06 August 2020

News Flash

टपालकी : बालपण नको रे बाप्पा!

अरे तुला सांगतो दादू, अगदी विनाकारण, केवळ इतरांपेक्षा हुशार आणि स्मार्ट असल्यामुळे लहानपणी मला खूप मार खायला लागलेला आहे

(संग्रहित छायाचित्र)

सॅबी परेरा

प्रिय मित्र दादू यांस,

सदू धांदरफळेचा नमस्कार.

आठवडय़ाभरापूर्वीच बालदिन होऊन गेला आणि त्या निमित्ताने खूप लोकांनी समाज माध्यमांवर ‘बालपणीचा काळ सुखाचा’, ‘रम्य ते बालपण’ असे कढ काढले. मला काही हे फारसं पटत नाही. ‘बालपण देगा देवा’ किंवा ‘माणसाने आयुष्यभर विद्यार्थी राहावं’ अशी टुकार सुभाषितं रचणारा इसम मला कुठे भेटला, तर त्याच्या कॉलरला धरून फेसबुक लाईव्ह करून विचारेन की, ‘‘बाबारे, आम्ही बालक आणि विद्यार्थी राहून काय जन्मभर मोठय़ा माणसांचा आणि मास्तरांचा मारच खायचा का?’’

अरे तुला सांगतो दादू, अगदी विनाकारण, केवळ इतरांपेक्षा हुशार आणि स्मार्ट असल्यामुळे लहानपणी मला खूप मार खायला लागलेला आहे. तू मला सांग, दिवाळीच्या रजेतला अभ्यास कुणी रजेच्या दिवसात करतात का? म्हणजे दिवाळीची रजा अगदी वर्षभराची जरी असली तरी तो अभ्यास तीनशे चौसष्टाव्या रात्रीच करायचा असतो की नाही? पण नेमकी त्या तीनशे चौसष्टाव्या रात्रीच आमच्या घरी वीज जायची आणि हे कारण कितीही जेन्युईन असलं, अगदी त्याच कारणामुळे मास्तरांनी त्यांच्या घरी चुकून घासलेटच्या बाटलीला तोंड लावलेलं असलं, तरी आमचे मास्तर तो सगळा राग, त्यांचा हात आमच्यावर साफ करून काढायचे.

अरे, शाळेत असताना मागच्या बाकांवर बसणाऱ्या बहुतेकांवर असतो तसाच! माझ्यावर देखील उर्दू भाषेचा खूपच प्रभाव होता. त्यामुळे माझ्या सगळ्या वह्य़ा मागून भरलेल्या आणि पुढून कोऱ्या असायच्या. तुला पटणार नाही, पण उर्दूच्या या व्यासंगाबद्दलही मला मार खावा लागलेला आहे. आम्ही तेव्हा शाळेत अनवाणी किंवा फारतर स्लिपर घालून जायचो आणि आमच्या वर्गात एक पोरगा होता- तो शूज घालून यायचा. एकदा त्या पोराच्या चोंबडेपणामुळे मास्तरांनी मला निसर्गाच्या हाकेला ओ देऊ दिली नाही. मग नाइलाजाने मला त्या पोराच्या शूचा असा काही लाघवी उपयोग करावा लागला की, त्यामुळे त्याचे पाय ओले आणि नंतर हे प्रकरण उघड होऊन माझी पाठ ढिली झाली. आमच्यावर असा बळाचा वापर करण्यात शिक्षिकाही फार मागे नव्हत्या. मला सांग दादू, कुणाला वेळ विचारताना आपण मनगट दाखवतो की नाही, मी लहानपणापासूनच स्मार्ट असल्यामुळे, तोच न्याय लावून मी आमच्या बाईंना स्वच्छतागृह कुठे आहे विचारताना माझा पाश्र्वभाग दाखवला; आणि केवळ माझ्या या स्मार्टनेसची असूया वाटून त्यांनी मला बदडून काढले होते. असो.

मानसशास्त्र असे सांगते की, तुमच्या बालपणी घडलेल्या घटनांचा तुमच्या आयुष्यावर खोल परिणाम होतो. तुला माहीतच आहे, आज आपल्याकडे बोफोर्स तोफांच्या व्यवहारात घोटाळा होतो, राफेल विमानाच्या सौद्यात गफला होतो. टेलिकॉमचे परवाने देताना नियम वाकवले जातात. रोज कसला न कसला भ्रष्टाचार बाहेर येतो. पण सामान्य माणूस त्याविरुद्ध हवा तितका आवाज उठवत नाही. मी म्हणतो, कसा उठवणार? या सामान्य माणसाचा आवाज लहानपणापासूनच दडपण्यात आला आहे. अरे, ज्या सामान्य माणसाला लहानपणी पाहुण्यांनी खाऊसाठी दिलेले पैसे आई-बाबांनी गडप केले, त्या कौटुंबिक भ्रष्टाचाराविरुद्ध त्याला आवाज उठवता आला नाही, तो राष्ट्रीय भ्रष्टाचाराविरुद्ध काय बोलणार?

