भ्रष्टाचारात सातत्य आहे. पण ते भ्रष्टाचारविरोधी आंदोलनं, चळवळी आणि उपक्रम यांत का दिसत नाही? ‘लोकसत्ता’च्या वर्धापन दिनानिमित्ताने समाजातील जागल्याची भूमिका निभावणाऱ्या ‘लोकसत्ता’ला यासंबंधात व्यापक विचारमंथन करणे गरजेचे वाटते. या संदर्भात  व्यक्ती आणि समाजाच्या उदासीनतेबाबतची खंत अतिथी संपादक नाना पाटेकर यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर राजकारण, प्रशासन, न्यायव्यवस्था, आरोग्य आणि समाजकार्य या क्षेत्रांतील भ्रष्टाचार आणि त्यावरच्या उपाययोजना याबाबत त्या- त्या क्षेत्रातील मान्यवरांनी केलेले विचारमंथन..
डोंगर, नद्या, समुद्र, जंगल म्हणजे देश नव्हे.
देशाची संकल्पना काय?  तर तिथले लोक.
माझ्यासकट ते लोक कुठायत?
ती सगळी माणसं मी शोधतोय.
आजच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीशी कुठलंही नातं नसलेली ती माणसं मी शोधतोय.
१९५५ सालची मुंबई मला आठवतेय. तेव्हा मी पाच वर्षांचा होतो.
गंमत म्हणून आम्ही कधी कधी फुटपाथवर झोपायचो. रस्त्यावरून बेमुर्वतखोरपणे भरधाव गाडी चालवणारे आजचे नट त्यावेळी नव्हते म्हणून आज मी जिवंत आहे.
मुंबईच्या पायात त्यावेळी चाळ बांधले होते. या चाळीचा छुन्नक छुन्नक असा नाद होता. त्या चाळीत राहणारे आम्ही मुंबैकर. सगळ्या जाती-धर्माना एकच नाव होतं- मुंबैकर. कुठलाही पारशी मराठी माणसाला- ‘ये साला घाटी, तुज्या काय ध्यानमंदी येते नाय काय अं.. साला अनाडी. दोन बुका शिकव तुजे पोऱ्याला, नाय तर तुज्यासारकाच भांडी घाशेल लोकाचे घरामंदी,’ असं बिनदिक्कत म्हणू शकत होता. मुसलमान घरातला कर्ता पुरुष आपल्या मुलाला विश्वासानं हिंदूच्या घरात शिकायला पाठवायचा. म्हात्रे गुरुजींना शबीर पेशमामपेक्षा जास्त कलमा पाठ होत्या. खानसाहेब सानेगुरुजींच्या ‘श्यामच्या आई’ने गहिवरायचे. लोहाराच्या परसातून चोरलेला ओंडका होळीत टाकताना खातूभाईंच्या चेहऱ्यावर अभिमान असायचा. शिगवणाची बाबी दोन दिवस गायब होती याची जाहीर चर्चा करताना जागतिक प्रश्नाचं स्वरूप आल्यासारखं वाटायचं. केन्याच्या दोन कोंबडय़ा नाहीशा झाल्यावर दुसऱ्या दिवशी केन्याच्या म्हातारीनं दिलेल्या शिव्या ऐकल्यावर कानांना फुकटात तेलपाणी केल्याचा आनंद मिळायचा. खोतअण्णांच्या आंब्यावर दगड मारला की आतून मुलतानीत बांधलेली एक अस्सल चीज ऐकायला मिळायची आणि एक प्रकारचं आध्यात्मिक समाधान मिळायचं.
