मनोहर पारनेरकर – samdhun12@gmail.com

जी माहिती, ज्ञान आणि फारच क्वचित शहाणीव सर्वसाधारण स्रोतामधून सहजी उपलब्ध नाही ती या सदराद्वारे देण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. या दृष्टिकोनास अनुसरूनच आजचा हा नाना फडणवीसांवरचा (मूळ नाव : बालाजी जनार्दन भानु) लेख आहे.

narendra modi
राहुल गांधी ‘शाही जादूगार’! गरिबी दूर करण्याच्या आश्वासनावरून पंतप्रधान मोदींची टीका
uddhav thackeray criticized pm narendra modi
“काश्मीर ते मणिपूरपर्यंत खदखद अन् हिंसाचार, तरीही भारतीय नीरोचे…”; ‘त्या’ दाव्यावरून ठाकरे गटाची पंतप्रधान मोदींवर टीका!
dharashiv, osmanabad lok sabha 2024 election, omraje nimbalkar, Shiv sena
ओमराजे निंबाळकर यांची कसोटी
Kerala CM Pinarayi Vijayan
‘भारत माता की जय’ आणि ‘जय हिंद’ हे नारे रचणारे मुस्लीम होते; केरळच्या मुख्यमंत्र्यांचा दावा

१७६१ च्या पानिपतच्या लढाईत झालेल्या दारुण पराभवानंतर मराठेशाही एखाद्या फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून उठून उभी राहिली आणि त्यानंतर सुमारे चार दशकांपर्यंत ती भारतातली सर्वाधिक सामथ्र्यवान शक्ती झाली. मराठेशाहीच्या सीमा उत्तरेतील कुमाऊं टेकडय़ांपासून ते दक्षिणेला कावेरी नदीपर्यंत आणि पश्चिमेला गुजरातपासून ते पूर्वेला ओडिसापर्यंत विस्तारल्या गेल्या. आणि हे काही सहजी घडलं नाही. ज्या मराठा व्यक्तींच्या पराक्रमामुळे हे घडलं त्यापैकी महादजी शिंदे, माधवराव पेशवा, अहिल्याबाई होळकर आणि सेनापती हरिपंत फडके हे त्यात प्रमुख होते. पण मराठा साम्राज्याच्या या नेत्रदीपक विस्तारामागे नाना फडणवीसांचं असामान्य मार्गदर्शन होतं यात तिळमात्र शंका नाही. आणि हे त्यांनी कुठल्याही सैन्याचं नेतृत्व न करता केवळ धोरणात्मक चातुर्याने आणि अंतर्गत व बा शत्रूंचा सामना करून केलं, हे जेव्हा आपल्या लक्षात येतं तेव्हा तर ही गोष्ट केवळ असामान्यच वाटते.

काही पाश्चात्त्य इतिहासकार आणि ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी नानांचा उल्लेख ‘मराठय़ांचे मकियव्हेली’ असा करत आले आहेत. पण ‘The Anarchy : The East India Company, Corporate Violence, And The Pillage Of An Empire’ या आपल्या पुस्तकात विल्यम डार्लिम्पल यांनी त्यांचं अतिशय संतुलित असं व्यक्तिचित्र रेखाटलं आहे. ते लिहितात, ‘सुमारे पंचवीस र्वष मराठय़ांचं प्रशासन मुत्सद्देगिरीने सांभाळणारे मराठय़ांचे पंतप्रधान नाना फडणवीस यांनाच सर्वप्रथम ईस्ट इंडिया कंपनीकडून भारतातील स्वतंत्र राज्यांना असलेल्या धोक्याची जाणीव यथार्थतेने झाली होती. हा धोका ओळखूनच त्यांनी १७८० साली तिहेरी युती घडवून आणली होती. त्याचा उल्लेख पुढे येईल. १३ मार्च १८०० रोजी नानांचं निधन झाल्यानंतर पुण्यातील ईस्ट इंडिया कंपनीचे स्थानिक प्रतिनिधी जनरल पामर लिहितात, ‘‘मराठय़ांच्या शासनातलं सर्व शहाणपण आणि संयम आता लयाला गेला आहे. आता कलकत्त्यातील कंपनीचे गव्हर्नर जनरल लॉर्ड रिचर्ड वेलेस्ली यांना काहीही करण्याची गरज उरलेली नाही. त्यांनी कलकत्त्यात शांतपणे बसावं आणि मराठा साम्राज्य कसं स्वत:हून लयाला जातं हे पाहावं.’’