लहानपणी मी बऱ्यापैकी गुबगुबीत आणि गोबऱ्या गालाचा असल्यामुळे आई-बाबांसोबत कुठेही गेलो तरी तिथे भेटणाऱ्या ताया, काक्या, मावश्या, आज्या गाल ओढून-ओढून माझे मुके घेत. या गोष्टीचा तेव्हा मला प्रचंड राग येत असे. पण नंतर काही काळाने जेव्हा मी तारुण्यात पदार्पण केलं आणि ज्ञानेश्वरीतल्या पसायदानाने प्रभावित होऊन ‘आता विश्वात मुके द्यावे’ या भावनेने बाहेर पडलो तेव्हा मात्र माझ्या नशिबी सदैव निराशाच आली. असो.

मी पाहतो लोक हल्ली लहानपणीच्या सगळ्याच गोष्टींचं, अगदी गरिबीचंही उदात्तीकरण करताना दिसतात. त्यांना जुनं सगळंच कसं गुडीगुडी दिसत असतं. असं म्हणतात की, काळ हा उत्तम इलाज आणि उत्तम वैद्य आहे. त्यामुळे जसजसा काळ जातो, तसतसं आपल्याला आपल्या बालपणीच्या काटय़ांचं विस्मरण होऊन केवळ फुलपंखी दिवस तेवढे स्मरतात. मी म्हणतो दादू, काळ हा उत्तम वैद्य असेलही, पण तोच काळ किती वाईट मेकअपमन आहे हे मी आज जेव्हा स्वत:ला आरशात पाहतो तेव्हा माझ्या लक्षात येते. पुन्हा असो.

जून महिन्यात लोक सोशल मीडियावर आपल्या मुलांच्या शाळेच्या पहिल्या दिवसाचे फोटो टाकतात. नोव्हेंबरमध्ये ‘बालदिना’च्या निमित्ताने स्वत:चे लहानपणीचे फोटो डकवतात. माझ्याकडे, माझ्या शाळेतल्या दिवसाचा एकही फोटो नसला तरी शाळेच्या पहिल्या दिवशी, मी आणि माझ्यासोबत गावातल्या अनेक मुलांना त्यांचे वडील एका हातात दप्तर आणि दुसऱ्या हातात छडी घेऊन गुरांसारखे हाकत नेत असतानाची ब्लॅक अँड व्हाईट स्मृती मात्र अजूनही माझ्या डोळ्यांसमोर ताजी आहे. नोबितासारखे डोळ्यांतून अश्रूंचे तुषार उडवत, तोंडाने भोकाड पसरून, वाहत्या नाकाने शाळेकडे हाकलली जाणारी ती अश्राप मुले मला अजूनही आठवतात. स्वत:ला विज्ञानवादी म्हणवणाऱ्या, प्राणिमात्रांना, वनस्पतीला भावना असतात हे मानणाऱ्या आपल्या पालकांनी कोवळ्या मुलांच्या भावना मात्र कधी समजून घेतल्या नाहीत. ठिकाय, आपल्या बाबतीत जे झालं ते झालं. निदान आपल्या मुलांच्या बाबतीत ते होऊ नये. म्हणून मी म्हणतो, आपल्या इच्छा-आकांक्षा मुलांवर लादू नका. रडणाऱ्या मुलाला जबरदस्तीने शाळेत पाठवताना निदान त्याला विचारा की बाबारे, तुला शाळेत जायचंय की थेट पंतप्रधानच व्हायचंय?

यार दादू, माझी तल्लख स्मरणशक्ती मला त्या बालपणीच्या गरिबीचे चटके विसरू देत नाही. अरे तुला सांगतो, आमची परिस्थिती इतकी गरिबीची होती की, घरात जे काही तुटपुंजं आहे त्यातच आम्हाला भागवावं लागायचं. तुला कदाचित पटणार नाही, पण मला चार पर्यायातून एक पर्याय निवडण्याची संधी मी जेव्हा स्पर्धा परीक्षा दिली तेव्हा पहिल्यांदा मिळाली रे!

