मकरंद देशपांडे

एखादी सुंदर कलाकृती बघून आपण शांततेच्या एखाद्या अशा बिंदूला पोहोचतो, जिथे जीवनातली अनिश्चितता, अराजकता नाहीशी होते आणि आपण स्वत:ला नशीबवान समजतो. उदाहरणार्थ, १९९२ साली फूट्सबर्न या फ्रेंच कंपनीचं रोमिओ ज्युलिएट नाटक, अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधला मायकल जॅक्सनचा अविस्मरणीय लाइव्ह शो, पंडित शिवकुमार शर्मा (संतूर) आणि उस्ताद झाकीर हुसन (तबला) यांची जुगलबंदी, एक हजाराची नोट (मराठी चित्रपट) १९८३चा क्रिकेटचा विश्व कप, माहीचा शेवटच्या बॉलवर सिक्सर, सचिन तेंडुलकर बॅटिंग करत असताना स्टेडिअममध्ये ‘सचिन-सचिन’ ओरडणं, मी लिहून दिग्दर्शित, अभिनित केलेली ‘सर सर सरला’ त्रिनाटय़धारा (नऊ तासांचं नाटक) आणि निलादरी कुमारचं अद्भुत सितारवादन! हे माझ्या अस्तित्वावर परिणाम करून गेलेल्या अनेक अनुभवांपैकी काही.

जेव्हा एखादा कलाकार दुसऱ्या कलाकाराच्या कलेचा अनुभव घेऊन आनंदून, झपाटून त्याच्याबरोबर काम करायची इच्छा प्रकट करतो, तो क्षण मात्र या सगळ्यांपेक्षा उजवा असतो. कारण आता कलेला कलेचीच पाठ मिळते, हात उंच करून, नजर वर करून आभाळाला ठेंगणं करण्यासाठी! किंवा असीम आकाशात झेप घेऊन पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर जाऊन हरवण्यासाठी! हरवलेलं मिळणं आणि हरवल्यावर मिळणं यात जीवनाचं गूढ सापडण्यासारखं आहे. हरवण्यासाठी भावनिक तीव्रतेचं इंधन मिळालं की मग ते अंतराळात यान सोडण्यासाठी रॉकेटच!

माझा ‘करोडो में एक’ या नाटकाचा पृथ्वीला झालेला प्रयोग पाहायला गुलजार, रंगमंचाच्या इतिहासात कायमचं नाव कोरलं जाईल असे नादिरा जहीर बब्बर आणि निलादरी कुमार आले होते. गुलजार खरं तर यशपाल शर्मा आणि किशोर कदम या त्यांच्या आवडत्या अभिनेत्यांचा अभिनय पाहायला आले होते. नादिराजीही यशपालला पाहायला आल्या होत्या. निलादरी कोणासाठी आला होता माहीत नाही. प्रयोग झाल्यावर गुलजारसाहेब मला म्हणाले की, ‘‘इतका उत्तम प्रयोग होता की माझ्याकडे शब्दच नाहीत. तुला एक मिठी मारतो.’’ नादिराजींनी स्वत:लाच कोसलं की ‘मी इतकी वर्ष का थांबले हे नाटक बघायला.’ सगळे गेल्यावर निलादरी मात्र घुटमळत होता. मला मिठी मारली आणि म्हणाला, ‘‘आपण एकत्र काम करायला हवं. उद्या भेटतोस का सकाळी, ब्रेकफास्ट करू या.’’ मी ‘हो’ म्हटलं. रात्री झोपताना प्रयोगातले काही उत्स्फूर्त क्षण, प्रयोगानंतरचा अभिनंदनाचा वर्षांव हे सारे आठवले आणि निलादरीचा अस्वस्थपणा जाणवला. काय बरं याच्या मनात असावं, अशा विचारांत झोपलो. सकाळी उठून पृथ्वी थिएटरच्या बाहेर एका कॅफेमध्ये निलादरीला भेटायला गेलो. आज तो फ्रेश होता. थोडा शांत आणि प्रसन्न, आनंदी! मला म्हणाला की, ‘‘तू, तू, तूच आहेस. मला तुझ्याबरोबर काम करायचंय.’’ पण काय करायचं याचं उत्तर नव्हतं.

