आपण आपल्या आजूबाजूच्या प्रचंड कोलाहलात, दैनंदिन रामरगाडय़ात जगत असतो.. पण यापलीकडे एक वेगळीच दुनिया आहे. ते जग आहे उत्कट भावनांचं! ते जग आहे भरजरी दु:खाचं! अत्यंत कोमल, अनुरागी तरलतम भावनेचं. अशा खऱ्या- खुऱ्या भावनांचा लखलखीत, जाळत जाणारा घोट घेण्याची तयारी असलेल्यांनाच या दुनियेत प्रवेश आहे. आणि अशा ‘वेडय़ांच्या’ दुनियेचा बेताज बादशहा आहे मदनमोहन! आपल्या मनाच्या आतल्या कप्प्यातल्या नसानसांना हलवणारं, आपल्या स्वत:च्या दु:खालाही समृद्ध करणारं, कारुण्यातलं भावनेचं वैभव जाणवून देणारं संगीत म्हणजे मदनमोहन! ज्यांना दुसऱ्यांच्या दु:खानं रडू येत नाही, कुठल्याही अनुभवाने ज्यांची भावनिक तटस्थता ढळत नाही.. थोडक्यात पाडगावकरांच्या ‘यांचं असं का होतं कळत नाही’ छाप मंडळींनी मदनमोहनच्या वाटेला जाऊ नये.. कारण शब्दाशब्दातून नव्हे, अक्षराअक्षरातून आवेगानं फुटून बाहेर येणारी ती तडफड, ती उत्कटता समजून घ्यायला, पेलायला ऐकणाऱ्याच्या मनाची संवेदनाच जिवंत हवी. इथे गरज त्या तरलतेची आहे, पांडित्याची नव्हे..

२५ जून १९२४ ला बगदाद शहरात मदनमोहननं जन्म घेतला. वडील ‘रायबहादूर’ चुनीलाल हे त्याकाळी ब्रिटिशांच्या पोलीस खात्यात कमिशनर होते आणि नंतर भारतात येऊन बॉम्बे टॉकिजमध्ये काही काळ काम करून नंतर ‘फिल्मीस्तान’ संस्थेचे भागीदार झाले. खुद्द मदनमोहन काही काळ सन्यात होते. असं समजतं की, ‘युनियन जॅक’ला उशिरा सलाम केल्यामुळे ‘लेफ्टनंट’चं प्रमोशन हुकलं आणि मदनमोहनने सन्यालाच रामराम ठोकला. लखनौ आकाशवाणीत िहदी संगीत प्रमुख म्हणून काम करताना बेगम अख्तर, मजाज लखनवीसारख्या गझल क्षेत्रातल्या दिग्गजांचा सहवास मिळाला. पहिला चित्रपट ‘आँखे’ (१९५०) साठी पहिला ‘ब्रेक’ देवेन्द्र गोयल या निर्मात्याने दिला. ‘आँखे’मधली ‘मोरी अटरिया पे कागा बोले’ किंवा ‘प्रीत लगाकर मंने ये फल पाया’ यासारखी गाणी गाजली. पण त्यांची लताबाईंच्या दिव्य सुरांशी ओळख यापूर्वीच गुलाम हैदर साहेबांच्या एका ध्वनिमुद्रण प्रसंगी झाली होती.  लताबाईंबरोबर एक गाणं मदनजी गायले. गाणं बहीण-भावाचं होतं. आणि या दोघांनी जन्मभर नातंही बहीण-भावाचं निभावलंही. पण गंमत म्हणजे इतकी छान ओळख होऊन, ‘आपण माझ्यासाठी गा’ अशी मदनजींनी विनंती करूनही काही कारणाने लताबाई ‘आँखे’साठी गायल्याच नाहीत. समज-गरसमजाच्या धुक्यातून वाट काढत नंतर मात्र दोघांनी इतिहास घडवला हे सत्य आहे. लताबाईंना वजा केलं तर मदनमोहन उरत नाही, असं अनेक जण म्हणतात.. पण म्हणून ‘संगीतकार’ या नात्यानं त्यांचा असलेला उच्च दर्जा कमी महत्त्वाचा ठरत नाही. मदनजींच्या चालींना लताबाईंनी मोजता येणार नाही एवढय़ा उंचीवर नेऊन ठेवलं. पण त्या अद्वितीय रचना ज्या विलक्षण प्रतिभेतून साकारल्या, ती प्रतिभा आपल्याला मानावीच लागते.

