मकरंद देशपांडे

वर्तमानपत्रात एखाद्या हिंसक घटनेबद्दल बातमी वाचल्यानंतर आपल्याला राग येतो किंवा खूप घृणा वाटते, त्रास होतो. बातमी आज आलीय, घटना काल घडलीय; पण आज ती वाचल्यामुळे शिळ्या बातमीचीही प्रतिक्रिया खोलवर उमटते. आता जर आपण असा विचार केला की, त्या घडणाऱ्या घटनेचे आपण साक्षी असतो तर आपली प्रतिक्रिया काय असती? मला नाटककार म्हणून हा प्रश्न पडला. म्हणजे मी रेखाटलेलं पात्र जर अशा एखाद्या हिंसक घटनेला साक्ष असेल तर त्याच्यावर नेमका काय परिणाम होईल? ते पात्र हतबल ठरेल? की फक्त साक्षी ठरेल आणि त्याच्या आत्म्याला कुठेतरी तडा बसेल?

अहिंसेने स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यावर हिंसा बाहेर आली. खरं तर ब्रिटिश गेल्यावर हिंसा आत राहून गेली होती, ती देशातल्या दोन धर्मानी आपापसात वापरली असंही वाटू शकेल. पण टॉलस्टॉयनी तर चक्क लिहिलं होतं की, भारतात (ब्रिटिशांची) हिंसक गुलामी असायचं कारण असं की, भारतीय हिंसेने जगत आले आणि जगत आहेत. त्यांना मानवातलं अनादी प्रेम दिसलंच नाही. त्याचं शेवटचं वाक्य जरी आपण चुकलेलं आहे असं म्हटलं तरी आज वर्तमानपत्रांत हिंसक घटना रोज वाचायला मिळतात. आता यावर कोणी म्हटलं, की अशा घटना तर जगभर घडताहेत, तर त्यावर माझ्याकडे उत्तर नाही. पण हिंसेला धार्मिक वा राजकीय कारण किंवा वळण असलं की माझ्या मनाला खूप त्रास होतो. कारण मला लहानपणापासून सांगण्यात आलंय की, मनुष्यजन्म हा खूप मौलिक आहे. कितीतरी योनींतनं गेल्यावर हा जन्म मिळतो. आणि मी ते आजही खरं मानतो. त्यातही आध्यात्मिक मातीत आपला जन्म झाला याबद्दल तर मी स्वत:ला कृतकृत्यच समजतो. पण मग एवढी हिंसा का?

त्रेतायुगातला मर्यादापुरुषोत्तम राम आणि द्वापारयुगातला महाभारत होऊ देणारा देवाधिदेव श्रीकृष्ण या दोन देव आणि नायकांमधला फरक काही सूचित करतो का? कलियुगात (आज) काहीही आक्षेपार्ह किंवा घृणास्पद घडलं तर विवेकी डोकी ‘हे कलियुग आहे.. असं चालणारच!’ असं म्हणून सहज स्वस्थ बसतात किंवा आपणहून काही बदलायचं नाही म्हणून ते युगावर ढकलतात. युग म्हणजे काळ. मग त्याला मानव जबाबदार नाही का? काळ स्वत:हून हिंसक का होईल? मला असं वाटतं की, मानवाला प्रेमापेक्षा हिंसा जास्त प्रिय आहे. कारण त्यात पौरुषत्व आहे.

प्रेम हे मानवाला बुळबुळीत, मुळमुळीत वाटत असावं. म्हणून बऱ्याचदा प्रेमिकांना त्यांच्या प्रेमामुळेच मारण्यात आलंय. म्हणजे त्या प्रेमालाच!! हे घोषित करण्यासाठी, की हे कलियुग आहे.. इथे शोकांतिका हाच शेवट योग्य आहे.

माझ्या नाटकाचा नायक समुद्रकिनारी बसून सूर्याचं दिवसभराचं काम उरकून क्षितिजावर अस्ताला जाणं पाहण्यात मग्न असताना अचानक त्याला आरडाओरडा ऐकू येतो आणि तो त्या दिशेला पाहतो. किनाऱ्याला जोडणाऱ्या रस्त्यावर काही लोक एका टॅक्सीची तोडफोड करताना त्याला दिसतात. टॅक्सीवाला मधे पडायचा प्रयत्न करतो, पण त्यालाही त्याच्या आक्रोशाचा प्रसाद मिळतो. मग तोही या नायकाप्रमाणे बघ्याची भूमिका घेतो. त्यानंतर त्याला दरडावून सांगण्यात येतं की, जिथून आलात तिथे जा!! नायक पुन्हा क्षितिजाकडे पाहतो. त्याला सूर्य असा भासतो, जणू ‘मी हे पाहिलंच नाही. कारण माझा तर आधीच अस्त झाला होता.’ हिंसेची कारणं वेगळी असतील, पण हिंसा हाच स्थायी धर्म असल्यानं हे तर होणारच! सूर्याच्या अनुपस्थितीत नायक समुद्रकिनारी तसाच बसून राहतो. एव्हाना त्या घटनेत (टॅक्सीच्या) फुटलेल्या काचा त्याच्या मनाच्या ठिकऱ्या करून जातात.