निलादरीसारख्या जिनिअस- मेस्त्रो सितारवादकाकडून नाटकाचं संगीत करून घेणं ही एक शक्यता. दुसरं म्हणजे, चित्रपटाचं दिग्दर्शन करून त्याचं संगीत त्यानं करणं. तिसरं काही सुचलं नव्हतं. मीही ‘हो’ म्हणत, ‘लवकरच करू या..’असं न म्हणता, ‘कधी तरी उत्स्फूर्तपणे करूच’ असं म्हणून संगीत आणि नाटकबा गप्पा मारल्या. त्यात आम्ही आमच्या बालपणाविषयी बोललो. त्याचं बालपण तसं सितार शिकण्यात गेलं. त्याच्या वयाच्या चौथ्या वर्षांपासून तो शिकत होता. त्याचे वडील कार्तिक कुमार हे स्वत: ऑल इंडिया रेडिओचे सर्वोत्तम सितारवादनाचे पारितोषिक प्राप्त केलेले आणि पंडित रविशंकर यांच्याबरोबर जग फिरणारे असे निलादरीचे गुरू. मी मात्र माझ्या बालवयात एमलेस (ध्येयशून्य) होतो. खूप खेळायचो. खूप हरवायचो (विचारात). आमच्या दोघांच्या वडिलांनी आम्हाला लहानपणी मार दिला- त्याला सितार शिकताना, मला वास्तवात परत आणण्यासाठी.

निलादरीचं म्हणणं पडलं की हरवत हरवत मी कलाकार म्हणून घडून गेलो. विशेषत: लेखक म्हणून.

सितार शिकवताना लहानपणी वडिलांनी मारल्यामुळे निलादरीच्या डोळ्यात पाणी यायचं आणि आता निलादरीचं सतार वाजवणं ऐकून वडिलांच्या डोळ्यात पाणी येतं. पुढे वर्षभर मी त्याचे कॉन्सर्ट पाहायला आणि अर्थातच ऐकून मंत्रमुग्ध व्हायला जायचो. निलादरीच्या वाजवण्यात खूप आक्रमकता आणि नाजुकपणासुद्धा आहे. तो जादुई दुनियेत घेऊन जातो, पण त्याचा अस्वस्थपणा मात्र कायम. मला आश्चर्य आणि कौतुक वाटायचं की इतका गुणसंपन्न सितारवादक अस्वस्थ का आहे? उत्तर एवढंच आहे की त्याला आता संगीत दुनियेबाहेरचा प्रेक्षकवर्ग हवा होता. त्याला आता नुसते राग वाजवायचे नव्हते. त्याला भावदुनियेत रमायचं होतं.

एका संध्याकाळी मला त्याची आठवण आली. त्याला फोन करून विचारलं, ‘‘निलादरी, मुंबईत आहेस का?’’ तो ‘हो’ म्हणाला. मी म्हटलं, ‘‘दीड वर्षांपूर्वी मी तुला म्हणालो होतो की, कधी तरी उत्स्फूर्त काही करू. तर आत्ता मला काही तरी सुचलंय. जर तुला वेळ असेल तर मी सत्यम हॉलमध्ये रिहर्सलसाठी जातोय, येतोस का?’’ तो म्हणाला, ‘‘मी साज (वाद्य.) घेऊन येतो.’ मी मनात म्हटलं, याला म्हणतात तीव्रता आणि उत्स्फूर्तता याचा सुवर्णमेळ! निलादरीची गाडी ठरलेल्या जागेच्या जरा पुढं गेली. आता लांब जाऊन यू टर्न होता. आम्ही फोनवर एकमेकांशी बोलायला लागलो. ‘‘बरं झालं मॅकभाई, पटकन पोहोचलो असतो तर सगळं सोपं वाटलं असतं.’’ मीही म्हणालो ‘‘तुझ्या गाडीच्या पार्किंगसाठी मी जागा करतो.’’ वास्तविक बोलताना खरं तर आम्हा दोघांची एकमेकांबरोबर काम करण्याची मन:स्थिती तयार होत होती. मला निलादरीला नाटकाच्या तालमीत खूप कम्फर्टेबल करायचं होतं; आणि निलादरीला जे येतं तेच एखाद्या कॉन्सर्टसारखं वाजवायचं नव्हतं. काही तरी उत्स्फूर्त होणार होतं हे खरं!

(पूर्वार्ध)

mvd248@gmail.com