पूर्वी शिव्या ऐकल्या की आनंद मिळायचा. निखळ आनंद. खरं तर त्या शिव्या ऐकण्यासाठीच सगळा आटापिटा असायचा. आज देऊन बघा. जला देंगे. केवढा फरक? दत्तूशेठ यांचं वाणसामानाचं दुकान. सकाळी खूप गर्दी असायची तिथं. मारुती नाक्यावर दोनच दुकानं- दत्तू खातू आणि सुंदरमानकर. पण खातूंच्या दुकानात गर्दी जास्त. अशावेळी अमीन गोगा तिथून जात असेल तर दत्तूशेठ हातातलं सगळं काम सोडून बाहेर रस्त्यावर येत व अमीन गोगाला एका विशिष्ट पद्धतीनं हाक मारीत. अमीन गोगा हा थोडा मंदबुद्धी होता. दत्तूशेठनी हाक मारली की तो चिडून अद्वातद्वा शिव्या देत असे. मग दत्तूशेठ तृप्त मनानं पुन्हा आपल्या जागी बसून गिऱ्हाईकांच्या पुडय़ा बांधीत असत. माझी आई कधी कधी दत्तूशेठना म्हणत असे- ‘काय भाई, कशाला चिडवता त्याला? किती घाण घाण शिव्या देतो तो!’ दत्तूशेठ म्हणायचे, ‘त्या ऐकल्याशिवाय दिवस बरा जात नाही.’
काय म्हणायचं याला? शिव्यासुद्धा जगण्याची गरज होती आमची त्यावेळी. आज मात्र दोन शब्दांचीही देवाणघेवाण होत नाही.
गोकुळाष्टमीला हंडी फोडताना खालचा थर मुसलमानांचा. चार-पाच वेळा हिंदूूंनी प्रयत्न करूनही हंडी फुटायची नाही. मग शेवटी खालचा थर मुसलमानांनी लावला की हंडी फुटलीच समजा. मग हुमायून म्हणायचा, ‘बगीतलाव मुसलमानाबिगर तुमची हंडी फुटत नाय.’ त्यावर नाना डोंगरीकर म्हणायचे, ‘खरा हाय हो. माज्या म्हायतीत ही सव्वीसवी येळ. मुसुलमानाशिवाय हंडी उफलत नाय.’
काय गंमत होती!
खेतवाडीत आबा मुणगेकर होते. माझ्या वडिलांना ते वडिलांसारखे. गोदीत काम करायचे. कमालीचे वात्रट स्वभावाचे. कधीतरी वडिलांना म्हणायचे, ‘अरे गजा, तीन बोटी ईल्या हत बंदरात.’
वडील सहज विचारायचे, ‘कुठल्या?’
‘जपानच्या हत. इचार नाव काय?’
वडील विचारायचे, ‘काय?’
आबा म्हणायचे, ‘एकीचे नाव ‘तुजी मारू’, दुसरीचे नाव ‘कवा मारू’ आणि तिसरीचे नाव ‘आता कित्या मारू.’ आणि मग सगळे जोरजोरानं हसायचे. (जपानी बोटींची नावं अशीच असायची. एम. टी. आयवा मारू, कामा गोटा मारू!)
मालवणी आणि जपानी भाषेचं नातं मला त्यावेळी कळलं.
मी वडिलांना खूप घाबरायचो म्हणून असेल, आबांनी माझ्या वडिलांची केलेली टिंगल मला खूप आवडायची.
मालोजी वराडकर हे अजून एक शेजारी. वडिलांचे समवयस्क. हा इसम वर्षभर तोंडातून एक शब्द काढायचा नाही. नाकासमोर चालणारा. प्रेसमध्ये कंपोझिटर होता. वर्षांतून एकदा गटारीला दारू पिणार आणि मग वर्षांची कसर भरून काढणार. त्या दिवशी मालोजी झोपेपर्यंत त्यांच्याशिवाय कुणीच बोलत नसे. अठरा ठिपके आणि अठरा ओळींची शिव्यांची रांगोळी ऐकताना कानांच्या पणत्या व्हायच्या.
मियाँमद यांच्या घरात आम्ही राहायचो.
