News Flash

सव्वा अब्जांपैकी फक्त ८५००?

सिनेमा वा साहित्य यांच्या तुलनेत भारतीय दृश्यकलाव्यवहार वाढला नाही, हे खरं आहे. हल्ली जागतिक चित्रलिलावांमधील भारतीय चित्रकारांच्या चित्रांच्या विक्रमी किमतींची जोरदार चर्चा होत असतानाच ‘जागतिक

| February 9, 2014 01:12 am

सिनेमा वा साहित्य यांच्या तुलनेत भारतीय दृश्यकलाव्यवहार वाढला नाही, हे खरं आहे. हल्ली जागतिक चित्रलिलावांमधील भारतीय चित्रकारांच्या चित्रांच्या विक्रमी किमतींची जोरदार चर्चा होत असतानाच ‘जागतिक  कलाबाजारात केवळ ८५०० लोकच भारतीय आहेत!’ असं विधान एका व्यवसायतज्ज्ञानं केलं. त्यावरून या क्षेत्रातील आपल्या खुरटलेपणाची कल्पना करता येईलही; तथापि चित्रकला क्षेत्रात नव्या, निराळय़ा दिशांनी लक्षणीय वाढ होते आहे, ही नाण्याची दुसरी बाजू..
नुकताच मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजे ‘मिफ’ पार पडला. त्याआधी पुण्याचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव झाला. त्याहीआधी कोल्हापूरचा.. हे सगळं सव्वाअकरा कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्रात होत असताना चित्रकलेच्या क्षेत्रातही आंतरराष्ट्रीय उत्सव भरतात, तसाच मुंबईमध्ये डिसेंबरात तिसरा ‘इंडिया आर्ट फेस्टिव्हल’ सुरू झाला आणि ‘आपण हळूहळू वाढतो आहोत’ असं समाधान देऊन संपला. हळूहळू सगळे वाढतातच. पण किती हळू, याची मोजदाद नसते. चित्रकलेसंदर्भात तशी एक मोजदादही अलीकडेच आणि एका उत्सवी उपक्रमातच झाली. दिल्लीत ३० जानेवारीपासून दिल्लीत ‘इंडिया आर्ट फेअर’ सुरू झाली (आणि तीन दिवसांनी संपली!) तेव्हा उद्घाटनाचा सोहळा वगैरे नसला तरी पत्रकार परिषद झाली.. तिथं कलाव्यापार मेळय़ांच्या आयोजनाचा चांगलाच अनुभव असलेले सँडी अँगस यांनी मापंच काढली भारतीय चित्रकला-क्षेत्राची. ते म्हणाले की, ‘भारतात ५० महत्त्वाचे चित्र-खरेदीदार आहेत. आणि गॅलरीमालक, चित्रकार, अभ्यासक, आयोजक आदी सगळे मिळूनसुद्धा हा आकडा फार तर आठ हजार पाचशेपर्यंत जातो. हे एवढेच लोक आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्वाचे आहेत, हे माहीत असल्यानंच आम्ही दिल्लीत दुसरी ‘आर्ट फेअर’ सुरू न करता सरळ ‘इंडिया आर्ट फेअर’मध्ये सहभागी झालो.. याला कारण हेच, की भारताचा कलाव्यवहार हळूहळू वाढतो आहे.’
सँडी अँगस यांचं हे म्हणणं ‘लोकसत्ता’नं ३१ जानेवारीच्या अंकात बातमी म्हणून छापलं होतं. पण ‘बातमी’ पुढेच आहे. सँडी अँगस यांच्या या म्हणण्याचा अर्थच फारसा कुणाच्या लक्षात आला नाही. अर्थ कळला असता तर त्यातली अपमानास्पद किंवा लाजिरवाणी बाजूही लक्षात आली असती. चित्रकलेची मोठी परंपरा असणाऱ्या आणि सव्वा अब्ज लोकसंख्येच्या भारत देशात फक्त ८५०० माणसंच आजच्या जागतिक कलाव्यवहाराच्या दृष्टीनं मोजता येतात आणि बाकीच्या भारतीयांना आम्ही मोजत नाही, असं अगदी अभावितपणे का होईना, एका विदेशी जाणकारानं म्हटलं आहे. ते जाणकार आहेत हे मान्य करावं लागेल, कारण हाँगकाँग, लंडन इथले आर्ट फेअर अँगस यांनी सुरू केले आहेत आणि ‘इंडिया आर्ट फेअर’च्या मालकीत २०१२ पासून त्यांची भागीदारी आहे. ही फेअर म्हणजे दृश्यकलेचा व्यापारमेळाच! त्यातून काय निष्पन्न होणार, याची माहिती असल्याखेरीज अँगस यांनी या मेळय़ाची सहमालकी स्वीकारलेली नाही.
