ज्येष्ठ रंगकर्मी-अभिनेते             डॉ. श्रीराम लागू यांचे निवडक लेख, मुलाखती, भाषणं यांचं ‘रूपवेध’ हे पुस्तक आज,    ३१ मार्च रोजी पॉप्युलर प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. त्यानिमित्ताने या पुस्तकासाठी डॉ. पुष्पा भावे यांनी घेतलेल्या डॉ. लागूंच्या प्रदीर्घ मुलाखतीचा संपादित भाग.

– डॉक्टर, अगदी पहिल्यापासून म्हणजे ‘वेडय़ाचं घर उन्हात’पासून सर्वच नाटकांत हे जाणवत होतं की, तुम्ही आवाजावर मेहनत घेतली आहे. हे तुम्ही स्वत:च शिकून घेतलं असणार. कारण त्या काळात मार्गदर्शन काही नव्हतंच उपलब्ध, त्यासाठी तुम्ही जाणीवपूर्वक काय केलं?

(हसून) हा विनोदी किस्साच आहे बरं का. विनोदी अशा दृष्टीने की, ‘वेडय़ाचं घर उन्हात’चं तुम्ही नाव घेतलंत म्हणून सांगतो. ‘वेडय़ाचं घर’ होईपर्यंत मला नटाला काही विशेष आवाज लागतो, तो कमावता येतो, याची जाणीव नव्हती. के. नारायण काळेंनी मला प्रथम सांगितलं की, ‘तुमचा आवाज चांगला आहे.’ अरे, म्हटलं नटाचा आवाज चांगला म्हणजे काय? गायकाचा आवाज चांगला असावा लागतो. नटाचा आवाज चांगला असावा लागतो? त्या वेळेला प्रयोग कमी व्हायचे. शनिवार, रविवार. पण ‘वेडय़ाचं घर उन्हात’ चालायला लागलं. काही वेळा शनिवार, रविवार असे दोन प्रयोग व्हायचे. तेव्हा शनिवारी प्रयोग झाला की, माझा आवाज बसायचा. मी आवाजाचा चुकीचा वापर करत होतो. त्यानंतर काळे माझ्याकडे एकदा आले आणि त्यांनी माझ्यावर एक बॉम्बच टाकला. ते म्हणाले, ‘‘बंगलोरला माध्यमिक शिक्षकांचं एक शिबीर आहे नाटकावर. व्हॉइस आणि स्पीच या विषयावर सहा व्याख्यानं द्यायची. प्रत्येक व्याख्यान दीड-दीड तासांचं आहे. तिथे तुम्ही जा.’’ मी म्हटलं, ‘‘अहो काळे, तुम्ही काय म्हणता? इथे मला ओ का ठो माहीत नाही, बोलण्याविषयी आणि तुम्ही मला सहा व्याख्यानं घ्यायला सांगता, हे ठीक नाही.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘तुम्हांला माहीत नसेल की, तुमचा आवाज चांगला आहे. तुम्ही ईएनटी स्पेशालिस्ट आहात. तुम्हाला माहीत नसेल तर माहिती करून घ्या. ही पुस्तकं घ्या.’’ त्यांनी माझ्यासमोर पाच-सहा पुस्तकं टाकली, व्हॉइस आणि स्पीचवर. आणि काहीतरी पंधरा किंवा तीन आठवडे असतील. ती पुस्तकं मी भराभर वाचली. ती लेक्चर्स घ्यायची हेच महत्त्वाचं होतं त्या वेळेला आणि ती कशीबशी मी साजरी केली. त्यानंतर ती पुस्तकं वाचताना माझ्या लक्षात आलं- अरे, पुस्तक वाचूनही काहीतरी करण्यासारखं आहे. मग त्याचा अभ्यास आपल्याला एकटय़ालाच करावा लागणार. त्याचं काही फॉर्मल ट्रेनिंग नाही. इन्फॅक्ट, त्या वेळेला आमच्याकडे प्रभाकर गुप्ते हे आवाजावर चांगले प्रयोग करायचे. क्लासेस वगैरे घ्यायचे. त्याचे ‘स्वरसाधना’ असे नाव आहे. तिथे मी एकदोन वेळेला गेलो. तेव्हा माझ्या लक्षात आलं की, आपण पुस्तकात जे वाचलं ते इथं नाही. हे काही वेगळंच सांगताहेत आणि हे अशास्त्रीय आहे. कारण मला त्याची टेक्निकली माहिती होती. मी ईएनटी असल्यामुळे मला हे समजलं की, चुकीचे सांगत आहेत. म्हणून मी तिथं गेलो नाही. मी ती पुस्तकं वाचत राहिलो आणि मग मी त्या अवस्थेला येऊन पोहोचलो.