मियाँमद यांच्या दोन बायका. अन्वरी आणि नज़्‍ाीरा.
अन्वरीची दोन मुलं- सैफुल, दिलशाद आणि नज़्‍ाीराची छागन, बाबला. मुलाचं नाव आठवत नाही. सगळे खेळायला एकत्र. माझी पहिली मैत्रीण दिलशाद. मी पाच वर्षांचा, ती चार. आता ती कुठेतरी अमेरिकेत असते.
हे सगळं सांगण्याचा हेतू एवढाच, की फक्त नाती होती; जातधर्म नव्हते. एकमेकांना आडवे जात होतो, त्यामुळे भेटत होतो. समांतर कधीच नव्हतो. सहजच कुणाच्या प्रेताला नमस्कार करणारी माणसं आज ‘याला आत्ताच मरायला हवं होतं का?’ अशी रीअ‍ॅक्ट होतात.
रस्त्यावर चालणारा प्रत्येकजण सजग असायचा. एखादा अनुचित प्रकार घडला तर सगळे धावून जायचे. त्यात जो कुणी असेल त्याचा परस्पर समाचार घेतला जायचा. पोलीस स्टेशन वगैरे नंतर. आता बाजूच्या घरात कुणी मेलं असेल तरी माझ्या घरची पार्टी बिनदिक्कत चालू असते. निबर व्हायला लागलोत आपण! रीअ‍ॅक्ट व्हायचंच नाही, ही वृत्ती झालीय आपली. आपण निवांत झोपू कसे शकतो? सकाळी छान उठू कसे शकतो? पुन्हा दिवसाचे सगळे विधी छान कसे चालू राहू शकतात? वय वाढतंय, पण मोठं कुणालाच व्हायचं नाहीए.
सगळे धर्म इकडून तिकडून एकच गोष्ट सांगतात; पण आम्ही आमच्या सोयीप्रमाणे धर्म वाकवतोय. धर्माची व्याख्या आपण सवंग करून ठेवलीय. खरा धर्म कुणी पाळतच नाही. सगळे पोपट पाळतात.
मध्यंतरी अण्णांनी छेडलेलं आंदोलन खूप दिलासा देऊन गेलं. काहीतरी चांगलं घडतंय याची चाहुल लागली. जनमानस अण्णांच्या पाठीशी उभं राहिलं. डोंगराआडून सूर्य येण्याची आम्ही वाट पाहू लागलो. पण सूर्य उगवलाच नाही. उगवणारच नाही असं नाही; पण उगवला नाही, हे खरं. अण्णांची तुलना गांधीजींबरोबर केली गेली. अण्णा नम्रपणे म्हणाले, ‘मी केवळ गांधीजींचे विचार मानणारा आहे.’
गांधीजींची वैचारिक बैठक पक्की होती. सरकारबरोबरचा युक्तिवाद आणि जनतेबरोबरचा सुसंवाद त्यांनी छान साधला होता. अहिंसेला त्यांनी हत्याराचं स्वरूप प्राप्त करून दिलं. वरकरणी भावनिक वाटणारी हाताळणी सखोल होती. वैचारिक आणि भावनिक यांचं बेमालूम मिश्रण होतं त्यांच्या मांडणीत. बॅरिस्टर आणि माणूस यांच्या संगमातून ते घडलं असावं. आणि म्हणूनच लोकांच्या मनात ते ‘महात्मा’ म्हणून रुजले. अण्णा जोपर्यंत तुम्ही एकटे होता, तोपर्यंत आम्ही तुमच्यासोबत होतो. ‘टीम’ झाल्यावर काहीतरी बिनसलं. टीमचं उत्तरदायित्व तुम्हाला घ्यावंच लागणार होतं. तिथंच कुठेतरी चुकल्यासारखं वाटतं.
