मकरंद देशपांडे

निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई

आज माझ्या पाडसाला झोप का गं येत नाही

गाय झोपली गोठय़ात, घरटय़ात चिऊताई

परसात वेलीवर, झोपल्या गं जाई-जुई

मिट पापण्या डोळ्यांच्या, गाते तुला मी अंगाई

आज माझ्या पाडसाला झोप का गं येत नाही.

बाळाला या अंगाईगीताने झोपवणारी आई.. पण मोठं होता होता अंगाई विस्मरणात जाते; आणि ऐसपस बिछान्यावर झोपूनही डोळे उघडे छताला पाहत राहतात. झोपेला कशी हाक घालावी कळत नाही. झोप रुसली? उडून गेली? का झोपेची वेळ चुकली? कारणं अनेक. धकाधकीचं जीवन, महत्त्वाकांक्षेचं जाळं, पंचतारांकित स्वप्नाचं आकाश आणि नकारात्मक विचारांचे पाश!!

या हरवलेल्या झोपेचं काय करायचं? हा प्रश्न तुमच्या-आमच्या जवळपास असणाऱ्या बऱ्याच जणांना कधी ना कधी पडला असणार. मलाही पडला होता; कारण कामानिमित्त प्रवास आणि अवेळी काम. तेव्हा मला निवेदिता पोहनकर फोनवर कळवळून म्हणाली की, ‘‘तुझी झोपही मीच पूर्ण करते.’’ आणि मी हसून हो म्हटलं आणि फोन बंद केला. कारण विमान कोचिन एअरपोर्टवरून उडणार होतं. विमानानं हवेत उड्डाण केलं आणि माझ्या मनानंसुद्धा!

विमानात अगदी सकाळी १० वाजतासुद्धा बरेच जण पेंगताना दिसले. असं वाटलं की, यांची झोप अपूर्ण आहे. कोणी यांची झोप झोपू शकेल का? या प्रश्नाच्या मेरू पर्वताला पादाक्रांत करत मी दिल्लीला पोहोचलो. दोन तास तिथे थांबून दुसऱ्या विमानानं वाराणसीला जायचं होतं. एअरपोर्टवर झोप पूर्ण करण्याच्या अकल्पित विचाराला घेऊन इथून तिथे फिरत होतो. दोन पाश्चात्त्य वयस्कर महिला एका विशाल पुस्तकालयासमोर उभ्या होत्या; पण त्यांना कळत नव्हतं की याक्षणी त्यांना कोणतं पुस्तक हवंय. वाराणसीच्या विमानात त्या माझ्याच बाजूच्या सीटवर बसल्यानं मी त्यांना माझ्याकडचं सईद मिर्झा या विचारवंत फिल्मी दिग्दर्शकानं लिहिलेलं ‘अम्मी’ नावाचं पुस्तक दाखवलं. मी म्हटलं, ‘‘वाचून बघा एखादं पान!’’ त्यांना आवडलं. मी लगेच त्यांना ते भेट म्हणून दिलं. प्रवासात त्या पुस्तक वाचत होत्या. मी विचार करत होतो. विमानात बरेचसे लोक पेंगत होतेच.

