पं. राजा काळे – rajakale1952@gmail.com

रागरूपाची कविता करून पं. जसराज यांनी राग गायले. आपले संगीत धूनप्रधान आहे. त्याचे शास्त्र नंतर झाले. सुरांची कविता गायल्याशिवाय रागाची धून साकारता येणे कठीण आहे, हे पंडितजी पुरेपूर जाणून होते. म्हणूनच ते हृदयस्पर्शी व सौंदर्यपूर्ण गायकीचा मानदंड प्रस्थापित करू शकले.

Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
anil kakodkar pune, indian nuclear physicist anil kakodkar
भारतातील संशोधन ‘नावापुरते’ असे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर का म्हणाले?
Controversy on Ramayana
सीतेच्या हातून रावणाला गोमांस, हनुमानाचं विकृत चित्रण, विद्यापीठातील नाटकाचा वाद आहे काय?
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…

ओम श्री अनंत हरी नारायण ।।

मंगलम् भगवान विष्णू मंगलम् गरुड ध्वजा मंगलम् पुंडरिकाक्षो मंगलाय तनो हरी ।।

तंबोऱ्याच्या सुरेल झंकारात स्वरमंडलाच्या झणत्काराने आपल्या गायनाची धीरगंभीर सुरुवात करणारा आणि श्लोकातील आकार, अकार, इकार, उकार आणि मकार यांचा रागाच्या सुरावटीत कलात्मक वापर कसा करावा याचं दर्शन घडवणारा मधुर, जादूई स्वर हरपला. गुरुवर्य पंडित जसराजजी गेले. एका सांगीतिक युगाचा अंत झाला. इहलोकीचे सूर सुखनिधान असणारे पंडितजी स्वर्गलोकात सुरांचा आनंद देण्यासाठी आपल्यातून निघून गेले. ज्या मंगलम् विष्णूचे ध्यान व गान त्यांनी आयुष्यभर अपार भक्तीने केले, त्या भगवान विष्णूनेच आलिंगन देऊन स्वर्गलोकात त्यांचे स्वागत केले असणार आणि तिथेही आपल्या गाण्याचा त्यांनी समा बांधलाच असणार.

गाण्यात, विशेषत: शास्त्रीय संगीतात आपल्या भावसौंदर्य प्रस्तुतीने समा बांधणारे थोर युगपुरुष गायक गेल्या ५० वर्षांत मी अनुभवले आणि एक संगीतसाधक म्हणून त्यांच्या गाण्याचा प्रभाव  माझ्या मनावर राहिला ते थोर गुरुवर्य पं. जितेंद्र अभिषेकी, पं. कुमार गंधर्व, पं. जसराज व  पं. भीमसेन जोशी.. ज्यांची  गायनशैली, सांगीतिक विचार आणि त्यांच्या रचना माझ्या दैनंदिन अभ्यासाचा विषय राहिला..

अतिशय प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत अथक परिश्रमांनी जसराजजींनी आपले गाणे  समृद्ध केले. प्रत्येक गायकाची समा बांधण्याची स्वतंत्र शैली होती. एक गानप्रतिज्ञा होती. आणि स्वत:च्या सांगीतिक विचारांवर पूर्ण निष्ठा ठेवून, गुरुजनांचा आणि सांगीतिक परंपरेचा आदर राखून त्यांनी आपले सांगीतिक विचार व गायनशैली उच्च शिखरापर्यंत पोहोचवली व स्वत: एक उत्तुंग शिखर आहोत हेही सिद्ध केले.

