आज होळी. यानिमित्तानं कुणाच्याही नावानं बोंब ठोकता येते. यंदा तर निवडणुकांचा सीझन असताना होळीचे रंग अधिकच गहिरे न झाले तरच नवल. पक्षोपक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांनी होळीअगोदरच परस्परांच्या नावानं राजकीय शिमगा सुरू केलेलाच आहे. त्यातलेच काही रंग.. खास आपल्या मातीतले.. तिरकस लोकधाटणीतले..  
होळीच्या दिशी सक्काळसकाळी ‘होळी रे होळी.. पुरणाची पोळी’ अशी गगनभेदी गर्जना ठोकतच आम्ही घराबाहेर पडलो! तेव्हा आमच्या मुखावर साक्षात् खुलीकॉलर निर्भयता होती! दोन्ही डोळ्यांत सिकंदरी रंगिझग होती व हातात शंभर ग्राम इकोफ्रेंडली गुलालाची पुडी होती!
मनी म्हटले,
आता खुश्शाल येऊ देत रंगांचे बाण,
फुटू देत पिशव्यांतले पाणीबॉम्ब,
पडू देत गुलालाचे मूठ मूठ गोळे,
होऊ देत गटारजलाचे ड्रोन हल्ले..
आम्हांस त्याची किंचितही तमा नाही!
कशी असेल? वाचकहो, फिकीर असेल तरी कशी?
बाहेर पडताना सर्वागावर तब्बल एक रुपयाची खोबरेल तेलाची बाटली संपूर्ण रीती केली होती. सलग दोन वष्रे बोहारणीने नाकारलेला बुशशर्ट व पँट नेसली होती. नेत्ररक्षणाकरिता मेव्हण्याने दिलेला काळा गॉगल घातला होता. कानात कापसाचे बोळे होते. बायको ‘नाकातही घाला’ म्हणत होती. पण आम्ही ते टाळले!
तर अशा झेड प्लस बंदोबस्तात ‘रंग बरसे भिगे चुनरिया’पासून सदाबहार ‘व्हळी रे व्हळी’पर्यंत विविध भावगीतांचा एफेम मनात लावून आम्ही रंग उधळण्यास घराबाहेर पडलो.
बाहेर पाहतो तो काय, इकडे तिकडे चोहीकडे ‘सुरंगांच्या डोही सुरंग तरंग’ ऐसा माहोल होता! गल्ली-गल्लीतून, चाळी-चाळींतून सतरंगी इंद्रधनुष्ये साल्सा करीत होती. रस्ते रस्ते नव्हते! पाब्लोदा पिकासोचे क्यानव्हास होते! माणसे माणसे नव्हती! सारे रणबीर होते.. सगळ्या दीपिका होत्या!! ती रंगमयी दुनिया पाहून आमच्या तर काळजाच्या (की पोटाच्या? नक्की स्मरत नाहीये!) खोल खोल आतून अगदी उन्मळून आले. गळा दाटून आला. डोळ्यांत (की तोंडात? हेही नेमके आठवत नाहीये!) चरचरून पाणी आले. अखेर हळूच बाजूच्या कट्टय़ावर आम्ही खिनभर टेकलो..
त्या भरात आम्ही आमचे तिसरे (की चौथे?) स्वातंत्र्यवीर मामु (पक्षी : माजी मुख्यमंत्री) अरविंदभाई केजरीवाल यांच्या निवासस्थानी कसे पोचलो, तेही आम्हांस समजले नाही.
दरवाजातूनच आम्ही त्यांना ‘हॅप्पी (प ला प!) होली’ म्हणून हाळी दिली.
आम्हांस पाहताच ते खुद्कन खोकले.
‘‘काय, खोकला अजून सुरूच का? कुछ काढाबिडा लेते क्यूं नहीं?,’’ आम्ही काळजीने त्यांस म्हणालो,‘‘काढा मालूम है ना? म्हंजे काय करायचं बरं का, थोडं गरम पाणी घ्यायचं. त्यात थोडासा ओवा, थोडी खडीसाखर, अद्रक, दालचिनी, तुलशी के पत्ते असं काय काय घालायचं..’’