नाना खरंच मराठय़ांचे ‘मकियव्हेली’ होते का? माझ्या दृष्टीने ते तसे नव्हते. मी त्यांना  ‘अठराव्या शतकातील भारताचे चाणक्य’ असं म्हणेन. पण ‘मकियव्हेली’ हे लेबल त्यांना चिकटलं. मकियव्हेली हे १५ व्या शतकातील इटालियन राजकारणी, तत्त्वज्ञ आणि राजकीय विचारवंत होते. ‘राजकारणात जर गरज असेल  आणि वेळेची तशी मागणी असेल तर राज्यकर्त्यांने दुष्टपणे वागणे, बेइमानी करणे ेआणि सदसद्विवेकबुद्धी सोडून वर्तन करणे हे योग्य आणि समर्थनीय आहे,’ असा विचार त्यांनी मांडला होता. पण मला वाटतं, नानांनी  भारतातीलच साम, दाम, दंड, भेद या नीतीचा चतुरपणे वापर केला. या नीतीतील साम आणि दाम या पहिल्या दोन भागांबद्दल मी काहीएक सांगू इच्छितो.

‘साम’ या नीतीचं प्रमुख उदाहरण असं : १७८० मध्ये ईस्ट इंडिया कंपनीबरोबर वडावचा शांतता करार करण्यात नानांनी पुढाकार घेतला. त्यानंतर त्यांनी त्यांचा जुना शत्रू हैदर अली याला एक खलिता लिहिला. त्यात त्यांनी- ‘टिपू सुलतानाने जुने शत्रुत्व विसरावे आणि ईस्ट इंडिया कंपनीविरोधात सहकार्य करावे..’ असा प्रस्ताव मांडला. या खलित्याला हैदर आणि टिपू दोघांनीही सकारात्मक पाठिंबा दिला. ही ‘तिहेरी युती’ म्हणून प्रसिद्ध आहे. यातून पुढे काही निष्पन्न झाले नाही याची कारणं बरीच असून, गुंतागुंतीची आहेत. आता थोडं ‘दाम’बद्दल.. नानांकडे नेहमीच प्रचंड प्रमाणात निधी उपलब्ध असे. त्याचा वापर त्यांनी वेगवेगळ्या राजांचे सहकार्य आणि निष्ठा मिळवण्याकरता नेहमीच केला.

मराठा राज्याचा प्रमुख शास्ता म्हणून आपल्या जवळजवळ तीस वर्षांच्या कारकीर्दीत नानांनी इतकी अमाप संपत्ती मिळवली होती की, त्या काळात त्यांचा उल्लेख ‘नवकोट नाना’ (नऊ कोटी रुपये संपत्ती असलेला) असा केला जाई. काही वर्षांपूर्वी नानांच्या हस्ताक्षरातील काही कागदपत्रं (अर्थात मोडी भाषेत!) ‘रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटन अँड आर्यलड’ इथे मिळाली. त्यात १७९६ साली नानांची संपत्ती पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचं नमूद केलं आहे. अर्थात आज या रकमेचं मूल्य काही हजार कोटी रुपये सहज होईल. या शोधाचं जनकत्व पुण्याचे इतिहासकार डॉ. उदय एस. कुलकर्णी यांच्याकडे जातं. ही कागदपत्रं ब्रिटिश संस्थेकडे कशी पोहोचली आणि त्याहीपेक्षा थरारक म्हणजे ती डॉ. कुलकर्णीनी कशी मिळवली याचा वृत्तान्त विस्तारभयास्तव इथे देता येत नाहीये, याबद्दल क्षमस्व.

