज मांडणारा असा एक भाग आणि दुसरा, धर्मगुरुपदापलीकडे जाऊन समाजात मिसळून, रंजल्या-गांजल्या लोकांसाठी झटणाऱ्या त्यांच्यातल्या सच्च्या कार्यकर्त्यांचा भाग. अर्थात संपादक, लेखक, मराठी भाषा-संस्कृतीचा अभ्यासक अशा वेगवेगळ्या नात्यांनी त्यांच्या कडून घडलेले कार्यही आत्मकथनात अधोरेखित होतेच.

धर्मगुरुपदासाठी सेमिनरीत जाऊन घेतलेले प्रशिक्षण, दीक्षा, त्यानंतर वेगवेगळ्या चर्चमधलं वास्तव्य, तिथे आलेले अनुभव, धर्मगुरू झाल्यानंतर सामान्य लोकांच्या व्यथा जाणून घेताना माणूस म्हणून लागलेला स्वत:चा कस. अशा वेगवेगळ्या अंगांनी फादर दिब्रिटो यांनी ख्रिस्ती धर्मपरंपरा वाचकांसमोर मांडली आहे. त्यातून धर्मगुरू होणं म्हणजे नेमकं काय? विरक्ती, ब्रह्मचर्य, संन्यासीपण यांचा स्वीकार करणं ही एक साधना कशी असते, याचं दर्शन घडतंच. परंतु धर्म म्हणजे नेमकं काय, याचं व्यापक अर्थाने तत्त्वचिंतनही त्यातून कळत-नकळतपणे व्यक्त होत जातं. सर्व धर्मीयांपर्यंत आपल्याला पोहोचता यावे म्हणून संतसाहित्याचं वाचन करणं, इतकंच नाही तर या सगळ्याला सक्रियतेची जोड देऊन वरळीच्या हनुमान मंदिरात प्रवचन देणं.. दिब्रिटोंची ही सहिष्णुता, उदारमतवादी वृत्ती, स्वधर्माशी एकरूप राहूनही आपलं मन खुलं, मोकळं ठेवण्याची त्यांची विशालता आत्मकथनात वेळोवेळी अनेक प्रकारे व्यक्त झाली आहे.

त्यांच्या मनात एक हळवं नातं आहे, ते निसर्गाशी. ‘निसर्ग माझा.. मी निसर्गाचा.. तो माझा पोशिंदा मी त्याचे लेकरू..’ ही त्यांची भावना आहे. आत्मकथनात अनेक मन हेलावून टाकणारे असे प्रसंग आहेत. लहानसहान माणसांची बोलकी शब्दचित्रं आहेत. कुसुमाग्रज, दुर्गा भागवत, विजय तेंडुलकर, इंदिरा संत यांसारख्या दिग्गज साहित्यकारांच्या आठवणीही आहेत. त्यामुळे या आत्मकथनाला एक हृद्यपण प्राप्त झाले आहे.

सेमिनरीमधला त्यांचा प्रशिक्षणाचा काळ, त्यातले अनुभव हा या कथनातील महत्त्वाचा भाग आहे. ख्रिस्ती समाजापलीकडच्या वाचकांना ख्रिस्ती धर्म अनोळखी नक्कीच नाही. परंतु या धर्माची शिकवण, ख्रिस्ती जीवनातील धर्माचे स्थान, त्यांचा श्रद्धाभाव, विशेषत: चर्चबद्दल, प्रार्थनेबद्दल त्यांच्या मनात असणारी भक्तीची भावना.. यांसारखे बारकावे. यामुळे थोडक्यात, एका वेगळ्या धर्मप्रणालीचे दर्शन या आत्मकथनातून वाचकाला घडत जाते.

