07 July 2020

News Flash

इतिहासाचे चष्मे : पौर्वात्यवाद आणि आपण

स्थलांतरे, व्यापारी उद्दिष्टे, राजकीय आकांक्षा यांतून घडणारी देशांतरे आणि सत्ताकारणे यांनी सबंध जगाचा इतिहास भरून गेलेला आहे.

भारतीय उपखंडाचा इतिहास हा या भूप्रदेशाचं अनेक मानवी वंश, संस्कृती, विचार इत्यादी घटकांच्या मिसळणीचा प्रदेश असल्याचं दर्शवतो.

हेमंत प्रकाश राजोपाध्ये – rajopadhyehemant@gmail.com

भारतीय उपखंडाचा इतिहास हा या भूप्रदेशाचं अनेक मानवी वंश, संस्कृती, विचार इत्यादी घटकांच्या मिसळणीचा प्रदेश (इंग्रजीत ज्याला melting pot असे म्हणतात.) असल्याचं दर्शवतो. वसाहतवाद हा या मिसळणीचा तुलनेनं आधुनिक, नवा कालखंड म्हणता येईल. ढोबळ अर्थाने अकादमिक विश्वात ज्याला ‘वसाहतवाद’ म्हटलं जातं तो विचार मध्ययुगात सुरू झालेल्या, युरोपीय देशांनी आरंभिलेल्या व्यापारी उद्योगांशी संबंधित आहे. या देशांतील राज्यव्यवस्थेच्या निकटवर्ती वर्तुळातील व्यापारी समूहांनी आशियाई, आफ्रिकी व अन्य खंडांतील देशांत व्यापारी बस्तान बसवून तिथल्या समाजांवर आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक अधिसत्ता गाजवण्याची प्रक्रिया ही ‘वसाहतवाद’ म्हणून ओळखली जाते. फिलिप होफमान या अभ्यासकाने दाखवून दिल्यानुसार, साधारण इसवी सन १८०० च्या पूर्वी, औद्योगिक क्रांती होण्याच्या आधी युरोपीय वसाहतकारांनी जगाचा ३५ टक्के भूभाग काबीज केला होता. आणि विसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकापर्यंत त्यांनी ८४ टक्के  जगावर आपली अधिसत्ता स्थापन केलेली होती. या आकडेवारीवरून वसाहती आणि वसाहतवाद्यांची राजकीय उद्दिष्टे आणि त्यांनी जगावर टाकलेला प्रभाव याचा काहीसा अंदाज येऊ शकतो. वसाहतवादाचा उगम किंवा त्या कल्पनेचा उगम अनेक अभ्यासकांनी थेट सिकंदराच्या स्वारीपर्यंत नेऊन भिडवला