मग मी व्यावसायिक झाल्यावर माझे दिवसातून तीनतीन प्रयोगसुद्धा व्हायचे. सकाळी ‘गिधाडे’, दुपारी ‘काचेचा चंद्र’, रात्री ‘नटसम्राट’; परंतु माझा आवाज बसल्यामुळे प्रयोग झाला नाही, असं कधीही झालं नाही. परंतु सुरुवातीला काहीच कल्पना नव्हती, त्यामुळे त्रास व्हायचा. अतिशय खरडून आवाज काढत होतो, परंतु नैसर्गिक अशा आवाजाची देणगी असल्यामुळे लोकांना माझा आवाज चांगला वाटत होता. त्याचा वापर मी मात्र फार चुकीचा करत होतो. जर का मी त्याच पद्धतीनं बोलत राहिलो असतो तर कदाचित लवकरच माझ्या नरडय़ाचं पार खोबरं झालं असतं!

– याच काळात आपण नव्याने ध्वनिक्षेपक, ध्वनिवर्धक यांच्याकडे जरा बारकाईने पाहायला लागलो का, नाटकवाली मंडळी पाहायला लागली का?

आमच्या वेळी ध्वनिक्षेपक आले होते.

– हां, पण आधीच आपल्याकडे कसं झालं पाहा, एक तर आम्ही ध्वनिक्षेपक वापरत नाही या प्रकारची एक भूमिका, आपल्या आवाजाशी जुळवून घेण्याचा विचार नव्हता. मला वाटतं, तुमच्या काळातच जुळवून घेण्याचा विचार आला असेल.

जुळवून घेण्याचा विचार केला हे खरं तर मी सांगणं बरोबर नाही, कारण ध्वनिक्षेपकाशिवाय काम करायची पाळी माझ्यावर कधी आलीच नाही. आली ती फार पुढे म्हणजे अलीकडे पृथ्वी थिएटर, एनसीपीएमध्ये. छोटय़ा हॉलमध्ये कामं केली तेव्हा प्रश्नच नव्हता. ‘मादी’ किंवा ‘मी जिंकलो, मी हरलो’ छोटय़ा हॉलमध्ये करायचो, त्या वेळेला आम्ही माइकशिवायच करायचो. त्यामुळे असा काही फरक जाणवला नाही किंवा आम्ही त्या माइकशी जुळवून घेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न कधी केला नाही. आपोआपच ते झालं असावं, परंतु आता ते जाणवलं. जेव्हा एनसीपीएमध्ये किंवा पृथ्वी थिएटरमध्ये प्रयोग केला, तेव्हा इतकं जाणवलं की, माइक असणं हे किती वाईट आहे आणि आपल्याला अशा तऱ्हेची थिएटर्स सगळीकडे मिळाली, जिथे माइकशिवाय आपल्याला काम करता येईल, तर आपला आवाज आपण किती अर्थानी वापरू शकू हे कळत गेलं.

– आवाजाची जातच मोठी. मला स्वत:ला असं वाटत आलंय की, तुमच्या आंगिक अभिनयामध्ये स्नायूंचा वापर ही तुमची खासियत आहे. खासियत अशा अर्थाने की तुमच्या व्यक्तिरेखेच्या त्या वेळेला असलेल्या शारीरिक अवस्था, मनोवस्था काही वेळेला तिचं व्यक्तिदर्शन हे सगळं तुम्ही स्नायूंच्या आधारे दाखवत असता. म्हणजे मला विशेष हे जाणवलं की, ‘मी जिंकलो-मी हरलो’मधील माधवची भूमिका करणार होतात, तर तेव्हा खूप वाद झाला की, डॉक्टर सामान्य माणूस दिसूच शकणार नाही. परंतु स्नायूंच्या वापरामध्ये त्या वेळेला तुम्ही अशी काही प्रक्रिया केली की, त्या वेळी तो आधी सामान्य दिसला, नंतर त्यातून बाहेर येताना. हे सगळं स्नायूंच्या आधारावर. आणि दुसरं मला एक आठवतं ते ‘गुरुमहाराजगुरू’मध्ये, तो आत जातो मग त्याला अध्यात्माचा स्पर्श होतो व तो बाहेर येतो. तर तुम्ही त्या काळात याचं कुठे शिक्षण न घेतल्यामुळे तुम्हांला वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग झाला असावा. फक्त चिंतामणराव कोल्हटकर यांनी ‘बहुरूपी’मध्ये त्याविषयी थोडंफार नोंदलं आहे, पण आपल्याकडे त्याविषयी, नटांनी काही नोंद केलेली नाही. त्यामुळे तुम्ही याविषयी बोललात तर बरं होईल.

