25 January 2020

News Flash

नाटकवाला : ‘करोडो में एक’

नाटकाचं नाव ‘करोडो में एक.’ नाटकाच्या पहिल्या प्रवेशात बन्सी आपल्या महागडय़ा, पण जुन्या वाटणाऱ्या शेरवानीत मोठमोठय़ांदा ओरडतोय

(संग्रहित छायाचित्र)

मकरंद देशपांडे

असणं किंवा नसणं यामध्ये जीवनाचं फसणं! वेडा कोण आणि शहाणा कोण, हे ठरवणार वैद्यक शास्त्र. समाज ‘सावधान पुढे धोका आहे,’ अशी लिहिलेली पाटी वाचून अपघात टाळतो. पण जीवनमार्गी असताना धोक्याचं वळण असेल का, हा प्रश्नच नसतो, त्यामुळे सूचनेशिवाय धोका होतो.

बन्सीलाल दिवाण या करोडपतीचं जीवन छान चाललेलं असतं. तीन लहान भाऊ त्याचे पार्टनर, त्यामुळे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स घरचेच. मुलगा गोल्ड मेडलिस्ट. पण वडिलांचं म्हणणं की, आपल्या देशात राहून काम कर. व्यापारात वाढ व्हायला हवी. नवीन विचारांचे तरुण जर बाहेर जायला लागले तर फक्त एवढंच ऐकायला मिळेल की, देशाबाहेर किती प्रगती झाली आहे. मुलालाही एक मुलगा आणि एक मुलगी. बन्सीलाल दिवाणांच्या आईचं म्हणणं होतं की, कितीही मोठे झालात तरी- एकत्र कुटुंब, सुखी कुटुंब- हेच मूल्य जपा. बन्सीलालही याच मूल्याला धरून आपल्या मोठय़ा कुटुंबाबरोबर जगत असतो. अगदी सगळे सण एकत्र साजरे केले जातात. सगळ्या नातवांना आपापसात भेटावंच लागतं. दृष्ट लागेल असं जीवन, पण कुठे ढग आडवा आला आणि त्या ढगात केवढा खड्डा होता, हे त्या विमानमार्गी सुखी स्वप्नजहाजाला कळलंच नाही आणि धाडकन् हादरा बसला. ऑक्सिजन मास्क खाली आले, पण त्यात ऑक्सिजनच नव्हता, कारण कुणीच कसलीच तयारी केली नव्हती. किंवा एका प्रकारची मनोवृत्ती असते, ज्यात सदैव सगळं आलबेल आहे असं सांगायचं आणि मानायचंही! त्यामुळे गेल्या दोन डायरेक्टर्स ऑफ बोर्ड मीटिंगमध्ये बन्सी आणि त्याच्या भावांतले मतभेद बाहेर आले नाहीत बन्सीसाठी, पण भावांसाठी ते भेद मोठे झाले आणि त्यांनी तिघांनी मिळून आपला वाटा मागितला. बन्सी खचून गेल्यावर भावांच्या मूर्खपणामुळे झालेला तोटा बन्सीच्या कुटुंबाच्या वाटय़ाला आला. अचानक सगळं चुकलं. सुखाचा डोलारा कोसळला. व्यापारात तोटा झाला की व्यापारी तो पुन्हा भरून काढण्याची आशा ठेवतात आणि यशस्वीही होतात. पण पशाऐवजी विश्वासाचा पायाच नाहीसा झाला तर मन तळ नसलेल्या विहिरीसारखं होतं. बुडालेल्या माणसाला आपण किती खोल बुडालोय तेच कळत नाही. मन विहिरीतनं अवकाशात फेकलं जातं आणि आता मुक्त भ्रमण सुरू होतं. त्याला काहीजण वेडेपणाचे आजार आहेत असं म्हणतील. किंवा कोणी ‘बिचारा’ म्हणून दया दाखवतील तर कोणी ‘इथे कुणी कुणाचा नाही, हे कलियुग आहे,’ असं म्हणतील.

