News Flash

विश्वाचे अंगण : शेपटीविना…

माणसाचं वर्तन ‘पर्यावरणाचा ऱ्हास हा वनस्पती व प्राण्यांचा आहे. आपल्याला काही धोका नाही’ असंच आहे.  

जीवशास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार, पर्यावरणाच्या विनाशामुळे दरवर्षी २००० प्रजाती (दररोज ५.४) नष्ट व लुप्त (ए क्स्टिन्क्ट) होत आहेत.

अतुल देऊळगावकर – atul.deulgaonkar@gmail.com

इसवी सन पूर्व सहाव्या शतकातील अद्वितीय बुद्धिमत्तेचा गुलाम इसाप याने सांगितलेल्या ३५८ कथा अखिल मानवजातीस सर्वकाळ प्रस्तुत वाटत आल्या आहेत. माणसांच्या विविध गुण-अवगुणांची वैशिष्टय़े व त्यामुळे होणारे बरे-वाईट परिणाम सांगण्यासाठी इसापने पक्षी व प्राण्यांचा चपखल उपयोग केला. इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात विष्णू शर्मा यांनी ‘पंचतंत्र’ मधून चातुर्यकथा रचल्या. आजही सर्व देशांतील सर्व भाषांमधून या बोधकथा सांगितल्या जातात. माध्यमे बदलत गेली तरी जगातील सर्व बालकांच्या गोष्टीवेल्हाळ बालपणाचा त्या अविभाज्य भाग आहेत व राहतील. जागतिक संस्कृतीचा हा एक अभिजात व अनमोल ठेवा आहे.

काळानुरूप इसाप व पंचतंत्र कथांचे नूतनीकरणसुद्धा सादर होऊ लागले. त्यांपैकी एक कथा अशी आहे- एका गावात एक गरीब शेतकरी राहत होता. (या वाक्याशिवाय कहाणी सुरूच होऊ शकत नाही) त्याच्याकडे बैलजोडी, एक बोकड व एक कोंबडी होती. संध्याकाळ झाली की बैल, बोकड व कोंबडी एकमेकांना आपली सुखदु:खे सांगत बसत. काही दिवसांताच त्यात एका उंदराची भर पडली. सगळे काही व्यवस्थित चालले असताना शेतकऱ्याच्या पत्नीने उंदीर पकडण्यासाठी पिंजरा आणला. त्यावेळी उंदीर म्हणाला, ‘‘हे पहा, आपण एकत्र येऊन तो पिंजरा हाणून पाडणं आवश्यक आहे. हे माझ्यावर आलेलं संकट आहे, असं तुम्ही समजाल. परंतु काही दिवसांत तुमचीही एकेक करून पाळी येईल, हे ध्यानात घ्या.’’

‘‘पण ती आपत्ती उंदरावरची आहे, आपल्याला काहीच धोका नाही,’’ असं मानून इतर प्राणी उंदराच्या आवाहनाची उपेक्षा करतात.  त्या रात्री उंदीर पिंजऱ्यात अडकतो आणि उंदराला पाहून नाग येतो. पिंजऱ्याशी झालेला आवाज ऐकून शेतकरीपत्नी बाहेर येते, पण तिचा पाय नागाच्या शेपटीवर पडतो आणि तो तिला कडकडून चावतो. गावातले सगळे जमा होतात. सापाचे विष काढण्यासाठी तो चावल्याठिकाणी कोंबडी बसवायला सांगतात. यात कोंबडीचा बळी जातो. तरीही विष काही पूर्णपणे निघत नाही. मग शहराचा दवाखाना गाठून उपचार केले तरीही ती काही वाचत नाही. तेराव्याला गावकरी बोकड कापायला सांगतात. पुढे पेरणीचा खर्च भागविण्यासाठी शेतकऱ्याला बैल विकावे लागतात. हे सर्व पाहणारा कावळा म्हणतो, ‘‘मूषकाची वाणी खरी ठरली. परंतु पुढे सर्व प्राणीमात्रांविना शेतकरीही जगणे कठीण होईल.’’