चित्रकलेला गांभीर्यानं घ्यायचंच नाही, अशी खूणगाठ बांधूनच जणू आपल्याकडील इंग्रजी आणि मराठी लोकप्रिय प्रसारमाध्यमं काम करत असतात. त्यामुळेच मग फक्त चित्रलिलावांमधल्या किमतींच्या बातम्या होतात किंवा कुठेतरी इंग्रजीत ‘इंडिया आर्ट फेअर’मधल्या विक्रीचे अचाट आकडे पाहून मराठीतही त्याआधारे बातमी करून घेतली जाते. याच्यापुढे, कलाव्यवहार नेमका कसा आहे, हे पाहण्याच्या वाटेला कुणीच जात नाही.
या पाश्र्वभूमीवर सँडी अँगस यांच्या विधानाची सविस्तर चर्चा आणि शहानिशा व्हायला हवी.
आधी त्यांच्या बाजूनं बोलण्याचा प्रयत्न करू.. ‘आठ हजार पाचशेपैकी बडे कलासंग्राहक ५०, हे तर अँगस यांनी सांगितलंच आहे. शिवाय २५ आंतरराष्ट्रीय बाजार-दर्जाचे गॅलरीमालक, या गॅलऱ्यांसाठी काम करणारे मॅनेजर वगैरे धरून ७५, आर्ट फेअरसारख्या कार्यक्रमांचे (इव्हेंट्स) आयोजक आणखी १५०, हे मिळून ३०० झाले. यात आणखी दीडशे छोटे-मोठे कलासंग्राहक धरू, म्युझियमसारख्या कलासंस्थांचे ५० अधिकारी आणि कलेच्या इतिहासाचे किंवा दृश्यकलेचे २५० प्राध्यापक धरू.. तरी सगळे मिळून साडेसातशेच! हल्ली कलाप्रदर्शनांना विचारनियोजक म्हणजे क्युरेटर हवे असतात. त्यातले नामांकित २५ आणि तुलनेनं नवोदित ७५ समजू. इथं बेरीज झाली ८५०. बाकीचे ७६५० चित्रकार म्हटलं तरी त्यात फक्त गायतोंडे, सूझा, हुसेन यांसारखे दिवंगतच २५० असतील. बाकीच्यांपैकी रंगचित्रं काढणारे हयात असलेले चित्रकार २४०० धरले तरी भारतात आजघडीला पाच हज्जार दृश्यकलावंत हे मांडणशिल्पं, फोटोग्राफी, परफॉर्मन्स, व्हीडिओ आर्ट, डिजिटल आर्ट्स किंवा न्यू मीडिया अशा नव्या क्षेत्रांत आहेत.. आपल्या गरीब देशासाठी हे भरपूरच नाही का?’ असा प्रतिप्रश्न करून अँगस यांची बाजू मांडण्याचा उपद्व्याप आपण करू शकतो.  
समाधानच मानायचं असेल तर ते कशातही मानता येतं. पण तुम्ही आमच्या दृष्टीनं ‘इतकेच’- आणि ‘आम्ही इथं येतोय हे उपकार समजा,’ असं कुणी सांगत असताना समाधान कसं मानता येईल?
जगातल्या कुणा जाणकाराच्या दृष्टीनं ‘आठ हजार पाचशे लोकच महत्त्वाचे’ की आणखी किती, हा मुद्दा नाहीच. मुद्दा आहे, आपल्यालाही तसं वाटतंय का, हा!
चित्रकला किंवा हल्लीची दृश्यकला हा आपल्या सव्वा कोटीच्या देशातल्या दहा हजारांहूनही कमी माणसांचा खेळ आहे असं तुम्हालाही वाटत असेल, तर ते का, याची कारणं शोधायला हवीत. ‘त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे चित्रकार किंवा तथाकथित चित्रकलावाले लोकच!’ असा जर तुमचा आरोप असेल, तर तो तात्पुरता तरी खरा मानायला हवा.