नाटकाचं नाव ‘करोडो में एक.’ नाटकाच्या पहिल्या प्रवेशात बन्सी आपल्या महागडय़ा, पण जुन्या वाटणाऱ्या शेरवानीत मोठमोठय़ांदा ओरडतोय. त्याला उगाचच संपूर्ण घराला रोशणाई करून पशाची नासधूस केलेली आवडत नाहीये. मग रंगमंचाच्या मध्यभागी झोपलेली म्हातारी आई त्याला समजावून सांगतीये की, एवढं रागावू नकोस. तू घेतलेले सगळे निर्णय मला मान्य आहेत. खरं तर बन्सीनं आईला न सांगताच कुरिअरचा बिझनेस विकून टाकलेला आहे. ऑर्किड फुलाचे फाम्र्स मात्र विकले नाहीत. आई आणि मुलाच्या या संवादाच्या मधे दारावरची बेल वाजते. बन्सी आईला सांगतो की, ‘मला आता कोणालाही भेटायची इच्छा नाही.’ आई ‘हो’ म्हणते. बन्सी आत जातो. आई वाकून बिछान्यावरून उठते. पण नंतर सरळ ताठ उभी राहते. डोक्यावरचा म्हातारीचा विग काढते. दरवाजा उघडते. बन्सीचा मुलगा ऋषिकेश आलाय आणि आई झालेली स्त्री ऋषिकेशचीच बायको शैलजा आहे. बन्सी आता आपल्या मनोविश्वात कधी अग्रवाल सन्सचा मालक बनतो, तर कधी कुणा यशस्वी व्यापार संकुलाचा. त्याला तसं वाटून द्यावं म्हणून सून शैलजा कधी त्यांची आई होते तर कधी अकाउंटंट तर कधी शेजारी.

दुसऱ्या प्रवेशात मुलगी लाजवंती घरी येते, पण बन्सीला ती आठवत नाही. बन्सी तिला ओळखत नाही. त्यामुळे शैलजाच्या म्हणण्यानुसार ती आज म्युझिक टीचर म्हणून आलेली आहे. बन्सी तिला गाणं म्हणायला सांगतो. लाजवंती बेसूर गाणं म्हणते. बन्सी रागावतो. लाजवंती सांगायचा प्रयत्न करते की ती संगीत शिक्षिका नसून त्यांची मुलगी आहे. त्यावर न आठवल्यानं बन्सी आणखीनच चिडतो आणि ऋषीला सांगतो की, ही कुणी संशयास्पद व्यक्ती घरात घुसली आहे, तिला बाहेर काढ. ती चोर असू शकते. घरातलं सामान नाही, तिला घरच हवं असेल. त्या शब्दांनी लाजवंती ढसाढसा रडते. आपल्या वडिलांच्या स्वास्थ्यासाठी ऋषीला आपल्या बहिणीला बाहेर काढावं लागतं.

तिसऱ्या प्रवेशात त्यांचा एक काल्पनिक मुलगा आणि सून अमेरिकेहून येतात. शैलजा त्या काल्पनिक जोडय़ाचा आदरसत्कार करते, पण ऋषीला हा खेळ संपवायचा आहे. तो शैलजाला सांगतो की जेवणाची थाळी काल्पनिक मुलासाठी मांडायची नाही. त्यावर बन्सीला संशय येतो की ऋषीला आपल्या अमेरिकेतल्या मुलाला मारायचं आहे. स्थिती खूप गंभीर होते. आरडाओरडा होतो. बन्सी पोलिसांना बोलवायची धमकी देतो. मुलगा सॉरी  म्हणतो. बन्सी आत जाऊन झोपतो. ऋषीला कळत नाही काय करावं ते.