माणसाचं वर्तन ‘पर्यावरणाचा ऱ्हास हा वनस्पती व प्राण्यांचा आहे. आपल्याला काही धोका नाही’ असंच आहे.

मागील वर्षी ‘वर्ल्ड वाइल्ड लाइफ फंड’ ने ५९ वैज्ञानिकांच्या साहाय्याने जगातील वन्यजीवांचा सविस्तर अहवाल तयार केला होता. ‘‘१९७० पासून आजवर ६० टक्के मासे, पक्षी, सरपटणारे प्राणी व सस्तन प्राणी नष्ट झाले आहेत. अब्जावधी वर्षांपासून चालत आलेल्या जीवसृष्टीच्या श्रंखलेतील एकेक कडी कायमस्वरूपी नाहीशी होत आहे. त्यामुळे आपली संस्कृ ती (सिव्हिलायझेशन) धोक्यात  आली आहे..’’ असं त्यात बजावलं होतं. त्याचा अर्थ समजावून सांगताना ‘वर्ल्ड वाइल्ड लाइफ फंड’चे कार्यकारी संचालक माइक बॅरेट म्हणाले, ‘‘वन्यजीव नष्ट होत असल्यामुळे त्या बातमीला आपण हिंगदेखील लावत नाही. समजा, ६० टक्के मानवजात नष्ट झाली असती तर उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप, आफ्रिका व चीन हे रिकामे झाले असते. अशा सातत्याने चालू असलेल्या विनाशामुळे आपण झोपेत टकमक टोकाकडे चाललो आहोत.’’

जीवशास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार, पर्यावरणाच्या विनाशामुळे दरवर्षी २००० प्रजाती (दररोज ५.४) नष्ट व लुप्त (ए क्स्टिन्क्ट) होत आहेत. ऑस्ट्रेलियात १ कोटी १२ लाख हेक्टरवरील अरण्यवणव्यात सुमारे १०० कोटी वन्यजीवांच्या आहुतीने हा वर्षांरंभ झाला आहे. हवाई, नाविक व सैन्य दलाचे तसेच अग्निशमन दलातील निष्णात जवान असे १०,००० जणांचे मनुष्यबळ वापरले गेले. भल्यामोठय़ा पाणीसाठय़ाची वाहने जमीन व हवेतून पाण्याचा मारा करूनही त्यांनाही दाद न देणारं १३० दिवसांचं हे अग्नितांडव पाऊस आल्यावरच शमलं. अ‍ॅमेझॉन सदाहरित अरण्यातील अग्निसंहारात असाच लाखो जीवांचा विनाश झाला होता. मागील वर्षी अलास्कातील आगींमुळे १६ लक्ष हेक्टर जंगल, रशियाच्या सायबेरियातील १० लक्ष हेक्टर जंगल व इंडोनेशियामधील ११ लक्ष हेक्टर जंगलाची राखरांगोळी झाली. नागरीकरण व औद्योगिकरणामुळे आणखीन जमीन मिळवण्यासाठी जंगलांवर टाच येण्याचा वेग वाढतच चालला आहे. त्यातून वन्यजीव नागरी वसाहतींकडे येऊ लागले. या संघर्षांत प्राण्यांची हार अटळ आहे. श्रीलंकेत कीटकनाशकांमुळे शेकडो हत्ती मरत आहेत. ऑस्ट्रेलियात पाण्याचं दुर्भिक्ष्य असल्यामुळे त्यांना उंट हा पांढरा हत्ती वाटत आहे. दर नऊ वर्षांनी उंटांची संख्या दुप्पट होते. त्यामुळे दहा लाख उंटांना कमीत कमी वेदना देऊन कसे मारून टाकता येईल याचे नियोजन चालू आहे. एकंदरीत कधी जळून, तर कधी अन्नपाण्याविना असंख्य प्राणी मरत आहेत.