हाच प्रसंग जेव्हा चित्रपटात दाखवतात तेव्हा काचा फुटणे, फोडणाऱ्या वीरांच्या तोंडचे अपशब्द किंवा टॅक्सीचालकाचा आक्रोश वाढावा म्हणून sound effects आणि sound processing केलं जातं. पण जेव्हा ते वास्तवात पाहिलं आणि ऐकलं जातं तेव्हा ते जरी दूर घडत असलं तरी खूप भीषण वाटतं. नायकाला कळतच नाही की सुंदर सूर्यास्त बघताना हे काय घडलं? मला हे का पाहावं लागलं? माझा या घटनेशी संबंध नाही असं कसं होऊ शकतं? मी या घटनेचा साक्षीदार आहे याला काहीतरी संदर्भ असणार? त्याला याचं उत्तर असं वाटतं, की तो काव्य करणारा कवी माणूस. स्वप्नजगात वावरणारा. कदाचित आजच्या वास्तवापासून दूर. तर त्याला वास्तवात परत आणण्यासाठी या घटनेची आवश्यकता होती. पण त्याला याचा मोबदला आपलं ‘काव्य’ देऊन चुकवावा लागतो. त्याच्या मनातलं काव्य हरवतं. नाटकाचं नाव- ‘कविता भाग गई’!

नायकाची प्रेमिका आपल्या प्रियकराला बोलतं करण्याचा प्रयत्न करते; पण नायक त्या घटनेनंतर बदललेला असतो. त्याला कशातच रस उरलेला नसतो. तो प्रेमिकेशी प्रेम करण्याच्या मन:स्थितीत नसतोच. प्रेमिकेला मात्र नायकाच्या या टोकाच्या बदलाबद्दल नाराजी असते. तिचं म्हणणं पडतं की, समाजात हिंसा असतेच. त्यात काय नवीन आहे? नायक मात्र हे मान्य करायला तयार नाही, की समाज हा हिंसेला मान्यता देतो. समाजाला माहिती असणारच, की हिंसा हे मानवाला मानवापासून आणि स्वत:च्या सदसद्विवेकबुद्धीपासून दूर नेणार. शक्तीचं साधन हिंसा असणं बरोबर नाही. असं झालं तर ‘भीती’ हे अस्त्र ठरेल आणि जनजीवनातील जगण्याची स्वाभाविक मुक्तता नाहीशी होईल. ‘प्रगती’, ‘शांती’ हे भाषणातले शब्द भाषणातच राहतील.

प्रेमिकेला मात्र असं काही वाटत नाही. तिला वाटतं, आपला प्रियकर कविमनाचा असल्यानं अधिक भावुक आहे. जेवढी वाटतीये तेवढी स्थिती वाईट आणि भीषण नाही. ती ठरवते की काहीही करून आपण प्रियकराच्या मनाला ओलं करणारं काव्य परत आणायचं. पण तिचे सगळे प्रयत्न व्यर्थ ठरतात. नायकाचं म्हणणं पडतं की, त्याचं काव्य आता त्याची वेदना आहे. त्याची कविता पळून गेली आहे. प्रेमिकेला कळत नाही की कवितेला कसं शोधायचं? कसं परत आणायचं?

एका रात्री दरवाजावर थाप ऐकू येते. दार उघडल्यावर एक उंच, धिप्पाड, भिकारी दिसणारा, अंगाला कुबट वास येणारा, पण गतकाळातला कुणीतरी असा जटाधारी नायकाला म्हणतो, ‘‘तुझी घाबरून पळून गेलेली, वेदनाग्रस्त कविता माझ्याकडे आली आहे.’’ हे ऐकून नायक चाचरतो. घाबरतो. ‘‘कोण तुम्ही?’’ या प्रश्नाला मिळालेलं उत्तर ऐकून नायक जमिनीवर पडतो. जटाधारी व्यक्ती अश्वत्थामा आहे. अश्वत्थामा कृष्णाच्या शापानुसार रोगिष्ट अवस्थेत चराचरात भटकतो आहे. तो चिरंजीव असल्यानं त्याची आता यातून सुटका नाही. नायकाच्या लक्षात येतं की, अश्वत्थामा हा महाभारतातल्या अन्यायी, अनैतिक हिंसेचं प्रतीक आहे. श्रीकृष्णानं त्याला यासाठी भटकत ठेवलंय, की समाजातल्या वेदनेला घर किंवा उदर मिळेल. आता तो अश्वत्थामा मला माझी कविता परत करायला आलाय.