मी एअरपोर्टला उतरलो आणि सईदला फोन लावला आणि त्या महिलांशी सईदचं बोलणं करून दिलं. त्यांना खूप आनंद झाला. भारतातला हा त्यांच्यासाठी अविस्मरणीय क्षण ठरला, असं त्या म्हणाल्या आणि मला त्यांनी त्यांच्या राहत्या हॉटेलवर जेवणासाठी निमंत्रित केलं. आत्तापर्यंत त्यांना मी काय करतो हे सांगितलं नव्हतं, पण त्यातल्या एका महिलेनं मला विचारलं की, ‘‘मी पुस्तक वाचत असताना तू सतत विचारात दिसलास. काय विचार करत होतास?’’ मी म्हटलं, ‘‘झोपेचा. तुमच्या प्रवासामुळे तुमची अर्धवट राहिलेली झोप जर दुसरं कुणी घेऊ शकलं तर काय होईल? एक तर तुम्ही आपला प्रवास न थकता चालू ठेवू शकाल. दुसरं म्हणजे प्रकृती ढासळणार नाही.’’ तिला ही कल्पना एवढी भन्नाट वाटली की, तिनं आपल्या मत्रिणीला खूपच उत्साहानं सांगितली आणि त्याच्या दुपटीनं दुसरीनं मला, ‘‘पुढे काय? कसं शक्य आहे?’’ अशा प्रश्नांचा प्रेमळ भडिमार केला. मी म्हटलं, ‘‘डिनरला भेटीन दोन-तीन दिवसांत, तेव्हा कदाचित उलगडा झालेला असेल.’’

ती रात्र यायला फार वेळ लागला नाही. सेव्हन स्टार म्हणायला हरकत नाही असं वाराणसीतलं हॉटेल. थाळी, वाटय़ा, भांडी सगळं चांदीचं. मला कळलंच नाही आपण कुठे आलो आहोत. जाणून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हतो. वाराणसीत, गंगेच्या काठी शूटिंग करताना मनात मात्र झोपेचा विचार चालूच होता. तो जाणून घ्यायला दोघी वयस्क मत्रिणी माझं जेवण संपण्याची वाट पाहत होत्या. जेवण संपलं आणि एक सिगरेट शिलगावत मी बोलायला सुरुवात केली.

‘सोना स्पा’ नावाच्या स्पामध्ये क्लाएंट आपली झोप विकत घ्यायला जाऊ शकतात. म्हणजे तिथे असलेली ‘स्लीप गर्ल’ ही त्या क्लाएंटशी मानसिकरीत्या एकजीव झाली की, त्याला पाहिजे तितके तास ती त्याच्या वाटणीची झोप पूर्ण करणार आणि त्या वेळात क्लाएंट आपली कामं करत प्रवास करू शकतो. त्याची झोप ती भरून काढतीये. ‘स्लीप गर्ल’ला स्वत:च्या मनाची तयारी करावी लागते, कारण ज्या क्लाएंटसाठी ती झोपते, त्याच्या झोपेतली त्याची स्वप्नं, दु:स्वप्नंही तिलाही दिसतात आणि काही प्रचंड त्रासदायक असू शकतात.

नाटकात दोन नायिका. एक पुण्याची- जिची आर्थिक स्थिती खराब असल्यामुळे पशाची आत्यंतिक गरज, पण तिचं मन खूपच संतुलित असल्यामुळे ती दुसऱ्याची झोप झोपू शकते. दुसरी नायिका ही आपल्या जीवनाला कंटाळलेली असते. तिला पशाची गरज नसते, पण दुसऱ्यासाठी काही करायची इच्छा असते. या कामामुळे तिला झोपायला कारण मिळतं. खरं तर या ‘सोना स्पा’मध्ये आणखीनही स्लीप गर्ल्स आहेत; पण या नाटकात आपण या दोघी आणि त्यांचे दोन क्लाएंट यांची गोष्ट पाहतो.