कर्बवायू शोषून शोषून सागरांतील प्राणवायूचं प्रमाण खालावत चाललं आहे. गेल्या ५० वर्षांत प्राणवायूचं प्रमाण शून्यावर आलेल्या समुद्रातील ठिकाणं ४५ वरून ७०० वर गेली आहेत. प्राणवायू नसल्यामुळे जलचरांचे काय? हा कर्बवायू पाण्यात मिसळून कर्बाम्ल (काबरेनिक अ‍ॅसिड) तयार होते. मागील १०० वर्षांत सागरांतील आम्ल २९ टक्क्यांनी वाढलं आहे. आता आम्ल पिऊन पिऊन आपण आम्ली सागरांकडे निघालो आहोत. आपल्या देशातील व राज्यांतील नद्यांच्या गटारीकरणाचा राष्ट्रीय कार्यक्रम आता पूर्णत्वास जात आहे. सर्व प्रकारची घाण नद्यांच्या स्वाधीन करून त्यातून प्राणवायूची हकालपट्टी करण्यात आपण यशस्वी झालो आहोत. प्राणवायूरहित जल हा आपल्या नद्यांचा विशेष गुणधर्म ठरत आहे. शिवाय आपला दशदिशांनी सुसाट निघालेला घनकचरा हा सर्व प्रकारच्या प्राणीमात्रांना बाजूला होण्याची आज्ञा करीत आहे. परिणामी यच्चयावत जीवसृष्टी जीव मुठीत धरून आयुष्य कंठित आहे.

आजमितीला पृथ्वीतलावर बहुसंख्येनं राहत असलेल्या सस्तन प्राण्यांची गणना पाहता मनुष्यप्राण्याने जोरदार आघाडी घेतली आहे. ७.६५ अब्ज लोकसंख्येच्या या प्राण्यापेक्षा संख्येनी अधिक असणाऱ्या उंदीर, खार व वटवाघळे यांची मोजदाद करणे अशक्य आहे. त्यानंतर प्राणीजगतातील  गाय (१.५ अब्ज), मेंढी (१.१ अब्ज), वराह (१ अब्ज), श्वान (९० कोटी), मांजर (६० कोटी) हे येतात. जंगल, प्राणी व आदिवासी हे विकासातील अडथळे माणसाला नकोसे झाले आहेत. उपयुक्तता हाच एकमेव निकष असल्याने आहारास योग्य प्राणी व माणसाळलेले प्राणी वगळता जंगलवासी प्राण्यांच्या संख्येला केवळ ओहोटी लागली आहे. शहर असो वा खेडं, नदी असो वा समुद्र, पर्वत असो वा जंगल- सर्व प्रकारच्या  निसर्गाचा विनाश हा स्थानिक ते जागतिक सर्वत्र सारखाच आहे. याला कारणीभूत प्रत्येक ठिकाणचा माणूसच आहे. मनुष्यप्राण्याच्या मेंदूत सर्व प्राणीमात्रांच्या मेंदूचे अवशेष असतात म्हणे. त्यापैकी सरपटणाऱ्या प्राण्यांचा मेंदू हा अधिक सक्रिय असतो. तिथून वर गेला तर सस्तन प्राण्याचा भावनिक मेंदू आणि विवेकी वागणारा द्विहस्त प्राण्यांचा मेंदू असतो म्हणे. मेंदूच्या कोणत्या भागाचा अधिक वापर करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी सरपटणाऱ्या प्राण्यांच्या संशयी, आक्रमक, हिंस्र मेंदूचा कारभार जास्त दिसतो. मानवजातीचे शारीरिक वय वाढताना मानसिक वय काही वाढत नाही याची जाणीव असंख्य वर्षांपासून विचार करणाऱ्यांना आहे. मानसिकदृष्टय़ा उत्क्रांत न झालेल्या मानवामुळे संस्कृती व उत्क्रांतीही धोक्यात आली आहे. त्यातील पहिला बळी हा निसर्गाचा आहे. (त्यापुढचा..?) निसर्ग ही मानवाला पुरेसं आकलन न झालेली एक परस्परसंबंधी (इंटरकनेक्टेड) विराट यंत्रणा आहे. त्या साखळीतील प्रत्येक कडी ही तेवढीच महत्त्वाची आहे. आता तर अनेक कडय़ा नाहीशा होत असल्यामुळे जीवसृष्टी विकृत व विरूप होत असून, त्याच्या परिणामांचीही साखळी आपण भोगत आहोत. निसर्गाचा बिघडवून टाकलेला तोल मानवजातीचा तोलही ढासळवत आहे.