नानांना कलेची उत्तम जाण होती. ते रसिक होते आणि कलासंग्राहकदेखील होते. (त्यांना त्यांचं स्वत:चं प्रदर्शन करायचीही आवड होती). हा त्यांचा गुण त्यांना तत्कालीन अभिजनांपासून वेगळं काढतो. जॉन थॉमस सेटॉन यांच्याकडून त्यांनी स्वत:चं एक चित्र (ऑइल ऑन कॅनव्हास) काढून घेतलं होतं. हा चित्रकार १७७६ ते १७८५ या काळात ईस्ट इंडिया कंपनीत नोकरीला होता. माझं जेव्हा २०११ च्या जुलै महिन्यात लंडनमध्ये वास्तव्य होतं, तेव्हा माझ्या एका एनआरआय मित्राने मला सांगितलं की, ‘सोदबी’ ही संस्था या चित्राचा लिलाव करणार होती. या चित्राला ५०,००० ते ७०,००० पौंड किंमत येईल असा ‘सोदबी’चा अंदाज होता. हा लिलाव तेव्हा झाला की नाही याची मला कल्पना नाही. आणि होय.. १७९२ साली स्कॉटिश चित्रकार जेम्स वेल्स यांनी नानांचे सवाई माधवरावांबरोबर एक चित्र काढले आहे.

‘नाना फडणवीस किंवा घाशीराम किंवा पेशवे यांच्या नीतिमत्तेबद्दल किंवा तिच्या अभावावर ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक भाष्य करत नाही,’ असं नाटककार विजय तेंडुलकर यांनी या नाटकावर बंदी घातली गेली होती तेव्हा नमूद केलं होतं. मला त्यावेळीदेखील हे त्यांचं म्हणणं पटलं होतं.. आणि आज तर ते जास्तच पटतं.

इथे आपण नानांना विजय तेंडुलकर किंवा गिरीश कार्नाड (त्यांच्या ‘ड्रीम्स ऑफ टिपू सुलतान’ या नाटकातही नानांचं पात्र आहे.) यांच्या नजरेतून न पाहता इतिहासकारांच्या नजरेतून पाहू या. ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाबद्दल जो काही अनाठायी वाद निर्माण झाला होता आणि त्यावर १९७३ साली बंदी घालण्यात आली होती, त्या गोष्टी आता इतिहासजमा झाल्या आहेत. आज आपण तेंडुलकर- पटेल- चंदावरकर- मुळगुंद या विलक्षण चौकडीला भारतीय रंगभूमीला एक वैश्विक दर्जाची अप्रतिम कलाकृती दिल्याबद्दल नव्याने मानवंदना देऊ या. त्यातही भास्कर चंदावरकरांना खास मानाचा मुजरा. त्यांनी मराठी लोकसंगीतातील तमाशा, गण, गौळण आणि वग यांचा कल्पक उपयोग करत या नाटकाच्या संगीतात एक चैतन्य निर्माण केलं आहे. त्यातील धृपद (रिफ्रेन) म्हणून कोरसचा केलेला वापर मला विशेष उल्लेखनीय वाटतो. अभंग आणि लावणी बाजूबाजूला ठेवल्याने त्यावेळच्या उच्चभ्रू समाजाचं भक्तीपासून अय्याशीपर्यंत झालेलं अध:पतन त्यातून रेखीवपणे लक्षात येतं.

गंगाधर गाडगीळ यांनी लिहिलेल्या लोकमान्य टिळकांच्या कादंबरीवजा  चरित्रात (ज्यात कल्पित घटनाही आहेत.) एक प्रसंग वर्णिला आहे. तो पूर्णपणे सत्य असेलच अशी खात्री नाही. टिळक हे आपल्या भावना उघडपणे व्यक्त करणाऱ्यांपैकी कधीच नव्हते. तरीही जेव्हा नाना फडणवीसांच्या नातवाला आणि त्याच्या कुटुंबीयांना ते भेटले तेव्हा भावनावश झाले होते असा तो प्रसंग आहे. ही कथित किंवा खरी भेट नानांच्या १९०० सालातल्या शंभराव्या स्मृतिदिनी झाली असावी. तोपर्यंत टिळक हे भारतातील उत्तुंग राष्ट्रीय नेते म्हणून ओळखले जाऊ लागले होते. हा प्रसंग मला महत्त्वाचा अशासाठी वाटतो की, या प्रसंगातून त्यांच्या पिढीतील सर्वसामान्य महाराष्ट्रीय लोकांप्रमाणेच टिळकांनादेखील मराठय़ांच्या इतिहासाबद्दल आणि नानांबद्दल किती आत्मीयता होती हे दिसून येतं. मराठेशाहीतील या चाणक्याची जाहीर प्रशंसा करण्यास आणि त्यांच्याबद्दलची आत्मीयता व्यक्त करण्यास लोकमान्य कचरले नाहीत, हे मला कौतुकास्पद वाटतं.

