27 February 2021

News Flash

मोकळे आकाश.. : नि:शब्द तळ्याकाठी

पुढचे चार दिवस त्याचा रक्तदाब, किडनी आणि यकृताचं कार्य मंदावत जातं आणि आठव्या-नवव्या दिवशी तो आमचा निरोप घेतो. 

कोरोनाने गेल्या नऊ-दहा महिन्यांच्या काळात मृत्यूशी निगडित असलेली भीषणता अधोरेखित केली.

डॉ. संजय ओक – sanjayoak1959@gmail.com

डॉ. संजय ओक .. प्रख्यात सर्जन. राज्याच्या कोविड टास्क फोर्सचे प्रमुख. आयुष्य व्रतस्थतेनं रुग्णसेवेत व्यतीत करत असतानाच अचानकपणे उद्भवलेल्या सर्वसंहारी करोनाकाळाचे आव्हान पेलण्याची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. या काळातील अनुभवांचं  मनमोकळं साप्ताहिक सदर..

एका अडाण वाटेवरचं ते एक नसíगक तळं.  गावठाणाच्या बाहेरच्या अंगाला. माणसांचा वावर तसा कमीच. नाही म्हणायला दूरवर कोपऱ्यात डोंगराच्या आडोशाला आणि पाणवठय़ाच्या काठावर लोखंडी पत्र्याच्या शेडस्चा आडोसा करून तयार केलेल्या मसणवटीमध्ये गावातलं एखादं मढं यायचं तेव्हा थोडीफार हालचाल दिसायची. बाकी रातीला रातकिडय़ांची हक्काची साथ. चार भटकी कुत्री सोडली तर जनावरंही पाणवठय़ावर फारशी फिरकत नसत.  काठावरच्या औदुंबराला फार वर्षांपूर्वी- म्हणजे गोऱ्या सायबाच्या वेळेला दगडी पार बांधून काढला होता. आज त्या पारावर ते दोघे बसले होते.. पाय पाण्यात सोडून. पावसाळ्यात पाणी गुडघ्यापर्यंत येत असे. आज फक्त अंगठे ओले होत होते. वारा पडला होता. ग्रीष्माचा सरता काळ होता. ढग दाटून येऊ लागले होते आणि सारे वातावरण कुंद भासत होते. त्या दोघांच्या सावल्या पाण्यातल्या प्रतििबबांशी लपाछपी खेळत होत्या.  दोघांत कोणत्या तरी गहन विषयावर चर्चा सुरू होती. एकाचा चेहरा स्थितप्रज्ञ होता, तर दुसऱ्याच्या चेहऱ्यावर खिन्नतेचा झाकोळ. त्या दोन प्रतिमा कोणी साध्यासुध्या गावकरी नव्हत्या, तर त्यापकी एक होते जीवन, तर दुसरा मृत्यू. जीवनाच्या चेहऱ्यावर औदासीन्य स्पष्ट दिसत होतं. मृत्यूही रिता भासत होता. आजवर त्याने खूप ऐकून घेतलं होतं. लोक त्याचा नुसता नामोल्लेखदेखील टाळत असत. ‘‘असं का होतं रे, की लोक तुझ्यावर प्रेम करतात, तुझी अपेक्षा करतात; पण मला मात्र झिडकारतात. माझा विचारही त्यांना अस होतो. खरं तर आपण दोघं एकाच ईश्वराची लेकरं. मग हे असं का?’’ जीवन हसले. आपला हात त्याने मृत्यूच्या गळ्याभोवती गुंफला आणि ते म्हणाले, “People hate you and love me, because you are an ugly truth and I am a beautiful lie.” ( अर्थात तू एक कटु, घृणास्पद सत्य आहेस आणि मी  एक लोभस मृगजळ!)

कधीतरी, कुठंतरी वाचलेली ही गोष्ट मला कोरोनाच्या काळात खूप अस्वस्थ करून गेली.  अगदी कालपरवापर्यंत आपल्याबरोबर गप्पाटप्पा करणारा आपला मित्र अकस्मात खोकल्याची तक्रार करतो. ‘‘चल, हॉस्पिटलला ये. मी सीटी-स्कॅन करतो.. काय टी. बी. वगरे नाही नं?’’ ही माझी दटावणी अव्हेरतो आणि पुढच्या दोन दिवसांत रात्री धाप लागलेल्या अवस्थेत मला त्याच्या आय. सी. यू. बेडसाठी धावाधाव करावी लागते. पुढचे चार दिवस त्याचा रक्तदाब, किडनी आणि यकृताचं कार्य मंदावत जातं आणि आठव्या-नवव्या दिवशी तो आमचा निरोप घेतो.  अरे, आठवडय़ापूर्वी तर नाक्यावर एकत्र चहा प्यायलो होतो, त्याची चव अजूनही रेंगाळतेय..  नाटकाला जायचं होतं.. ऑस्ट्रेलिया सीरिज एकत्र बसून अनुभवयाची होती.. २०२१ साली आमच्या दोन्ही फॅमिलीज्ना एकत्र कोकण टूर करायची होती.. व्याडेश्वराचं दर्शन.. आणि आज अचानक सारं शांत झालं.. ते प्लॅन्स, त्या योजना खोटय़ा होत्या; खरी ठरली ती फक्त आजची चिरशांतता. ती क्रूर होती, कुरूप होती, पण तीच सत्य होती.

