News Flash

दखल

सरकारे शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना राबवतात आणि तरीही शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कमी होत नाही.

शेतकरी आत्महत्यांची मीमांसा

महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येचा विषय हा सर्वसामान्यांसाठीही खूपच संवेदनशील आहे.  सरकारे शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना राबवतात आणि तरीही शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कमी होत नाही. कधी निसर्गाची अवकृपा, तर कधी सावकारी वा सरकारी यंत्रणेच्या कात्रीत सापडलेले पीडित शेतकरी अखेरीस प्राप्त परिस्थितीला कंटाळून आत्महत्येचा मार्ग पत्करतात. शेतकऱ्यांच्या या आत्महत्येमागची कारणे शोधण्याच्या प्रयत्नांतूनच ‘मर्म शेतकरी आत्महत्यांचे’ हे आयपीएस अधिकारी कैलास कणसे यांचे पुस्तक आकारास आले आहे. या पुस्तकात लेखकाने शेतकऱ्यांचे प्रश्न प्रचलित शासन व्यवस्था तसेच पोलीस अधिकारी म्हणून विदर्भ-मराठवाड्यात गेली १८ वर्षे काम करताना आलेल्या प्रत्यक्ष अनुभवांतून मांडले आहेत.

एकीकडे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील शेतकरी आहे त्या परिस्थितीला खंबीरपणे तोंड देताना दिसतात, तर तिकडे विदर्भ-मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण आधिक्याने आढळते, हे निरीक्षण लेखक नोंदवतो. मग त्यामागची कारणे शोधण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला. लेखकाने सुरुवातीलाच काही घटनांचा उल्लेख करून तिथली नेमकी परिस्थिती काय आहे, हे ओघवत्या भाषेत कथन केले आहे. या अनुभवकथनातून वाचकाला तिथल्या शेतकरीवर्गाची नेमकी नस आणि वेदना आकळते. तिथल्या मुलींचे शिक्षण, शेतकऱ्यांच्या आर्थिक गर्तेमुळे नवरा म्हणून त्यांचा स्वीकार करण्यास नकार देत असलेल्या तिथल्या मुली अशा अनेकविध समस्यांचा धांडोळा लेखक घेतो. एकीकडे लेखक शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागच्या परिस्थितीचा आढावा घेत असतानाच त्यावर कोणती उपाययोजना करता येईल याचीही महत्त्वपूर्ण मांडणी करताना दिसतो. ग्रामीण भागांत सर्व शासकीय यंत्रणा कार्यरत आहेत आणि तरीही शेतीच्या समस्यांशी मात्र एकटा शेतकरीच तेवढा झुंजताना दिसतोे. त्याचे जीवन या संघर्षातच विझू विझू होते आणि तो शेवटी आत्महत्येचा मार्ग पत्करतो. याचे मुख्य कारण म्हणजे शेती व्यवसायाची सद्य: दयनीय अवस्था, तशात निर्माण होणारे अक्राळविक्राळ प्रश्न आणि त्यांची उकल होईल अशी सक्षम यंत्रणा नसणे, हे होय.

पुस्तकात लेखकाने शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काही उपाय सुचविले आहेत. शेतकरी, लोकप्रतिनिधी आणि ग्रामीण भागातील प्रशासकीय यंत्रणा यांचा योग्य मेळ साधल्यास हा प्रश्न मार्गी लावता येईल असे लेखक म्हणतो. त्यासाठी काही उपाययोजनाही त्यांनी सुचविल्या आहेत. यात शेतकरी महिलांचाही समावेश आहे. जलस्रोत वाढवणे, शेतीच्या बांधावर वृक्षलागवड, बी-बियाणांचे नियोजन, वित्तीय साहाय्य अशा अनेक साहाय्यकारी योजनांतून या आत्महत्या रोखता येऊ शकतील असा लेखकाला विश्वास वाटतो.

‘मर्म शेतकरी आत्महत्यांचे’- कैलास कणसे, चैत्र बुक्स प्रकाशन, पृष्ठे- १९३,

मूल्य-२८० रुपये.  ६

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2021 12:04 am

Web Title: notice farmer suicides akp 94
Next Stories
1 थांग वर्तनाचा! : आपण विरुद्ध ते? आता बास!
2 असामान्य कवयित्रीची संवेदनशील बखर
3 चवीचवीने… : ‘तिखटा’चं जागरण
Just Now!
X