डॉ. स्मिता निखिल दातार 

प्रख्यात व्हायोलिनवादक पद्मश्री पं. डी. के. दातार यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त ‘डी. के. दातार.. द व्हायोलिन सिंग्ज’ हे त्यांचे चरित्र १६ नोव्हेंबर रोजी मुंबईत प्रकाशित होत आहे. ग्रंथाली प्रकाशनाच्या या पुस्तकातील संपादित लेख.

पद्मश्री पंडित डी. के. दातार यांनी शास्त्रीय व्हायोलिनवादनात गायकी शैली रुजवली. तिचा जगभर प्रसार केला. त्यांनी व्हायोलिनवर शब्दांना गायला लावलं. ते राग ‘तिलककामोद’ वाजवायला लागले की रसिक ‘कोयलिया बोले अंबुवा’ गुणगुणायला लागायचे. ते ‘देश’ राग वाजवायला लागले की रसिक ‘सखी मोरी रुमझुम’चा पदन्यास अनुभवू लागायचे.

‘डी. के.’ ही आद्याक्षरे अल्पावधीत गाजण्याची काही कारणं होती. डी. कें.नी विघ्नेश्वर शास्त्रींकडून गायकी शैलीने व्हायोलिनवादन आत्मसात केलं. व्हायोलिन तीन पद्धतींनी मिळवलं जातं. पाश्चात्त्य शैलीच्या वादनात ते ‘म सा प रे’ असं मिळवतात. तंतकारी शैलीत ते ‘प सा प सा’ असं मिळवलं जातं. यात तारांवरचा ताण वाढतो, म्हणून ते कर्कश वाजतं. तर गायकी शैलीत ते ‘सा प सा प’ असं मिळवलं जातं. यात तारांवरचा ताण हलका होतो आणि व्हायोलिन मृदु वाजतं. या पद्धतीत गजाचं वजनदेखील प्रभावीपणे वापरता येतं. (फोर्सफुल बोइंग) डी. के. ‘सा प सा प’ पद्धतीने व्हायोलिन मिळवत. त्यामुळे रागाचा पूर्ण विस्तार करता येतो. त्यातून  नादमधुर, संथ आणि नैसर्गिक ध्वनिनिर्मिती होते, हे ते सप्रमाण सिद्ध करीत. ‘सा प सा प’ टय़ुनिंगमुळे अडीच सप्तकं वादकाला उपलब्ध होतात, हेही ते दाखवून देत. यामुळे खर्जातही रागबदल करता येई आणि तो जास्त परिणामकारक होई. व्हायोलिनचा ब्रिज चार तारांचाच ताण सहन करू शकतो. तानपुऱ्यात असलेला षड्ज पंचम भाव ‘सा प सा प’ टय़ूनिंगमध्येच मिळतो यावर त्यांचा ठाम विश्वास होता. रागाचे संपूर्ण स्वरूप ते उलगडून दाखवीत. विलंबित आणि मध्य लयीत विस्तार केल्यावर द्रुत लयीतील रागविस्तार करताना त्यांच्या डाव्या हाताच्या नियंत्रणाचे कौशल्य दिसून येई. निरनिराळ्या वजनांच्या ताना, बोइंगनुसार स्वरांचे वजन बदलून घेतलेली तान, तिहाई घेऊन समेवर मुखडा पकडणे हे कसब त्यांनी आत्मसात केले होते. आलापीत ते रागाचे मूळ स्वर दाखवीत. त्यांचं प्रत्येक वेळी स्वरवर्तुळ पूर्ण करून समेवर येणं म्हणजे जणू उदबत्तीच्या सौम्य सुगंधाची वर्तुळे स्वत:भोवती गिरक्या घेताहेत असा भास होई. रागाचे मूळ नियम ते मोडत नसत. एका दीर्घ गजात एक स्वर किंवा एकाच तारेवर मींडच्या साहाय्याने घेतलेली तान, लांब गजाचा पुरेपूर  वापर यात ते गज पूर्णपणे काबूत ठेवत. गजाच्या योग्य त्या वेगासाठी उजव्या हाताचे मनगट आणि पंजा याने ते गजाचे उत्तम नियमन करत. लांब गजाचा पूर्ण आणि संयमित उपयोग करताना ते हुकमी गजबदल करीत. तेही इतक्या शिताफीने, की गज बदललेला पहिल्या रांगेत बसलेल्या प्रेक्षकालाही कळू नये.

