06 July 2020

News Flash

ओळख.. अनोळखी पाकिस्तानची

इतिहासाच्या विस्तृत पटावर एखाद्या तुलनेने नवजात राष्ट्राच्या आयुष्यातील २५ वर्षांचा काळ खूप मोठा म्हणता नाही येणार.

| December 7, 2014 12:22 pm

इतिहासाच्या विस्तृत पटावर एखाद्या तुलनेने नवजात राष्ट्राच्या आयुष्यातील २५ वर्षांचा काळ खूप मोठा म्हणता नाही येणार. पण पाकिस्तानसारख्या सतत राजकीय, सामाजिक, धार्मिक उलथापालथींना सामोऱ्या जात असलेल्या राष्ट्राच्या इतिहासात या एवढय़ा काळातही नोंदवून ठेवण्यासारख्या पुष्कळच घटना घडल्या lok20आहेत. डोळ्यांसमोर भरकटत गेलेल्या आपल्या भावंडाची जितपत बित्तंबातमी ठेवावी, तितपत या घटनांची माहिती प्रत्येक भारतीयाला असतेच. पण त्यापलीकडे जाऊन या देशाच्या अंतरंगात डोकावून पाहण्याचा प्रयत्न मात्र फारसा होत नाही. या पाश्र्वभूमीवर २५ वष्रे पाकिस्तानी समाजजीवनाच्या बारीकसारीक कंगोऱ्यांवर प्रकाशझोत टाकण्याचे काम ज्येष्ठ पत्रकार फिरोज अशरफ यांनी नेटाने चालू ठेवले. या प्रयत्नांचे मोल मोठे आहे. त्यांचे निवडक लेख ‘पाकिस्तान- समाज आणि संस्कृती’ या पुस्तकात संग्रहित झाले आहेत. हे लेख एकत्रितपणे वाचताना आपल्या या शेजारी राष्ट्राने गेल्या २५ वर्षांत अनुभवलेल्या स्थित्यंतरांचा आढावा घेणे शक्य होते.
पुस्तकातील लेखांचा कालखंड १९८५ पासूनचा असून त्यातील शेवटचा लेख २०१० सालचा आहे. ‘जंग’, ‘नवाए-वक्त’, ‘डॉन’ इत्यादी पाकिस्तानी वृत्तपत्रं-नियतकालिकांमध्ये तेथील घडामोडींचे पडणारे प्रतििबब lr14टिपून त्याआधारे तिथल्या समाज, संस्कृतीवर केलेली वैशिष्टय़पूर्ण टिपण्णी असे या लेखांचे स्वरूप आहे. या टिपण्णीला विषयाचे कोणतेही बंधन नाही. उलट ठळक बातम्यांच्या अनुषंगाने चच्रेत आलेले थोडे वेगळे विषय वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न यात दिसतो. उदाहरणार्थ, पुस्तकातल्या पहिल्याच लेखाला संदर्भ आहे तो झिया-उल-हक यांच्या राजवटीत १९८५ साली पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकांचा. झिया यांनी लादलेल्या प्रदीर्घ मार्शल लॉच्या जाचातून या निमित्ताने थोडा मोकळा श्वास घेतल्यावर पाकिस्तानातही मोकळेपणाने व्यक्त होण्यासाठी लंडनच्या हाइड पार्कसारखा एखादा कोपरा हवा यासाठीची चर्चा तिथल्या बुद्धिजीवींमध्ये सुरू झाली. या चच्रेबद्दलचे भाष्य या लेखात आहे. अशाच प्रकारे थेट राजकीय स्वरूपाच्या लेखांपेक्षा राजकीय प्रभावाचे पाकिस्तानी साहित्य- संस्कृती आणि समाजावर झालेले, होत असलेले परिणाम या लेखांमधून टिपले गेले आहेत.