आपण तसा तो मानू आणि हा साडेआठ हजारांचा हिशेब संपवून टाकू.
भारतीय लोकांपर्यंत या देशातली चित्रकला पोहोचत नाही- आणि ती पोहोचली पाहिजे, हे कळकळीनं सांगणारे किमान १५ मराठी लेख गेल्या दहा वर्षांत लिहिले गेले आहेत. मराठी टायपिंगची (युनिकोड) सुविधा, वाढत गेलेलं ब्लॉग-जगत यांमुळे हे लेख लोकांपर्यंत पोहोचू शकले. या लेखांचा साधारण सूर असा की, मराठीतून चित्रकलाविषयक लिखाण अधिक व्हायला हवं, चांगल्या आर्ट गॅलऱ्या सुरू व्हायला हव्यात आणि लोकांमध्ये या कलेविषयी आवड निर्माण होण्यासाठी लहान मुलांपासून प्रयत्न व्हायला हवेत. हे सारं खरं आहे. पण मुद्दा आहे तो हा, की कुणाच्याही कितीही सदिच्छा असतील किंवा ‘ब्लूप्रिंट’ तयार असेल, तरी जगाच्या आणि ‘आपल्या’सुद्धा दृष्टीला आपण लहानच दिसतोय.
हा एक दृष्टिकोन झाला. दुसरीकडे ‘इंडिया आर्ट फेअर’सारख्या जागतिक कलाबाजारात भारताचं स्थान निर्माण करू पाहणाऱ्या ठिकाणी न जाता आणि सँडी अँगस यांच्यासारख्या तज्ज्ञांना हात दाखवून अवलक्षण करून न घेता जागतिक कलेच्या विचार-व्यवहारात (बाजारात नव्हे!) वावरण्याचे संघटित प्रयत्नसुद्धा होत आहेतच. त्या प्रयत्नांची एक यादी केली तर ती कंटाळवाणी ठरू नये. उलट, या यादीतून ‘आपल्याकडे काही होतच नाही’ हा नकारार्थी सूर तरी बंद व्हावा.
इंडिया आर्ट फेअरमधल्या एका भिंतीवर सर्व फोटो उलटे का लावले आहेत, असा विचार प्रेक्षक करत असतानाच त्यांना मधोमध एक जुनं घडय़ाळाचं कपाट दिसतं.. त्यामध्ये काचेऐवजी बहिगरेल आरसा असल्यानं प्रेक्षकाचंही प्रतिबिंब उलटंच दिसू लागतं.. अनोळखी लोकांचे जुने फोटो किती संदर्भहीन असतात, हे समजत असतानाच स्वतचा फोटो काढण्याचा मोह न आवरावा, अशा क्षणाचा अनुभव देणारी ही कलाकृती नरेंद्र यादव यांची!
यादीची सुरुवात फक्त मराठीतल्या कलाविषयक लिखाणापासूनच करू. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापासून ते १९५० च्या दशकापर्यंत महाराष्ट्रात चित्रकलाविषयक लिखाण कसं होत होतं आणि त्याचं सार-सत्त्व काय होतं, याचा शोध घेणारं ‘मराठी नियतकालिकांतील दृश्यकलाविचार’ हे पुस्तक रमेशचंद्र पाटकर यांनी पाच वर्षांपूर्वी लिहिलं. अगदी अलीकडे ‘विवेक’ साप्ताहिकाच्या एका बृहद् प्रकल्पाचा भाग म्हणून महाराष्ट्रवासी चित्रकार-शिल्पकारांचा माहितीकोश प्रकाशित झाला. तर हाँगकाँगला मुख्यालय असलेल्या ‘एशिया आर्ट आर्काइव्ह’ या संस्थेनं नुकताच भारतीय भाषांतल्या महत्त्वाच्या कलाविषयक लिखाणासंदर्भात जो लेख-सूची प्रकल्प १३ भारतीय भाषांमधल्या १०,५०० लेखांनिशी हाती घेतला, त्यात सध्याच १०३७ लेख मराठीत आहेत. (हा प्रकल्प लोकसहभागातूनच पूर्ण होणार आहे.)  