06 December 2019

News Flash

आमच्या काळी..

माझ्या शालेय कालखंडात झटपट क्रिकेट नव्हतं. निवांतपणे पाच दिवसांच्या टेस्ट मॅचेस् होत असायच्या. मध्ये एक दिवस सुट्टी. म्हणजे एकूण सहा दिवस एकेका सामन्याचा उत्सव चालायचा.

| April 14, 2013 12:38 pm

माझ्या शालेय कालखंडात झटपट क्रिकेट नव्हतं. निवांतपणे पाच दिवसांच्या टेस्ट मॅचेस् होत असायच्या. मध्ये एक दिवस सुट्टी. म्हणजे एकूण सहा दिवस एकेका सामन्याचा उत्सव चालायचा. अशा ऐसपस क्रिकेट सामन्याचं धावतं समालोचन त्या टीव्हीपूर्व जमान्यात रेडिओवरून व्हायचं. हे समालोचन बॉबी तल्यारखान, विजय र्मचट, सुरेश सरैया, अनंत सेटलवाड वगरे बुजुर्ग त्यांच्या फडर्य़ा इंग्रजीत करत असत. त्यामुळे आणि केवळ त्यामुळेच इंग्रजीचा सराव झाला. आम्ही पोरं दिवसाचे सहा-सात तास रेडिओसमोरच दिनचर्या आटोपत असू. गृहपाठच काय पण परीक्षेची तयारीसुद्धा आम्ही अशीच करत असल्यामुळे घरातले थोर पुरुष डाफरायचे. ते का चिडताहेत हे आम्हाला उमजत नसायचं आणि आम्ही रेडिओला चिकटून बॉल-टू-बॉल कॉमेंटरीच्या कोलाहलात अभ्यास करूच कसा शकतो हे त्यांना समजत नसायचं. या तिढय़ाला ‘जनरेशन गॅप’ असं इंटरनॅशनल नाव आहे हे नंतर कधीतरी कोणीतरी सांगितलं.
मुलं मोठी झाल्यावर एकदा त्यांना हे सांगितलं. चिरंजीवांनी विचारलं, ‘‘पण मुळात एक गेम तीन तासांत फिनिश करण्याऐवजी त्या वेळी सहा दिवस का वेस्ट करत असत?’’ म्हणजे त्यांचा दृष्टिकोन तिसराच!
एका पिढीतल्या जनतेला आधीच्या किंवा पुढच्या पिढीतल्या प्रजेची वर्तणूक किंवा विचारधारा अगम्य वाटण्याचं कारण म्हणजे त्या दोन गटांमधलं एका पिढीचं अंतर. पिढी म्हणजे साधारणपणे तीस वर्षांचा कालखंड. जनरेशन गॅप म्हणजे माझे आईवडील, मी आणि माझी मुलं यांच्या जाणिवा-नेणिवातली दरी! असं मी अजूनपर्यंत समजत होतो. पण हल्ली या समजुतीला हादरा बसायला लागला आहे. नुकताच इंजिनियर झालेला माझा धाकटा पुतण्या माझ्यासोबत आइस्क्रीम आणायला आला होता. शेजारीच एक कोचिंग क्लास होता. आइस्क्रीमची डिलिव्हरी होण्यापूर्वी क्लास सुटला. पंधरावीस विद्यार्थी आणि तितक्याच विद्यार्थिनी असा जथ्था हसत खिदळत बाहेर पडला. घोळक्या घोळक्यात नाही, एक मुलगा आणि एक मुलगी अशा जोडय़ांनी. मी आ वासला. पुतण्याही अचंबित झाला आणि म्हणाला, ‘‘आमच्या काळी असं नव्हतं. आम्हा मुलांचे गट असायचे. मुलींचे वेगळे ग्रुप्स असायचे. इतक्या लहान वयात..’’
मी विचारलं, ‘‘कितवीत असतील रे ही मुलं?’’
‘‘नववीत. एकाच्या हातातल्या वहीवर वाचलं.’’
‘‘म्हणजे चौदा-पंधरा वर्षांची आहेत. तुझ्यापेक्षा आठदहा वर्षांनीच तर लहान आहेत.’’
‘‘हो ना. पण आजकालच्या मुलांचं काही कळतच नाही.’’
आता मी आश्चर्यचकित झालो. म्हणजे हल्ली जनरेशन गॅपचा कालखंड तीस वर्षांवरून दहा वर्षांपर्यंत घसरलाय की काय?
माझ्या एका मित्राला पहिल्या मुलीनंतर तब्बल अकरा वर्षांनी दुसरी मुलगी झाली. गेल्या महिन्यात धाकटीच्या विवाहसोहळ्याची तयारी सुरू झाल्यावर एक दिवस थोरली तणतणत आमच्या घरी आली आणि म्हणाली, ‘‘काका, तुम्ही तरी मिनीला समजावून सांगा. काय एकेक फॅडं डोक्यात घेऊन बसलीय!’’
‘‘फक्त साधं रजिस्टर लग्नच करायचं म्हणतेय का? घरातलं शेवटचं कार्य आहे म्हणावं. होऊन जाऊ दे दणक्यात!’’
‘‘साधं? लग्नाची फिल्म काढायलाच हवी म्हणे.’’