असला तरीही त्याचं आजचं औचित्य आधुनिक काळातील बाजारपेठांच्या आणि युरोप-पाश्चात्त्यकेंद्री अर्थव्यवहारांच्या विस्तारवादी धोरणांभोवती फिरत राहतं. अर्थात या आर्थिक व्यवहारांना आणि व्यापारी उद्दिष्टांना पूरक आणि वर्धक अशा ज्या गोष्टी आहेत, त्या साऱ्या गोष्टी वसाहतवाद्यांनी संबंधित प्रदेशांत नेल्या आणि त्यातून संबंधित प्रदेशांतील सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रांत शिरकाव करण्याचे अनेक यशस्वी प्रयत्न करत आपले प्रभावक्षेत्र प्रस्थापित केले. याअंतर्गत ख्रिस्ती मिशनरी कार्यकर्त्यांना व प्रचारकांचा धर्मप्रचार, इंडोलॉजिस्ट, आफ्रिकेतील भौगोलिक साहस मोहिमा आखणारे एक्स्प्लोरर, खलाशी, राजनीतिज्ञ इत्यादी मंडळींना संबंधित वसाहतींच्या प्रदेशात नेत ‘सॉफ्ट पॉवर’ पसरवण्याचे उद्योगही या मंडळींनी सुरू केले. एडवर्ड सैद या सुविख्यात समीक्षक-अभ्यासकाने आपल्या ‘पौर्वात्यवाद’ (orientalism) या ग्रंथात मांडल्याप्रमाणे, साधारणत: १८ व्या शतकाच्या आरंभापासून युरोपीय व्यापारी, प्रशासक, अभ्यासक, साहित्यकार यांनी करून ठेवलेल्या वासाहतिक प्रदेशांच्या वर्णनात्मक नोंदी व चित्रणांतून युरोपीय समाजाची पौर्वात्य समाजांविषयीची विशिष्ट साचेबंद, संकुचित प्रतिमा उभी राहिली आणि त्यातून या पाश्चात्त्य ‘जेत्यां’च्या विश्वात पौर्वात्य समाजांविषयी गौणत्वप्रवण भावना निर्माण झाली. वसाहतवाद्यांनी या प्रदेशांत वसाहती करून तिथे आपले सांस्कृतिक-राजकीय वर्चस्व स्थापन करणे, हा हीन अशा पौर्वात्यांना सुसंस्कृत करण्याचा उद्योग असल्याची धारणा या चर्चाविश्वाने प्रसृत केली. म्हणूनच पाश्चात्त्य लेखकांच्या वर्णनपर नोंदींवर बेतलेले पौर्वात्य देशांचा विचार करणारे चर्चाविश्व हे सैद यांनी दाखवून दिल्याप्रमाणे वासाहतिक वर्चस्ववादाच्या प्रेरणांचे प्रतिनिधित्व करते.