तुमच्याबद्दलचं प्रेम आणि आदर तेवढाच आहे, पण आज आधार कमी वाटतोय. कदाचित उद्या पुन्हा वाटेल. वाट पाहीन. आशाळभूत शेतकरी पावसाची पाहतो तशी.
या साऱ्यात मी कुठाय?
माझ्यापाशी असलेल्या माध्यमाचा मी योग्य उपयोग करतोय का? माझे चित्रपट केवळ गल्लाभरू आहेत का? तुमच्या- माझ्या मनातली घुसमट मी तुमच्यापर्यंत पोचवतो आहे का चित्रपट माध्यमातून? तुम्ही ठरवायचं. चुकत असेन तर अव्हेरायचं. बरोबर असेन तर तुम्ही बरोबर असणारच आहात. माझ्यापाशी माझी घुसमट काढण्यासाठी माध्यम आहे. ज्यांच्याकडे काहीच नाही ते काय करीत असतील? किती गुदमरलेले असतील?
एक दिवस याचा स्फोट नक्कीच होईल. त्यावेळी किंकाळी नसेल. वळलेली मूठ नसेल. तलवार नसेल. प्रत्येकाच्या डोळ्यांत केवळ ठिणगी असेल. दबलेली. वर्षांनुर्वष. त्या जथ्थ्याचं मूक चालणंसुद्धा भयप्रद असेल. डोळ्यांतून उडणाऱ्या स्फुल्लिंगातून वणवा पेटेल. त्यात भ्रष्ट मंडळी लोप पावतील. हा आशावाद नाही, हे वास्तव आहे.
नवीन पिढीमध्ये तो त्वेष आहे.. निर्भयता आहे.. आणि समर्पणही आहे. सगळंच काही संपलेलं नाही. ही सुरुवात आहे..

नाना पाटेकर यांची कविता
आभाळाला भिंती घातल्या आणि मी घरंदाज झालो
वाटय़ाला आलेला खिडकीएवढा आभाळाचा तुकडा
अवकाश बनून राहिला माझ्यासाठी
सूर्याला फुंकर घालून
घरच्या दोन पणत्यांत दिवाळी करत राहिलो
भिंतीवरची सावली फक्त मोठी झाली.
संवेदकनाकक्षा तशाच बथ्थड
चार चांदण्यांची खिडकीच जगण्याची चौकट बनून राहिली,
एक नियमित मरण जगण्याची सवय झाली.
त्याची भलावण करत राहिलो
भल्या मोठय़ा आभाळाची सवय तुटलेली
चुकून दरवाजाबाहेर पडलो तर भीती वाटायला लागते.
एवढं मोठं आभाळ डोक्यावर तरंगत असलेलं पाहून
कोसळेल की काय असं वाटायला लागतं.
चांदण्यांचा खच पाहून डोळे गरगरायला लागतात
समोरच्या चिरंजीव अंधारातून कुणीतरी येऊन
झडप घालेल असं वाटायला लागतं.
आणि पुन्हा मी स्वत:ला चार भिंतीत चिणून टाकतो
मी असा का झालो?
इतका असुरक्षित?
कधी निघणार बाहेर मी मीच बांधलेल्या थडग्यातून?
खरं तर हा आभाळाचा मंडप माझ्यासाठीच आहे ना?
कधी झिमटणार मी या आभाळाला?
कधी माळणार मी या चांदण्या माझ्या केसात?
क्षितिजावरील सूर्याकडे मान उंचावून पाहत असताना
कधी फुलणार इंद्रधनुष्य माझ्या डोळ्यात?
मला या भिंतीच्या बाहेर पडायला हवं
निबिड अंधाराच्या पलीकडे कदाचित खूप
प्रेम करणारा हात असेल माझी वाट पाहत
मी कदाचित प्रेम करणं विसरलोय
बस थोडा हात लांब करून अंधाराला छेदण्याची गरज आहे
कुणी येणार का बरोबर?
पहिल्यांदा अंधार झेलू
मग आकाश लांब नसेल.