‘‘थ्यँक्यू जी. पण सध्या मी हे घेतो.’’ त्यांनी बाजूचा स्टीलचा ग्लास दाखवला.
‘‘काय आहे त्यात?’’
हे उपोषणवाले आणि स्टीलचा ग्लास असं काही एकत्र पाहिलं की आमच्या मनात कली किंवा लालूप्रसादच शिरतात.
‘‘अद्रक मार के बिगर चाय, जी!’’ ते तोंड कडवट करत म्हणाले.
त्या बिगर चायवर चर्चा पुढे सुरू ठेवत आम्ही पुसले, ‘‘आज होळी. तुमची काही तयारीबियारी दिसत नाही!’’
‘‘आहे ना जी. कैमलवाल्यांना सांगून ठेवलंय..’’
‘‘कैमल? तुम्ही उंटावरून होळी खेळणार की काय? नाही म्हणजे तुम्हाला शोभूनच दिसेल ते! पण..’’
‘‘नहीं जी. तसं नाही ते. कैमल इंकवाल्यांना सांगून ठेवलंय- शाईचे दोन टेम्पो पाठवून द्या म्हणून. येतीलच इतक्यात.’’
‘‘म्हणजे तुम्ही शाईची होळी खेळणार.’’
‘‘हां जी. त्याचं खास ट्रेिनग दिलं आहे आमच्या कार्यकर्त्यांना.’’
‘‘ट्रेिनग?’’ होळी खेळण्याचे प्रशिक्षण हा अद्भुतच प्रकार वाटत होता.
‘‘हां जी. नेमबाजीचं ट्रेिनग! शाई नेमकी तोंडावर कशी फेकायची, मग मार न खाता नेमकं पोलिसांकडं कसं पळायचं, अशा विविध गोष्टी त्यात आहेत.’’
‘‘वा!’’ आम्हांस अन्य शब्द सुचला नाही.
‘‘हे तर काहीच नाही जी. आपल्यावर फेकलेली शाई कशी चुकवायची, याचे तर खास क्लास घेतलेत आम्ही. स्वत: योगेंद्रभाईंनी याचा अभ्यासक्रम तयार केला आहे!’’
‘‘वा!’’ आपण काय बोलणार?
अरिवदभाई बोलतच होते, ‘‘आपण फेकलेली शाई आपल्याच चेहऱ्यावर उडू नये म्हणून यापुढे अण्णा टोपीऐवजी माकडटोपी वापरावी काय, असाही एक सुझाव आला आहे. तो आजच आम्ही वेबसाइटवर टाकणार आहोत..’’
हे ऐकले आणि एकदम आमच्या मस्तकातील एलईडी पेटला!
मनी म्हटले, शाई टाकणारे हेच लोक, शाई झेलणारेही हेच लोक.. म्हणजे ही तर लोक-शाई होळी!!
आता आपल्या चेहऱ्यावर कोणी शाई टाकायच्या आतच आपण निसटावे असे मनी आणून आम्ही तेथून निसटलो.
जाता जाता काय चाललेय युवराजांचे हे अवलोकावे म्हणून आम्ही आमची पदकमले दश जनपथी वळवली.
पाहतो तो काय, बंगल्याच्या हिरव्या तटक्यांच्या आत एक्या अंगास म्याडमजी, दिग्गीराजा, ताईसाहेब, मेहुणेसाहेब अशी खाशी मंडळी खुच्र्या मांडून बसली होती. हिरवळीवर युवराजांची होळी रंगात आली होती. एकटेच खेळत होते!
आम्हांस पाहताच ‘बुरा न मानो होली है’ असे गंभीरपणे म्हणत त्यांनी हातीचा गुलाल आमच्या दिशेने भिर्रकन् भिरकावला.
पण तो त्यांच्याच डोळ्यांत गेला!
बहुधा हवा फिरली असावी!