एक क्लाएंट खूप मोठा व्यापारी असतो, ज्याच्याकडे खूप पसा आणि फार मोठा बिझनेस असतो, तर दुसरा क्लाएंट कॉर्पोरेट कंपनीत मोठय़ा पदावर असतो. दोघंही शिकलेले, पण झोपेसाठी मात्र भुकेलेले. त्यांना वाटलंही नव्हतं की, अशी काही गोष्ट घडेल. स्लीप गर्ल्सनी त्यांची झोप पूर्ण करताना त्यांच्या स्वप्नातल्या अशा काही गोष्टी पाहिल्या की, अतिशय सौजन्यानं वागणारी ही मंडळी त्यांच्या अचेतन मनात गुन्हेगार निघाली. व्यापारी ज्या स्लीप गर्लचा क्लाएंट होता तिनं त्याच्या स्वप्नात पाहिलं की, त्यानं एका बाईला बंदुकीनं गोळ्या घातल्या, तर दुसरीला बाथरूमच्या टबमध्येच मारायचा प्रयत्न केला. ‘सोना स्पा’च्या नियमानुसार क्लाएंटची स्वप्नं ही गुप्त ठेवली जातात. फक्त क्लाएंटलाच ती सांगितली जातात; जर त्यांना त्याबद्दल जाणून घ्यायचं असेल तरच! पण व्यापाऱ्याला जाणून घ्यायचं होतं. स्लीप गर्ल त्याला आठवून जसंच्या तसं स्वप्न सांगते. व्यापारी गांगरतो, कारण त्या दोन बायकांशी त्याचे प्रेमसंबंध असतात. तो व्यापारासाठी वेगवेगळ्या शहरांत जातो. या दोन बायका त्या शहरात त्याची ‘सोय’ म्हणून असतात, असं त्या बायकांना कळल्यावर त्या मागच्या काही महिन्यांपासून त्याच्यावर चिडलेल्या असतात. आता त्या व्यापाऱ्याला ब्लॅकमेल करत असतात. त्याच्याकडून फ्लॅट आणि महागडय़ा वस्तूंची मागणी करतात, नाही तर त्याच्या बायको आणि मुलाला सगळं सांगू, अशी धमकी देत असतात. या त्रासाला कंटाळून त्याच्या मनात त्या बायकांना मारून टाकण्याचे विचार येत असतात. या कारणास्तव त्याची झोप उडालेली असते.

दुसरा क्लाएंट कॉर्पोरेट कंपनीचा असतो. तो आपली खरी ओळख लपवून असतो. स्लीप गर्लला स्वप्नात दिसतं आणि ऐकू येतं, ‘‘खबरी! खबरदार! खरं बोल! जेलमध्ये टाकणार नाही, डायरेक्ट वरती देवाकडे पाठवणार!’’ हे ऐकून क्लाएंटला धक्का बसतो. कारण तो असतो एन्काऊंटर सबइन्स्पेक्टर- जो या सोना स्पाचं खरं रूप जाणून घ्यायला क्लाएंट बनून आलेला असतो, पण त्याच्यासमोर त्याचंच खरं रूप बाहेर येतं. त्यानं एका माणसाला चुकून गोळ्या घातलेल्या असतात. त्याच्या खबरीकडून त्याला मिळालेली माहिती चुकीची निघते आणि आपल्या या चुकीचा अपराधबोध त्याला असतो.

हे दोन्ही क्लाएंट खरं तर मानसिक रुग्ण झालेले असतात. याला कारण झोप नाही. झोपेअभावी दोघंही समाजासाठी आणि स्वत:साठी घातक ठरलेले असतात. सोना स्पामधल्या स्लीप गर्ल्स त्यांच्यासाठी एक प्रकारे वरदान ठरतात, कारण त्यांच्या समोर स्वत:चं खरं रूप उघड होतं. स्लीप गर्ल्सला मात्र त्यांच्या स्वप्नांचा त्रास सहन होत नाही. पुण्याच्या स्लीप गर्लला आपल्या वडिलांच्या औषधाची बिलं भरायची असतात. सबइन्स्पेक्टरच्या स्वप्नांमुळे तिच्यात बदल होतो- जो तिला भीषण वाटतो. व्यापाऱ्याच्या स्वप्नांमुळे दुसऱ्या स्लीप गर्लला आपल्या वडिलांचा राग येतो, कारण त्यांनी तिच्या आईला डिव्होर्स दिलेला असतो.

सोना स्पा ही झोपेची जागा, मात्र चौघांसाठी एक थिअरोपेटिक जागा होऊन जाते.