औंधचे पंतप्रतिनिधी सरदार भगवंतराव आणि साताऱ्याचे सरदार रघुनाथ घनश्याम मंत्री यांच्याकडून नानांना १७६८ साली मेणवली हे गाव देणगी म्हणून मिळालं होतं. या गावात नानांनी स्वत: साठी एक भव्य वाडा बांधला. या वाडय़ाचं बांधकाम १७८० साली पूर्ण झालं. कृष्णा नदीच्या काठी या वाडय़ाला एक घाट आहे. विष्णू आणि माणेश्वर म्हणजे शिव यांची दोन देवळं तिथे आहेत. माणेश्वराच्या देवळात ६५० किलो वजनाची एक घंटा आहे. वसई येथील पोर्तुगीजांच्या किल्ल्यातील कॅथ्रेडलमधून विजयाची आठवण म्हणून ही घंटा चिमाजीअप्पा (थोरल्या बाजीरावांचे धाकटे बंधू) यांनी १७३९ साली आणली होती. या घंटेवर तान्ह्य जीझसला घेतलेल्या मेरीचं चित्र आहे.

१८०० साली नानांच्या निधनानंतर दुसरे बाजीराव पेशवे यांनी हा वाडा जप्त केला. नानांची विधवा पत्नी जिऊबाई यांना हा वाडा रीतसर परत करण्याचा हुकूम जनरल आर्थर वेलेस्लीने १८०४ साली दिला. (हा पुढे ‘डय़ूक ऑफ वेलिंग्टन’ म्हणून जगप्रसिद्ध झाला. भारताचा गव्हर्नर जनरल रिचर्ड वेलेस्ली यांचा तो धाकटा भाऊ. त्याने टिपू सुलतानाचा पराभव करून मराठा साम्राज्याला प्राणांतिक धक्का दिला होता आणि पुढे युरोपमध्ये नेपोलियनचाही त्याने पराभव केला होता.) जिऊबाई यांच्या मृत्यूनंतर त्यावेळच्या बॉम्बे प्रांताचे गव्हर्नर सर बार्टले फ्रेर यांनी हा वाडा नानांच्या वारसांकडे सुपूर्द केला जाईल अशी व्यवस्था केली.

हा वाडा आणि तिथल्या निसर्गसौंदर्याने मुंबईतल्या अनेक हिंदी चित्रपट निर्मात्यांना आकर्षित केलं आहे. १९५९ सालच्या विजय भट्ट यांच्या ‘गुंज उठी शहनाई’पासून ते २००४ सालातील आशुतोष गोवारीकर यांच्या ‘स्वदेस’पर्यंत निदान डझनभर तरी चित्रपटांचं शूटिंग या लोकेशनवर झालं आहे.

जाता जाता : पुण्यातील डॉ. उदय एस. कुलकर्णी यांच्या ओझरत्या उल्लेखाने सोपानची त्यांच्याबद्दलची उत्सुकता चाळवली गेली. त्यांचं हे छोटंसं व्यक्तिचित्र : डॉ. कुलकर्णी (जन्म- १९५६) हे उत्कृष्ट सर्जन आहेत. १९९५ साली त्यांनी भारतीय नौदलातून स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर ते मराठा साम्राज्याच्या इतिहासलेखनाकडे वळले. आतापर्यंत त्यांची तीन पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. १) Solstice at Panipat- 1761, 2) James Wales- Artist and Antiqarian in the time of Peshwa Sawai Madhavarao, 3) The Era of Bajirao. या पुस्तकांसाठी संशोधन करताना आणि काही दुर्मीळ दस्तावेज मिळवण्यासाठी डॉ. कुलकर्णी यांनी घेतलेले परिश्रम, त्यांनी दाखवलेली चिकाटी आणि हिकमत लक्षात घेता त्यांना ‘मराठी इंडियान जोन्स’ म्हणावं लागेल. जयपूर लिटररी फेस्टिव्हलमध्ये विल्यम डार्लिम्पल यांच्याबरोबर चर्चा असो वा पुण्यातील वसंत व्याख्यानमालेचे व्यासपीठ असो; डॉ. कुलकर्णी या दोन्ही ठिकाणी तितक्याच सहजतेने रमतात आणि तितकेच ‘कूल’ असतात. क्या बात है!
शब्दांकन : आनंद थत्ते