कोरोनाने गेल्या नऊ-दहा महिन्यांच्या काळात मृत्यूशी निगडित असलेली भीषणता अधोरेखित केली. त्याआधी मी ती मीडियामधून पाश्चात्त्य देशांमध्ये अनुभवली होती. सत्तरीच्या पुढच्या आजी-आजोबांचा घरातल्या इतर फॅमिली मेंबर्सनी घेतलेला निरोप, त्यांना लाभलेला अखेरचा सक्तीचा विजनवास.. आणि सरतेशेवटी मिलिटरीच्या कॉन्व्हायमधून शवपेटय़ांची सामुदायिक दफनभूमीकडे झालेली वाहतूक. दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच राबवलेली Mass graves ची संकल्पना. चिरा नाही, पणती नाही, क्रॉसचे चिन्ह नाही, फुले वाहायची सोय नाही. ट्रेलरमधून आलेल्या शवपेटय़ा खोल खणलेल्या खड्डय़ात उतरवण्यासाठी लावलेल्या क्रेन्स.. मृत्यूचं इतकं रौद्र रूप आपण रणभूमीवरही पाहिलं नव्हतं. पण तेच अंतिम सत्य होतं. आपल्याही देशात परिस्थिती यापेक्षा फारशी वेगळी नव्हती. नंबर तुलनेने खूप कमी होते, हीच काय ती जमेची बाजू. पण घरच्या लोकांपासून दूर आय. सी. यू.त आलेल्या एकाकी मृत्यूचे भोग डॉक्टर, इंजिनीअर, वकील, आय. ए. एस. अधिकारी यांच्याही भाळी लिहिले गेले. पांढऱ्या कपडय़ात चेहराही न दर्शविणारा देह मार्शल्सच्या माध्यमातून दफन/ दहनासाठी नेला जात होता.  स्मशानभूमीमध्ये रांगा लागल्या होत्या. कोणतेही धार्मिक विधी नव्हते. िपडदानांचे सोहळे नव्हते.  मुखाग्नी / भडाग्नीचे सोपस्कार नव्हते. इथे होती ती फक्त विषाणूची दहशत आणि त्यामुळे कमीत कमी मानवी स्पर्श आणि सान्निध्यात अग्नीला देह स्वाहा करण्याची धडपड. हा मृत्यू दाहक होता, भेदक होता, क्रूर होता, कुरूप होता; पण तोच अंतिम सत्य होता. It was an ugly truth.

आजवरचं त्या व्यक्तीच्या आयुष्यातील स्थान, स्थावर, स्थर्य सारं धुळीला मिळालं होतं. पसाअडका, पद, प्रतिष्ठा, प्रतिष्ठाने सारं सारं फोल ठरत होतं.. सुंदर मृगजळासारखं. त्याच्या आभासी पाण्यातून शेवटची तहान भागणं शक्य नव्हतं. It was a beautiful lie.

जून महिन्यात जीवावरच्या दुखण्यातून मी घरी आलो अन् थोडय़ाच दिवसांत भुसावळचे माझे स्नेही बालरोगतज्ज्ञ डॉ. उमेश खानापूरकर कोरोनाने फोर्टसिमध्ये अ‍ॅडमिट झाले. माझा आणि उमेशचा संपर्क १९८८ पासूनचा. कित्येक बाळं Surgery साठी उमेशने माझ्याकडे पाठविली होती. आमच्या दोघांमध्ये परस्पर आदराचा एक अतूट धागा होता. एका रात्री उमेशचा फोर्टिसमधून फोन आला. निर्वाणीची भाषा. मी उसनं अवसान आणून म्हणालो, ‘‘नाही हो, तुम्ही बरे व्हाल. मी नाही का झालो?’’ दोन दिवसांनी उमेश आम्हाला सोडून गेला.

प्रत्येक नव्या पुस्तकासंदर्भात चर्चा करायला किंवा घरातील कोणी आजारी पडलं तर फोन करणाऱ्या नीला सत्यनारायण मॅडम आपल्याला सोडून गेल्या. हे सारे मृत्यू माझ्यातलं आतलं काहीतरी संपवीत गेले. जीवनातल्या क्षणभंगुरतेची जाणीव झाली. जगायला तर हवंच, पण संपूर्णपणे डोळे उघडे ठेवून. कारण Life is a beautiful lie and death though ugly is the only truth.

शेवटी अंतिम सत्य एकच! बाकी सारी रिती गोळाबेरीज!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2021 2:40 am

Web Title: on the bay of pond coonavirus pandemic memories mokale aakaash dd70
Next Stories
1 थांग वर्तनाचा! : आक्रमकता आणि भय
2 दखल : प्रेरक व्यक्तिचित्रे
3 चवीचवीने.. : चंपाषष्ठीचा सामिष ‘घडा’
Just Now!
X