दिवाळीच्या निमित्ताने ११ नोव्हेंबरच्या ‘लोकरंग’मधील डॉ. संजय ओक यांच्या लेखाची मांडणी धक्कादायक आहे.
‘दिवाळीचा प्रारंभ म्हणजे धन्वंतरी पूजन. हिंदू धर्मानुसार प्रत्येक सणाच्या प्रत्येक दिवसाला एक आगळे महत्त्व आहे. धन्वंतरी हा तर देवांचा वैद्य.. मला या संपूर्ण उत्पत्तीचा परामर्श आजच्या आरोग्यव्यवस्थेच्या परिघात शोधायचा आहे,’ असे म्हणणारे डॉ. ओक-‘सागराच्या उदरातून बाहेर पडणारी अमोल रत्ने.. ऐरावत, लक्ष्मी आणि तिच्या पाठोपाठ तिचा सहोदर धन्वंतरी’ आणि ‘धन्वंतरी हा बोलूनचालून महाविष्णूचा अवतार’ या व्यवहाराबाबतही (म्हणजेच विष्णूने स्वत:च्याच अवताराच्या सहोदरशी लग्न केले या पाश्र्वभूमीवर) ‘मला या संपूर्ण उत्पत्तीचा परामर्श शोधायचा आहे,’ असे म्हणतील काय? वास्तविक परंपरा घातकही असतात (उदा. नातेसंबंधातील विवाहांमुळे होणारा आरोग्याला धोका) हा मुद्दा ठसवण्यासाठी नातेसंबंधातील विवाहाची माहिती उपयुक्त होती. मुळात कोणत्याही धर्माच्या कोणत्याही सणाला आगळेच महत्त्व असते.
‘रुग्णाला बरे करायचे तर ऊर्जा आवश्यक’ या वाक्यातून काय सुचवायचे आहे? जगातील कित्येक क्रियांना ऊर्जा लागते. रोग करणारे जंतू, जीव आणि कॅन्सर पेशी यांनाही ऊर्जाच लागते. धन्वंतरीचे प्रतीक त्यांनासुद्धा उत्साह देण्यासाठी कल्पिले आहे काय?
दोन भिन्न चित्रणे एकमेकांशी निगडित आहेत. (उदा. बंदुकीची गोळी झाडल्याच्या एका दृश्यापाठोपाठ दुसरा माणूस खाली पडतो, असे दुसरे दृश्य दाखवले तर पहिल्या दृश्यातील गोळी दुसऱ्या दृश्यातील व्यक्तीला लागली, असा समज होतो. मग भले दोन्ही दृश्यातील चित्रणे वेगवेगळ्या वेळी (आणि गावांत) केलेली असली तरीसुद्धा) असे सिनेमात सुचवले जाते. ‘धन्वंतरीच्या दुसऱ्या हातात आहेत रक्तपित्या जळवा.. रक्तशुद्धीकरणासाठी आज आपण हिमोडायलिसिसचा पर्याय वापरतो.’ ही वाक्ये पाठोपाठ घालून जाणता-अजाणता, भूतकाळाचे उदात्तीकरण मात्र जरूर होते. हिमोडायलिसिसमध्ये रक्ताचा फक्त काही अंश काढून टाकला जातो. उरलेले बरेचसे आणि चांगले रक्त शरीराला परत दिले जाते. जळू मात्र सर्वच गिळंकृत करते. या दोन्हींत जमीन-अस्मानाचा फरक आहे, हे कोठेही स्पष्ट होत नाही.
‘धन्वंतरीच्या काही प्रतिमांमध्ये एका हातात औषधी वनस्पतीची जुडी आहे’ आणि ‘धन्वंतरीचा पुनर्विचार करताना मला जेनेरिक मेडिसिन्स, हर्बल उत्पादने यांच्या अधिक प्रात्यक्षिक उपयोगावरच भर देणे अपेक्षित आहे.’ या दोन वाक्यांत काहीतरी परस्पर संबंध आहे काय?
‘काही प्रतिमांमध्ये धन्वंतरीच्या हातात आयुर्वेदाची पोथी आहे.. इंडियन मेडिकल काऊन्सिलने दुराग्रह सोडून आयुर्वेदाच्या सप्रमाण सिद्ध झालेल्या तंत्राचा स्वीकार करून अ‍ॅलोपथी समृद्ध करणे गरजेचे आहे,’ असे डॉ. ओक म्हणतात. यातील ‘इंडियन मेडिकल काऊन्सिल’ म्हणजे सेंट्रल काऊन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन असे नसून मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडिया (एमसीआय) हे अभिप्रेत असावे. परंतु आधुनिक वैद्यकशास्त्राने रेझर्पिन, क्विनाईन, विनक्रिस्टिन किंवा डिगॉक्सिन स्वीकारल्या हे सत्य नाकारता येत नाही. ‘सप्रमाण सिद्ध झालेल्या’ कोणत्या तंत्राचा, मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियाने दुराग्रहाने विरोध केला, ते स्पष्ट व्हावे.