खरं म्हणजे मी स्नायूंचा वापर करतो आहे हे पुष्कळ पुढं माझ्या लक्षात आलं. तोपर्यंत काय होतं ते  सांगतो. एखादी भूमिका वाचली की, ती वाचता वाचता माझ्या डोळ्यांसमोर उभी राहते. उदा. ‘गुरुमहाराजगुरू’मधला गुरू हा पहिल्यांदा ट्रक ड्रायव्हर म्हणून येतो, तेव्हा तो कसा चालतो, कसा बोलतो, बघतो हे मला दिसत असे, अगदी अ‍ॅक्च्युअली दिसत असे. तो आत गेल्यावर कफनी घालून बाहेर येतो, तो एक तेज:पुंज असा योगी. एका क्षणामध्ये कसा त्याच्यात बदल होतो तोही मला दिसत असे. मी फक्त तसं व्हायचा, दिसायचा प्रयत्न करायचो. हे सर्व स्नायूंच्या आधाराने होत होतं आणि याच्यामध्ये दुसरं काहीही नव्हतं, हे जास्त फायनली माझ्या लक्षात आलं. ‘हिमालयाची सावली’च्या वेळेला. त्यातल्या माझ्या पॅरालिसिसच्या प्रकारचं प्रचंड कौतुक झालं. अभिनयाची हाइट जी म्हणतात ती याच्या पलीकडे असूच शकत नाही, असं जेव्हा बोलण्यात आलं, तेव्हा मला सगळ्यांना नीट सांगावं लागलं की हे केवळ एक गिमिक आहे. यामध्ये अभिनयात, माझ्या शरीरातल्या काही विशिष्ट स्नायूंवरती मला असा ताबा मिळवायचा आहे की, पॅरालिसिस झालेला माणूस जसा असतो तसे मसल्स मला करायचे आहेत. त्याला पॅरालिसिस झालेला नाही, परंतु तो झालेला आहे हे जाणवून द्यायचे आहे. म्हणून मग ते स्नायू मला तितक्या पद्धतीने कंट्रोल करायचे आहेत. मी नटाला सारखा अ‍ॅथलीट फिलॉसॉफर असं बोलत असतो, त्याचं मुख्य कारण हे आहे. अ‍ॅथलीटचा खरा अर्थ असा नव्हे की, तो कुणी बोरिस बेकर झाला पाहिजे किंवा मॅकॅन्रो किंवा टारझन झाला पाहिजे. त्याचं अतिशय लवचीक, प्लास्टिक असं शरीर झालं पाहिजे. इतकं की आपल्याला त्याच्यातून शरीराला काही हवं ते करता येईल, पाहिजे त्या वेळेला तितका आपल्या शरीरावरती नटाचा ताबा झाला पाहिजे असा अ‍ॅथलीटचा अर्थ झाला पाहिजे आणि म्हणून मी सारखा उगाळत असतो. कारण शरीराचा वापर करताना मला असे लोक फार कमी दिसतात.

-आपल्याकडे दोन घोटाळे झाले. एक नॅचरॅलिस्टिक शैलीचा आपण उल्लेख केला, की वास्तवदर्शी शैलीचा वापर करायचा, याचा अर्थ आपल्या शरीराची हालचाल कशीही झाली तरी चालेल, असा एक प्रवाह आला. मराठीमधला कलाकार चालताना इतक्या वाईट पद्धतीने चालतात की काही वेळा रागानं थोडं ‘खांद्यावरचे नट’ असा शब्दप्रयोग मी करते. तर नॅचरॅलिस्टिक शैलीमध्ये हा घोळ एका बाजूला झाला. दुसऱ्या बाजूला मला असं वाटतं, एका बाजूला तुम्ही शारीरिक अशी परिवर्तनं दाखवत असताना कुठेतरी आत आतडय़ामध्ये मूळ तुम्हांला शोधता आलं पाहिजे आणि त्या दोन्हींचा संबंध प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता आला पाहिजे. विजयाबाईंनी स्वत:चा अभिनय बांधताना याकडे अतिशय बारकाईनं लक्ष दिलं, पण इतर मंडळींनी तसं लक्ष दिलं नाही असं वाटतं, म्हणून तुमचा उल्लेख केला. आपल्या काळाला ही गोष्ट जोडून घ्यायची झाली तर मग एका बाजूला आपण कवायतींचा उल्लेख करतो, करामतीचा उल्लेख करतो, आणि दुसऱ्या बाजूला वैयक्तिक अभिनयाकडे लक्ष पुरवलं जात नाही असं म्हणतो. तर तुम्हांला अगदी त्या त्या काळापासूनच्या अभिनयाच्या दृष्टिकोनातून पाहत असताना काय वाटतं?