नायक आणि अश्वत्थाम्याचा हा अनाकलनीय संवाद चालू असताना प्रेमिकेला जाग येते. आधी तिला हे स्वप्न वाटतं. मग ती अश्वत्थामाच्या कपाळावर श्रीकृष्णानं भगवती मणी काढून घेतल्यामुळे झालेली जखम पाहते. त्यातून सतत रक्तस्राव होत असतो. अश्वत्थामा तिच्याकडे जखमेवर लावण्यासाठी पीठ मागतो. ती पीठ देते.

अश्वत्थामा पीठ लावत असताना तिच्या डोक्यात भयानक वाटणारी कल्पना येते. ती तिच्या मीडियावाल्या मित्राला फोन करते आणि विश्वास बसणार नाही अशी बातमी देते. त्यांना अश्वत्थामाचं लाइव्ह कव्हरेज पाहिजे असतं. प्रेमिकेने केलेल्या या फोनमुळे नायक चिडतो. अश्वत्थामा नायकाला सांगतो की, जीवन हे वेदनामय आहे, त्यामुळे कवितेला जपून ठेव. कारण तिला जर जाऊ दिलंस तर जगणं असह्य़ होईल. मीसुद्धा एका महाकाव्याच्या महाशोकांतिकेचा भाग आहे याची मला जाणीव आहे म्हणून मी हे सहन करू शकतोय. अश्वत्थामा लाइव्ह कव्हरेजसाठी तयार होतो आणि टीव्हीवरच्या प्रश्नांचा पोरकटपणा सुरू होतो. कारण हिंसेचं काव्य वाचणं आणि हिंसेचा भाग असणं यांत खूप फरक आहे. अश्वत्थामा टीव्हीवरच्या या हास्यास्पद संवादाला श्रीकृष्णाच्या शापाचा भाग मानतो आणि निघून जातो.

नायकाच्या पात्रासाठी मला प्रामाणिक नट हवा होता. यशपाल शर्मा एवढा प्रामाणिक निघाला की नाटकाचे प्रयोग झाल्यावर त्याची वाहवा झाल्यावरही तो म्हणाला की, मला पहिला प्रवेश नीट जमला नाहीये. प्रेमिकेची भूमिका खूपच उथळ, बेजबाबदार आणि स्वार्थी असल्यानं अशी नटी हवी होती की जिला अभिनय करताना त्यात शरम नसावी. दिव्या जगदाळेनं प्रेमिका खरी केली. टीव्ही सूत्रधाराच्या भूमिकेतला पोरकटपणा आणि खोटेपणा निवेदिता भट्टाचार्यानी खराच केला. टीव्हीच्या कॅमेरामनची छोटी भूमिका रणवीर सिंगने- जो आता बॉलीवूडमध्ये नायक आहे- कमालीच्या ऊर्जेने केली. खरं तर तो नाटकाचं बॅकस्टेज करत होता. ट्रंका उचलणं, चहा आणणं, सेट लावणं वगैरे. पण त्याला अभिनय करायची जबरदस्त इच्छा होती. म्हणून त्याला ऐनवेळी सांगितलं की, संगीतावर दृश्य बदलत असताना तू कॅमेरामन हो आणि लाइट्स अ‍ॅडजेस्ट कर आणि शूट कर. त्याला तेवढं करून खूप बरं वाटलं होतं. अश्वत्थामा मी केला. माझा आवडता नायक- जो खलनायक झाला. अश्वत्थामा साकार करताना माझ्या डोळ्यांत पाणी यायचं. कारण तो सगळ्या अनीतीचा लक्ष्य ठरला होता. त्याच्या वडिलांना कूटनीतीने मारण्यात आलं होतं. पण त्यानं जे केलं तेसुद्धा भयंकर होतं म्हणून तो आजही शापित, चराचरांत फिरतो आहे. त्याला मोक्ष मिळायला नको का? जर त्याला या वेदनेतून मुक्ती नाही तर विश्वात शांती कोठून येणार?

‘हे श्रीकृष्णा, अश्वत्थाम्याला शापमुक्त कर.’

जय श्रीकृष्ण! जय कविता!

जय आत्मा! जय अश्वत्थामा!

mvd248@gmail.com