‘लोकरंग’मधील (३ मार्च) ‘कोन्हाची म्हैस, कोन्हाले उठबैस’ हा लेख वाचून चांगलीच करमणूक झाली! एका वाहिनीवर ‘बोलीभाषेचा जागर’ या कार्यक्रमांतर्गत जळगाव जिल्ह्य़ाच्या पूर्व भागात जेथे लेवा गणबोली सर्रास वापरली जाते, त्या भागात ‘तावडी बोली’ बोलली जाते असा शोध लावलेला होता. या दोन्हीचे कर्तेधर्ते आहेत ‘पाडा’, ‘कुम्ड’, ‘कुंधा’ या तावडी भाषेतल्या कादंबऱ्यांचे लेखक अशोक कौतिक कोळी! या कादंबऱ्यांमुळे तावडी भाषेला ओळख मिळाली आणि लेखकालाही! पण तावडी भाषेची हवा कानात शिरल्याने त्याच अभिनिवेशात जेथे लेवा गणबोली बोलली जाते, त्या प्रदेशात तावडी बोलली जात असल्याचा या लेखकाला साक्षात्कार झाला. हे करत असताना आपण वडाची साल पिंपळाला जोडत आहोत याचे भान त्यांना राहिले नाही.
अहिराणी बोली नुसत्या पश्चिम खानदेशात बोलली जात नाही, तर पूर्व खानदेशात- म्हणजे जळगाव जिल्ह्य़ाच्या पश्चिम भागातही बोलली जाते. लेवा गणबोली जळगाव जिल्ह्य़ाच्या पूर्व भागात बोलली जाते. तावडी पाचोरा आणि जामनेर तालुक्याचा दक्षिणेकडील- म्हणजेच अजिंठा डोंगराकडील प्रदेशातच बोलली जाते. अन्यत्र कोठेही ती बोलली जात नाही.
जळगाव जिल्ह्य़ाच्या पूर्व भागात आणि मलकापूर तालुक्यात सर्वत्र लेवा गणबोली बोलली जाते. तापी, पूर्णा, वाधुर आणि गिरणा या नद्यांच्या प्रदेशात शेतीव्यवसाय असलेल्या लेवा पाटीदार समाजाची वस्ती आहे. या व्यवसायात मदतनीस असणाऱ्या बारा बलुतेदारांनीही हीच बोली संपर्कभाषा म्हणून स्वीकारली आहे. म्हणूनच तिला ‘लेवा गणबोली’ असे संबोधले जाते. मात्र, जळगाव जिल्ह्य़ाच्या पूर्व भागात आणि मलकापूपर्यंतच्या परिसरात तावडी बोलली जाते, हा लेखकाचा जावईशोध धक्कादायक आहे. जळगाव जिल्ह्य़ातील उत्तर जामनेर, भुसावळ, जळगाव, रावेर, यावल, मुक्तानगर, तसेच मोताळा, मलकापूर, मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर, शहापूपर्यंतचा भूप्रदेश लेवा गणबोलीचा बालेकिल्ला आहे. तेथे तावडीचा काहीही संबंध नाही.
लेवा गणबोली ही समाजजीवनाशी एकरूप झालेली आहे. या भाषेला स्वत:चे सौष्ठव आहे. गोडवा आहे. शब्दांमध्ये नाद आहे, लय आहे. खास लहेजा आहे. तिला व्याकरण आहे. अशोक कोळी जिला तावडी समजतात, ती लेवा गणबोली आहे. त्यांना अपेक्षित असलेली तावडी जामनेर व पाचोरा तालुक्याचा जो अजिंठा डोंगराजवळचा प्रदेश आहे, तेथेच बोलली जाते; इतरत्र नाही.
नि. रा. पाटील आणि ऊर्मिला पाटील यांनी ‘लेवा गणबोली कोश’ तयार केला आहे. त्यात लेवा बोलीचा संपूर्ण इतिहास व्याकरणासह दिलेला आहे. शब्द आहेत, म्हणी आहेत, वाक्प्रचार आहेत. या पुस्तकाला २००६ चा महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा पुरस्कारही प्राप्त झाला आहे. हा कोश अशोक कोळी यांच्या वाचनात न आल्यामुळे कदाचित त्यांनी ही गल्लत केली असावी.
 ‘पीपल्स लिंग्विस्टिक सव्‍‌र्हे ऑफ इंडिया’तर्फे भाषा सर्वेक्षण प्रकल्प हाती घेण्यात आला होता. त्यांनी महाराष्ट्रातील सर्व बोलीभाषांचा सव्‍‌र्हे केला. त्यात बोलीभाषा, त्यांचे स्थान, त्यांची वैशिष्टय़े या साऱ्याचा ऊहापोह केलेला आहे. ‘भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण : महाराष्ट्र’ या नावाने (संपादक डॉ. गणेश देवी, प्रकाशक : अरुण जाखडे, पद्मगंधा प्रकाशन, पुणे) हा ग्रंथ प्रसिद्ध झाला आहे. त्यात महाराष्ट्रातील सर्व भाषांचे सर्वेक्षण केलेले आहे. ते असे-
बोली आणि भाषा : मराठी आणि मराठीची रूपे- १) मराठी, २) अहिराणी, ३) आगरी, ४) खानदेशी लेवा, ५) चंदगडी, ६) झाडी, ७) पोवारी, ८) कोहळी, ९) तावडी, १०) मालवणी, ११) वऱ्हाडी, १२) वाडवळी , १३) सामवेदी, १४) संगमेश्वरी. याशिवाय आदिवासींच्या २० भाषा आणि भटक्या-विमुक्तांच्या २४ भाषा अशा एकूण ५४ भाषांचा अभ्यास केलेला आहे.