लाजवंतीचा नवरा- जो जाहिरात जगतात क्रिएटिव्ह डायरेक्टर आहे, तो ऋषीला शेवटचा उपाय म्हणून शहरात समांतर सरकार चालवणाऱ्या आबासाहेबांना भेटायला सांगतो. कारण ते बन्सीला एकेकाळी जवळून ओळखायचे. भावांमुळेच बन्सीवर ही परिस्थिती आली आहे हे ऐकून ते त्याला मदत करतील. कारण भावांनी केस त्यांच्या बाजूंनी स्ट्राँग केली आहे आणि कोर्टाच्या तारखा आणि वकिलांच्या महागडय़ा फी देण्यासारखी आता त्याची स्थिती नाही.

चौथ्या प्रवेशात आबासाहेब घरी आले आहेत. बन्सीबद्दल ऋषी आणि जावयाशी बोलत आहेत. आबासाहेब आश्वासन देतात की त्यांच्या मित्रासाठी ते हे काम सहज करतील, पण नेमकं तेव्हा ऋषीचा मुलगा आणि मुलगी घरात येतात. त्यांच्यामागे शैलजा घरात येते. घरातला फोन वाजतो. शैलजा फोन उचलते. पलीकडून ऋषीचा आवाज. घरातला ऋषी आणि आबासाहेब हे काल्पनिक बन्सीच्या मनातले.. हे आता कळतं.. अंधार.. मध्यांतर..

दुसऱ्या अंकात शैलजा बन्सीची नखं कापत असताना संजू (बन्सीचा नातू) आपण आपल्या आजोबांप्रमाणे मोठा उद्योगपती होणार आणि त्यांच्यासाठी खूप पैसे कमावणार आणि त्यांची सगळी देणी देणार, हे बोलताना ऐकून आजोबा (बन्सी) चिडतात आणि नाराज होऊन आत जातात.

ऋषी घरी परततो आणि आबासाहेबांना भेटू शकलो नाही याचं व्यंगात्मक वर्णन करतो. पण शैलजा सांगते की आबासाहेब तर बाबांना (बन्सीला) घरी भेटले. ऋषीला आपल्या वडिलांच्या मानसिक स्थितीबद्दल हसू आणि रडू येतं.

पुढच्या प्रवेशात बन्सी आपल्या मुलाचा- ऋषीचा हात पकडून त्याला सांगतो, ‘मला असं वाटतं की मी मनोरुग्ण आहे. माझ्यामुळे तुला खूप त्रास होतोय, पण काय करू? अचानक दुसराच विचार येतो आणि मग मी, मी राहतच  नाही. मी चुकलो तर मला रागाव, पण मला सोडून जाऊ नकोस.’ ऋषी रडतो. रात्री ऋषी आपल्या बायकोला सांगतो,  ‘मी हरलोय. केस आपण जिंकू शकत नाही. हे घर विकावं लागणार आहे, त्यामुळे मी ठरवलंय की मी माझ्या वडिलांबरोबर आत्महत्या करणार, पण तू आपल्या मुलांना मोठं कर.’ शैलजा घाबरते. आतल्या खोलीतून बन्सी धावत येतो आणि त्याला यम दिसतो. तो यमाला सांगतो की माझी जायची वेळ आली नाहीये. त्या भीतीच्या पोटी तो आबासाहेबांना बोलावतो. आबासाहेब त्याच्या कल्पनेत, प्रेक्षकातनं येतात आणि त्याला घाबरून न जाण्याचा संदेश देतात. ‘जगायला हिंमत लागते मरायला नाही,’ असा उपदेश करतात. ‘मरायचेच असेल तर काही करून मर, उगाच वेडं होऊन मरू नकोस,’ असं सांगतात.