वसाहतवाद आणि वसाहतींच्या स्थापनेतून निर्माण झालेल्या पाश्चात्त्यांच्या वर्चस्वाचा परिणाम स्थानिक संस्कृती, राजकीय-वैचारिक विश्वावर व पर्यायाने समाजावर होणे अर्थातच स्वाभाविक होते. या परिणामांच्या अनेक आविष्कारांपैकी काही महत्त्वाचे आविष्कार विचारात घेणं पौर्वात्यवाद समजून घेण्यासाठी आपल्या कामी येईल. पौर्वात्यवाद कल्पनेचे प्रणेते सैद यांनी नमूद केले आहे त्यानुसार पौर्वात्य जगाची प्रकृती ही गूढवादी, कालबाह्य़ आणि सरंजामी, जुनाट, अंधश्रद्ध अशी असल्याचा (mythical east) सरधोपट विचार या नोंदींद्वारे पाश्चात्त्य विश्वात दृढ झाला.

खरं तर पाश्चात्त्य विश्वात ‘ओरिएंट’ हा शब्द काहीसा सैलसर अर्थाने वापरला जातो. ‘मॉर्गेन लँड’ म्हणजे ‘उगवतीचा प्रदेश’ या सुंदर शब्दाद्वारे जर्मन अभ्यासकांनी त्याचा निर्देश केला आहे. काही वेळा ऑटोमन तुर्क आणि युरोपीय विश्व यांच्यातील राजकारणाशी अनुस्यूत अशा अर्थाने ख्रिश्चनबहुल युरोप आणि मुस्लीमबहुल आशिया अशा अर्थीदेखील ‘ओरिएंट’ हा शब्द वापरला गेल्याचं दिसून येतं. योहान हेर्डर, फ्रीडरिख श्लेगेल आणि हेगेल या अभ्यासकांनी पौर्वात्य प्रदेशांना वेगवेगळ्या संदर्भात अतिदूर पूर्व (far east), मध्य आशिया, दक्षिण आशिया अशी नावे दिली. या शब्दप्रयोगाला १९ व्या- २० व्या शतकातील कम्युनिस्ट राजवटीचे काही संदर्भदेखील लावले गेले असले, तरी ‘ओरिएंट’ शब्दाची व्याप्ती ‘युरोपेतर प्रदेश’ अशी काहीशी तुच्छतादर्शक धारणेला निर्देशित करते असे अभ्यासकांनी दाखवून दिले आहे. अर्थात थॉमस ट्रॉटमान, रोझेन रोशर, डेव्हिड लुडेन इत्यादी अभ्यासकांनी सैद यांच्या पौर्वात्यवाद सिद्धांताच्या मर्यादा आणि काहीशा सरधोपट, विरोधाभासात्मक मांडणी असलेल्या चौकटी दाखवून दिल्या असल्या तरीही सैद्धांतिक विश्वातील एक लक्षणीय आणि महत्त्वाचा सिद्धांत म्हणून पौर्वात्यवादाच्या काही महत्त्वाच्या अंगांना दुर्लक्षून चालणारे नाही. हे लक्षात घेऊन पौर्वात्यवादाचे भारताच्या संदर्भात परिशीलन करताना पीटर हीह्ज या अभ्यासकाने वासाहतिक पौर्वात्यवाद आणि वसाहतोत्तर पौर्वात्यवाद अशी दोन भागांत विभागणी केली आहे. यापैकी वासाहतिक पौर्वात्यवादात इंडोलॉजी ज्ञानशाखेच्या उदयाचा काळ, भारत व भारतीय साहित्य, संस्कृती व समाजाविषयीचा रोमँटिक कल्पनांचा काळ आणि स्वामी विवेकानंद, श्रीअरविंद इत्यादी भारतीय विचारकांनी पाश्चात्त्य धर्तीवर मांडलेल्या भारतीय कल्पनांचा काळ अशी विभागणी पीटर यांनी केली आहे. तर वसाहतोत्तरकालीन ओरिएंटलिझम हा रोमिला थापर इत्यादींनी केलेल्या उदारमतवादी मांडणीचा, रोनाल्ड इंडेन इत्यादी अभ्यासकांनी केलेल्या सुलभीकृत तपशीलवार विवेचनात्मक मांडणीचा आणि राजाराम, डेव्हिड फ्रॉले इत्यादी हिंदुत्व-उजव्या मांडणीच्या अंगाने जाणाऱ्या प्रतिक्रियात्मक मांडणीचा अशा तीन भागांत पीटर यांनी विभागला आहे. या विभागणीकडे पाहता भारतीय इतिहासाच्या व संस्कृती-अभ्यासाच्या क्षेत्रातील सहा महत्त्वाच्या विभागण्यांची नेमकी कालानुक्रमे कल्पना येऊ शकते.

