आश्लेषा महाजन

विजय खाडिलकर यांचा ‘नुक्कड’ हा कथासंग्रह म्हणजे उपेक्षितांच्या जीवनाचा वास्तवदर्शी चित्रपटच होय. पुण्याच्या समकालीन प्रकाशनने अलीकडेच हा कथासंग्रह प्रसिद्ध केला आहे. कथासंग्रहाचे शीर्षक आणि अन्वर हुसेन यांचे लक्षवेधी मुखपृष्ठ यामुळे कथांविषयीची उत्सुकता वाढते. ‘उर्वरित समाजाने दखल न घेतलेल्या अतिसामान्यांच्या चिरंतन दु:खावर ही हलकीशी फुंकर’ ही अर्पणपत्रिका म्हणजे तर या वेशीबाहेरच्या कथानकांचा जणू दरवाजाच.

सतत वेगळ्या विषयांचा वेध घेणाऱ्या विजय खाडिलकरांनी कथा, कादंबरी, नाटक, कविता, इ. साहित्यप्रकारांत मुशाफिरी केलेली आहे. ‘खिडक्या’, ‘लाल बत्ती’, ‘बंद दरवाजा’, ‘परिक्रमा’, ‘सरसरती बारीक सर’ इत्यादी कथासंग्रह त्यांच्या नावावर आहेत.

‘नुक्कड’मधल्या कथांचा घाट वेगळा आहे. त्यात ठरावीक रूढ कथांप्रमाणे नायक-नायिका वा विविध पात्रे नाहीत. एखाद्या वस्तीवरून कॅमेरा फिरावा नि त्यात बारकाईने सारे तपशील टिपले जावेत, तशा या कथा वाचकाला त्या-त्या वातावरणाचे दर्शन घडवतात. कथावाड्.मयात दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात- कथावस्तू आणि कलावस्तू. कथावस्तू म्हणजे कथेचे बीज. परिघाबाहेरचे जग हीच ‘नुक्कड’ची कथावस्तू आहे. कलावस्तू म्हणजे कथेची कलात्मक मांडणी, भाषा, शैली इत्यादी. कलावस्तू कशी आहे, हे अनुभवण्यासाठी प्रत्यक्ष कथाच वाचायला हव्यात. हे केवळ मनोरंजन करणारे साहित्य नाही, तर दाहक सामाजिक वास्तव आहे. आपणही या वास्तवाचा भाग असल्यानं या कथा आपल्याला अस्वस्थ करून टाकतात. माणसाच्या आयुष्यातलं बकालपण, ओकंबोकं, रखरखीत वास्तव विचारप्रवृत्त करतं.

शहरी व हल्ली गावातही पोहोचलेल्या श्रीमंती, चंगळवादी झगमगाटापलीकडे गल्लीबोळ, वाडय़ा-पाडय़ांमध्ये आणि नागर वस्त्यांमध्ये हातातोंडाशी गाठ बांधताना काय काय घडत असते, याचे चित्र-प्रवाही कथन करणाऱ्या ११ कथांचे हे पुस्तक आहे. बदलत्या काळाची नि त्यानुसार येणाऱ्या संदर्भाची सुसंगत सलगता त्यात आहे. पांढरपेशा समाजाचा डोलारा ज्या पायाभूत श्रमांवर उभारलेला असतो, त्या जगाचे, श्रमिकांच्या जगण्याचे वास्तवदर्शी चित्रण कथांमध्ये आहे. धनदांडग्या बिल्डरच्या वक्रदृष्टीमुळे विस्थापित होणारे टांगेवाले, गरीब मुस्लीम समाजातील जगण्याचे तपशील, ऊस-तोडणी कामगारांचे भटके जीवन, शौचालय-सफाई करणाऱ्यांचे दिनचक्र, गरीब पारशी-गोवन वस्तीतले जीवनदर्शन, जुनाट पडक्या किल्ल्यावर मक्याची कणसे विकणाऱ्या मुश्ताकचा जीवनसंघर्ष.. अशा विषयांना कवेत घेणाऱ्या या कथा आहेत. पानवाले, चहावाले, भाजीविक्रेते, अंडी नि मासेवाली, बिगारी, गवंडी, मुकादम, विडीशॉप वा दारूचा गुत्ता चालवणारा, पेट्रोल पंपावर काम करणारा, सायकल- रिक्षा ओढणारे, तृतीयपंथी, धुणीभांडी करणाऱ्या, शरीरविक्रय करणाऱ्या महिला, ब्युटी पार्लरमध्ये काम करणाऱ्या मुली.. अशी कितीतरी पात्रे वेगवेगळ्या कथांमध्ये येतात. ती जिवंत होतात. ही सगळी जगाच्या पाठीवर जगण्यासाठी संघर्ष करणारी वास्तवदर्शी पात्रे आहेत. गरिबी, दारिद्रय़, अज्ञान, अंधश्रद्धा, कष्ट, उपेक्षा यांना उरावर घेऊन धावणारी ही माणसे. शहरीकरण, तथाकथित प्रगती, जागतिकीकरण यांच्या चक्रव्यूहात भरडणारी, वर्तमानात जगणारी ही माणसे. काम, क्रोध, मद, मोह, लोभ, मत्सर यांचा मुक्त आविष्कार करणारी रांगडी, अनवट चालीची, पण अस्सल आणि खरी माणसे आहेत ही!

