‘अब्राहमचं असणं’ हा (लोकरंग, ८ मार्च) गिरीश कुबेर यांचा लेख वाचल्यानंतर या देशातील अस्तित्वात असलेले कायदे जर येथील यंत्रणेकडून पुरेपूर वापरले तर काय काय करता येते याची प्रचिती आल्यासारखी वाटली. या पूर्वीही असे प्रयत्न झाले आहेत. टी.एन. शेषन यांनी राजकीय पक्षांना निवडणूक कायदा आणि आचारसंहिता दाखवली. कुबेर म्हणतात ते अगदी खरे आहे- लोकपाल, जनलोकपाल यापेक्षा नेकीने काम केले तर आहे ती व्यवस्थासुद्धा किती प्रभावी ठरू शकते! अण्णा हजारे आणि अरिवद केजरीवाल यांनी आहे ती व्यवस्था प्रभावीपणे राबवण्यासाठी आग्रह धरला तर देशावर त्यांचे खूप उपकार होतील. अण्णा हजारे आणि केजरीवाल अब्राहम यांना परत सेबी मध्ये आणण्यासाठी आणि त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला लिहिलेल्या पत्राचा पाठपुरावा करण्यासाठी आंदोलन करतील काय?

..तर भाबडय़ा भावनेला छेद जाईल
अब्राहम यांचे अभिनंदन करण्यासाठी खरोखरच शब्द कमी पडतील.  त्यांच्या कर्तृत्वाची गाथाच गिरीश कुबेर यांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी  – ज्यांना देशहिताची चिंता आहे – सादर केली आहे. कुबेर म्हणतात, कि लोकपाल-जनलोकपाल या मागण्या निर्थक /हास्यास्पद आहेत? हा मुद्दा वादाचा होऊ शकतो पण नेकीने काम केलं तर आहे ती व्यवस्था प्रभावी व परिणामकारक ठरू शकते हे त्यांचं विधान अत्यंत बिनतोड आहे. सर्वसाधारण लोकांची भावना आज अशी झाली आहे, की भ्रष्टाचारी मंडळी पशाच्या जोरावर व सरकारच्या नाकत्रेपणामुळे निर्दोष सुटतात पण अब्राहम यांच्या उदाहरणावरून लोकांच्या भाबडय़ा भावनेला छेद मात्र नक्की दिला जाईल?
– श्रीनिवास जोशी, डोंबिवली, मुंबई.

सहराश्रीचं असणं..
‘अब्राहमचं असणं’ या लेखाचा उद्देश जरी अब्राहम यांचं कौतुक करणं नसला तरी या लेखामुळे त्यांचं कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलं. आजच्या  सडक्या व्यवस्थेत असे अब्राहम तग धरून असल्याचं वाचून आनंद झाला. त्यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. पण एकीकडे आपणास ही व्यवस्था सडकी आहे हे मान्य असणं व दुसरीकडे अशा व्यवस्था परिवर्तनासाठी लोकपाल, जनलोकपालसारख्या कायद्यांची आवश्यकता न वाटता त्यांना निर्थक व हास्यास्पद म्हणून थट्टा उडवणं हा दुटप्पीपणा झाला. नियमांच्या आधारे काम करणारे पुरेसे अब्राहम नसणं ही आजच्या व्यवस्थेची खरी अडचण नसून नियमांचं उल्लंघन करणाऱ्या सहराश्रींचं असणं ही प्रमुख अडचण आहे. समाजातील असे सहाराश्री सत्ता, संपत्ती आणि बळाचा वापर करून वारंवार नियमांचं उल्लंघन करतात आणि कायद्यातील त्रुटींचा आधार घेऊन उजळ माथ्यानं फिरतात. असे सहाराश्री रोखायला प्रचलित कायदे जर  कमी पडत असतील तर वेळोवेळी नवीन कायदे करावेच लागतील. खरं पाहिलं तर प्रत्येकानेच नतिकतेनं वागण्याचं ठरवल्यास जनलोकपालच काय साध्या वाहतूक कायद्यांची देखील  आवश्यकता भासणार नाही, पण आपण रामराज्यात नाही. प्रचलित व्यवस्थेच्या अगदी पहिल्या पायरीपासून ते शेवटच्या पायरीपर्यंत असंख्य सहाराश्रींना, जनतेच्या सेवकांना, नोकरशहांना ही व्यवस्था सडकी राहण्यातच आपलं भलं आहे असं वाटतं.
– प्रा. दिनेश जोशी, लातूर.