हा जो कवायत वगैरेचा भाग आहे तो मला वाटतं, त्या नाटकाच्या लिखाणावर अवलंबून आहे. तर लेखकांनी असा ठरावीक फॉम्र्युला ठेवलेला असेल किंवा अमुक एक आशय व्यक्त करायचा म्हणजे आपल्याकडं बाकी दुसरं काही वापरण्यापेक्षा समूहातर्फे  तो आशय व्यक्त करायचा. या सगळ्या नाटकांच्या लिखाणातच मला वैयक्तिक अभिनयाला वाव कमी होत चाललेला वाटतो. तो नटांचा किंवा दिग्दर्शकांचा दोष आहे असं काही मला वाटत नाही. अर्थात, त्या दिग्दर्शकांनी तशीच नाटकं का निवडावीत, या प्रश्नाचा विचार करायला हवा. वैयक्तिक भूमिकेला वाव असेल असं का निवडू नये? परंतु या प्रकारची नाटकं जी केली जातात, जिथे त्याचा चांगला वापर होऊ शकतो, हेही आपण ज्युनिथसारख्या किंवा गोचीसारख्या नाटकांमधून पाहिलं आहे, परंतु त्याचा एकदा फॉम्र्युला बनला. एखाद्या गोष्टीचा किंवा मी म्हटलं नॅचरॅलिस्टिक नाटक, मग प्रत्येक नाटक नॅचरॅलिस्टिक पद्धतीने करायचं अशा एक-एक प्रत्येक काळामध्ये फॅशन्स पडत जातात. मला वाटतं ही, या काळामधली फॅशन आहे. ही काय फारशी टिकेल असं वाटत नाही. सुदैवानं ती जातही चाललेय असं दिसतंय, पण हा काही त्या अभिनेत्यांचा दोष आहे हे मी मानायला तयार नाही. म्हणजे वैयक्तिक अभिनयाकडे आज जे दुर्लक्ष होतंय ते त्या प्रकारच्या लिखाणामुळे. वैयक्तिक अभिनय डिमांड केला जाईल अशा प्रकारच्या व्यक्तिरेखा आज होत नाहीत. माझी जी तक्रार आहे आजची, ती ही आहे. खरं म्हणजे आज नट कमी ताकदीचे आहेत असे मला मुळीच वाटत नाही. आज आमचे नाना पाटेकर म्हणा किंवा सदाशिव किंवा परवा सुधीर जोशींचा पर्फॉर्मन्स म्हणा,  अतिशय चांगल्या कॅलिबरचे हे नट आहेत. ज्याला फर्स्ट ग्रेड कॅलिबर म्हणतात असे हे नट आहेत. परंतु त्यांना जी नाटकं करावी लागतात ती आजची नाटकं नाहीत किंवा अशी आहेत की, त्याच्यापेक्षा ते जास्त काही करू शकत नाहीत.

-अभिनयाच्या संदर्भातील काही नाटय़बाह्य़ गोष्टींचा विचार करताना मला असं वाटतं की, पाश्चात्त्य देशांमधील बहुसंख्य नट हे स्वत: रंगभूषेचं प्रशिक्षण घेतात आणि अनेकदा स्वत:ची रंगभूषा स्वत:च करतात. इतकंच नाही, तर पॉल म्युनिचं विलक्षण उदाहरण आहे की भूमिकेनुसार इतका चेहरा बदलण्याचं. दुसरं म्हणजे आपल्याकडे असं दिसतं की, केवळ विग वापरायची या कृतक पद्धतीनं वापर होतो, पण रंगभूषेचा हा कलापूर्ण वापर किंवा विचार आपल्या कलाकारांनी केलेला दिसत नाही. तुम्ही कधी दृष्टिकोनातून रंगभूषेचा वापर कधी केला नाही का?