क्लाएंटना त्यांची चूक सुधारण्याची संधी मिळते, कारण त्यांनी स्वप्नात केलेले गुन्हे ते वास्तवात थांबवू शकतात आणि स्लीप गर्ल्सचा जो स्वत:चा त्रास आहे त्याला सामोरं जाण्यासाठी दुसऱ्यांच्या झोपेचा फायदा होऊ लागतो.

सोना स्पाचा विचार कोचिन ते दिल्ली विमान प्रवासामध्ये सुरू झाला आणि दिल्ली ते वाराणसी या प्रवासात विचाराला नाटकीय रूप मिळालं. आणि बनारसच्या मणिकर्णिका घाटावर जिथं देहाला जाळून आत्म्याला मोक्ष मिळतो तिथं माझ्या मनातल्या झोपेच्या नाटकाला सद्गती मिळाली असं म्हणायला हरकत नाही.

हे नाटक लिहून झाल्यावर नाटकवाले, फिल्मवाले, डॉक्टर, वकील, पोलीसवाले सगळे जे ओळखीचे होते ते थक्क झाले. त्यांना असं वाटलं की, माझं डोकं एखाद्या हरवलेल्या कारखान्यात बनवलं गेलंय, ज्याचं रसायन आता शोधता येणार नाही.

या नाटकाचं मंचन करताना दोन गोष्टी प्रभावीपणे दाखवणं आवश्यक होत्या. एक- क्लाएंट आणि स्लीपगर्लचं मानसिक एकत्रीकरण. त्यासाठी मी पारंपरिक आणि पाशात्त्य नृत्याच्या मुद्रा वापरल्या. दोघंही एकमेकांची डोकी पकडून साधारण १८० अंशाच्या कोनातून फिरवून दोघांची कपाळं आपापसात जोडतात. संगीत सुरू होतं आणि मानसिक एकत्रीकरणाची सुरुवात होते. दुसरी गोष्ट- क्लाएंट निघून गेल्यावर स्लीप गर्ल झोपेत आणि तिच्या झोपेत त्याची पडणारी स्वप्नं. मुळात रंगमंचावर, खासकरून पृथ्वी थिएटरला जिथे रंगमंच हा जणू विहिरीत असल्यासारखा असल्यानं झोपलेली व्यक्ती टॉप लाइटमध्ये वेगळ्या विश्वात गेलेली वाटतेच; आणि मग फूट लाइटमध्ये तिच्या स्वप्नांतील व्यक्ती सायक्लोवर (पडदा) त्यांच्या पडणाऱ्या मोठय़ा सावल्यांनी भयानक वाटतात. प्रेक्षकांच्या अंगावर येणारा क्लाएंटच्या मनातील व्यभिचार फारच परिणामकारक ठरला. काही प्रेक्षकांना तर त्याची किळस वाटली. एका प्रेक्षकाने तर मला हेही सांगितलं की, ‘‘अहो देशपांडे, मान्य आहे की स्वप्नात असे व्यभिचारी विचार येतात; पण ते असं अगदी समोर कशाला दाखवायला हवं?’’ माझी खात्री झाली की नाटय़ खरं झालं.

अहाना कुमरा आणि श्रुती व्यासनं फारच संवेदनशील स्लीप गर्ल्स साकारल्या. रोमीनं साकार केलेला व्यभिचारी व्यापारी खरंच किळस येईल असा उभा केला. असा गुणी नट चांगलं काम न मिळाल्यानं देश सोडून गेला. आता तो अ‍ॅक्टर नाही. कॅनडात कुठे तरी काम करतो. अंजुम शर्मानं कठोर, पण अपराधबोध असलेल्या पोलीसवाल्याच्या मनातलं द्वैत फारच खरं केलं. नाटकाला शैलेंद्र बर्वेनं दिलेलं संगीत हे ख्रिस्तोफर नोलनच्या फिल्म्सच्या धाटणीचं म्हणायला हरकत नाही.

जय झोप! जय स्वप्न!

जय रंगमंच! जय प्रयोग!

mvd248@gmail.com