उन्हात चांदणे पडेल आता
अमावस्येला चंद्र दिसेल
पाऊससुद्धा सरासरीहून
थोडासा अधिकच पडेल
आता उष्मा थंड असेल
अन् थंडीही उबदार
अच्छे दिन येणार
गडय़ांनो, सच्चे दिन येणार

डाल डाल पे चोब्बीस कैरट
सोन्याची चिमणी असेल
घराघरांतील चिमण्यांमधूनी
सोन्याचाच धूर दिसेल
खुशाल हिंडा काठीला
बांधून सोन्याचा मणिहार
अच्छे दिन येणार
गडय़ांनो, सच्चे दिन येणार

देश की धरती सोना उगले
सर्वत्रचि हे चित्र दिसेल
शेती नव्हे ही डिदमास अन्
नक्षत्रची शाखा असेल  
दुष्काळातही धरणे फुल्ल
अन् सुकाळीच वर्षां होणार
अच्छे दिन येणार गडय़ांनो,
सच्चे दिन येणार

युरो डॉलर येन युआन
राहतील उभे बांधून हात
रुपया म्हणेल केम छो,
बाबांनो, किती रे सुकलात?
सेन्सेक्सचीही स्पर्धा
आता रॉकेटशीच असणार
अच्छे दिन येणार गडय़ांनो,
सच्चे दिन येणार

रस्त्यांवरच्या टोलनाक्यांवर
म्हणेल कोणी हसता हसता,
येथून आलात, भाग्य आमुचे
टोल देऊनी का लाजविता?
हेमाच्या गालापरी रस्ते,
पिंपलही नसणार
अच्छे दिन येणार गडय़ांनो,
सच्चे दिन येणार

भ्रष्टाचार अन् दुष्टाचार
सारे मातीला मिळणार
चिरीमिरीच्या परंपरेवर
पाळत सत्याची असणार
व्हॉटसॅपवरूनी जय जय ज्याचा
तोचि सत्याचा अवतार
अच्छे दिन येणार गडय़ांनो
सच्चे दिन येणार

अखेर..
स्वप्नांना कसले सेन्सॉर?
म्हणा तयांना नमोस्कार
अच्छे दिन येणार गडय़ांनो,
सच्चे दिन येणार..