लहानपणी खूप वेळा सहलीला गेल्यावर, जत्रेत, मिरवणुकीत, उत्सवात मी हरवणार, आई रडवेली होणार आणि सगळे आपापले कामधंदे सोडून मला शोधायला लागणार, असा एक ठरलेला प्रोग्राम असायचा. पण माझ्या बडबडण्याच्या सवयीमुळे मी सापडायचोदेखील लगेच. सापडल्यावर आईकडून मिळालेले रट्टे आणि त्या प्रसंगातून शिकलेला धडा मी कधीच विसरणार नाही.. माणसाने बडबडे असावे म्हणजे, आपण हरवलो तर अचानक शांतता कशी पसरलीये हे ध्यानात येऊन लोक शोधून काढतात आपल्याला!

मित्रा, आजकाल वाघांच्या, गिधाडांच्या आणि चिमण्यांच्या दिवसेंदिवस कमी होत चाललेल्या संख्येबद्दल ग्रामपंचायतीपासून युनोपर्यंत सगळीकडे चिंता व्यक्त होतेय. त्यांच्या संवर्धनासाठी नवनवीन योजना राबवल्या जाताहेत. पण किराणा दुकानावर जाता जाता, अचानक रनअप घेऊन बॉलिंगची अ‍ॅक्शन करणारी मुलं लुप्त होत चालली आहेत, याबद्दल कुणी अवाक्षरदेखील काढत नाहीये; अगदी बालदिनाच्या दिवशीदेखील नाही. हे अधिक चिंताजनक आहे की नाही?

तुला सांगतो दादू, मी आजही महिन्याचे सामान भरताना, साखरेचा एक बकाणा तोंडात सारतो. बालपणीच्या साखरेची गोडी या साखरेला नाही असा विचारही माझ्या मनाला शिवत नाही. रस्त्याने चालताना दगड दिसला, तर पायांनी भिरकवत मी तो दूरवर नेतो. आइस्क्रीमच्या कपाचं झाकण चाटल्याशिवाय टाकत नाही. रस्त्यात एखादा जुना मित्र किंवा मत्रीण पाठमोरी दिसली, तर तिच्या खांद्यांना पकडून ‘भॉऽऽऽऽक’ करायला मी लाजत नाही. कोणाचा तरी तळपाय उघडा दिसला, तर त्याला गुदगुल्या केल्याशिवाय मी पुढे जात नाही. खऱ्या आयुष्याइतकेच सोशल मीडियावरही मित्रांना ब्लॉक करून काही दिवस ‘कट्टी’ झाल्यावर स्वत:हून ‘बट्टी’ करायलाही मी पुढाकार घेतो. यापेक्षा वेगळं बालपण देव मला किंवा ‘बालपण देगा देवा’ म्हणणाऱ्या तुम्हाला काय देणार आहे?

बालपण नकोच आहे रे मला. अरे, ज्याच्या घराच्या उंबऱ्यात चपलांचा ढीग आहे, मित्रा-पाहुण्यांनी भरलेलं घर आहे, ज्याच्याकडे छंद जोपासण्याइतका वेळ आहे, हक्काने जाता येईल असे पाहुणे ज्याच्याकडे आहेत. आपल्या घरी इष्टमित्रांची खातिरदारी करण्याची दानत ज्याच्याकडे आहे, गप्पांच्या मफिली रंगवणारे, ज्यांच्यासोबत खळखळून हसता येईल आणि काळजातलं दु:ख सांगून मोकळेपणाने रडता येईल असे मित्रमत्रिणी, शेजारी, नातेवाईक ज्याच्याकडे आहेत.. चांगलंचुंगलं वाचायची, ऐकायची, पाहायची, चाखायची, अनुभवायची इच्छाशक्ती आणि कुवत ज्यांची अजूनही शाबूत आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे, आपला गोतावळा आणि आपले छंद हे आपलं नोकरी-धंद्यातलं पद, आपल्या नावावरील जमीन जायदाद, ठिकठिकाणची गुंतवणूक, लॉकरमध्ये ठेवलेले हिऱ्या-मोत्यांचे दागिने या सगळ्यांपेक्षा महत्त्वाचं आहे हे समजण्याइतपत समृद्ध प्रौढपण ज्याच्याकडे आहेए त्याला कशाला हवंय पुन्हा बालपण?

तुझा ‘बाल’-पन नसलेला मित्र,

सदू धांदरफळे

sabypereira@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2019 4:10 am

Web Title: not want childhood tapalki article abn 97
Next Stories
1 विशी..तिशी..चाळिशी.. : इन्शाल्ला..
2 गांधीजींचा विविधांगी मागोवा
3 नाटकवाला : शेक्सपिअरचा म्हातारा
Just Now!
X