त्यांनी खमिसाच्या बाहीने डोळे पुसले. सात्विक संतापून हातांच्या बाह्या वर केल्या. मग हाती पिचकारी घेतली. एक पाऊल मागे घेतले. दुसरे गुडघ्यात वाकवून पुढे ठेवले. अशी खांद्यालगत पिचकारी आणून नेम धरला अन् सर्रकन् आमच्यावर रंग उडवला.
पण तो त्यांच्याच अंगावर उडाला!
त्यांना काय होतेय हे काही कळेनाच.
अखेर म्याडमजीच पुढे आल्या. म्हणाल्या, राहू दे आता रंग उधळणं. हवा फारच फिरलेली आहे!
ताईसाहेबांच्या डोळ्यांत तर अश्रूच आले. त्या म्हणाल्या, हो ना. खूपच हवा फिरली आहे. दादाने तोंडातून काही शब्द काढला तरी तो फिरून त्याच्याच अंगावर येतो!
दिग्गीराजाही ट्विट करावे तसे बोलले. म्हणाले, त्या मुलाखतीच्या दिवशीही अशीच हवा होती बहुतेक!
त्यावर युवराज आणखीच सात्विक संतापले. म्हणाले, आपण महिलांचे सबलीकरण करणे गरजेचे आहे!
त्यांच्या या सबलीकरणाचा आणि होळीचा नेमका काय संबंध, हे गणित काही आमच्या लक्षात आले नाही. ते कदाचित म्याडमजींच्या ध्यानी आले असावे म्हणून आम्ही पाहिले, तर त्या स्वत:च ताईसाहेबांकडे पाहत होत्या.  
ते पाहून आम्ही समजलो, की आता येथून सटकावे.
सटकलो ते थेट भाजपच्या कार्यालयातच पातलो.
तेथील रंग काय वर्णावा महाराजा! जगातील अवघा तानापिहिनिपाजा जणू एकच झालेला! कार्यालयाच्या आवारातील मंडपी विविध रंगांचे ढीग मांडलेले. खुद्द भाजपचे वडाप्रधानपदना उम्मेदवार महामहिम नमोजी तेथे उभे. आम्ही त्यांस नमस्कारीले. उगवत्या सूर्यास नमस्कारणे ही तो आपली संस्कृती!
त्यांनी आमच्याकडे पाहिलेही नाही. कसे पाहणार? गुजरातचे ते विकासपुरुष महाराष्ट्राचे विकासक जे की रा. रा. नितीनभौ गडकरी यांच्याशी बोलण्यात व्यग्र होते. दोघांचेही ध्यान त्या रंगांत लागलेले होते.
अखेर नमोजी एका कार्यकर्त्यांस म्हणाले, ‘‘आ करो, त्या भगव्यामध्ये हवे थोडा ब्लू रंग टाका.’’
गडकरी म्हणाले, ‘‘आधीच टाकलाय ना वो ब्लू! दोन जागांना पडला नं तो आपल्याला!’’
त्यावर जराही विचलित न होता नमोजी म्हणाले, ‘‘हवे ये करो. स्मोल क्वोंटिटीमधी लिला.. एटले तुमचा तो हिरवा रंग टाका.. हवे ज्युओ, कोण्ता रंग झाला तो?’’
गडकरींनी पाहिले. भगवा अधिक निळा अधिक हिरवा. हे मिश्रण त्यांना ओळखीचे वाटत होते. कुठे बरे पाहिले ते? मग अचानक त्यांना आठवले, अरे हा तर काँग्रेसी रंग! ते चक्रावलेच!
त्यांची ती गूढ मूढावस्था पाहून नमोजी गालातल्या गालात हसले आणि म्हणाले,
‘‘गडकरीसाहब, आ विकासना रंग छे! आला का ध्यानमधी? हवे आ रंग घ्या नि सगळे मिळून होली खेळा!’’
आता पुढची काही वष्रे या होळीची िझग काही उतरणार नाही, हे जाणून आम्ही तेथून बाहेर पडलो.