मदनमोहनना अनेकदा ‘गझलसम्राट’ म्हटलं जातं. काळाला पुरून उरणाऱ्या अनेक गझला मदनजींनी दिल्या, हे जरी सत्य असलं तरी ही गाणी बघा. यातली एकही ‘गझल’ नाही, तरीही रचना म्हणून ही गाणी अत्युच्च दर्जाची, मदनमोहनचा प्रचंड आवाका सिद्ध करणारी आहेत. यात आपण रागसंगीतावर आधारित गाणी विचारात घेत नाही आहोत. ‘नना बरसे रिमझिम’, ‘शोख नजर की बिजलियाँ’, ‘ए दिल मुझे बता दे’, ‘दिल ढूँढता है’, ‘आपकी नजरोंने समझा’, ‘रंग और नूर की’, साँवरी सूरत मन भायी’.. अशी अनेक गाणी ‘गझल’ नसूनही प्रचंड ताकदीची, उत्कृष्ट ‘कंपोझिशन्स’ आहेत.. पण अनेकदा उत्कृष्ट वजनदार काव्य हे गाण्यांपेक्षा गझलमध्ये जास्त प्रभावीरीत्या मिळत असल्याने मदनमोहनच्या सांगीतिक मानसिकतेला हा ‘फॉर्म’ जास्त मानवला असावा..

मदनमोहनच्या गाण्यांना असं एक चिरस्थायी अस्तित्व आहे की, चित्रपट न पाहता ते गाणं तुम्ही ‘अनुभवू’ शकता. अनेकदा तर गाणं आधी ऐकलं जातं, खूप आवडतं, कारण त्याच्या रचनेतली कारागिरी, त्या रचनेचा डौल, शब्द, काव्य, आपल्याला भिडते आणि ती भावना आपली स्वत:ची असल्यामुळे पडद्यावर बघायची गरजच उरत नाही. (क्वचित बघितल्यावर निराशासुद्धा पदरी पडते!) हे ‘भाग्य’ खूप कमी गाण्यांना असतं. तपशील बदलतात.. भावना

चिरस्थायी असतात.

मदनमोहन हा उत्कृष्ट ‘कंपोजर’ का मानायचा? तर त्याच्या रचनेला एक सुंदर ‘आकार’ आहे.. ध्रुवपद, अंतरा, ध्रुवपदाला येऊन मिळणारी अंतऱ्याची ओळ या सर्वाना एक सुंदर लय, सुखद अशी जोडणी (linkage) आहे. त्याच्या ध्रुवपदात एक तरी अशी विलक्षण ‘जागा’ असते की, ज्यावर ती रचना ‘तोलली’ जाते. बऱ्याच वेळा एखादं अक्षर लांबवलं जातं.. त्यावर एक सुरेख ‘ठहराव’ किंवा ‘sustain’  असतो. बऱ्याच गाण्यांत एखाद्याच्या गळ्यात, एखाद्याच्या गळ्याच्या फिरतीची परीक्षा बघणारी, सुरेलपणाचा कस लागणारी अशी एक ‘हरकत’ असते. अगदी सुरुवातीच्या काळातलं ‘सांवरी सूरत मन भायी’ (अदा) सारखं गाणं बघा. दुसऱ्या ओळीत, ‘अरमानोंने ली अंगडाई’ म्हणताना ‘अंगडाई’ हा शब्द असा काही ‘फिरवलाय’ आणि त्याला ‘सांवरी सूरत’ला असा काही आणून सोडलाय की ती अंगडाई पण जिवंत होते, आणि त्या बुद्धीला, प्रतिभेला आपण शरण जातो. ‘मेरे पिया से कोई जाके कहदे’ (आशियाना) हे असंच एक गाणं.. तो ‘कोईऽऽ’ मधला ‘ई’ कार म्हणजे त्या गाण्याचं वैभव.. ‘नना बरसे रिमझिम’ (वह कौन थी) मधली ‘पिया तोरे आवन की आस’ मधली ‘आऽऽस’ किती स्वर समृद्घ! त्यात लयीचा खेळही आला (१,२ – १,२, ३, ४, दुप्पट लय), स्वरांची पखरणही आली आणि ‘आस’ अधिकच गहिरी झाली. ‘बेताब दिलकी तमन्ना यही है’ (हँसते जख्म) म्हणताना ‘बेताऽऽऽब’ असं लांबवल्यामुळे, ते मन कसं आवरण्याच्या पलीकडे गेलंय हे वेगळं सांगायलाच लागलं नाही.. ‘जरासी आहट होती है’ (हकीकत) मध्ये, ‘तो दिल सोचता है’ यात ‘सोचता’ वरची जागा अशीच खोल, विचारपूर्वक केलेली, ‘त्या’ ची वाट बघताना येणाऱ्या उलटसुलट विचार आंदोलनांना स्पष्ट करणारी. ‘न तुम बेवफा हो’ (एक कली मुस्कायी) ही ओळ दुसऱ्या वेळी घेताना ‘फा’ अक्षरावर जे काही घडतं, ते या दुनियेतलं नाही.. ‘बदली से निकला है चाँद’ (संजोग) म्हणताना ‘निकला’ मधल्या ‘क’ ला दिलेला हलकासा खटका आठवा.. चाँद का ‘निकलना’ सही मायनेमे सामने आता है! ‘मेरी वीणा तुम बिन रोए’ (देख कबीरा रोया) मध्ये ‘वीणा’ शब्दावर सुंदर जागा आहेच, पण ‘सजना, सजना, सजना’ ही आर्त हाक ज्या पद्धतीने ‘चढवत’ नेली आहे, ते केवळ एक श्रेष्ठ ‘रचनाकार’च करू शकतो. मदनमोहनना तिसऱ्या दर्जाचे सिनेमे मिळणं, किंवा लोकप्रिय अभिनेत्यांवर गाणी चित्रित न होणं, अ‍ॅवॉर्ड्स मिळणं न मिळणं यापेक्षा त्यांच्या चालींचं हे चिरस्थायी अस्तित्व, चालींची समृद्धता जास्त महत्त्वाची वाटते.. कारण सगळ्या लौकिकाच्या पलीकडच्या या चाली आहेत..