चित्रकला हा विषय एरवी शनिवार- रविवारी किंवा मनोरंजनाच्या पुरवण्यांमध्ये वाचण्याचा. पण ‘लोकसत्ता’नं हा विषय विचार-पानावर (२०१३ मध्ये) आणला. इथवर चित्रकलाविषयक भारतीय, मराठी लिखाण आलं आहे. लिखाणाखेरीज कृतिशील प्रयत्नही कमी झालेले नाहीत. चित्रकार सुधीर पटवर्धन यांनी ‘बदलती क्षितिजे’नावाचं प्रदर्शन एका आर्ट गॅलरीच्या साहाय्यानं केवळ मुंबई, पुणे किंवा कोल्हापुरात नव्हे, तर नागपूर, औरंगाबाद आणि कोकणातही भरवलं, त्याला आता पाच र्वष होतील. पटवर्धनांनी निवडलेले भारतीय चित्रकार ‘त्या ७६५० पैकी’ होते, असं समजायला वाव आहे. पण पुढे याच पटवर्धनांनी पुण्याच्या ‘सु-दर्शन कलादालना’मध्ये ड्रॉइंग्जचं किंवा रेखाचित्रांचं खास प्रदर्शन दोन भागांत भरवलं. त्यातले काही चित्रकार निराळे होते. शिवाय ‘सु-दर्शन’नं गेल्या दोन-तीन वर्षांत मुलांना चित्रकलेची गोडी लावण्याकरता पालक आणि शिक्षकांची चर्चासत्रं घेतली. हे संस्थात्मक प्रयत्न सध्या महाराष्ट्रात तरी अपवाद म्हणून पाहता येतात. पण बंगळुरुसारख्या शहरात ‘वन शांतिरोड’ आणि ‘बार-वन’ या दोन संस्था सातत्यानं कलाबाजाराच्या पुढचा आणि पर्यायी विचार करत आहेत. त्यासाठी कार्यक्रम आखत आहेत. मुंबईच्या भाऊ दाजी लाड संग्रहालयात (राणीबाग) किंवा मोहिले पारीख केंद्रातर्फे ‘एनसीपीए’ अथवा अन्य ठिकाणी जी व्याख्यानं होतात, तीही या पर्यायी प्रयत्नांचाच भाग असल्याची खात्री अनुभवांती पटते. दिल्लीच्या जेएनयू, आंबेडकर युनिव्हर्सिटी यांसारख्या विद्यापीठांत कलाविचारांच्या अभ्यासासाठी खास विभाग असल्यानं तिथली चर्चासत्रं किंवा खुली व्याख्यानं ही तर मेजवानीच असते. दिल्लीतच ‘खोज’ नावाची गेली १२ र्वष निव्वळ दृश्यकलेच्या पर्यायी विचारांचा ध्यास घेतलेली एक संस्था आहे. तशा प्रकारची मुंबईतली अवघ्या एक वर्षांची संस्था म्हणजे बोरीवलीची ‘कोना’! आपल्याला ‘जे. जे.’ माहीत असतं. पण रचना संसद किंवा ठाणे स्कूल ऑफ आर्ट यांसारख्या कलाशाळांतले विद्यार्थी अशा उपक्रमांमध्ये मोठा सहभाग नोंदवत असतात. ‘रचना संसद’चा सहेज राहल हा विद्यार्थी गेल्या दोन वर्षांत ‘आठहजार पाचशें’पैकी झाला, तो त्यानं चौफेर लक्ष ठेवल्यामुळेच. सध्या कानपूरच्या आयआयटीत शिकवणारी कौमुदी पाटील ही मूळची कोल्हापूरची;    पण ती शांतिनिकेतनमध्ये शिकली. तिकडे शांतिनिकेतनातही ‘आमच्या पिढीत कुणीच नाही..’ अशी नकारघंटा होती. ती अंशुमान दासगुप्तांसारख्या अध्यापकांनी प्रयत्नपूर्वक बदलली.