माझ्या सांगीतिक यात्रेच्या प्रारंभापासूनच भावसौंदर्यवादी गाण्याचे आकर्षण मला जसे सिने-संगीतातील रागदारी संगीतावर आधारित अनेक रचनांचे राहिले; तसेच शास्त्रीय  संगीतातील युगपुरुष गायकांची भावसौंदर्यवादी गायकी आणि नावीन्यपूर्ण रचनांनी मला वेड लावले. हा कालखंड १९६८ ते १९७३ दरम्यानचा होता. १९६८ ला पं. जसराजजींच्या गायनाने मी मोहित होऊन त्यांचा भक्त झालो त्याला कारण होत्या- नट भैरव, हंसध्वनी, शुद्ध बरारी, शुद्ध नट, पूरिया, बिलासखानी तोडी, गोरख कल्याण, अडाणा या रागांमधील ध्वनिमुद्रिका!

पं. जसराजजींचे आणि पं. अभिषेकींचे मराठवाडय़ाशी विशेष ऋणानुबंध राहिले आणि सतत कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांचे येणेही नेहमीच व्हायचे. पंडितजींची आणि माझी प्रत्यक्ष भेट ते बीडच्या कार्यक्रमासाठी आलेले असताना औरंगाबादला झाली. बीड येथील पंडितजींच्या गाण्यावर विशेष प्रेम असलेले व त्यांच्या सांगीतिक संघर्षांच्या काळातील त्यांचे आश्रयदाते गोपाळराव देशपांडे यांच्या घरची बैठक.. मैफिलीआधी मी ज्या रेकॉर्डची अनेक पारायणं केली त्या राग हंसध्वनीमधील ‘पवन पूत हनुमान’ ही बंदिश त्यांना ऐकवली. ती ऐकू न अग्निहोत्री गुरुजींना ते म्हणाले, ‘राजा को मेरे पास भेज दो!’ पण माझ्या जीवनात गुरुवर्य पं. अभिषेकींकडेच शास्त्रीय संगीत शिकण्याचे योग होते. कारण पं. जसराजजींइतकेच अभिषेकीबुवांच्या चतुरस्र गायकीवर माझे प्रेम व श्रद्धा जडली होती.

भारत सरकारच्या संस्कृती विभागाच्या शिष्यवृत्तीकरिता जेव्हा मी अर्ज केला तेव्हा पं. जसराजजींनीच मला शिफारसपत्र दिले होते. मी त्यांना म्हटले, ‘मैं आप के पास प्रत्यक्ष रूप में गाना सिखने नहीं आ पाया।’ त्यावर त्यांचे उत्तर फार उमदेपणाचे होते.. ‘खैर.. राजा, तुम इस संगीत की दुनिया में तो हो।’ अशा अनेक प्रसंगांतून त्यांच्या जिंदादिलीचे दर्शन मला वारंवार घडत राहिले.

पं. जसराजजींच्या अनेक मैफिली मी आवर्जून ऐकल्या आणि त्यांना तंबोऱ्यावर स्वरसाथ देण्याचाही योग आला. त्यातील जालना येथील एक अविस्मरणीय मैफल! तबल्यावर गोपाळ वाडेगावकर होते व पेटीला अप्पा जळगावकर.  सुरुवातीला राग आसा मांड, खमाज बहार, दरबारी कानडा अजूनही मला प्रेरणादायी वाटतात. आसा मांडसारख्या रागात दुर्मीळ असणारा विलंबित ख्याल ‘तुम बिन कौन मेरा पालनहार’ व मध्यलय त्रितालातील ‘काहे गुमान करत हो कर रही’ या रचनांची त्यांची अतिशय सौंदर्यपूर्ण प्रस्तुती माझ्या मनात कायमची रेकॉर्ड झाली आहे. आसा मांड रागाचे वैभव व सौंदर्यशाली दर्शन घडवणाऱ्या युगपुरुष गायकांमध्ये पं. जसराजजींनी आपल्या अनोख्या ढंगाने व स्वर-लगावाने या रागाला फारच देखणे केले होते. शास्त्रीय संगीतशास्त्राला अवचेतन मनात (सबकॉन्शस माइंड) ठेवून त्याचे कलेत रूपांतर कसे करायचे याचा प्रत्येक मोठय़ा कलाकाराने आपला आपला विचार केलेला आहे. त्यात पंडितजींनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे. प्रत्येक रागावर आपली स्वत:ची वेगळी गुंजाईश निर्माण करून त्या रागात आपली नाममुद्रा उमटवली आहे. रागरूपाची कविता करून त्यांनी राग गायले. आपले संगीत धूनप्रधान आहे. त्याचे शास्त्र नंतर झाले. सुरांची कविता गायल्याशिवाय रागाची धून साकारता येणे कठीण आहे, हे पंडितजी पुरेपूर जाणून होते. म्हणूनच ते हृदयस्पर्शी व सौंदर्यपूर्ण गायकीचा मानदंड प्रस्थापित करू शकले.