गझल बांधतानासुद्धा मदनमोहनची स्वत:ची रचना शैली कशी प्रत्ययाला येते, पाहा. गझलचा ‘फॉर्म’ हा दोन ओळींच्या शेराचा आहे. ‘यूँ हसरतों के दाग’ (अदालत) ही गझल या दृष्टीने पाहा. ‘घरसे चले थे हम तो खुशकी तलाश में’ यानंतरची ‘गम राह में’ ही ओळ ध्रुवपदाच्या चालीची आहे.. पण ‘खुशकी तलाशमें’ या शब्दांची चाल त्या दिशेने वळ(व)ली, तर दोन्ही वेळा वेगळ्या पद्धतीने गाऊन ‘गम राह मे’ या ओळीला सुंदरपणे जोडली जाते, इथेच संगीतकाराची बुद्धी पणाला लागत असते. ‘मुझे गम भी उनका अजीज है, के उन्ही की दी हुई चीज है’ गाताना ‘के उन्हीकी’ ही ओळ अवरोहात खाली आणण्याचं कसं सुचलं असावं! ‘है इसीमे प्यार की आबरू’ (अनपढ)..

मदनमोहनच्या ‘हरकती’ किंवा खास जागा हा एक सूक्ष्म विचाराचा विषय आहे. ‘वो चुप रहे तो मेरे दिल के दाग जलते है’ (जहाँआरा) या गाण्यात, ‘वो बात करले तो बुझते चराग जलते है’ मध्ये, बुझ‘ते’ आणि च‘रा’ग वरच्या जागा, गळा विलक्षण सुरेल आणि धारदार फिरतीचा असला तरच घेण्याचा प्रयत्न करावा.. अन्यथा कपाळमोक्ष ठरलेला आणि नुसती स्वच्छ जागा येऊनही शून्य उपयोग.. त्यात ओतलेला उमाळा, आवेग.. या पुढच्या गोष्टींचं काय? अगदी याच घाटाची जागा, ‘मेरी आँखोसे कोई नींद लिये जाता है’ (पूजा के फूल) या गाण्यात आहे. ‘दूरसे प्यार का पगाम दिये जाता है’ या ओळीत ‘पगाम’ शब्दावर अशीच मुश्कील जागा आहे. ‘चराग’ आणि ‘पगाम’ या दोन्ही जागांचा

घाट सारखाच..

बंदिशीच्या आकाराचं विलक्षण भान मदनमोहनच्या बांधणीत दिसतं. अंतरा बांधताना मदनमोहन स्वत:च्या सौंदर्यदृष्टीचा पुरेपूर उपयोग करताना दिसतो. ‘जरासी आहट’चा अंतरा यासाठी जरूर ऐकावा.. ‘छुपके सीने में..’ यानंतर छोटासा आलाप का यावा? तोसुद्धा दोन्ही अंतऱ्यात वेगवेगळा.. तर, ‘छुपके सीने में कोई जैसे सदा देता है, शाम से पहले दिया दिल का जला देता है,’ या ओळी मंद्र सप्तकात (खाली) जातात.. ‘है उसीकी ये सदा, है उसीकी ये अदा..’ या ओळी, ‘अदा’ वर एक सुंदर जागा घेऊन ‘कहीं ये वो तो नहीं’.. या ओळींना मिळतात. ही एक सुंदर ‘रचना’ तयार होते. ध्रुवपदाला अशा रीतीने मिळणारी ओळ ‘मं तो तुम संग’ (मनमौजी) या गाण्यातसुद्घा आहे. ‘क्यूं आंधी में दीप जलाया’ या ओळीचा शेवट ज्या स्वरावर होतो, त्याच स्वरावरून ‘मं तो तुम संग’ ही ओळ सुरू होते.. अशा चाली ऐकणाऱ्याला बांधून ठेवू शकतात आणि मनात घट्ट रुजतात. आजकाल आपण चालीची अशी घट्ट वीण विसरत चाललो आहोत. भरकटणारे अंतरे, सांगीतिक बुद्धीला न पटणाऱ्या रचना ऐकताना हे प्रकर्षांने जाणवतं..        (क्रमश: )