मी अभ्यास नाही करू शकलो. कारण बहुतेक प्रत्येक रोलमधली स्वत:ची रंगभूषा ही मी स्वत: कन्सीव्ह केलेली आहे, मी ती सजेस्ट करतो. दिग्दर्शकाला ते पटते. आतापर्यंत तरी असं कुठे झालेलं नाही. माझी स्वत:ची अडचण अशी आहे की, मी अत्यंत आंधळा माणूस आहे, चष्मा नसला की रंगभूषा करताना आरशासमोर बसलो तरी मला माझा स्वत:चा चेहरासुद्धा दिसत नाही. मला जर रंगभूषा स्वत:ला स्वत:ची करायची असेल, तर आरसा नाकाजवळ धरावा लागेल. म्हणजे मला नाक रंगवता येणार नाही. ही माझी त्यातली प्रॅक्टिकल अडचण आहे. त्यामुळे मी स्वत:ची रंगभूषा करू शकत नाही, परंतु माझी रंगभूषा मात्र स्वत:च कन्सीव्ह करतो. माझ्या आत्तापर्यंतच्या सगळ्या भूमिकांत ते मी केलेलं आहे. ‘गिधाडे’मध्ये  मला त्या माणसामध्ये फक्त एवढंच दिसत होतं की, त्याचं कपाळ एवढंसंच दिसावं किंवा ‘नटसम्राट’मध्ये त्या माणसाला टक्कल पाहिजे हे दारव्हेकरांना पटवून द्यायला मला वेळ लागला. त्यांना वाटलं की, हे फार केशवराव दात्यांसारखं दिसेल. वेगळेपणा हा असतोच की, आपण काही केशवराव दात्यांसारखी नक्कल करणार नाही. किंबहुना मला ते सुचतं. ‘हिमालयाची सावली’मध्ये एवढेसेच केस ठेवलेत. त्याचा विग करणं अतिशय कठीण आहे. आमच्या रंगभूषाकारांनी सांगितलं की, छोटासा विग तयार करणं कठीण आहे. लांब केसांचा विग पटकन तयार करून देईन. पण नाही, मी हट्ट धरला की मला छोटय़ा केसांचाच विग हवा आहे. सुरुवातीला तर त्याने मला एवढाच विग तयार करून दिला होता, पण मी म्हटलं नाही त्यातला प्रत्येक केसन् केस असा उभा राहिला पाहिजे. जो मनुष्य हजामत करतो आणि मग हजामत एक-दोन आठवडय़ांनी जसे केस वाढत जातात तसे ते हवे.

– तुमचा हा जो काळ आहे, या काळाच्या शेवटी तुम्ही निर्णय घेतलात की सगळा वेळ पूर्णपणे नाटकाला द्यायचा, वैद्यकीय व्यवसाय सोडायचा. हा निर्णय घेण्यापूर्वी नाटक आणि आपण याचं काही नातं तपासून घेतलंत का?

खरं म्हणजे नाही. त्या वेळी थोडासा झपाटल्यासारखा झालो होतो असंही नाही, परंतु साक्षात्कार झाल्यासारखा झाला तो आफ्रिकेमध्ये. तिथं मी तीन र्वष होतो, तो पहिल्यांदाच माझ्या आयुष्यातला काळ असा होता की, जवळ जवळ नाटकातून मी संपूर्णपणे बाहेर पडलो होतो. आणि तिकडे हे जाणवत राहिलं की दोनपैकी एक गोष्ट जर सोडता येत असेल तर मेडिकल प्रॅक्टिस सोडणं शक्य आहे, पण नाटक कायमचं सोडणं शक्य नाही. तीन वर्षांत तिथे माझी जी तडफड झाली त्यातून ही गोष्ट मला लक्षात आली. परंतु नेमकं नाटकाचं व माझं काय नातं आहे हे अजून मला कळलेलं नाही. जसं गायकाला गावंसं का वाटतं, पेंटिंग करणाऱ्याला पेंटिंग करावं असं का वाटतं, तसं मला अभिनय करावा, नाटक करावं असं का वाटतं याचा शोध अजूनही लागत नाही. अंदाजच करायचा तर असं म्हणता येईल की, मनुष्य जेव्हा स्वत:शीच भयंकर असमाधानी असतो, तेव्हा तो निरनिराळ्या प्रकारे परकाया प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो. कधी हे जगायचा प्रयत्न करतो, तर कधी ते. पण, या सगळ्याने काही माझं समाधान होत नाही. मात्र असं वाटतं, ‘अगेन कोटिंग द प्लॅटिटय़ूड’ किंवा कोस्लरने जे म्हटलेलं आहे की, ‘इज नायदर अ प्रिवीलाइज नॉर अ राइट, इट इज अ बिल्ट इन नेसेसिटी ऑफ द क्रोमोसोम्स ऑफ द स्पेसीज.’ म्हणजे आमच्या क्रोमोसोम्समध्ये कुठे तरी नाटकाचं जीन्स पडलेलं आहे. याच्या पलीकडे मला काही दुसरं दिसत नाही.