सेमिनरीत असतानाच तरुण फादर दिब्रिटोंच्या आयुष्यात एक तरुणी पत्ररूपाने आली होती. तिच्या आणि त्यांच्या प्रेमभावनेचा तो पहिला हुंकार! काही काळ तिच्या ‘गुलाबी’ पत्रांनी सुखावलेल्या त्यांना त्यांच्या मार्गदर्शकांनी सावध केलं. आपली वाट ब्रह्मचर्याची आहे, हे भान आल्यावर आपल्या या प्रेमाला पूर्णविराम देत त्यांनी हा पत्रव्यवहार थांबवला. आपल्या आयुष्यातील इतकी नाजूक, हळुवार स्पंदनं प्रामाणिकपणे मांडल्यामुळे त्यातला अलवारपणा आपल्यापर्यंत पोहोचत राहतो. याशिवाय सेमिनरीतले फादर क्लेस यांना कॉलेज सोडून जाण्यासाठी दिले गेलेले आदेश, त्यांना वाचवण्यासाठी मुलांनी केलेलं बंड, रेक्टर फेरांडो, इतर फादर सहकारी यांच्या आठवणी, ‘स्नेहसदन’ संस्थेत दाखल होणं, तिथे मराठी भाषा, संस्कृतीची होत गेलेली ओळख, त्यातून धार्मिक सुसंवादाचे घडलेले कार्य, आणीबाणीचा कठीण काळ, त्या काळात उपरोधिक मार्गाने इंदिरा गांधींना लिहिलेले पत्र.. या पत्रामुळे पोलिसांकडून झालेली चौकशी.. रोमच्या ग्रेगेरियन विद्यापीठात शिकताना आलेले अनुभव.. हे सारे उत्कटपणे लिहिले आहे.

एकीकडे भावपूर्णता नि दुसरीकडे वैचारिकता अशा परस्परविरोधी छटा हे या आत्मकथनाचे आणखी एक वैशिष्टय़. ‘जगण्याची ओझी घेऊन कुणीही आमच्याकडे येतात आणि अनेकदा पिसासारखी हलकी होऊन परततात..’ असे ते लिहितात. मग कुणी स्त्री, घरचे लोक गर्भपात करून घेण्यासाठी मागे लागलेले असतानाही त्यांच्या आधारे ते मातृत्व पेलण्यास सिद्ध होते. एखादा जीवनाला वैतागून मृत्यू जवळ करायला निघालेला, वसईला उतरून त्यांना भेटून जगण्यासाठी बळ मिळवून जातो, तर एखादी लहान मुलगी ‘मी मरणार का?’ असा निरागस प्रश्न विचारून त्यांच्यावरचा विश्वास व्यक्त करते. या सगळ्यातून फादर दिब्रिटो धर्मगुरूपेक्षाही एक संवेदनशील माणूस म्हणून आपल्यासमोर जास्त ठळक होतात. रोममध्ये असताना पोप जॉन पॉल यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव त्यांच्यावर पडला आणि त्यातूनच त्यांची सामाजिक दृष्टी विस्तारत गेली. ‘सुवार्ता चळवळ’, हरित-वसई आंदोलन, गिरीजचे पाणी आंदोलन.. सिडकोविरुद्धची लढाई..आदी आंदोलनांच्या माध्यमातून त्यांचा सक्रिय कार्यकर्त्यांचा पिंड सामोरा येत जातो. त्याच्या तळाशी असणारं त्यांचं पर्यावरणवादी व्यक्तित्वही जाणवत राहतं. विशेषत: विकासाच्या नावाखाली वसईच्या निसर्गाची विल्हेवाट लावून सिमेंटची जंगलं उभी करू पाहणाऱ्या भू-माफियांविरुद्धच्या आंदोलनात फादर सर्वसामान्य लोकांमधलेच एक होऊन उभे राहिले. राजकारणी शक्तींविरुद्ध त्यांनी बंड पुकारलेच, पण रंजल्या गांजल्या जनतेच्या प्रश्नांसाठी त्यांनी स्वत:चा जीवही धोक्यात घातला.