दु:खद आणि घातक बाब
सहारा प्रकरण इतक्या सोप्या शब्दांत गिरीश कुबेर यांनी समजावून सांगितलं त्याबद्दल माझ्यासारख्या सामान्य माणसाला खूप बरं वाटलं.  अब्राहम, न्या. हेगडे आणि खेमका ही मंडळी दिवसेंदिवस दुर्मीळ होत चालली आहेत. नेकीनं काम करायचंच नाही ही जणू परंपराच होत चालली आहे. नेकीनं काम करणाऱ्याला लोक आजकाल मुर्खात काढतात ही दु:खद आणि घातक बाब आहे.
– विकास आपटे, मुंबई.

अब्राहमचं असणं.. महत्त्वाचंच!
 ‘अब्राहमचं असणं’ हा लेख खूपच झणझणीत उतरलाय. काही भयानक फसवणुका वाचकांसमोर आणल्याबद्दल धन्यवाद. के. अब्राहम यांचं ‘आप’करण नाही झालं तेच बरं आहे. असे सनदी अधिकारी संख्येनं कमी असले तरी मुजोर सहाराश्रींवर अंकुश ठेवायला पुरेसे आहेत.
– जयंत साने, ठाणे.

उल्लेखनीय काम
‘अब्राहमच असणं’ हा लेख वाचल्यानंतर विश्वासच बसेना, की एक व्यक्ती इतक्या खोलवर आणि एवढय़ा संयमानं इतकं कठीण काम करून, स्वयंघोषित देशभक्ताला त्याची जागा दाखवून देऊ शकते. अगदी दररोज पूर्ण पानभर स्वातंत्र्यदेवीची जाहिरात देऊन, मी कसा देशभक्त आहे, याचा परिपाठ ही माणसं करतात. माझ्यासारखे त्याला खरंच देशभक्त, महान समाजसेवक समजतात. अब्राहम यांनी एक स्पृहनीय काम केलं आहे.
– सौरभ कुलकर्णी

कायदा नाही, ही समस्या नाही
‘अब्राहमचं असणं’ हा लेख वाचला. काही वर्षांपूर्वी टी. एन. शेषन यांनी केलेलं काम पाहून मलाही असंच वाटलं की, कायदा नाही ही समस्या नाही, तर कणा नसलेली माणसं फार मोठय़ा संख्येनं असणं ही खरी समस्या आहे. असलेल्या नियमांच्या आधारे काम करून राजसत्ता बदलता येते असं  शेषन यांनी दाखवून दिलं. परंतु शेषन इतके बोलू लागले की न्यायालयानं त्यांच्या वकिलाकरवी त्यांना थोडं कमी बोलण्यास सांगितलं. लोकपाल, जनलोकपाल निर्माण करावयाचे याचा अर्थ ‘मी माझं वागणं, विचार बदलणार नाही’ असा आहे.
– विनायक देशपांडे
 
भविष्यात फसगत होऊ नये
‘अब्राहमच असणं’ हा लेख वाचून आश्चर्य वाटलं नाही. आपल्या देशातील सर्व व्यवस्था इतकी किडलेली आहे की एकटे अब्राहम कुठे कुठे पुरे पडणार? हा विषय सर्वोच्च पातळीवर हाताळला गेला पाहिजे, म्हणजे भविष्यात तरी लोकांची फसगत होणार नाही.
– प्रभाकर कुलकर्णी, मुंबई.

सत्याची कास
‘अब्राहमच असणं’ हा लेख अचूक आणि आवश्यक वाटला. मध्यमवर्गीय अशाच लोकांच्या तथाकथित साम्राज्यांना आणि त्यांच्या स्वप्नांना भुलून जातात. आणि ही तथाकथित माणसं आपलं साम्राज्य प्रस्थापित करतात. अब्राहम यांनी दाखवून दिलं आहे की, सत्याची कास धरून चालणाऱ्या माणसाला कुठलीही व्यक्ती किंवा कायदा त्याच्या ध्येयापासून अडवू शकत नाही. गिरीश कुबेर यांनी अशा माणसाला प्रकाशझोतात आणलं, हीसुद्धा कौतुकास्पद बाब.
– सुनील खांडेकर

अब्राहम यांना सलाम!
सहाराश्रींच्या कृष्णकृत्यावर प्रकाशझोत टाकणारा गिरीश कुबेर यांचा लेख अप्रतिम होता. सहारा प्रकरणात डॉ. के. एम. अब्राहम यांचे उल्लेखनीय प्रयत्न कोणालाच ज्ञात नव्हतं. अशा प्रकारे काम करताना हिंमत लागते आणि ती अब्राहम यांनी केली. अब्राहम यांना सलाम!
– रवींद्र केंभवी