नजीकच्या काळात उन्हाळ्यातील तापमान ५० अंश सेल्सियसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्या तापमानात पक्ष्यांना तगणे अशक्य होईल. अशा अनेक कारणांमुळे संयुक्त राष्ट्रसंघाने इशारा दिला आह- ‘‘जीवसृष्टीतील प्रजाती कायमस्वरूपी लुप्त होण्याचा वेग वाढत चालला आहे. प्राणीजगतातील १० लाख प्रजाती नष्ट होण्याच्या बेतात आहेत.’’ याआधी सुमारे ६ कोटी ५०लाख वर्षांंपूर्वी ज्वालामुखींचा उद्रेक, उल्कापात व हवामानबदल यांमुळे जीवसृष्टीचे समूळ उच्चाटन झाले होते. त्यानंतर यथावकाश एकपेशीय ते सस्तन प्राणी अशी उक्रांती होत गेली. अनेक वैज्ञानिक ‘‘सध्याची मानवी वाटचाल ही जीवसृष्टीच्या सहाव्या समूळ उच्चाटनाकडे म्हणजेच निसर्गाच्या अंताकडे आहे,’’ असं वारंवार बजावताहेत.

पर्यावरण ऱ्हासासोबतच नव्याने आलेल्या करोना विषाणूंनी  संपूर्ण जगाचे सर्व व्यवहार ठप्प पाडून ऐतिहासिक संकट आणलं आहे. १९९२ पासूनच हवामानबदलाचे सार्वजनिक आरोग्यावर भीषण परिणाम होणार असल्याचं भाकित वैज्ञानिक वर्तवत होते. जागतिक आरोग्य संघटनेनी ३०० पानाच्या विस्तृत अहवालात ‘‘जागतिक तापमानवाढीमुळे विषाणू व इतर रोगजंतू वाढीस लागून जगाला अनेक साथींच्या रोगांना सामोरं जावं लागेल,’’ असा इशारा दिला होता. करोना हा  ज्ञात असलेल्या अज्ञाताचं आव्हान आहे. त्याच्या उगमाबद्दल अनेक तर्क लावले जात आहेत. अमेरिकेतील रोग पर्यावरणतज्ज्ञ (डिसीज इकॉलॉजिस्ट) लुई एस्कोबार म्हणतात, ‘‘शहरीकरण व जंगलतोडीमुळे वन्यजीवांचा मानवी वसाहतींशी संपर्क वाढू लागला आहे. हजारो वर्षांपासून अनेक विषाणू व जीवाणू हे वन्यजीवांच्या सोबतीने राहत आहेत. वन्यजीवांना कसलीही हानी न पोहोचवणारे हे सूक्ष्मजीव मानवाला मात्र कमालीचे त्रासदायक ठरत आहेत. हवामानबदल व निसर्गविनाशामुळे अनेक वन्यजीव हे मानवी वसाहतींकडे येत आहेत. परिसराची सफाई करणारे पक्षी व कीटक नाहीसे झाल्यामुळे सूक्ष्मजीव वाढत आहेत. माकड, ससे, कोल्हे, उंदीर, डुक्कर, वटवाघूळ व अन्य पक्षी हे अनेक सूक्ष्मजीवांचे वाहक आहेत. जंगलातून  येणाऱ्या पक्ष्यांना व प्राण्यांना शहरात सहज व मुबलक अन्न मिळाल्याने त्यांची संख्याही वाढत आहे. या  सूक्ष्मजीवांकडून एड्स, इबोला, सार्स, स्वाइन फ्लू, बर्ड फ्लू अशा भेटी मानवाला मिळत आहेत. कदाचित करोना हे हिमनगाचे टोक असावं, इतक्या भयंकर जागतिक साथी भविष्याच्या पोटात दडल्या आहेत.’’ आपल्याला निसर्गाचं अर्थशास्त्र दिसत नाही, तसंच निसर्गाकडून होणारं आपत्ती निवारण व रोगनियंत्रणही समजत नाही. अविवेक व अविचारातून माणसाने पाणथळ जागांपासून अरण्यांपर्यंत, ओढय़ांपासून समुद्रांपर्यंत, टेकडय़ांपासून पर्वतांपर्यंत निसर्ग शिल्लकच न ठेवण्याचा निर्धार केला. आता उरलेला निसर्ग त्यांच्या परतभेटी (रीटर्न गिफ्ट्स) पाठवत आहे.