बंदिश आकर्षक कशी ठेवावी, रागातील  स्वरनाटय़ कसे ठेवावे, भावसौंदर्याची त्याला कशी जोड द्यावी याचा त्यांचा अनुभव समृद्ध करणारा होता. गुरुवर्य अभिषेकींच्या आणि पं. जसराजजींच्या गायकीतल्या अशा काही गोष्टी समांतर, पण भावसौंदर्याचे वेगळे वैशिष्टय़ जपणाऱ्या राहिल्या.

गुरुवर्य अभिषेकींबद्दल, त्यांची गानशैली व परंपरेचा बाज ठेवून केलेल्या नावीन्यपूर्ण रचनांबद्दल पंडितजींना विशेष प्रेम होते. ‘प्रेम वरदान स्मर सदा’सारखी अनेक नाटय़गीते त्यांना खूप आवडायची. मी जरी प्रत्यक्ष त्यांचं गाणं शिकू शकलो नाही तरी मी त्यांना गुरुस्थानी मानतो हे ते जाणून होते. एका परंपरेत राहून आपल्या गुरूंच्या समकालीन युगपुरुष गायकांच्या सहवासातून, मैफिलींतून, ध्वनिमुद्रणाच्या माध्यमातून आणि रचनेतून मी त्यांच्या गानशैलीचा शक्य तितका व्यासंग केला. तो अजूनही सुरूच आहे.

अभिजात संगीताला आपल्या भावसौंदर्यपूर्ण गानशैलीने भारावून टाकणारे व आपल्या पद्धतीने रागाची धून साकारणारे, माझ्या दैनंदिन व्यासंगाचा विषय असणारे हे सर्व युगपुरुष गायक संगीताचे ‘सूर सुखनिधान’ असणारेच होते. प्रत्येकाची सूर सुखाचा आविष्कार करायची पद्धत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणे, त्यांनी ठेवलेल्या गुरुजनांच्या आदर्शाप्रमाणे वेगळी होती. त्यांनी आपले सांगीतिक विचार पुढे नेण्यासाठी केलेला संघर्ष वेगळा होता. त्या संघर्षांत तावूनसुलाखून निघाल्यानंतरचे पडलेले प्रतिबिंब त्यांच्या गाण्यात जाणवायचे. गुरुवर्य अभिषेकी व भीमसेनजींचे गाणे एकीकडे अत्यंत तरल संवेदनांचे, वीररसाचे व पौरुषी आविष्कार घडविणारे राहिले, तर कुमारजींचे गाणे एकीकडे रोमँटिसिझमचे, सौंदर्यवादी असले तरी ‘शोकपिया’ हे नामाभिधान सार्थ करणारे व संगीताचा धर्म अत्यंत आर्ततेने व्यक्त करणाऱ्या संगीताच्या एका धर्मोपदेशकाचे, तर प्रसन्नचित्त पं. जसराजजींचे गाण्याचे सूरसुख हे अत्यंत मोहक, मधुर, लाघवी व आर्जवी सुरांची कविता गाणारे, देखणे होते. श्रीकृष्णाच्या मधुराष्टकाप्रमाणे पं. जसराजजींचे सर्वच मधुर होते. जसे- ‘अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपतेराखिलं मधुरं, गीतं मधुरं, पीतं मधुरं, भुक्तम मधुरं, रुपम मधुरं, तिलकं मधुरं मधुराधिपतेराखिलं मधुरं..’