या आत्मकथनात अनेक पाश्चात्त्य, लेखकांचे विचार, अवतरणं यांचे संदर्भ येतात. पाश्चात्त्यच नाही तर मराठीतील काही लेखकांच्या साहित्याचे, कवितांच्या बरोबरीने ‘बायबल’मधील काही अवतरणं, कथा यांचेही पुष्कळ संदर्भ येतात. या संदर्भामुळे फादर दिब्रिटो यांच्या विचारांना, चिंतनाची, समग्रतेची सखोल जोड मिळाली आहे. त्यांच्यातला लेखकही या संदर्भातून सातत्याने जाणवत राहतो नि ‘माझी शब्द-संवाद यात्रा’, ‘सुबोध बायबल’ ही प्रकरणंही त्यांच्यातला हा लेखक ठळकपणे सामोरे आणतात.  एक ख्रिस्ती धर्मगुरू, लेखकाच्या भूमिकेतून ‘बायबल’कडे कसा पाहतो, ते या प्रकरणात आले आहे.  तर ‘सुवार्ता’ मासिकाच्या संपादकपदावरून काम करताना संपादनाच्या माध्यमातून एक वैचारिक आदान-प्रदान करणारी चळवळ कशी उभारता आली, याबद्दल त्यांनी लिहिले आहे. जितके प्रगल्भ त्यांचे वैचारिक लेखन तितकेच सुंदर ललित लेखनही. त्यांच्यातल्या भावोत्कट लेखकाचीही साक्ष पटते.  या आत्मकथनातील शेवटचे प्रकरण ‘नाही मी एकला’ हे एका अर्थी या आत्मकथनाचा ‘आत्मा’ आहे.  स्वत:ला तपासत केलेला आणि त्यातून स्वत:ला आजमावण्याचाही प्रयत्न केलेला हा संवाद अंतरात्म्याशी करता करता परमेश्वराशीही चालू आहे. स्वत:च्या आत पाहण्याचे जे धैर्य लागते, ते धैर्य यात दिसते. अनेक वाटांनी ‘स्व’पाशी पोहोचणारा त्यांचा प्रवास ते चिंतनाच्या पातळीवरून मांडत जातात. आपल्या आयुष्याचे सार, तत्त्वचिंतन या प्रकरणात त्यांनी व्यक्त केलेले दिसते.

हे आत्मकथन पारदर्शी, सच्चं आणि निर्मळ आहे- ते म्हणूनच.  ते भावपूर्ण असलं तरी भावविवश नाही. शांत, संयत सुरात एखाद्या रागातल्या विलंबित लयीत गायलेल्या चीजेसारखं हे आत्मकथन आहे – स्वत:च्या लयीत गायलेलं!

मात्र आत्मकथनातील मजकुरावर संपादनाचे अधिक संस्कार व्हायला हवे होते असे वाटते. काही ठिकाणी कथन लांबले आहे. दिब्रिटोंच्या बोलीभाषेतील संवादांचे पुन्हा कंसात भाषांतर दिले आहे. खरं तर त्यामुळे वाचताना अडथळा येतो. तसेही बोलीभाषेतील संवाद अनाकलनीय नाहीत. परिशिष्टातील काही पत्रे वगळली असती तरी चालले असते, असेही वाटते.

‘नाही मी एकला’ हे आत्मकथन मराठीतील एक महत्त्वाचं आत्मकथन ठरावं. कारण ते एका धर्मगुरूचं आत्मकथन आहे. ज्याची जगण्याची वाट धर्म नावाच्या संवेदनशील संस्थेच्या प्रांगणातून समाजापर्यंत पोहोचणारी आहे. हे आत्मकथन वाचल्यावर आपल्या लक्षात येते, की या आत्मकथनाने आपल्या मनात एक सात्त्विक प्रकाश देणारी इवली वात प्रज्वलित केली आहे.

‘नाही मी एकला ’- फादर फ्रान्सिस दिब्रिटो’,

राजहंस प्रकाशन,

पृष्ठे – २५४ , किंमत- ३०० रुपये

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2019 4:10 am

Web Title: nahi mi ekala by father francis dbritto book review abn 97
Next Stories
1 नाटकवाला : ‘माँ इन ट्रान्झिट’
2 संज्ञा आणि संकल्पना : पूर्णब्रह्म
3 गवाक्ष : जागरण