न्या. नरेंद्र चपळगावकर हे जुन्या पिढीतील सामाजिक जाणिवा आणि संवेदनशील मन असलेले न्यायमूर्ती आहेत. आधी वकिली आणि उच्च न्यायालयात न्यायमूर्तीपदाची जबाबदारी पार पाडत असताना दीर्घकाळ त्यांचा न्यायव्यवस्थेशी संबंध आला. सामाजिक व्यवस्थेत अन्यायाच्या चक्रात अडकलेली व्यक्ती न्याय मागण्यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावते. वकील आणि न्यायमूर्ती या नात्याने या व्यक्तींची ओळख होते, तेव्हा काही वेळा न उलगडलेल्या किंवा पडद्याआड राहिलेल्या काही घटना व प्रसंग हे बरेच काही सांगून जातात. ते सामाजिक प्रश्न कोणते आहेत आणि जीवनातील धगधगते वास्तव काय आहे, याची जाणीव करून देतात. अशा काही प्रसंगांना न्या. चपळगावकर यांनी कथांच्या स्वरूपात गुंफले आहे. या कथा काही प्रमाणात काल्पनिक असल्या तरी त्यातून जिवंत अनुभवांचे चित्रच नेत्रपटलांपुढे उभे राहते.
उदरनिर्वाहाचे एकुलते एक साधन उरलेल्या रखमाबाईच्या जमिनीच्या तुकडय़ावर गावातील सरपंचाचीही नजर होती. या गरीब विधवा महिलेला वकिलीचे पैसेही न घेता मदत करण्याचा प्रयत्न माजी न्या. चपळगावकर यांनी केला, पण ती ‘कसायां’च्या जाळ्यात कशी अडकली, याचे हृदयस्पर्शी चित्रण ‘एका गायीची गोष्ट’मध्ये आहे. ‘कॅप्टन’ हाही प्रामाणिक रिक्षाचालक. एका दिवाणी न्यायाधीशांच्या मुलीला रिक्षातून सिनेमाला नेल्यावर तिच्या एका कानातील सोन्याचा डूल हरवला आणि त्याची रवानगी तुरुंगात झाली. मात्र हा डूल काही दिवसांनी सापडला आणि तो सुटला. पण कॅप्टनमधील संवेदनशील माणसाचा आनंदच हिरावला गेला. ‘नातं’ ही कथाही तितकीच मनाला भिडणारी आहे. आपली मालमत्ता फुंकून टाकलेल्या रामच्या कुटुंबीयांचे हाल पाहवत नाहीत, यासाठी िपपळनेरचे हणमंतराव पाटील यांचा जीव तुटतो आणि दुसरा मुलगा शंकरकडून ते आपल्याच जमिनीचा तुकडा मागतात. पण त्याचीही विल्हेवाट लागेल, यासाठी वडिलांना नकार दिल्याने शंकरराव न्यायालयात दावा दाखल करतात. वडील आणि मुलगा न्यायालयात वादी-प्रतिवादी होतात व भांडतात. पण सुनावणी सुरू होण्याआधी व नंतर त्यांच्यातील नाते मात्र कायम असते. भाकरतुकडा एकत्र खातात आणि एकाच बैलगाडीतून घरी जातात. हे कसे असे विचारता, हणमंतरावांची सूनही सांगते, ‘भांडण भांडणाच्या जागी, त्यामुळे नातं थोडंच तुटतं?’ बिहारीमलकडून पैसे वसूल करण्यासाठी लढवलेली ‘शक्कल’ आणि व्यापाऱ्याचा मुलगा सुरेश याच्या गाडीखाली अपघात झालेल्या लहान मुलीला आयुष्यात उभे राहण्यासाठी त्याच्या वडिलांकडून मोठी आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी काय करावे लागले, हे ‘देणं’ या कथेतून सांगितले आहे. ‘तडजोड’ ही कथाही विलक्षण हेलावून टाकणारी आहे. पत्नीची छेड काढली, म्हणून नामदेवने पार्वतीच्या पतीचा खून केला. घटनेची साक्षीदार असलेल्या पार्वतीपुढे जीवन जगण्याचा प्रश्न होता. नामदेवविरोधात साक्ष द्यायची की उर्वरित आयुष्यासाठी ‘तडजोड’ करायची, हा तिच्यापुढे प्रश्न होता. शेवटी ती नामदेवच्या धाकटय़ा भावाचा आश्रय घेते.
अशा अनेक कथांमधून न्यायव्यवस्थेचे अपुरेपण आणि तिचा होणारा गैरवापरही दिसतो, तर माणूसपण जागे ठेवणाऱ्या आणि व्यवस्थेपेक्षा न्यायाला महत्त्व देणाऱ्यांचेही दर्शन होते. न्यायव्यवस्थेच्या चष्म्यातून समाजमनाचा डोळसपणे घेतलेला वेध या कथांमधून डोकावतो. त्यामुळे त्या काल्पनिकतेपेक्षा वास्तवतेकडे झुकणाऱ्या जाणवतात. त्यामुळे त्या सहजपणे भावतात आणि संवेदनाशील मनाला अस्वस्थही करतात.     
‘न्यायाच्या गोष्टी’ – नरेंद्र चपळगावकर, पद्मगंधा प्रकाशन, पुणे, पृष्ठे – १२८, मूल्य – १२५ रुपये.