धर्मावर आधारित राजकारण, वेळोवेळी दिली जाणारी इस्लामीकरणाची हाक, दहशतवाद यामुळे पाकिस्तानचे कट्टरतावादी रूप वेळोवेळी पुढे येत असले तरीही लोकशाहीवादी, पुरोगामी विचार मांडणाऱ्या विचारवंतांचा आवाजही या भूमीमध्ये सातत्याने ऐकू येत राहिला आहे. अशरफ यांच्या लेखांमध्ये अशा आवाजांना प्रामुख्याने स्थान दिले गेले आहे. मग तो इक्बाल यांच्या विचारांवरून झडणाऱ्या वादविवादांचा विषय असो, राजकीय दडपशाहीचा सामना करत वाटचाल करणाऱ्या तेथील पुरोगामी लेखक संघाच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडणारा लेख असो, लाहोरमध्ये रुजलेल्या रंगभूमीच्या चळवळीचा विषय असो किंवा परंपरेने चालत असलेल्या उर्दू-पंजाबी सुफी संत-कवींच्या उरूसांचे वर्णन असो. पाकिस्तानातील ही उदारमतवादी विचारधारा नेमके काय सांगू पाहत आहे याची झलक या लेखांतून मिळते. त्यातही व्यक्तिचित्रणात्मक लेख विशेषत्वाने वाचण्यासारखे आहेत.
‘पाकिस्तानात ‘मे’ दिन’, ‘पाकिस्तान शोधतो आहे संस्कृतीची मुळे’, ‘सांस्कृतिक वेगळेपणाची वेदना’, ‘रसिकराज लाहोर’ अशा लेखांमधून पाकिस्तानचे सांस्कृतिक संचित, त्यामागचा इतिहास, पाकिस्तानातील मूळच्या मिश्र संस्कृतीची पाळेमुळे याबद्दलचे अनेक संदर्भ सहज सापडतात. फाळणीच्या वेळी तेथे गेलेले भारतीय मुस्लीम, बांगलादेशी मुस्लीम, त्याचबरोबर िहदू, पारशी, ख्रिश्चन असे काही गट पाकिस्तानातील अल्पसंख्य समाजात मोडतात. या समाजासमोरील बिकट प्रश्नही काही लेखांमधून मांडले गेले आहेत. तसेच अन्सार बर्नी यांच्यासारख्या काही लढाऊ समाजसेवकांची व्यक्तिचित्रणेही यात आहेत.
भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील संबंध नेहमीच सौहार्द आणि तणावाच्या दरम्यान झुलत राहतात. या नाजूक विषयावर निरीक्षकाच्या तटस्थ दृष्टिकोनातून अशरफ यांनी टीका केलेली दिसते. पाकिस्तानी समाज-संस्कृतीविषयी कुतूहलाने वाचताना आपल्याच समाजातल्या अनेक वास्तवांवर या लेखांतून नकळत बोट ठेवले गेलेले दिसते. मात्र लेखांतील निवेदनाचा सूर अत्यंत संयत आहे. सहवेदनेचा आहे. त्यामुळे ‘आपण-ते’ ही नेहमीची ढोबळ विभागणी येथे उरत नाही.
२५ वर्षांच्या या काळात पाकिस्तानच्या राजकीय पटलावर अनेक बदल घडले, राजवटी बदलल्या. या संग्रहातील लेखांना त्या साऱ्या घडामोडींचे तत्कालीन संदर्भ आहेत. हिरा जनार्दन यांनी या लेखांचा मराठी अनुवाद केला असून त्यात मूळ िहदी भाषेच्या मांडणीचा बाज तसाच आहे. ‘आपण एकमेकांचा दुस्वास का करतो?’ या प्रश्नाचा हा लेखसंग्रह समंजसपणे विचार करण्यास मदत करणारा आहे.

‘पाकिस्तान : समाज आणि संस्कृती’ – फिरोज अशरफ, अनुवाद – हिरा जनार्दन, लोकवाड्मय गृह, मुंबई, पाने- २३२, मूल्य- ३०० रुपये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2014 12:22 pm

Web Title: pakistan samaj ani sanskruti by feroz ashraf
टॅग Pakistan
Next Stories
1 उद्ध्वस्त स्त्रीमनाची हेलावणारी कथा
2 बळी.. बोथट संवेदनेचा!
3 परवडू लागण्यास कारण की..
Just Now!
X