वसाहतवादाची संक्षेपात मीमांसा करणाऱ्या आपल्या सदरातील ‘वसाहतवाद : युगांतराचा मागोवा’ या लेखात वासाहतिक काळात इंग्रजी शिक्षण घेतलेल्या भारतीयांच्या पहिल्या पिढय़ांमधील उच्चवर्णीय/वर्गीय लेखक-अभ्यासक मंडळींनी संस्कृत व अन्य अभिजन भाषांतून वसाहतवाद्यांच्या अनुनयाचे केलेले साहित्यिक उद्योग आणि त्याचे सांस्कृतिक-राजकीय औचित्यानौचित्य यांचा विचार आपण केला. पौर्वात्यवादाच्या वर नमूद केलेल्या प्रकारांतून ‘भारोपीय’ भाषाशास्त्र (Indo-European linguistics), त्यातून आलेला आर्यवाद, आर्य आक्रमण-स्थलांतर सिद्धांत, त्यावरील सकारात्मक-नकारात्मक मांडणी करणाऱ्या विचारधारा उदयाला आल्या. जर्मन रोमँटिसिझमच्या प्रभावातून उदय पावलेल्या भारतीय साहित्य-संस्कृतीविषयीच्या रोमँटिक धारणा या संस्कृतिप्रेम आणि राष्ट्रवादी अंगाने विकसित झाल्या. इंग्रजी व्यवस्थेत शिकलेल्या, इंग्रजी भाषेतून मांडणी करणाऱ्या स्वामी विवेकानंद, अरविंद इत्यादी तत्त्वज्ञांनी उपनिषदे-गीता इत्यादी ग्रंथांना विवक्षित चौकटीत औचित्य प्राप्त करून देण्यासाठी त्यातून विश्वबंधुत्वादी मूल्यांचा घोष जगभरात फिरून, जगभरातून आलेल्या अनुयायांच्या मार्फत केला. महायुद्धांच्या काळात त्या धारणांना धार्मिक संवेदनांची जोड मिळत गेली. स्वातंत्र्योत्तर- वसाहतोत्तर काळात उदारमतवादी विचारांच्या प्रवाहात बौद्ध धर्माची पुनर्माडणी श्रीलंकेत अनागारिक धम्मपाल यांनी राष्ट्रवादाच्या चौकटीत केली. भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘समता’ या युरोपीय वैचारिक मंथनातून प्राप्त झालेल्या मूल्यावर बेतलेल्या दलितमुक्तीच्या आपल्या व्यापक राजकीय चळवळीला बौद्ध तत्त्वज्ञानाची चौकट मिळवून देत, हिंदू धर्माची चिकित्सा करून त्यातील विषमतेवर नेमके बोट ठेवले. याच काळात डी. डी. कोसंबी आणि पुढे रोमिला थापर इत्यादी उदारमतवादी इतिहासकारांनी भारतीय इतिहासाभ्यास क्षेत्राला पाश्चात्त्य  विश्लेषणात्मक संशोधन पद्धतीची जोड देत नवी अभ्यासव्यवस्था रुजवली. या अभ्यास क्षेत्राचा प्रतिवाद करणारी उजव्या, हिंदुत्ववादी अंगाने जाणारी ऐतिहासिक मांडणीची परंपरा गेल्या काही दशकांत वाढीला लागून या व्यवस्थेने उदारमतवादी आणि डाव्या अंगाने झालेल्या चिकित्सेतून झालेल्या विश्लेषणाला खोडून काढत हिंदू राष्ट्रवाद आणि हिंदू गौरवाच्या अंगाने मांडणी करण्यास सुरुवात केली. या मांडणीचा आधार असलेल्या ‘हिंदू धर्म’ या वासाहतिक काळात पाश्चात्त्य प्रभावातून नव्याने कल्पित केल्या गेलेल्या एकसाची धर्मप्रणालीचा आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाचा अकादमिक परामर्श घेणारे अनेक देशी आणि विदेशी अभ्यासक आधुनिक काळात उदयाला आले.