करोनामुळे मागील महिन्यात आलेल्या टोळधाडीच्या संकटाकडे माध्यमांचं फारसं लक्ष गेलं नाही. काही देशांत २५ वर्षांनंतर, तर काही देशांत ७० वर्षांनंतर आलेली ही भयंकर टोळधाड इराण, सौदी अरब, येमेन, सुदान, इथिओपिया, सोमालिया, एरित्रिया व केनिया अशा १७ देशांत पसरली होती. त्यामुळे जागतिक अन्न व शेती संघटनेने ‘‘अंदाजे २.५ लाख हेक्टरवरील मका, बाजरी, ज्वारी व वाटाण्याची उभी पिकं संपवून टाकणाऱ्या सुमारे २० अब्ज टोळांना नियंत्रणात आणण्यासाठी  १४ कोटी डॉलरची मदत करावी,’’ असं आवाहन केलं होतं. यंदा वाळवंटी भागात वाढलेल्या चक्रीवादळानंतर आलेल्या पावसामुळे वाढलेल्या हिरवळीमुळे टोळधाड आली असं वैज्ञानिक सांगत आहेत. एका दिवसात १५० किलोमीटर अंतर कापणाऱ्या टोळांच्या आक्रमणाने आकाश अंधारून जाते. असा भयपट प्रत्यक्षात अनुभवताना कोटय़वधी जनता भयग्रस्त झाली होती. एकंदरीत डास, टोळ असे कीटक हे माणसांसाठी युद्धजन्य परिस्थिती आणत आहेत. महायुद्ध अथवा इतर कोणत्याही कारणांना पृथ्वीवरून मानवजात नष्ट झाली वा परग्रहावर वस्तीस गेली तर येथे झुरळ व डास यांचंच अधिराज्य असेल, असं अनेक विज्ञानपटांत व कादंबऱ्यांत दाखवलं आहे. पाकिस्तानाला किंचित स्पर्शून गेलेली टोळधाड आपल्या चिंता वाढविणारी आहे.

विख्यात लेखक नंदा खरे यांनी १९९३ साली लिहिलेल्या भविष्यवेधी ‘२०५०’ या कादंबरीत (ग्रंथाली प्रकाशन) भिंत हाच संगणक व दूरचित्रवाणीचा पडदा झाला आहे. संगणक एकमेकांशी संवाद साधत आहेत अशी विज्ञान प्रगती रेखाटली आहे. त्या कादंबरीमध्ये जागतिक साथीमध्ये १३६ कोटी लोक मारणाऱ्या महामारीचं वर्णन केलं आहे. विलगीकरण, तपासण्या, युद्धातील  हत्यार म्हणून विषाणूचा वापर असे अनेक तपशील त्यांनी तेव्हा लिहून ठेवले आहेत. निसर्गातील एक यंत्रणा मोडली तर दुसरी उभी राहते, असं म्हणत निसर्ग खरवडत राहणाऱ्या विकासवादातून झालेला ऱ्हास त्यांनी दाखवला होता. जागतिक तापमानवाढ व हवामानबदल अशा अनेक संकल्पनांचा वेध खरे यांनी २७ वर्षांपूर्वी द्रष्टेपणाने घेतला होता. त्यांनी विसावं शतक हे खनिजाचं होते, एकविसावं शतक शेतीचं असेल, श्रीमंती खालवेल व गरीबीही निवळेल असं २०५० सालाचं चित्र रंगवलं होतं. या कादंबरीकडे कोणीही फारसं लक्ष दिलं नव्हतं. त्या कादंबरीने घेतलेली काळाची झेप आज लक्षात येते.