सर्व कथांमधून प्रकर्षांने जाणवते ती संवेदनशील लेखकाची तीव्र आणि तीक्ष्ण निरीक्षणशक्ती. शब्द म्हणजे जणू बारकावे टिपणारे कॅमेरे आहेत. हुबेहूब वातावरण-निर्मिती, वास्तूंची चपखल आणि चित्रदर्शी वर्णनं ते प्रसंगी लाँग शॉटप्रमाणेच क्लोज अपनेही टिपतात आणि ड्रोनमधून विहंगावलोकनही करतात. ग्रामीण मराठी, हिंदी, गुजराती, गोवन, कोंकणी, बांगला, बंबय्या, दख्खनी, उर्दू, बाणकोटी, सोलापुरी इत्यादी भाषा/बोलींचे अतिशय समर्पक उपयोजन लेखकानं केलं आहे.

जागतिकीकरण, खाजगीकरण, आधुनिक काळातील विकासाच्या संकल्पना यांमुळे भौतिक सुखसोयीच्या, चैनीच्या वस्तू, सेवा उपलब्ध झालेल्या खऱ्या पण त्याचे लाभार्थी आहेत धनदांडगे लोक. मात्र त्यांच्यासाठी राबणारा श्रमिकवर्ग मात्र फाटकाच राहिला. या श्रमिकांचं जगणं मांडणाऱ्या अनेक साहित्यकृती ओघानेच निर्माण झाल्या. त्यात माणसं आली. या माणसांसोबतच त्यांचं आयुष्य जिथून सुरू होतं आणि संपतं- त्या परिसराचं, वस्त्यांचं आणि तिथल्या सामूहिक जीवनाचं चित्रण करणं सामाजिक दृष्टीनेही महत्त्वाचं आहे. खाडिलकरांनी ते आपल्या कथांमधून अतिशय संवेदनशीलपणे केलं आहे. रोजच्या जगण्यात आपण पावलोपावली श्रमिकांवर अवलंबून असतो. मात्र ते कुठे राहतात, काय खातात, कोणती भाषा बोलतात, त्यांच्या गरजा काय आहेत, उत्पन्न किती.. अशा अनेक बाबींपासून आपण अनभिज्ञ असतो. त्यांच्या जीवनात डोकावून पाहण्यासाठी आपण आवर्जून प्रयत्न करत नाही. त्यामुळेही सार्वजनिक ठिकाणी श्रमिकांना असंवेदनशील वागणूक दिली जाते. या कथा श्रमिकांकडे संवेदनशीलपणे पाहण्याचा दृष्टिकोन देतात.

शिक्षणाचे लोकशाहीकरण झाल्याने वाचकांचे व अभिव्यक्तीचेही लोकशाहीकरण झाले आहे. वाचन-संस्कृतीचा अक्ष

परिघाबाहेर व ग्रामीण संवेदनांकडे वळत असतानाच्या काळात हा कथासंग्रह येणे ही महत्त्वाची घटना आहे.

‘ नुक्कड ’ – विजय खाडिलकर,

समकालीन प्रकाशन,

पृष्ठे –  १२८, किंमत- १५० रुपये.

ashleshamahajan@rediffmail.com