22 September 2020

News Flash

‘जो वादा किया वो निभाना पडेगा’

मागच्या लेखात 'रहे ना रहे हम' (मजरूह-'ममता')बद्दल लिहिल्यावर असंख्य प्रतिक्रिया आल्या. त्यावरून हे गाणं खरोखरच ऐकणाऱ्याला लौकिकापासून दूर नेणारं, दैवी असल्याचं पुन्हा एकदा जाणवलं. रोशनच्या

| June 22, 2014 01:01 am

मागच्या लेखात ‘रहे ना रहे हम’ (मजरूह-‘ममता’)बद्दल लिहिल्यावर असंख्य प्रतिक्रिया आल्या. त्यावरून हे गाणं खरोखरच ऐकणाऱ्याला लौकिकापासून दूर नेणारं, दैवी असल्याचं पुन्हा एकदा जाणवलं. रोशनच्या आणखीनही काही मास्टरपीसेसची चर्चा करू या.
‘किसी नजर का मस्त इशारा’ (कैफ इरफानी- ‘रागरंग’)
हे गाणं त्या काळाच्या (१९५२) खूप पुढे होतं. ‘जिंदगी’वरची हरकत खूप सूक्ष्म.. ‘क्या  कश्तीयाँ रहेगी लहरों से होशियार’ म्हणताना त्या होडीचं लाटांवर वर-खाली झुलणं त्या स्वरांत कसं उमटलंय, ते ऐका. अंतऱ्यानंतर गाणं दादऱ्यातून केरव्यात जातं. दुसऱ्या कडव्यात ‘जीना उसी का है’ या ओळीच्या सोबतीचा व्हायोलिनचा पीस, स्पॅनिश गिटारचा ऱ्हिदम ऐकण्यासारखा.. यानंतर पुन्हा गाणं हलकेच दादऱ्याच्या ठेक्यावर येतं. रोशनला श्रेष्ठ कम्पोजर ठरवणारी आणखी एक गोष्ट या गाण्यात आहे. अंतऱ्याची शेवटची ओळ ध्रुवपदासारखीच बांधण्याचा (सोपा) पर्याय असताना ‘दरीया का एक बहता किनारा’ या ओळीला वेगळी चाल देण्यात रोशनचं कौशल्य दिसतं.
‘जो वादा किया वो निभाना पडेगा’ (साहिर- ‘ताजमहल’)
जगातल्या अप्रतिम द्वंद्वगीतांमधलं मुकुटमणी असणारं हे गाणं. यात रोशनची एक खासियत दिसून येते. त्याच्या द्वंद्वगीतात नायक-नायिका वेगवेगळे अंतरे गातात. समांतर पातळ्यांवर! तरीसुद्धा ते द्वंद्वगीत एकमेकांत मिसळून जाते. सुंदर व्हायोलिन्स, फ्लूट, सतार यांचे ूे्रुल्लं३्रल्ल, चुस्त ऱ्हिदम.. रफीच्या अंतऱ्यानंतर कुठलाही म्युझिक पीस न येता थेट लताबाईंची एन्ट्री.. आणि तिसरा अंतरा दोघांनी एकत्र म्हणणं.. सगळंच खूप प्रवाही आणि उत्कट..
‘पाँव छू लेने दो’ (साहिर- ‘ताजमहल’)
किती मुलायम गाणं. त्या पाकळ्यांसारखंच. ही फुलं तुझ्या पायांना स्पर्शण्यासाठी बघ किती अधीर झालीत. पण तू पसरलेल्या या फुलांच्या नाजूक पखरणीवर मी पाय देऊ? तुझ्या प्रेमाचा अपमान नाही का होणार? या अत्युच्च शायरीला आणि चालीला तोड नाहीच. ‘शर्म हमसे भी करोगी’ या ओळीत रफीसाहेबांनी जो अत्यंत विशिष्ट, खासगी आवाज लावलाय- खूप तरल.. की काळीज थरारतं. ‘शर्म हमसे’नंतर रफीचा जो पॉज आहे, तिथे जणू शेकडो सतारी झंकारून उठतात. खरं तर पडद्यावर अभिनय करण्यासाठी काही शिल्लकच राहत नाही. या गाण्यात लताबाईंचा जो आवाज लागलाय (लावलाय?), तो नेहमीपेक्षा तुम्हाला वेगळा, जास्त पातळ वाटत नाही का? एक-दोन जागी तर त्याला एक प्रकारचा ब्रेक आहे. खूप लोभसवाणा. विशेषत: ‘होगी’वरची जागा ऐकताना हे जाणवतं.