यापुढील जगाची विभागणी ही करोनाआधी व करोनानंतर अशी होईल. यातून दोन शक्यता संभवतात. या विषाणू आव्हानाचा संदेश हे कोणत्याही एका राष्ट्राचे काम नव्हे, तर संपूर्ण जगाने शहाणपणानं एकत्र येऊन सहकार्य करावं असाच आहे. हवामानबदल, आरोग्य असो वा शेतीच्या संशोधन क्षेत्रात जागतिक साहचर्य आवश्यक आहे याची प्रकर्षांने जाणीव झाल्याने संपूर्ण जगाची पुनर्रचना चालू होईल. वैज्ञानिकांच्या निष्कर्षांचा मान राखून जगरहाटीत विलक्षण बदल होतील. धोरणकर्त्यांकडून सार्वजनिक आरोग्य व शिक्षण क्षेत्राची चाललेली उपेक्षा थांबेल. निसर्ग वाचवण्यासाठी अवघे जग एकवटल्याने उदारता व सुसंस्कृतेचं जागतिकीकरण होईल.

अन्यथा काही महिन्यांत करोनाचा धडा विस्मरणात जाईल. पुन्हा नव्या जोमाने अरण्यांची होळी चालू होईल. एकेक पक्षी व प्राणी नाहीसे होत जातील. काही वर्षांत आजूबाजूचा पक्ष्यांचा किलबिलाट संपून जाईल. रातकिडे ऐकू येणार नाहीत आणि मातीला गंधही येणार नाही. मात्र, कथा-कहाण्या, अभंग व बंदिश यांमधील चिमणी, कावळा, कोकीळ, मोर, पावशा, बेडूक, कोल्हा यांचे अधिराज्य मात्र माणूस असेपर्यंत तसेच अबाधित राहील. पुढच्या पिढय़ांकरता आभासी वास्तव हेच वास्तव झाल्याने पक्षी व प्राण्यांच्या सचेतनीकरणाचीच (अ‍ॅनिमेशन) सवय होऊन जाईल. तेव्हा ‘शेपटीवाल्या प्राण्यांची सभा’(ग. दि. माडगुळकरांची कल्पना) भरूच शकणार नाही अशी तजवीज विनाशेपटीच्या प्राण्यांनी करून ठेवली आहे. परंतु विषाणूंना नष्ट करणं तर दूरच; त्यांना आटोक्यात आणणं हेसुद्धा मानवाला जमत नाहीए. मानवी वृत्तींमधील होत जाणारे परिवर्तन व सूक्ष्मजीवांमध्ये होणारे वेगवान उत्परिवर्तन (म्युटेशन) असा हा संघर्ष आहे. वैज्ञानिक करोनाच्या नवनव्या अवतारांसारखे धोके दाखवून जगाला सावध करीत आहेत. पृथ्वीवर राहण्याजोगे वातावरण  न राहिल्यास ‘चलो मंगळ’च्या तयारीत असणाऱ्या मानवजातीला सूक्ष्मजीव जेरीला आणत आहे व यापुढेही आणणार आहेत. तेव्हा आरंभी उल्लेख केलेल्या कावळ्याच्या वाणीतील शेतकऱ्यासारखी आपली गत होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2020 1:12 am

Web Title: need to save wildlife and envornment globally dd70
Next Stories
1 व्हायरसचे विज्ञान
2 अफसाना लिख रही हूँ.. : ‘साथ साथ’
3 भारत-पाक सौहार्दाचे प्रतीक
Just Now!
X