‘लोकरंग’ (१६ मार्च)‘पडसाद’मध्ये रवींद्र चित्रे यांनी माझ्या लेखात ‘हम दोनो’चा उल्लेख नाही, असे म्हटले आहे. ‘हम दोनो’ हा चित्रपट जयदेव यांच्या संगीताने नटलेला आहे. त्यामुळे खय्याम यांच्यावरील लेखात त्याचा उल्लेख करण्याचा प्रश्नच येत नाही.
– डॉ. मृदुला दाढे जोशी

माहितीपूर्ण लेख
‘लोकरंग’ (१६ मार्च) मधील खय्याम यांच्यावरील लेख खूप आवडला. आपली आवडती गाणी आपल्याला इतकी का आवडतात याचे नेमके कारण कळले. ही गाणी आवडण्यामागे ‘खय्याम’ हा समान दुवा आहे, याचा कधी विचार केला नव्हता. या लेखामुळे काही आवडत्या गाण्यांमध्ये नवीन गाण्यांची भर पडली. या सदरामुळे खूप सुंदर माहिती मिळाली.
– आदित्य अनिल मोघे

‘रहे ना रहे हम’..
‘लोकरंग’(१६ मार्च) मधील मृदुला दाढे यांची हिंदी संगीतकारांवरील लेखमाला उत्तमच आहे. ‘फिर छिडम्ी रात, बात फूलों की’ या गीताच्या संदर्भात त्यांनी लिहिलेला छोटासा परिच्छेदच ‘प्रमाथी गंधाने मोहरलेला’ आहे. या लेखामुळे  ‘है कली कली के लब पर तेरे हुस्न का.’ या माझ्या जुन्या आवडत्या गाण्याची आठवण झाली.
– अविनाश जोशी

उलटा चष्मा
‘लोकरंग’मध्ये ‘तिरकी रेघ’ वाले संजय पवार यांनी अरिवद केजरीवाल यांचा चष्मा कसा उलटा आहे  आणि त्यामुळे प्रस्थापित व्यवस्था त्यांना उलटी दिसते, यावर फारच चांगला लेख लिहिला आहे. तो त्यांच्या तिरक्या रेघेला अनुरूप वाटतो. पण आपल्या सर्वाचा चष्मा प्रस्थापित व्यवस्थेप्रमाणे सरळ असल्याने अशी उलटा चष्म्यावाली माणसे आपल्याला तिरक्या चष्म्याची दिसतात. त्यांच्या नि:स्वार्थ व  साधेपणानेच सामान्य जनता प्रभवित होऊन पक्षाला एका वर्षांत दिल्लीतील निवडणुकीत यश दिले. इन्कम टॅक्ससारख्या ‘खादीच्या खात्यात’ मोठय़ा पदावर असूनही त्यांची कारकीर्द जर स्वच्छ नसती, तर काँग्रेस सरकारने त्यांची अनेक प्रकरणे सहज बाहेर काढून त्यांचा ‘परोपकारी गोपाळा’चा चेहरा केव्हाच फाडून टाकला असता. निवडणुकीला उभे राहताना  त्यांनी नवरा-बायकोचे दोन कोटी मालमत्तेचे जे शपथपत्र दिले होते त्यालाही कोणी आव्हान देऊ शकलेले नाही.  
 वेषांतर करून जनतेची दु:खे जाणणाऱ्या राजाचे आपण आजवर कौतुक करत आलो. मग मंत्री िस्ट्रग ऑपरेशन करण्यासाठी  रात्री- अपरात्री फिरतात म्हणून दोष देणाऱ्याची कीव करावीशी वाटते.
मुकेश अंबानी यांनी राजकीय पक्ष विकत घेतले आहेत, हा त्यांनी केलेला आरोप जर खोटा असेल तर या दोघांसह सर्वच राजकीय पक्ष माहितीच्या अधिकारकक्षेत यावयास का तयार नाहीत?
केजरीवाल यांना सध्याची भ्रष्टमय व रुबाबी पद्धतच बदलायची आहे. पण सध्याची पद्धत लोकांच्या इतकी गळी उतरली आहे, की यात काही चुकीचे आहे हे त्यांना दिसतच नाही. उलट त्यांचे रेल्वेने किंवा रिक्षाने जाणे कोणीच पचनी पाडू शकत नाही. समाजाची हीच दृष्टी बदलण्यासाठी आप पक्षाने आदर्श सिस्टीम दिसू शकणारा चष्मा वाटावा, ही लेखकाने केलेली सूचना एकदम अनुकरणीय आहे. – प्रसाद भावे, सातारा</p>