‘दिल जो न कह सका..’ (मजरूह- ‘भीगी रात’)
मला हे गाणं आवडतं ते त्याच्या अप्रतिम सुंदर बांधणीसाठी. स्वररचनेला ‘लॉजिक’ असतं का? जरूर असतं. या गाण्याचा अंतरा यादृष्टीने ऐका..
‘नगमा सा कोई जाग उठा बदन में
झनकार की सी थरथरी है तन में
मुबारक तुम्हें किसी की लरजती सी बाहो में
रहने की रात आयी..’
यात गमपनीसाऽऽऽ या अंतऱ्याच्या ओळीतून दुसरी ओळ शुद्ध निषादावर संपते. तिलाच पुन्हा सुंदर वळवून कोमल निषादाचा स्पर्श करत गंधारावर आणलंय. आणि पुन्हा ‘मुबारक तुम्हें’ या ओळी इतक्या सुंदर रीतीने धवतावर जाऊन, पुन्हा षड्जावर येऊन, सागरेरे रेमगग म गरे सा या ‘रात आयी’वरच्या फ्रेजला जुळवल्या आहेत. त्यामुळे एक सुंदर गोफ विणल्यासारखा हा अंतरा वाटतो. ‘रात आयी’ या ओळीच्या बरोबरीनं जे मेंडोलीन जातं, ते केवळ सुंदर. काळजातलं तुफान रफीच्या आवाजाइतकंच त्या व्हायोलिन्सने, कोंगो- ढोलकने तोलून धरलंय. हेच गाणं लताबाई म्हणतात तेव्हा ‘कहने की रात आई’ या ओळी एका श्वासात आणि वेगळ्या अंदाजात गातात.
‘ओह रे ताल मिले नदी के जल में’ (इंदीवर- ‘अनोखी रात’)
गूढ शब्द. तशीच गूढ चाल. त्यात भर घालणारा हुंकार देणारा कोरस. मुकेशचा यातला निरागस, अंतर्मुख करणारा आवाज आणि बासरी यांचा जणू संवाद. गाणं सुरू झाल्याबरोबर बासरीचा टिपेचा सूर सोबत करतो- ते अप्रतिम.
‘सूरज को धरती तरसे, धरती को चंद्रमा
पानी में सीप जैसे प्यासी हर आत्मा.
मितवारे, बूँद छुपी किस बादल में
कोई जाने ना..’
किती अर्थगर्भ शब्द.. धरतीला सूर्याची आस, चंद्राला धरतीची.. या सगळ्यात, पाण्यात राहून िशपला जसा आतून कोरडाच, तसे अतृप्त आपण.. आणि खरंच, पाण्याचा थेंब नेमका कुठला अभ्र घेऊन आला? या सगळ्याचं अंतिमीि२३्रल्लं३्रल्ल काय? बलांच्या गळ्यांतल्या घुंगरांचा आवाज कुठल्या कुठे घेऊन जातो.. ‘ओह रे ताल’पासून कोमल रिषभ, गंधाराच्या चाललेल्या संवादात ‘कोई जाने ना’ला शुद्ध गंधार चमकून जातो. वा! रोशनसारखे संगीतकार स्वत:च्या प्रतिभेवरच न विसंबता किती मेहनतीने गाणी करत होते, हे लक्षात येतं.
‘स्वप्न झडे फूल से मीत चुभे शूल से’ (गोपाळदास सक्सेना (नीरज)- ‘नई उमर की नई फसल’)
‘स्वप्न झडे फूल से मीत चुभे शूल से
