19 January 2020

News Flash

इदं न मम

बागेतल्या एका बाकावर विसावलो होतो. रिवाजानुसार तासभर गोल गोल चकरा मारून झाल्या होत्या. नाव नाना-नानी पार्क; पण आसपास फक्त नानाच नाना दिसत होते. नावापुरतीसुद्धा एकही

| December 22, 2013 01:01 am

बागेतल्या एका बाकावर विसावलो होतो. रिवाजानुसार तासभर गोल गोल चकरा मारून झाल्या होत्या. नाव नाना-नानी पार्क; पण आसपास फक्त नानाच नाना दिसत होते. नावापुरतीसुद्धा एकही नानी पार्कमध्ये फिरकली नव्हती. मीही एकटाच आलो होतो. आमच्या घरची नानी टीव्ही मालिकांच्या रिपीट टेलिकास्टचा आस्वाद घेत मनातल्या मनात बागेत फिरण्याचा व्यायाम करत होती.
सूर्य नुकताच मावळला होता. संधिकालाच्या धूसर वातावरणात मनाला हुरहुर लागत असते. वय वाढतं तशी ही भावनाही वाढते. नक्की असं काहीच कारण नसतं. तितक्यात माझ्या पाठच्या बाकावर दोन ‘नाना’साहेब फिरणं आटोपून बसले.
एक नाना कातावले, ‘‘अरे, कुटुंबप्रमुख मी- आणि घरात मलाच किंमत देत नाहीत, याचा अर्थ काय?’’
नाना क्रमांक दोन उत्तरले, ‘‘चालायचंच. आपण दुर्लक्ष करावं.’’
हुरहुर कॅन्सल करून मी कान टवकारले.
‘‘दुर्लक्ष कसं करू? कोकणातलं घर आणि जमीन विकायला काढलीय मुलानं. त्या पशांनी मुंबईजवळ एक वीकएंड होम घेणार आहेत.’’
‘‘छान! म्हणजे आपल्या क्लबच्या ट्रिपला हक्काची जागा मिळाली.’’
‘‘धन्य आहे तुझी. तुला ट्रिपा दिसताहेत. मी मन:शांती हरवून बसलोय. अरे, वडिलोपार्जति घर आहे ते. माझ्या आधीच्या तीन पिढय़ा जन्मल्या होत्या त्या पवित्र वास्तूत.’’
‘‘सध्या कोण राहतं त्या घरात?’’
‘‘कोण राहणार? कुलूप लावून ठेवलंय. चार पसे घातले तर अजूनही ते घर टुकटुकीत होऊन जाईल. पण सुनेला मत्रिणींसारखं एक मॉडर्न वीकएंड होम घेण्याचे डोहाळे लागले आहेत.’’
‘‘मला विचारशील तर तू संमती देऊन टाक.’’
‘‘अजिबात नाही. माझ्या बायकोचीही याबाबतीत मला साथ आहे.’’
‘‘गावाला जाऊन राहाल का तुम्ही दोघं कायमची?’’
‘‘ते कसं शक्य आहे? आडगाव आहे ते. आमचं आता वय झालंय. दुखलंखुपलं तर कोण बघणार?’’
‘‘मग तुमचं वय झालंय हे मान्य करा ना! सोडा त्या डुगडुगत्या घराचा हव्यास. ते तुमचं आता नाहीच असं समजा. ज्यांचं ते होणार आहे त्यांना त्यांच्या मर्जीप्रमाणे विनियोग करण्याची मुभा देऊन टाका.’’
‘‘छट्! डोक्यावर चढून बसतील आमच्या. यू नो, रविवारी माझी सगळी पुस्तकं रद्दीत देऊन टाकण्याचा कट शिजला होता. बायकोसुद्धा सामील झाली होती. मी रद्दीवाल्याला हाकलवून दिला. अरे, तुमच्या मुलांची अभ्यासाची पुस्तकं ठेवायला अख्ख्या घरात काय फक्त माझ्याच बुकशेल्फ सापडल्या? सुनेनं िहदी सिनेमांच्या ह्य़ा इतक्या डीव्हीडी गोळा करून ठेवल्या आहेत. द्या की त्या फेकून. बक्कळ जागा तयार होईल.’’
‘‘पण आता तुला जुन्या पुस्तकांचा ध्यास कशाला? एखाद्या छोटय़ाशा शाळेला किंवा गावाकडच्या वाचनालयाला नेऊन दे. तिथली पोरंथोरं दुवा देतील. इथं तुझ्या नातवांच्या पुस्तकांना जागा होईल.’’
‘‘छट्! मी जिवंत असेपर्यंत माझ्या पुस्तकांना हात लावू देणार नाही. पुस्तकांचं प्रेम नाहीच रे यांना. घरात पाय टिकेल तर पुस्तकं वाचतील. किती उशिरा घरी येतात रे! यांचं बघून उद्या मुलंही मध्यरात्री उगवायला लागतील. मग काय करणार?’’