‘राहता राहिला अमृतकुंभ. अमरत्वाचे प्रतीक. किती जगलात यापेक्षा जास्त कसे जगलात हे महत्त्वाचे. मधुमेह, कंप, पक्षाघात, मूत्रपिंड विकार, अल्झायमर्स किंवा पार्किन्सन्स आणि बायपास का स्टेन्ट्स असे जगण्यासाठी का हवाय तो कुंभ? या सगळ्या आजच्या युगातल्या ‘मोहिनी’ आहेत,’ हा विचार खरंच मोहिनी घालेल; परंतु हे जादूभरे अमृत अमरत्व देते की रोगांपासून स्वातंत्र्य देते, हे स्पष्ट होत नाही. अर्थात राक्षसांना टोपी घालून सर्व अमृताचा ताबा मिळवूनसुद्धा देवांना ‘धन्वंतरी.. देवांचा वैद्य!’ याच्याकडे जाण्यापासून सुटका मिळालीच नाही. अमृतमंथनापूर्वी हे देव कोणाचा सल्ला घेत होते?
‘मधुमेह, कंप, पक्षाघात, मूत्रपिंड विकार, अल्झायमर्स किंवा पार्किन्सन्स आणि बायपास का स्टेन्ट्स असे जगण्यासाठी का हवाय तो कुंभ?’ या सूचक विधानातून  डॉ. ओक दयामरणाचे समर्थन करत आहेत असे वाटते. असे जगण्यासाठी हा हवाय तो कुंभ? असे दयामरणाचे समर्थनच करावयाचे असेल तर धन्वंतरीची आवश्यकताच काय? ‘व्हेदर अवे धन्वंतरी’ असे सुचवण्याचा डॉ. ओक यांचा उद्देश आहे काय?
– डॉ. राजीव जोशी, पुणे

हा खेळखंडोबा सहज थांबवता येईल
४ नोव्हेंबरच्या ‘लोकरंग’मधील नीरजा यांचा लेख वाचला. माझ्या मते चांगल्या दर्जाच्या उपलब्ध तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करून प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षकांच्या नेमणुकीचा प्रश्न सहज सोडवता येईल.
ज्याप्रमाणे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, बँकांचे रिक्रुटमेंट बोर्ड कार्य करते, त्याप्रमाणे शिक्षण खात्याने रिक्रुटमेंट बोर्डाची स्थापना करावी. जिल्हा परिषद व खासगी शिक्षण संस्थांना या बोर्डामार्फत सीईटीद्वारे पास झालेल्या व मेरिटनुसार शिक्षकांची नेमणूक करणे बंधनकारक करावे. शिक्षकांनाच तालुक्यानुसार शाळा निवडण्याचा पर्याय द्यावा.
संस्थाचालकांनी शाळेसाठी फक्त मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. नाही तरी सध्या शासनच मान्यताप्राप्त शाळांच्या शिक्षकांचा पगार करते. मग शिक्षकांची नेमणूक शासनानेच केली तर काय बिघडले?
यासाठी विद्यार्थी संघटना, शिक्षक संघटना, पदवीधर मतदारसंघाचे आमदार, शिक्षक आमदार आदींनी दबावगट निर्माण करणे आवश्यक आहे. तसेच सर्व विद्यार्थ्यांना (बँक व रेल्वेसारख्या) परीक्षा देण्याचा व गुणवत्तेनुसार नोकरीस लागण्याचा नैसर्गिक समान अधिकार मिळवण्यासाठी जनहित याचिकेचाही पर्याय उपलब्ध आहेच. मायक्रोसॉफ्ट, सॅप, सास आदी कंपन्या जगभर सतत ऑनलाइन परीक्षा घेत असतात. तसेच भारतातही अनेक कंपन्या ऑनलाइन परीक्षांचे आयोजन करतात. त्या कंपन्यांचे अनुकरण केले तर शाळांमधील कॉपी प्रकरण सहजपणे थांबवता येईल. आपल्या देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी स्पर्धात्मक वातावरण आवश्यक आहे. स्पर्धात्मक वातावरणामध्ये टिकण्यासाठी उत्तम ज्ञानाची गरज असते. चांगल्या दर्जाचे शिक्षक जर हवे असतील तर त्यांनीही स्पर्धात्मक वातावरणातूनच पुढे येणे आवश्यक आहे.
– मिलिंद बेंबळकर, पुणे</p>