हे प्रयत्न का झाले, यालाही कारण आहे. साधारणपणे ‘जागतिकीकरण’ असं या कारणाचं वर्णन करता येईल. १९९५ पर्यंत भारतीय चित्रकलेत सारं काही आलबेल होतं. म्हणजे बंगालवाले बंगाल स्कूलसारखी चित्रं काढत होते, बडोदावाले नॅरेटिव्ह स्कुलात धन्यता मानत होते आणि मुंबईत ‘जे. जे.’मध्ये शिकलेले लोक तर तोवर केवळ व्यक्तिचित्रणात नव्हे, तर अमूर्त चित्रं काढण्यात किंवा त्याबद्दल अमूर्त बोलण्यातसुद्धा वाकबगार झालेले होते. पण हळूहळू अस्वस्थता वाढू लागली. नव्या आर्ट गॅलऱ्या, भारतीयांकडे नव्यानं आलेला पैसा असे बाह्य़ बदल घडू लागले, त्यातून चित्रकारावरील ताणही कदाचित वाढू लागला. पण अनेकांना हेही जाणवू लागलं की, कलेचा वैचारिक व्यवहारदेखील जगात बराच पुढे गेलेला आहे आणि आता स्पर्धा करायचीच, तर ती कलेच्या जागतिक इतिहासाशी असायला हवी. आपण इतिहास घडवलाच नसल्याच्या असमाधानातून सृजनाकडे वाटचाल सुरू होते, असा अनेक मल्याळी, बंगाली, उडिया किंवा मराठीभाषक चित्रकारांचा अनुभव या काळात नोंदविला गेलेला आहे. हे असमाधानी चित्रकार इंग्रजी वाचू लागले. इंटरनेट हाताशी आल्यावरही पुस्तकं आणि आर्ट फोरमसारखी मासिकं वाचत राहिले. या तरुणांपैकी काहीजणांची अस्वस्थता लवकर संपली. घर, गाडी, लग्न वगैरे झाल्यावर ते सुशेगाद झाले. पण बरेचजण आज चाळिशीत किंवा पन्नाशीच्या उंबरठय़ावर असतानाही नवी माहिती, नवं पाहणं आणि स्वतचा नवा विचार करणं, या वाटेवर कायम आहेत. संगणक नसताना गणित शिकलेले आणि आज पंचेचाळिशीत असलेले अनेकजण जसे संगणक क्षेत्रात यशस्वी झालेले दिसतात, तसेच हे चित्रकारही!
खरं आव्हान पुढे आहे. आज चाळिशीत असणारे चित्रकार जागा अडवून बसणार. त्यामुळे त्यांच्याहीपेक्षा नवा, वेगळा विचार तरुणांना करावा लागेल. ‘मजुराचं चित्र काढलं म्हणून सामाजिक बांधिलकी’ वगैरे प्रकार यापुढे चित्रांमध्ये तरी भोळसट ठरवले जातील. आणि ‘फक्त दृश्यांमधूनच विचार करायचा’ हे खरोखरच किती कठीण आहे, आणि तिथे स्वतला तरी नक्कीच फसवता येत नाही, हेही या तरुणांना कळेल. मग कुठल्यातरी ‘रेफरन्स’ची ‘कॉपी’ करण्यापेक्षा थेट वैचारिक पुस्तकं वाचून, त्या विचाराचा आपल्या जगण्याशी काही संबंध आहे का याचा शोध घेऊन, दृश्यकलेत उपलब्ध झालेल्या व्हिडीओ अथवा संगणकीय कलेसारख्या अनेक नव्या माध्यमांपैकी एखादं निवडून हे दृश्यकलावंत ‘मोठे’ होतील.
हे सारं जेव्हा होईल, तेव्हा ‘फार तर आठ हजार पाचशे’ यासारखे हिशेब विरून गेलेले असतील. पण तेव्हा तरी कुणा कलाव्यापार मेळय़ाच्या मालक मंडळींनी या वाढीचं श्रेय घेऊ नये. चित्रकलेला समाजात स्थान देण्यासाठी आणि चित्रकारांची वैचारिक प्रतिष्ठा जपण्यासाठी अनेक दिशांनी प्रयत्न होत आहेत. आपल्या महाराष्ट्रातसुद्धा होत आहेत. या प्रयत्नांमुळे कदाचित लघुपट आणि चित्रपटांचे जेवढे महोत्सव आज महाराष्ट्रात भरतात, तेवढेच पुढील पंधरा वर्षांनी दृश्यकलेचेही भरू लागतील!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2014 1:12 am

Web Title: only 8500 indian artist known to international art world
Next Stories
1 शुभ्र काही जीवघेणे!
2 जावे दावोसच्या गावा…
3 अशोक – द ग्रेट!
Just Now!
X