अतिद्रुत, चढय़ा लयीत वाजवणे, चमत्कृती करणे, तालाशी झटापट करणे, स्वरांच्या कोलांटउडय़ा मारून लोकांना खूश करणे हे त्यांनी कधीही केले नाही. गायकही तार सप्तकात फार वेळ गात नाहीत, त्याने सांगीतिक मूल्यांची हानी होते असं त्यांचं मत होतं. म्हणूनच त्यांच्या स्वरलगावात आक्रमकता नव्हती. नजाकत होती. द्रुत लयीचा अतिरेक नव्हता, तर सुरांच्या सुबक नक्षीची रांगोळी होती. ते अर्ध्या- पाव मात्रेत ख्यालाचा मुखडा उचलत आणि तिन्ही सप्तकांत मुक्त संचार करीत. ताल आणि लयीच्या अंगाने केलेलं मोहक कशिदाकाम म्हणजे डी. कें.चं व्हायोलिनवादन!

राग मांडणं ही कलाकाराची सर्जनशीलता आहे. कलाकार नुसता राग मांडत नाही, तर त्याच्या कल्पकतेचं आणि व्यक्तिमत्त्वाचं प्रतिबिंबच तो रागाच्या सौंदर्यातून पुनक्र्षेपित करत असतो असं त्यांचं तत्त्वज्ञान होतं. बकुळीचा गंध यावा, पण फूल दिसू नये, तसंच नजाकतदार ताना उलगडाव्यात; पण त्यातली बोटांची जादू कळू नये असं डी. कें.चं वादन तंत्रशुद्ध, सौंदर्यपूर्ण आणि स्वर-लयीवर हुकूमत असणारं होतं. त्यांचं हे विचारांनी परिपूर्ण वादन साध्य होण्यासाठी त्यामागे कसून केलेला रियाज, अनेक दिग्गज कलाकारांचं वादन ऐकून केलेली श्रवणभक्ती, ध्येयाकडे असलेले लक्ष ही कारणं होतीच; पण विधात्याने त्यांच्या बोटात एक दैवी शक्ती दिली होती. ते स्वाती नक्षत्रातला पावसाचा थेंब होते.. ज्याला परमेश्वराने मोती होण्यासाठी पृथ्वीवर पाठवलं होतं.

जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, बृहन्मधुर ते ते त्यांनी घेतलं आणि त्यांच्या वादनात दैवी देणगीसह मुलायमपणा, वैविध्य आणलं. स्वत:चा मार्ग त्यांनी स्वत:च बनवला. स्वत:ची रेकॉìडग्ज पुन:पुन्हा ऐकून चुका सुधारल्या. पूर्वी ते पांढरी चारमध्ये वाजवायचे. मग ते काळी एकमध्ये वाजवू लागले आणि त्यानंतर काळी दोनमधे त्यांना हवी ती सुरेलता मिळाली. त्यातून त्यांनी काय, कसं, किती आणि कुठे वाजवावं याचे आडाखे बांधले. बहुश्रुततेने सांगीतिक संवेदनशीलता वाढवली. आपण काय करायचं नाही, हे त्यांनी पक्कं ठरवलं होतं. आपल्या सीमारेषा आधीच आखून घेतल्या होत्या. म्हणूनच त्यांना गायकी अंगाच्या वादनाचं उच्च दर्जाचं तंत्र अवगत झालं.

पंडितजींचे व्हायोलिनवादनाचे देशविदेशात अनेक कार्यक्रम होत. त्यांच्या कार्यक्रमाचेसुद्धा किस्से आहेत. काही मजेशीर, काही हळवे, तर काही चटका लावणारे. लंडनला महाराष्ट्र मंडळाचा कार्यक्रम होता. पं. शरद साठे यांचं गायन आणि पं. डी. के. दातार यांचं व्हायोलिनवादन. दोघे मित्रच असल्याने दोघांची राहण्याची व्यवस्था एकाच घरात केली होती. परदेशात स्वत:ची कामं स्वत:च करावी लागतात. डी. कें.ना याची बिलकूल सवय नव्हती. कार्यक्रमाआधी काही खाऊन जावं म्हणून शरद साठे म्हणाले, ‘‘दामू, तू टोस्ट बनव, मी कॉफी करतो.’’ डी. कें.नी ब्रेड टोस्टरमध्ये घातला आणि गाण्याच्या तंद्रीत टोस्टरमध्ये हात घालून तो काढायला गेले. शरदजी मोठय़ानं ओरडले, ‘‘दामू, गाढवा, टोस्टर चालू आहे. हात भाजतील ना!’’ आणि झटक्यात डी. कें.नी हात मागे घेतला. एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराचे सर्जनशील हात वाचवले होते.