त्या रात्रीनंतर बन्सी घरातून बेपत्ता होतो. त्याची सगळीकडे शोधाशोध केली जाते. संध्याकाळी बन्सी घरी परततो. त्याच्या हाताला रक्त असतं. तो सांगतो की मी आज आपल्या ऑफिसला गेलो. सिक्युरिटीने मला थांबवलं, पण मी त्यांना सांगितलं की मी या कंपनीचा मालक आहे. त्यावर त्यांनी मला वेडा म्हणून हटकलं. नवीन होते ते. माझे भाऊ आता त्यांचे मालक होते. मी त्यांना धक्काच मारून आत गेलो. जुन्या लोकांनी मला नमस्कार केला, पण भावांनी मला विचारलं, ‘इथे काय करतोय?’ या प्रश्नावर ‘मी.. मला काहीच आठवत नाहीए.. पण मी खुर्चीच डोक्यात घातली असं वाटतंय. आता मी स्वत:च त्याचं प्रायश्चित्त करतो.’ असं म्हणून तो विंगेत जातो. खिडकी फुटण्याचा आवाज.. त्यांनी खाली उडी मारली आहे.

शेवटच्या प्रवेशात ऋषी बन्सींने लिहिलेली मोडक्यातोडक्या वाक्यांची चिठ्ठी वाचतो. त्यात लाजवंती कशी आहे? तिची काळजी घ्या, असं सांगतो. दोन गोष्टी नक्की कर. दरवर्षी घरात गणपतीची स्थापना कर आणि मुलांवर आपल्या देशभक्तीची स्वप्नं लादू नकोस.

हे नाटक लिहून झाल्यावर सगळंच वादळी घडलं. या नाटकाचं पहिलं वाचन मी पृथ्वी थिएटरवर एक लांब टेबल लावून, मला आवडणारे नट बोलावून, प्रकाशयोजना करून केलं. वाचन संपल्यावर नटांना विचारलं की, त्यांना कोणतं पात्र करायला आवडेल. यशपाल शर्मा म्हणाला, ‘मुलाचं.’ आयेशा रज़ा म्हणाली- ‘शैलजा.’ निवेदिता मुलगी झाली आणि बन्सी मी करायचं ठरवलं.

आयेशाचं नाटकातलं लाजवाब काम पाहून कुमुद मिश्रा (नट) तिच्या प्रेमात पडला आणि त्यांचं लग्न झालं. बन्सी नावाचा एक प्रेक्षक भेटला आणि तो म्हणाला, ‘ही माझी गोष्ट आहे. मीसुद्धा वेडा झालो होतो. आता माझी तब्येत सुधारत आहे.’

यशपाल शर्मानी केलेला ऋषी माझ्या नाटय़यात्रेतला खूपच मार्मिक अभिनय. त्याच्याबरोबर अभिनय करताना मला लिहिलेले प्रवेश खऱ्या अर्थानं जिवंत करता आले. किशोर कदमने आबासाहेब साकारताना आपल्या अभिनयाद्वारे शिवाजी पार्कवरील लाखो लोक  पृथ्वी थिएटरच्या सभागृहात उभे असल्याचा परिणाम साकार केला. आयेशाची आई (दिल्लीची ज्येष्ठ नटी) ती मला म्हणाली, ‘नाटक पाहताना असं वाटत होतं की घराच्या भिंतीतली एक वीट काढून मी घरात डोकावून जे घडतय ते पाहतेय.’

शैलेंद्र बर्वेनी माझ्या अनेक नाटकांसाठी संगीत दिलं, पण या नाटकासाठी काहीतरी वेगळीच सूरमाला संगीतबद्ध केली; ज्यात नाटकातलं ‘असणं-नसणं’ यातलं मानसिक वादळ भेदकपणे उभं राहिलं. या नाटकाच्या प्रयोगानंतर प्रेक्षक बराच वेळ थिएटरवर थांबायचे.. स्तब्ध अवस्थेत.

जय नाटक! जय प्रेक्षक!

पराजय पसा! पराजय नातं!

mvd248@gmail.com

First Published on September 8, 2019 2:04 am

Web Title: natakwala article makrand deshpande karodon mein ek hindi play abn 97
Next Stories
1 संज्ञा आणि संकल्पना : मन वढाय वढाय..
2 गवाक्ष : ओलावा
3 हाये न मन को चन पडे..
Just Now!
X