‘‘अर्थातच! तुझ्याही लग्नाचं व्हिडीओ शूटिंग केलं होतं की.’’
‘‘हिच्याही लग्नाचं करायचंच आहे की. पण ही शहाणी तीन तासांची फीचर फिल्म काढायची म्हणतेय.’’
‘‘काय? खराखुरा अख्खा सिनेमा?’’
‘‘हो. हल्ली म्हणे नवऱ्या मुलाच्या आणि मुलीच्या घरी जाऊन लग्न कसं जमलं, घरी कोण कोण आहेत वगरे माहिती काढतात आणि त्यावरून फिल्मची स्टोरी लिहितात. मग एक डायरेक्टर सिनेमासारखं शूटिंग करतो. चार-पाच हिट गाण्यांवर नवरा-नवरीचे डान्स बसवतात. मुख्य वऱ्हाडी मंडळींकडून डायलॉग वदवून घेतात. रिटेकच्यावर रिटेक घेतल्यामुळे सप्तपदीची सत्तरपदी होते.’’
‘‘म्हणजे एकूण खूपच खर्चिक मामला असणार.’’
 ‘‘इव्हेंट मॅनेजमेंट फर्मला संपूर्ण सोहळ्याचं कॉन्ट्रॅक्ट द्या असा हट्ट धरलाय. चार दिवस सोहळा करणार म्हणे. आपल्यात मेहंदी, संगीत वगरे करतात का? पण ही खुळी करणार आहे. निमंत्रणपत्रिकेसोबत महागडी गिफ्ट पाठवणार. जेवणात किमान वीस स्वीट्स पाहिजेत. रिसेप्शनला स्टार अटेन्डन्स हवाच.’’
‘‘अरे बापरे! शाहरुख खानचा डान्स परफॉर्मन्स ठेवायचा हट्ट धरलाय की काय मिनीनं?’’
‘‘कमीतकमी दोनतीन हिंदी टीव्ही स्टार तरी पाहिजेतच म्हणे. आपली ऐपत काय याचा पाचपोचच नाही गधडीला. पपा डोकं धरून बसले तर हिनं सरळ तिच्या बँकेतून लोन काढलं. पगारातून हप्ता कापून घेतील म्हणे. पपांना किती वाईट वाटलं. वास्तविक तिचंही लग्न आपल्या पद्धतीनुसार व्यवस्थितपणेच करणार होते ते. पण मिनी म्हणते की तिच्या मत्रिणींची लग्नं ही अशीच होताहेत. या हल्लीच्या पोरींचा माइंडसेटच समजत नाही.’’
मी तडकाफडकी मिनीला फोन लावला. थोडक्यात प्रस्तावना केली. झापायला सुरुवात करणार तोच ती चित्कारली,
 ‘‘वॉव! म्हणजे आमचा ब्लॅक अँड व्हाइट टीव्ही थडकला का तुमच्या घरीही? या ओल्ड आँटीनं खरंच वात आणलाय. शी इज सच अ बोअर, यू नो! जग कुठे गेलंय आणि ही आमची विअर्ड काकूबाई अ‍ॅज इज व्हेअर इज बेसिसवर गेल्या सेंच्युरीतच स्टक अप झालीय. आय डोंट अंडरस्टँड हर अ‍ॅटिटय़ूड!’’
म्हणजे कन्फर्म झालं. जनरेशन गॅप आता दहा वर्षांवर आलीय.
मग प्रश्न असा पडला की जी जनरेशन गॅप शतकानुशतकं शिस्तीत एका पिढीचं अंतर राखून तिचं कार्य बिनबोभाट पार पाडत होती ती आत्ताच का अशी सटपटतेय? वयात केवळ दहा वर्षांचंच अंतर असणाऱ्या दोन माणसांना एकमेकांची विचारसरणी इतकी अगम्य का वाटतेय?
सायंकट्टय़ावर विषय काढला तेव्हा एकजण म्हणाला, ‘‘टीव्हीवर सेन्सॉरशिप बसवली पाहिजे. सिरियलमध्ये दाखवतात तेच लोकांना खरं वाटतं.’’
दुसरा म्हणाला, ‘‘लोक आत्मकेंद्री झालेत. दुसऱ्याचं मन जाणण्याची गरज वाटत नाही.’’
तिसरा म्हणाला, ‘‘मला वाटतं मुख्य कारण म्हणजे तंत्रज्ञानाचा भयानक वेगानं विकास होतोय. टीव्ही आला म्हणता म्हणता व्हीसीआर आला. पाठोपाठ केबल, इंटरनेट, डिश, आयफोन, टूजी, थ्रीजी झपाटय़ानं आले. मानवी जीवनामध्ये दर दहा वर्षांत उक्रांती होतेय. मानसिकताही त्याच वेगानं बदलणारच ना!’’
तितक्यात एका वडिलोपार्जति घरात तीन पिढय़ा सुखेनव नांदणाऱ्या एकत्र कुटुंबाचे अतिज्येष्ठ कुटुंबप्रमुख मिस्किलपणे डोळे मिचकावत म्हणाले, ‘‘पण एक महत्त्वाची गोष्ट तुमच्या नजरेतून सुटलीय.’’
‘‘कोणती?’’
‘‘आजी-आजोबा आणि नातवंडं यांच्यात ‘जनरेशन गॅप’ कधीच नसते.’’   

First Published on April 14, 2013 12:38 pm

Web Title: our old days
टॅग Cricket,Test Match
Just Now!
X