असाच एक प्रसंग अमेरिकेच्या दौऱ्यात घडलेला. वॉशिंग्टनमध्ये संध्याकाळी सहा वाजता डी. कें.चा कार्यक्रम होता. अरुण बागल या कार्यक्रमाचे आयोजक होते. कार्यक्रमाच्या अर्धा तास आधी डी. के. तयारी करत असताना त्यांचं बोट कपाटाच्या दारात सापडलं. डाव्या हाताचं तेच बोट- जे व्हायोलिनच्या तारांवर जादू करायचं, तेच जायबंदी झालं. रक्ताची धार लागली. डी. कें.नी कोणालाही न सांगता तात्पुरतं रक्त थांबवलं आणि अर्ध्या तासात कार्यक्रम  केला. सभागृह तुडुंब भरलेलं. व्हायोलिन त्या कापलेल्या बोटाने तसंच, तितकंच मधुर वाजलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर होते तेच शांत, शालीन भाव आणि मधुर हास्य. कार्यक्रम संपल्यावर  बागल यांना हे कळलं आणि ते डी. कें.चं बोट हातात धरून गदगदून रडले. वेदना सहन करूनही डी. कें.नी रसिक आणि आयोजक दोघांनाही कसलाही त्रास न देता, दिला होता तो फक्त आनंद!

मं अकेला ही चला था जांनीब ए मंजील मगर

लोग साथ आते गये और कारवा बनता गया..

डी. कें.नी कधीच कोणी आपली वाहवा करावी म्हणून वादन केलं नाही किंवा कधी टाळ्यांसाठी वाजवलं नाही. आमीर खाँसाहेब नेहमी म्हणायचे, ‘‘दाद लेनी है तो गुणीजनों से लो, तालियों से नहीं.’’ गुणी माणसांकडून दाद मिळवण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. ते कष्ट डी. के. दातार घेत होते. ‘पंडित’ उपाधी मिळाली तरी ते स्वत:ला विद्यार्थीच समजत. आणि माणूस आजन्म विद्यार्थीच राहिला तर मनाची कवाडं उघडी राहतात. नवीन ज्ञान आत्मसात करता येतं. नव्या संकल्पना रोमारोमांतून झिरपतात. मनाचा तळ ढवळून काढतात. विचारांचं समुद्रमंथन होतं आणि नव्या कलाकृतीचा जन्म होतो. पंडितजींचं असं विद्यार्थ्यांचं कोवळं मन होतं. त्यांनी अनेकांचं वादन ऐकलं. शास्त्रीय, उपशास्त्रीय, पाश्चात्त्य, लोकसंगीत आणि सगळ्यातलं चांगलं निवडून त्यांनी आपल्या वादनावर त्याचे संस्कार घडवले.

त्यांच्या वादनावर पं. रविशंकरांच्या लयकारीचा प्रभाव होता. पं. कुमार गंधर्वाच्या विजेसारख्या तानांचा प्रभाव होता. पं. डी. व्ही. पलुस्करांच्या मधुर भजनांचा प्रभाव होता. बडे गुलाम अली खाँच्या खर्जाचा प्रभाव होता. बेगम अख्तरच्या ठुमरीचा प्रभाव होता. बिसमिल्ला खाँच्या सनईचा प्रभाव होता. बुंदुखांच्या सारंगीचा प्रभाव होता. ग्वाल्हेर घराण्याच्या कल्पकता आणि उपज अंगाचा प्रभाव होता. पण तरीही त्यांनी या कोणाचीच नक्कल केली नाही. त्यांनी या सगळ्याचा आपल्या मधाळ बोटांनी रस काढला, त्यात आपल्या नादमाधुर्याचं अमृत कालवलं आणि सुरावटीच्या चाफ्याच्या फुलांच्या द्रोणातून शालीनतेने ते रसिकांसमोर पेश केलं.

शिष्यांना विद्या देतानासुद्धा त्यांनी आपलं वादन जसंच्या तसं उचलावं असं डी. कें.नी कधी म्हटलं नाही. त्यांना वाटायचं, प्रत्येकाने वादनात स्वत:चा वेगळा विचार करावा. ते फुलवावं आणि गायकीचा प्रसार करावा. त्यांचं मन आकाशासारखं विशाल होतं. ते शिष्यांना अनेक जणांचं वादन ऐकायला लावत. त्यांनी कायम त्यांच्या यशाचं श्रेय त्यांच्या गुरूंना, बंधूंना आणि बहुश्रुततेला दिलं. ऌ2ड म्हणजे पाणी नाही. ते एक रासायनिक संयुग आहे. जे पाणी आकाशातून तत्त्व घेऊन येतं, ज्यात भेसळ नसते, ते खरं पाणी! डी. के. असं आकाशातून आलेलं निवळशंख पाणी होते- जे कधी वाद, प्रवाद, प्रलोभनं कशानेच मलिन झालं नाही. येणाऱ्या पिढय़ांचं व्हायोलिनवादन डी. कें.च्या गायकी शैलीच्या मापदंडावर तोललं जाईल. डी. कें.नी शास्त्रीय संगीताच्या विशाल कॅनव्हासवर त्यांचं व्हायोलिनवादन कोरून ठेवलंय. हे आकाश पांघरायची नव्या कलाकारांची तयारी हवी.

drsmitadatar@gmail.com