पंडितजींच्या ख्यालाचा उत्तर भारतीय गायकीचा लहेजा व बाज ख्यालाची ‘आन-बान-शान’ राखणारा वाटायचा. गाण्यातील लयतत्त्व व त्यामुळे गाण्यात आलेला सुकून, अस्सल उत्तर भारतीय सांगीतिक उच्चारण तसेच त्याला भावसौंदर्याची जोड यामुळे त्यांची ख्यालगायकी एका राजेशाही (मॅजेस्टिक) दर्जाची व देखणी राहिली. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अनुरूप असलेली अतिविलंबित- जवळपास ६० ते ७५ सेकंदाचे आवर्तन असणारी लय घेऊन ते ख्याल भरायचे. एखाद्या कुशल खेळियाप्रमाणे आपल्या सुरांचा लय-तालाशी सुसंवाद ठेवत त्यातील स्वरनाटय़ जागवत रागाचा सहज आणि  देखणा आविष्कार ते करायचे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील जिंदादिली व गाण्यातले सौंदर्य जेवढे मोहक, तेवढेच गंभीरही भासत असे.

गाण्याचे गाणेपण व सौंदर्यवाद काय असतो, हे ज्या ज्या थोर गायकांनी शिकवले त्यामध्ये जसराजजींचे वेगळेपण संगीतसाधकांना प्रेरणा देणारे, आदर्शवत वाटेल. गायक होण्यापूर्वीची त्यांची वाटचाल एक तबलावादक म्हणून असली, तरीही आपल्या गाण्यात लयकारीच्या आहारी जाऊन त्यांनी आपले गाणे कधीही रूक्ष, नीरस केले नाही. रागशास्त्र त्यांना माहीत होते, पण त्यावर कधी अनावश्यक चर्चा न करता गाण्याचे गाणेपण रूहदारीने जपण्यावरच त्यांचा जास्त भर राहिला. त्याला स्वाभाविक अशी अंगभूत लयकारी जितकी गरजेची व अनुरूप राहील, तितकीच त्यांच्या गाण्यात दिसायची.

‘सत्यं ब्रूयात, प्रियं ब्रूयात’ हे तत्त्व त्यांनी जीवनात ठेवले होते. जीवनात सकारात्मकता ठेवून संवाद साधणे हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वातला अत्यंत महत्त्वाचा पैलू होता. आणि या वृत्तीमुळेच ते प्रचंड लोकसंग्रह करू शकले. कलाकाराचे व्यक्तिमत्त्व व कला कशी असावी याचा ते आदर्श होते. शास्त्र आणि कलेच्या पलीकडे जाऊन सूर सुखनिधान असणाऱ्या या आनंदसूर्याने गेली सात दशके श्रोत्यांना दैवी आनंद आणि फक्त आनंदच दिला. परमेश्वराला ‘रसो वैस:’ म्हटले आहे. सर्व

रसांची परिपूर्ती शांतरसात होते असे संत ज्ञानेश्वरांनी सांगितले आहे. पंडितजी स्वत:च ‘रसराज’ होते आणि त्यामुळे कुठलाही राग त्यांनी गायला तरी शांतरसाची अनुभूती रसिकांना नेहमीच मिळत असे.

रागदारीची कविता गाणारे, ख्यालाच्या देखणेपणाचा आदर्श असणारे त्यांचे गाणे येणाऱ्या अनेक पिढय़ांना, संगीतसाधक आणि कलाकारांना प्रेरणा देणारे राहील. तसेच जनताजनार्दनाच्या हृदयात कोरलेले राहील.

त्यांना माझी विनम्र श्रद्धांजली व त्यांच्या पावन  स्मृतीस कोटी कोटी प्रणाम!