लुट गए सिंघार सभी बाग के बबूल से
और हम खडे खडे बहार देखते रहे
कारवाँ गुजर गया गुबार देखते रहे’
मूर्तिमंत निराशा.. स्वप्नभंग.. फक्त आणि फक्त वैफल्य.. या सगळ्याचा अर्क असलेलं हे गाणं. मूळची ‘नीरज’ची ही कविता. कोमल रिषभ असा काही काळजात घुसतो. चालीची ताकद अफाट आहे. आणि हे गाणं ज्याचं त्यांनी स्वत:च्या अनुभवांचा संदर्भ घेत ऐकायचं.. प्रत्येकाची एक दुखती रग.. मर्म असतं. तिथलीच खपली काढणारं हे गाणं आहे. उद्ध्वस्त होण्याच्या उत्सवाचं गाणं. बुडून जायचं त्या असहाय भावनांमध्ये. ‘और हम झुके झुके, मोडपर रूके रूके.. उम्र की चढाव का उतार देखते रहे..’ चिमटीतून वाळूसारखं निसटून जाणारं आयुष्य थोपवणार तरी कसं? त्या धुरळ्याकडे हताशपणे बघत राहणं आपल्या हाती आहे. ‘गुबार देखते रहे..’ अत्यंत अस्वस्थ करणारं हे गाणं चित्रपटात कोणत्या पाश्र्वभूमीला आहे, याचा शोध घेण्यासाठी हा चित्रपट पाहिला. निवडणुकीत अवघ्या एका मताने पराभव झाल्यावर नायकाला येणाऱ्या नराश्याच्या पाश्र्वभूमीवर हे गाणं आहे. पण या कवितेचा, या स्वरांचा आवाका त्याच्या कितीतरी पटीने मोठा आहे. म्हणूनच हे गाणं कुठल्याही अशा कथेसंदर्भापलीकडचे आहे, हे नक्की. एकदा ऐकलं की या गाण्यातून बाहेर यायला फार कष्ट पडतात..
‘संसार से भागे फिरते हो’ (साहिर- ‘चित्रलेखा’)
अत्यंत भेदक, तीव्र आणि अविचारी वैराग्याचा पोकळपणा दाखवून देणारे साहिरचे शब्द.. ‘ये भोग भी एक तपस्या है, तुम त्याग के मारे क्या जानो’ किंवा ‘ये पाप है क्या ये पुण्य है, क्या रीतों पर धर्म की लहरें है’ म्हणताना वरचा षड्ज असा बंदुकीच्या गोळीसारखा लागलाय, की त्या विचारातला थेटपणा, स्पष्टपणा खणखणीतपणे भिडतो. ‘भगवान को तुम क्या पाओगे’ म्हणताना ‘क्या’वर जो उपहास आहे तो पुन: पुन्हा ऐकण्यासारखा.
‘कभी तो मिलेगी, कहीं तो मिलेगी’ (मजरूह- ‘आरती’)
‘वो दिन दूर नहीं.. जब जिन्दगी मौत पर हँसेगी’ म्हणत उंच स्वरात ठामपणे आशावाद व्यक्त करणारं अफाट सकारात्मक गाणं. सगळी मरगळ क्षणार्धात पळवून लावणारं काही या गाण्यात आहे. ‘मली न हो, धुंधली पडे ना देख नजर की चाँदनी’मध्ये ‘पडे ना’चा खास उच्चार ऐकायचा. खूप सांगितलंय त्यात. डोळ्यांतली चमक, तुझ्यातली ठिणगी विझू देऊ नकोस. मग जग तुझंच आहे.. ‘राही’चा स्वर लांबवणं, ढोलकचा चुस्त ठेका, ‘डाले हुए है रात की चादर’ म्हणताना दरीत घुमल्यासारखा आसमंत व्यापून उरणारा आवाज..
‘ना तो कारवाँ की तलाश है, ये इश्क इश्क है’ (साहिर- ‘बरसात की रात’)
