0004कांदा संतापला होता. रागावला होता. चीड चीड चिडला होता.
त्याच्या तळमूळाची आग शेंडय़ाला गेली होती!
दिसायला लाल असला तरी मूळचा तो हळवा. दंवाच्या चार थेंबानंही जखमी होणारा.
पण आज संतापून तो लाल गरवा झाला होता!
काय समजले भौ आपणांस हे लोक?
जरा कुटं भाव वाढला तं लागले बठ्ठे कोकलायला! म्हणे कांदा रडवणार! काय दुसरी हेडिंगं सुचून नाही राहिली का भौ तुम्हाला? अरे, रडवणार तर रडवणार! काय कोणाच्या पिताश्रींस भितो का आपण?
अरे, अस्सल इराणी रक्त आहे! लिलिएसी कूळ आहे! खानदानी कंद आहे!
वाटेला जाल, तर डोळ्यांत पाणी आणल्याशिवाय राहणार नाही!
असंच सांगत नाही. इतिहास गवाह आहे म्हणावं.
त्याच्या डोळ्यांसमोर ती जुनी लढाई उभी राहिली. आठवणींचे पापुद्रे सुटू लागले. आणि त्या नुसत्या स्मरणगंधानेच त्याच्या चेहऱ्यावर रक्तिमा आला.
अहाहा! काय कौशल्याने डाव टाकला होता भौ कंदर्पकौटिल्यांनी. हळूहळू सैन्य कमी करीत लढाई जिंकण्याचं ते तंत्रच आगळं होतं. दिल्लीश्वरांच्या लक्षात ती रणनीती येईपर्यंत त्यांच्या नाकाला कांदा धरण्याची वेळ आली होती!
आताही म्हणावं आम्ही मागं हटणार नाही!
म्हणे भाव वाढलेत!!
वाढणारच ना भौ? कांद्याला कांदा म्हणा, प्याज म्हणा, डुंगली म्हणा की यवनेष्ट. अखेर औषधीच आहोत आम्ही! तिखट, पौष्टिक, कफोत्सारक आणि मूत्रल! आता ही काही चव्हाटय़ावर आणायची गोष्ट नाही. पण जाणणारे बरोबर जाणतात. आम्ही वाजीकरही आहोत! समजून घ्या ना भौ तुमचं तुम्ही. देशी व्हायग्रा हो! त्यासाठी तुम्ही थोडी जादा किंमत नाही मोजणार? मग? वाढले भाव तर अशी काय आफत आली? परवडत नसेल तर वाटेला जाऊ नका! वाटणात घालू नका! पण नाही. पेपरांतनं ओरडणार तुम्ही. आता तर काय म्हणे आयात करणार आहेत!
करा- आयात करा! चिनी वस्तू आणल्याच आहेत; आता चिनी कांदाही आणा! आणि तो फोफशा कांदा टाकलेल्या पोह्याला व्हेज मंच्युरिअन पोहे म्हणा!
हाहाहा! व्हेज मंच्युरिअन पोहे आणि शेजवान पिठलं!
त्या पिटुकल्या पीजेने त्याचं त्यालाच हसू आलं.
पण नाही. हे चालू देता कामा नये. परप्रांतीयांच्या मदतीने भूमीपुत्रांना गारद करण्याचे हे कारस्थान तडीस जाऊ देता कामा नये!
काय करावं? त्याला काही सुचेना. विचार करकरून त्याचं डोकं गरम झालं.
डोकं गरम झालं की वरचा प्लास्टिकचा कागद तापला, हेही त्याला कळेना.
एवढे कसे आपल्या डोक्यात कांदे? त्याला स्वत:चाच राग आला.
काहीतरी केलंच पाहिजे.
त्याने आजूबाजूला नजर टाकली. एखादा लांब-रूंद लाल बावटा पसरावा तसे लाल कांद्याचे ढीगच्या ढीग लागले होते. यांना भाव मिळावा यासाठी आपण काहीतरी केलंच पाहिजे. माणसांनी आपणास ‘अनियन्य’भावाने शरण यावं यासाठी काहीतरी युक्ती पणाला लावलीच पाहिजे.
मुख्यमंत्र्यांना साकडं घालावं काय? पण नको. चेहऱ्यावरून ते काही कांदा खाणारातले वाटत नाहीत! ते आपल्यालाच चातुर्मास पाळण्याचा सल्ला देतील. मग राजू शेट्टी की रघुनाथदादा, की थेट अंगारमळाच गाठावा?
की विदर्भातल्या शेतकऱ्यांचाच पाठ गिरवावा?
मेल्यानंतरच त्यांच्या जीवाचं सरकारी सोनं होतं म्हणतात!
हो, तसंच करावं. तसंच!
खुदकुशी!
कांद्याने मनाशी दृढ निश्चय केला.
********
असं म्हणतात की त्यानंतर शेतातले, चाळींतले, बराकींतले कांदे एकाएकी सडू लागले. रस्तोरस्ती सडलेल्या कांद्याचे ढीग दिसू लागले.
लोक म्हणतात की, यंदा अवकाळी आणि गारपिटीमुळे कांदा टिकतच नाही.
कोणी म्हणतात की, बियाणंच खराब होतं.
खरं काय ते कोणालाच समजत नाही.
0008पेपरांतनं एवढंच कळत होतं, की आवक कमी झाल्याने कांद्याचे भाव वाढत चालले आहेत.
balwantappa@gmail,com