तर अगदी तश्शीच होळी इकडे कृष्णकुंजीही रंगली होती. महाराजसाहेबांचे सगळे शिलेदार कमरेचा पट्टा कसून जय्यत तयारीने आले होते. न येऊन सांगणार कोणास? स्वत: महाराजसाहेब आज सक्काळची वेळ असूनही जातीने खाली उतरले होते. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीचाच संताप होता. म्हणजे साहेब चांगलेच नॉर्मल मूडमध्ये होते!
चौथ्यांदा हातातील रुमाल नाकातोंडास लावून ते म्हणाले, ‘‘चला, चला. आता फायनल रिहर्सल. यावेळी कोणी चुकला ना, तर मात्र अजिबात गय करणार नाही! पायगुडे हात कुठे आहेत तुमचे?.. मग हातात घ्या ना रंग! हं. बाळाजी, तुम्ही असे समोर उभे राहा.. अरे, ते भाजपवाले कुठं गेले?.. या इकडं. तोंड लपवून हसताय काय? विनोद चाललाय काय?.. हं. बाळाजी, आता तुम्ही या शेलारमामांच्या मागे उभे राहा. राहिलात? हं. आता असा गुपचूप हात बाहेर काढा. स्वत:च स्वत:ला टाळी द्या आणि फेका रंग.. मारा पिचकाऱ्या.. फोडा फुगे! समोरच्याचे बरोब्बर खळ्ळ खटॅक झाले पाहिजे!’’
‘‘समोरच्याचे म्हणजे?’’
‘‘तुमच्यासमोर कोण उभं आहे, बाळाजी?.. त्यांचे!’’
‘‘असं.. असं. आम्हाला वाटलं.. असो!’’ बाळाजी हळूच म्हणाले.
महाराजसाहेबांच्या आदेशानुसार सगळे होळीची प्रॅक्टिस करू लागले. महाराजांनी पुन्हा रुमाल काढला तसे आम्ही त्यांना सामोरे गेलो.
‘‘नमस्कार!’’
साहेबांनी हात वर केला- न केला असे केले.
‘‘होळीची तालीम चाललीय वाटतं..!’’ आम्ही पुसले.
‘‘डोळे आहेत ना?’’ साहेबांनी प्रतिसवाल केला. पण तेवढय़ाने आम्ही कसले खचून जातोय? इतके दिवस पत्रकारितेत राहून एवढी कातडी कमावली, ती काही उगाच नाही!
‘‘नाही म्हणजे, होळीची तालीम म्हणजे जरा विचित्रच वाटतं ना!’’
‘‘त्यात काय विचित्र? हे होळीचे नवनिर्माण आहे. महाराष्ट्रात आजवर कोणीही खेळलेली नाही अशी होळी! ती कुणाच्यातरी आडून आडून खेळायची असते..’’
‘‘व्वा! चांगलये!.. काय नाव म्हणालात हिचं?’’
‘‘ते सर्व मी योग्य वेळी सांगणारच आहे. पण हिला ‘आडमोदी होळी’ म्हणतात!’’
आता ही होळी का खेळली जाते? कोणाच्या आडून खेळली जाते? त्यात रंग कोणावर टाकायचा असतो? तिची ब्लूिपट्र असते का? असे विविध सुलभ प्रश्न आमच्या मनी तरळू लागले होते. त्यातील एखादा तरी सवाल टाकून पाहावा काय, असा विचार आम्ही करीतच होतो, तोच आमच्या श्रीमुखावर सप्पदिशी फुगा फुटला.. नाकातोंडात पाणी गेले.. श्वास गुदमरला.. हातपाय झाडीतच आम्ही उठलो..
पाहतो तो काय.. हाती तांब्या घेऊन ही आम्हांस गदागदा हलवत म्हणत होती, ‘‘मेलं, सोसत नाही तर घेता कशाला एवढी?’’
त्यावेळी चाळीत होळी रंगात आली होती. डीजेवर गाणे ढणाणत होते..
जय जय शिवशंकर, काटा लगे ना कंकर, के प्याला तेरे नाऽऽऽऽम का पिया..