‘‘बेशिस्त आहेत का रे तुझी नातवंडं?’’
‘‘लहान आहेत अजून. पण नाचगाण्यात लक्ष अधिक असतं. टीव्हीवरच्या डान्स प्रोग्रॅममध्ये जाणार म्हणतात. ही यांची महत्त्वाकांक्षा!’’
‘‘लहानपणी गल्लीत क्रिकेट खेळण्याच्या नादात मी भान विसरत असे. पण पुढे शिक्षण, नोकरी आणि संसार व्यवस्थित केला. फक्त आता खेळ बदलले आहेत, इतकंच.’’
‘‘पण आपल्या वेळी सध्याप्रमाणे जीवघेणी स्पर्धा नव्हती. आमची सूनबाई पोरांच्या भंपक हट्टाला खतपाणी घालते. आता डान्स क्लासला घातलंय.. मुलांना आणि स्वतला. मला ही थेरं अजिबात पसंत नाहीत.’’
‘‘तुझा काय संबंध?’’
‘‘म्हणजे? अरे, सख्खा आजोबा आहे मी त्यांचा. नातू इंजिनीयर आणि नात डॉक्टर व्हायलाच हवीत. हवं तर मी त्यांची फी भरेन. शिक्षणाचा इतर सगळा खर्चही करेन. भरपूर पसे आहेत माझ्याकडे.’’
‘‘मुलगा काय म्हणतो?’’
‘‘पशाची टिमकी वाजवू नका म्हणतो. त्याला गलेलठ्ठ पगार आहे. शिवाय सून नोकरी करते. पण माझ्या मते, तिनं घरी बसून संसार सांभाळावा. माझी बायकोही याच कारणावरून धुसफुसते. पण विचारतो कोण?’’
‘‘काय करते सून?’’
‘‘चार्टर्ड अकाऊंटंट आहे. रँक मिळाली होती.’’
‘‘काय सांगतोस? वा! मग तिनं घरी बसून ज्ञानाला गंज का चढू द्यावा?’’
‘‘तू नक्की कोणाच्या बाजूचा आहेस?’’
‘‘तुझ्याच! तुला आणि वहिनींना आता निवांतपणा, स्वास्थ्य आणि सौख्य मिळायला हवं. पण त्यासाठी तुम्ही अलिप्त व्हायला शिकलं पाहिजे. तुमचा संसार यशस्वीरीत्या पार पडलाय. आता एक्झिट घेण्यापूर्वीची जी काही र्वष असतील ती ‘इदं न मम’ असं म्हणत निर्धास्तपणे मजेत घालवा. संसारी असावे, असोनि नसावे, अंतरी असावे सुखरुप!’’
‘‘का म्हणून संसारी नसावे? हा संसार मी माझ्या हिमतीवर उभा केलाय. सगळं मी स्वहस्ते कमावलंय. मी का म्हणून त्यावर पाणी सोडू? जोवर माझे हातपाय सशक्त आहेत आणि डोकं सक्षम आहे, तोवर घरात अंतिम निर्णय माझाच असायला हवा. मी शरणागती पत्करणार नाही.’’
‘‘पराभवाचा प्रश्न येतोच कुठे? तुम्हा चौघांचं काय युद्धबिद्ध चाललंय की काय? अरे, आता संसाराची नौका वल्हवायला चिरंजीव आणि सूनबाई समर्थ आहेत. ते त्यांच्या मुलांना बिघडू देणार नाहीत. त्यांची काळजी करणं सोडून द्या.’’
‘‘म्हणजे आम्ही कान, तोंड आणि डोळे मिटून घ्यायचे का?’’
‘‘तुमचा सल्ला मागितलाच तर त्यांना जे हवंय तसंच मत द्या. अरे, राज्य करून झालंय तुमचं. आता देव बनून मुलांच्या देव्हाऱ्यात बसा. मुलं जे काय ठरवतील त्यावर ‘तथास्तु’ म्हणा. मग पहा- ती दोघंही तुम्हाला हसतमुखानं किती मान देतात ते. तुम्ही सुखी व्हाल. ते खूश होतील.’’
‘‘माय फूट! मी माझा कंट्रोल कदापिही सोडणार नाही.’’
नाना-नानांची जुगलबंदी टायब्रेकमध्ये अडकली. पण दोन नंबरच्या नानासाहेबांचा अलिप्ततावाद माझ्या मनाला भावला. घरी गेल्यावर आमच्या नानीला पटवून दिलं पाहिजे. तोच तर एक मोठा प्रॉब्लेम आहे. मला उमजलेली कोणतीच गोष्ट ती सहजासहजी समजून घेत नाही. म्हणजे आमच्या घरीही या जुगलबंदीची सांगता होईपर्यंत नवीन वर्ष उजाडणार असं दिसतंय.
त्याच नववर्षांसाठी सर्व बंधूभगिनींना हार्दकि शुभेच्छा!   
(समाप्त)

First Published on December 22, 2013 1:01 am

Web Title: nana nani
टॅग Old People
Next Stories
1 अंतर-ज्ञान
2 परिभक्षक
3 स्वातंत्र्य
Just Now!
X