खरं तर ‘ये इश्क इश्क है’ ही नुसरत फते अलींचे वडील मुबारक अली यांची गाजलेली कव्वाली. पण त्याआधीची ‘ना तो कारवाँ की तलाश है’ हे साहिरचं लिहिलेलं अप्रतिम काव्य आहे आणि रोशनचं स्वत:चं सृजन आहे. ‘तेरा इश्क मं कैसे छोड दूँ, मेरे उम्रभर की तलाश है..’ म्हणत हे गाणं ‘ये इश्क इश्क है’ला येऊन जुळतं.. पुढं ही कव्वाली इतक्या चरमिबदूपर्यंत जाते, की ‘इंतहा ये है के बंदे को खुदा करता है इश्क’मध्ये रफीचा टिपेला पोचणारा आवाज, चढत गेलेली ती लय, ढोलक, खंजिरी.. यांतून एक विलक्षण ट्रान्स अनुभवायला मिळतो. ‘इश्क इश्क’ या शब्दांची नशा चढते.
िहदी चित्रपटसृष्टीत ही सर्वात जास्त गाजलेली कव्वाली. तिची तालीम अनेक दिवस चालली आणि रेकॉìडगला तब्बल २९ तास लागले. याचं कारण त्याची अत्यंत गुंतागुंतीची, पण फार विचारपूर्वक केलेली मांडणी. अनेक गायक-गायिका. ओव्हरलॅिपग ओळी. विभाजन. बांधणीतल्या स्वातंत्र्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे ही कव्वाली. रोशनला अजरामर करणारी.
याशिवायही कितीतरी गाणी.. ‘हम इंतजार करेंगे’ (‘बहू बेगम’), ‘तुम एक बार मुहब्बतका’ (‘बाबर’)सारख्या सुंदर मेलडीज् आपल्याला रोशनने दिल्या. सुरुवातीच्या काळात ‘बोगी बोगी बोगी’ (‘हमलोग’)सारखं रॉक अ‍ॅण्ड रोल स्टाईलचं गाणं आणि नंतर ‘खनके तो खनके क्यूं खनके’ (‘वल्लाह क्या बात है’)सारखं ओ. पी. स्टाईलच्या जवळ जाणारं गाणंसुद्धा रोशननी दिलंय. लताबाईंनी घोषित केलेल्या, परंतु प्रत्यक्षात न आलेल्या ‘भरवी’ या संगीतप्रधान चित्रपटात संगीत रोशनचंच असणार होतं. पण आपल्या नशिबात ही गाणी नव्हती असंच म्हणावं लागेल.
रोशनपुत्र संगीतकार राजेश रोशनजींना जेव्हा मी भेटले, तेव्हा ते आपल्या पिताश्रींच्या अबोल, गंभीर स्वभावाबद्दल, त्यांच्या शैलीबद्दल कृतज्ञतेने भरभरून बोलले. स्वभावाने अबोल, नव्‍‌र्हस नेचरचे रोशनजी वयाच्या अवघ्या पन्नासाव्या वर्षी हसता हसता ठसका लागल्याचं निमित्त होऊन अचानक निघून गेले. स्वत:चा सांगीतिक वारसा राजेश रोशनला सोपवून. तो दिवस होता १६ नोव्हेंबर १९६७. पण एकच गाणं त्यांच्या संगीताची जादू कायम ठेवायला पुरेसं आहे..
रहे ना रहे हम महका करेंगे
बनके कली, बनके सबा, बागे वफा में..
रहे ना रहे हम..                                          

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2014 1:01 am

Web Title: old hindi songs
Next Stories
1 रहे ना रहे हम : ‘जिन्दगी भर नहीं भूलेगी..’
2 अब क्या मिसाल दूँ..
3 चाँद फिर निकला…
Just Now!
X