‘बहिणाबाई चौधरी, भालचंद्र नेमाडे, के. नारखेडे, श्रीराम अत्तरदे या लेवा समाजाच्या लेखकांनी तावडी भाषेत लेखन केलेले आहे,’ असे म्हणत अशोक कोळी यांनी षट्कारच मारला आहे. बहिणाबाई चौधरी यांची ‘बहिणाबाईची गाणी’, रुक्मिणीबाई पाटील यांचे ‘रुक्मिणीगान’, भानू चौधरी यांची ‘गावाकडली गाणी’, भा. लो. चौधरी यांचे  नाटक ‘मरी जाय जो’, अ. कृ. नारखेडे यांचा नाटय़छटासंग्रह -‘खान्देशी खुडा’,  नि. रा. पाटील यांचा ‘लेवा गणबोली कोश’ असे लेवा बोलीतील साहित्य असून ते लेवा पाटीदार समाजातील लेखकांनी लिहिले आहे. भालचंद्र नेमाडे यांचे ‘बिढार’, ‘झूल’, ‘कोसला’, ‘जरीला’, ‘हिंदू- एक समृद्ध जीवनातील अडगळ’ या कादंबऱ्या, के. नारखेडे यांचे ‘शिवार’, ‘खानदेशी माती’ आणि इतर ग्रंथसंपदा, दिवाकर चौधरी यांची ‘बुझ्र्वागमन’, डॉ. श. रा. राणे यांची ‘कंदील’, पद्मावती जावळे यांचे ‘अरे संसार संसार’ इत्यादी अनेकांनी लेवा समाजजीवनावर आधारीत वाङ्मय निर्माण केले असून, त्यात लेवा गणबोलीचा वापर केला आहे. तिला विजनवासात पाठवू नका. नाही तर लेवा गणबोलीचा वापर करून म्हणावे लागेल- ‘जाढं मोठं दयलं, झावरनं गायलं.’
– अरविंद नारखेडे, जळगाव.

त्या भावना जवळच्या, मात्र मूळ संस्कृत श्लोकार्थाहून किंचित वेगळ्या
 ‘लोकरंग’ (१२ मे )मधील कवी सुधीर मोघेंचा शांताबाई शेळके यांच्यावरील ‘एक समूर्त भावकाव्य’ हा लेख आवडला. केवळ एकच लहानसा मुद्दा वाचकांच्या नजरेस आणून द्यावासा वाटतो. मोघ्यांनी ‘तोच चंद्रमा’ या अजरामर भावगीताची जन्मकहाणी लिहिली आहे. त्यात मूळ संस्कृत श्लोकाचा संदर्भ देऊन त्याचा भाव स्पष्ट करताना ते असे म्हणतात, ‘‘प्रदीर्घ कालावधीनंतरच्या या पुनभ्रेटीत ती (अनाम कवयित्री) प्रियकराला सांगते आहे. – ‘सारं सारं काही ते आणि तसंच आहे रे..तशीच पौर्णिमा आहे, तोच लताकुंज आहे, तीच मी आहे, आणि माझं कौमार्य हरण करणारा तोही तूच आहेस.. पण तरीही या सर्वातून काहीतरी हरवून गेलं आहे.. सगळं तेच आहे, पण तरीही काहीही नाहीये राजा, काहीही नाही..’’ मोघ्यांच्या मते, या श्लोकातून नायिकेच्या मनातील निराशा, खंत, रुखरुख अशा भावना व्यक्त होतात.
मूळ संस्कृत श्लोक असा आहे. –
य:कौमारहर:सएवहिवरस्ताएवचत्रक्षपा-।
स्तेचोन्मीलितमालतीसुरभय:प्रौढा:कदम्बनिला:।
साचवास्मितथापितत्रसुरतव्यापारलीलाविधौ।
रेवारोधसिवेतसीतरुतलेचेत:समुत्कण्ठते?
ज्येष्ठ संस्कृतज्ञ प्रा. कृष्ण अर्जुनवाडकर सरांनी ‘काव्यप्रकाश’ या संस्कृत काव्यशास्त्रावरील टीकाग्रंथात या श्लोकाचा अर्थ असा दिलेला आहे. – ‘‘माझ्या कुवारपणाचे ज्याने हरण केले तोच प्रियतम (जरी आताही आहे), चत्रातल्या त्याच रात्री, उमललेल्या मालतीपुष्पांच्या सुगंधाने भरलेले तेच कदम्ब वृक्षांवरून वाहणारे वेगवान वारे आणि मीदेखील तीच आहे. तरी त्याच नर्मदातीरीच्या वेताच्या जाळीच्या तळी त्याच सूरतक्रीडेच्या विलासासाठी माझे अंत:करण ओढ खात आहे.’’