हे सारं पाहताना आपण ध्यानात घ्यायला हवी अशी महत्त्वाची गोष्ट ही की, पौर्वात्यवाद आणि वसाहतवाद या दोन तत्त्वांतून वर नमूद केलेल्या धारणा आपल्या देशात प्रवेशत्या झाल्या आणि पसरल्या. १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी आणि पाश्चात्त्य प्राच्यविद्यापंडित यांच्यातील चर्चा, त्यांच्या नोंदी यांतून युरोपीय समाजाच्या मनात उभे केले गेलेले उपखंडाविषयीचे चित्र आणि युरोपीय मूल्यव्यवस्था, आधुनिकता, औद्योगिकीकरण आणि राष्ट्रवाद या संकल्पनांतून निर्माण झालेल्या भारतीय संस्कृती-इतिहासाविषयीच्या नव्या औचित्य चौकटी यांच्या प्रभावातून उपखंडातील संस्कृतीकरण, राजकारण, समाजकारण अजूनही बाहेर आलेले नाही आणि ते तसे येऊही शकत नाही. आग्नेय आशियात प्राचीन भारतीयांनी स्थापन केलेल्या व्यापारी वसाहती आणि राजकीय सत्ताकेंद्रे यांच्या प्रभावातून आग्नेय आशिया अद्याप बाहेर आलेला नाही, कारण इथून त्या भागात गेलेल्या परंपरांना तिथल्या स्थानिकांनी राजकीय प्रभावातून, सत्ताकारणातून किंवा अन्य कारणातून आत्मसात करून त्यांच्या देशी चौकटींत मुरवून टाकले. पाश्चात्त्य देशांनी सोळाव्या शतकापासून स्थापन केलेल्या वसाहती आणि दीड- दोन शतकांच्या राजकीय वर्चस्वातून आणि आजतागायत टिकून असलेल्या आणि जगातील सर्व कोपऱ्यांना व्यापून टाकणाऱ्या पाश्चात्त्य संस्कृतीचा, वैचारिक-राजकीय मूल्यव्यवस्थेचा प्रभाव कळत-नकळत मान्य करत त्यांना देशी चौकटीत औचित्य प्राप्त करून देण्याच्या प्रक्रिया आजही अविरत सुरू आहेत आणि राहतील.

स्थलांतरे, व्यापारी उद्दिष्टे, राजकीय आकांक्षा यांतून घडणारी देशांतरे आणि सत्ताकारणे यांनी सबंध जगाचा इतिहास भरून गेलेला आहे. संबंधित स्थानिक भूभागांत त्यांना राष्ट्रीय, धार्मिक अस्मितांच्या माध्यमातून प्रतिक्रियात्मक वृत्तींचा सामना करावा लागत असला तरीही हे प्रभाव कमी-अधिक प्रमाणात अमीट राहतात.

पौर्वात्यवाद या संकल्पनेचे अनेक आयाम आणि त्यावरील चिकित्सेतून समोर आलेल्या त्यांच्या मर्यादा यांची साकल्याने चर्चा आपण या छोटय़ा लेखात करू शकत नाही; पण या विषयाची, सिद्धांताची अगदी जुजबी का होईना, पण ओळख करून घेणे आज आपल्याला आवश्यक झाले आहे. समाज, संस्कृती आणि राजकारण या क्षेत्रांतील सारे घटक एकारले होत असताना सामाजिक सिद्धांत आणि त्यातील गुंतागुंती समजून घेणे समाजाविषयी जागरूकता बाळगणाऱ्या सर्वासाठी आवश्यक झाले आहे. खरे तर देशी-विदेशी अस्मिता किंवा आग्रह यांना विशिष्ट वैचारिक सिद्धांताच्या चौकटीत पाहणे हीदेखील एक स्वतंत्र सांस्कृतिक-राजकीय प्रक्रिया असते. तसे असले तरी ही प्रक्रिया आधुनिकता, पौर्वात्यवाद आणि वसाहतवादाचा वारसा खांद्यावर घेऊनच वावरते, हे सत्य भारतीय इतिहासाचा अभ्यास करताना आपल्याला मान्य करावं लागतं. त्यामुळे पौर्वात्यवादाचा आणि वसाहतवादाचा अभ्यास करत, त्यातून उमगणाऱ्या वास्तवांना स्वीकारणं म्हणजे आपल्या स्वत:च्या आणि समाजाच्या भौतिक ‘स्व’रूपाच्या विकसनाचे व अस्तित्वाचे प्रामाणिक परिशीलनच समजायला हवे.

(लेखक ‘ऑब्झव्‍‌र्हर रीसर्च फाउंडेशन’ या संस्थेत वरिष्ठ संशोधक म्हणून कार्यरत आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2020 1:34 am

Web Title: orientalism and us itihasache chasme dd70
Next Stories
1 अफसाना लिख रही हूँ.. : ‘तू जो मेरे सूर में..’
2 नव्वदीचे बाबा!
3 मानियले बहुमता…
Just Now!
X