दरवर्षी दिवाळीला उत्तमोत्तम दिवाळी अंक विकत घेणे आणि पुढचे काही महिने रवंथ केल्याप्रमाणे त्यांचा रसास्वाद घेणे हा माझा आवडीचा नित्यनेम. चकली-लाडूची चव नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत विरघळते, पण उत्तम लेख मात्र पुढच्या ग्रीष्मातही साथसंगत करतात आणि दुखऱ्याखुपऱ्या मनावर मायेची फुंकर घालतात असा माझा अनुभव आहे. २०१३ ची दिवाळीही त्याला अपवाद कशी ठरेल? ‘माहेर’च्या दिवाळी अंकातील सुबोध जावडेकरांची ‘ऑपरेशन राहत’ ही कथा माझ्या मनात रेंगाळत राहिली.
उत्तर काशी आणि उत्तरांचलच्या अस्मानी संकटानंतर तिथे अडकून पडलेल्या यात्रेकरूंच्या सुटकेसाठी सॉर्टीज करणाऱ्या सन्यदलातील दिलेर स्टीव्हन आपले हेलिकॉप्टर निसर्गाशी आणि लहरी वातावरणाशी सामना करीत हायड्रोइलेक्ट्रिक प्रोजेक्टच्या हेलिपॅडवर उतरवतो.. जीव वाचला, या आनंदात ‘जय भोलेनाथ’चा गजर करीत यात्रेकरू हेलिकॉप्टरमधून उतरून बेस कॅम्पकडे धावतात.. इतक्या प्रतिकूल परिस्थितीतून स्वत:चा जीव धोक्यात घालून ज्याने आपल्याला वाचवले त्या पायलटचे आभार मानायचे सौजन्य कोणीही दाखवीत नाही. त्याला ‘थँक यू’, ‘नमस्कार’ तर लांबच, पण ‘जान बची, लाखों पायें’, ‘जय भोलेनाथ’ हा जागर करून हेलिकॉप्टरकडे पाठ करून धावणाऱ्या त्या १८ जणांच्या जथ्थ्यामध्ये कडेवर घेतलेले एक छोटे शेंबडे पोर मात्र पाठमोऱ्या अवस्थेत कॅप्टन स्टीव्हनकडे पाहून हसले आणि टाटा करीत हात हलविते झाले.
जावडेकरांनी कथा इतकी सुबक रचली आहे की जोशीमठ, अलकनंदा, तांबूस रंगलेली हिमशिखरे, वनराई, अंधारलेली दुपार, पावसाच्या सरी आणि हेलिपॅड सारं काही डोळ्यांसमोर उभे राहिले. पण इतकी सुंदर कथा मात्र माझ्या मनात मानवी स्वभावाच्या एका पलूकडे अंगुलिनिर्देश करताना रुखरुख लावून गेली. आभाराचे दोन शब्द आम्हाला भार का वाटावेत?  धन्यवाद देऊन ऋणनिर्देश करण्यात आम्ही कद्रूपणा का दाखवावा?
कॅप्टन स्टीव्हनला येणारा हा अनुभव आपल्याला प्रत्येक क्षेत्रात ठायी ठायी येतो. एरवी डॉक्टरला देव मानणारे कधी कधी त्याच्या श्रमांच्या, कष्टांच्या कौतुकाचा परतावा देताना आखडलेले दिसतात.  परतावा केवळ फीच्या स्वरूपातच नसतो, तर डॉक्टर- नर्स- वॉर्डबॉय- आयामावशी यांनी तुमच्यासाठी केलेल्या श्रमांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात असतो. पसे कितीही दिले तरी कमीच असतात. मोलाला मर्यादा असते, हृदयाच्या बोलाला नाही. कोणीतरी आपल्यासाठी काही केलेच तर त्याच्या खांद्यावर हात ठेवून, त्याचे हात हातात घेऊन व्यक्त केलेल्या नि:शब्द भावना या फीच्या छनछनाटापेक्षा नादमधुर असतात. मग ते व्यक्त करताना संकोच कशाला? पाश्चात्यांच्या संस्कृतीत एकंदर ‘थॅक्स्, चिअर्स, डांके’ या शब्दांची रेलचेल आहे. वयाने मोठे असलेले प्रौढही अगदी बालवाडीतल्या आपल्या नातवाशी बोलताना या भावना व्यक्त करतात. तो उपचार नसतो, तर त्यांच्या जडणघडणीचा भाग असतो. ते बाळ मोठे होताना साहजिकच या संस्काराच्या शिदोरीवर वाढते आणि त्याचा वापर करताना पुढे त्याला अवघडून जायला होत नाही.
आमच्याकडे मात्र ‘अडलंय माझं खेटर’ “”It is his job”,  “He is not doing me a favour”” ‘करायलाच पाहिजे’ इत्यादी समसमा शब्दांच्या कोलाहलामध्ये कृतज्ञतेचा जीव घुसमटून जातो. कधी समोरच्याची अपेक्षा असते, तर कधी तोही निर्विकार, निर्ढावलेला असतो. याला नेमकं कृतघ्नपणा नाही म्हणता येणार; पण पोच देण्यात, पावती फाडण्यात आपण उणे पडतो, हेच खरे.
रोजच्या आयुष्यात किती म्हणून प्रसंग स्मरायचे? सकाळी बिल्डिंगच्या खालचा गुरखा ‘‘शलाम शाब’’ म्हणतो, तेव्हा ‘‘क्या बहादूर, कैशा है?’’ म्हणा.. तुमची गाडी धुतल्याची निशाणी वायपरच्या ब्लेड्सचे झेंडे उभारून ठेवणाऱ्या गाडी धुणाऱ्या मुलाच्या पाठीवरून हात फिरवताना ‘‘६ी’’ ल्लिी’’ म्हणा, टायरमध्ये हवा भरणाऱ्या अण्णाला पाच रुपयाचे नाणे देताना ‘‘अण्णा, थँक यू’’ होऊन जाऊ दे.. ऑफिसात चहा देणाऱ्या नानाला कधी तुमच्या कपातला घोटभर चहा बशीतून कटिंग म्हणून द्या.. पाहा, दिवस वेगळा जाईल.. माणसं तीच असतील मन:स्थिती बदलेल.. भाषा तीच असेल, अर्थ बदलेल.. टी. व्ही.वरची तीन मित्रांची चार कोक मागवून चौथी बाटली सव्‍‌र्ह करणाऱ्या वेटरला देणारी जाहिरात मला खूप समाधान देऊन जाते, ती त्यामुळेच!
..विचारात गुरफटलेलं असताना शाळेतली बालपणाची आठवण झाली. घरात गाडय़ा नव्हत्या, तो काळ.. बहुतांशी प्रवास पुण्याच्या बसनेच. पण कधी कधी आई आर्यभूषणपासून दीप बंगल्यापर्यंत रिक्षा करायची आणि दीड रुपयाचे भाडे देताना रिक्षावाल्याला ‘‘थँक्स’’ म्हणायची.. ‘‘थँक्स कशाला? भाडे देतोय ना आपण?’’ या माझ्या अपरिपक्व प्रश्नाला ती हसून उत्तर देती व्हायची- ‘‘वचने किम् दरिद्रता?’’