या श्लोकावरील त्यांचे भाष्य थोडक्यात असे आहे -या प्रमदेचा हा जो कोणी वल्लभ आहे, तो तिचा सांप्रत पती असो वा नसो; त्यानेच (विवाहापूर्वीच) तिच्या कुवारपणाचे अवगुंठन दूर केले (असा मोहक आणि मनचोर!) आणि तोच अद्यापही तिच्या हृदयाचा स्वामी आहे. आज तीही तीच आहे आणि तिला हव्या असलेल्या प्रणयक्रीडाही त्याच आहेत. अशा परिस्थितीत वास्तविक उत्कंठा उणावावयास हवी. पण काय आश्चर्य! तिची उत्कंठा लेशमात्रही उणावलेली नाही. मग असे काय घडले की ज्यामुळे प्रमदेचे मन तिच्या वल्लभाशी समागम होण्यासाठी पूर्वीइतकेच तहानलेले राहिले? या प्रश्नाचे उत्तर ती स्वत:ही देत नाही आणि किंबहुना ती हा प्रश्न ‘एक प्रश्न’ म्हणून ऐकवीतच नाही. ‘माझे मन आजही ओढ खाते’ एवढेच ती सांगते.’’
संस्कृतमध्ये उत्कंठा म्हणजे मनाचा ओढा, नॉस्टॅल्जिया. संस्कृतातील सम्हा उपसर्ग तीव्रता वाढवतो, परिपूर्णता वाढवतो. श्लोकातील समुत्कण्ठते या शब्दाने मनाचा सर्वतोपरी तीव्र ओढा अभिप्रेत आहे. या शब्दावरून आणि अर्जुन वाडकरांच्या भाष्यावरून एवढे मात्र स्पष्ट होते की, ती नायिका इतर गोष्टींच्या पाश्र्वभूमीवर आपल्या वल्लभाशी पूर्वीप्रमाणेच एकरूप होण्यास आजही आतुर आहे. तिचा भावनावेग आणि व्याकुळता आजही तेवढीच तीव्र आहे, ताजी आहे. आणि त्या क्षणासाठी उत्कंठेने वाट पाहत राहण्याची तिची तयारीही आहे. म्हणूनच यामागे तिचे नराश्य आणि चुटपुट नाही तर वेडी आशा आणि असोशी मात्र निश्चितच सूचित होते.
मोघ्यांनी विशद केलेल्या या श्लोकातील नायिकेच्या भावना (चेत: समुत्कण्ठते) शांताबाईंनी या श्लोकाच्या अर्थाला कलाटणी देऊन आपल्या भावगीतात सूचित केलेल्या नायकाच्या मनातील भावनांच्या (गीत ये न ते जुळून, भंगल्या सुरातुनी) बऱ्याच जवळच्या वाटतात, मात्र त्या मूळ संस्कृत श्लोकार्थाहून किंचित वेगळ्या आहेत.
सलील कुळकर्णी, पुणे.

onion, Dindori, loksabha election 2024,
दिंडोरीत कांदा प्रचाराच्या केंद्रस्थानी
onion, Dindori, loksabha election 2024,
दिंडोरीत कांदा प्रचाराच्या केंद्रस्थानी
dhule crime news, dhule gutkha transport marathi news,
साड्यांच्या गठ्ठ्यांआडून गुटख्याची वाहतूक, धुळे जिल्ह्यात साडेदहा लाखाचा मुद्देमाल जप्त
holi color
कोल्हापूरसह राज्याच्या ग्रामीण भागात शनिवारी रंगपंचमी; खरेदीला उधाण

अनाम कवयित्रीसाठी
‘कविता-सखी’ या सदरात सुधीर मोघे यांनी श्रीमती शांता शेळके यांच्या गीताविषयी जे माहितीपूर्ण विवेचन केले आहे ते प्रसिद्ध गीत ‘तोच चंद्रमा नभात..’ हे ज्या मूळ संस्कृत श्लोकावरून रचले आहे त्या श्लोकाची कवयित्री आहे शीलाभट्टारिका नावाची काश्मिरी स्त्री. याचा संदर्भ मम्मटाच्या ‘काव्यप्रकाश’ या ग्रंथात सापडतो. मौज प्रकाशनच्या कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर व अरविंद मंगरूळकर यांनी संपादित केलेल्या ग्रंथात हा संदर्भ सापडतो. काव्यप्रकाश उल्हास १ ते १० या भागात उल्हास क्र. १- पृष्ठे ६ वर हा श्लोक छापलेला आहे.
वैजयंती आठल्ये, गोरेगाव (प.), मुंबई.