12 July 2020

News Flash

समांतर सिनेमाचे स्वतंत्र बिरुद

चित्रपटातला अमोल पालेकर म्हटलं की, डोळ्यासमोर कितीतरी रंजक रूपं येतात.

(संग्रहित छायाचित्र)

सतीश जकातदार

प्रयोगशील रंगकर्मी, अभिनेता, चित्रपट दिग्दर्शक अमोल पालेकर यांच्या (२४ नोव्हेंबर) पंचाहत्तरीनिमित्त त्यांच्या चित्रपट व नाटय़ कारकीर्दीविषयी घेतलेला मागोवा..

चित्रपटातला अमोल पालेकर म्हटलं की, डोळ्यासमोर कितीतरी रंजक रूपं येतात.. ‘रजनीगंधा’तला वेंधळा, पण सरळमार्गी सज्जन संजय! ‘छोटीसी बात’मधला बावळ्या ठेवणीचा तडफदार बनलेला आत्मविश्वासपूर्ण अरुण, ‘गोलमाल’मधला दोन टोकाच्या स्वभावाचे जुळे भाऊ आहोत, असे नाटक करणारा लक्ष्मण प्रसाद उर्फ रामप्रसाद.. अशा हलक्या-फुलक्या, पण नाना तऱ्हेच्या व्यक्तिरेखा! याशिवाय त्यांनी या प्रतिमेच्या विरोधी जाणाऱ्या अनेक व्यक्तिरेखा सादर केल्या.

भूमिका’मधील खलवृत्तीचा नवरा ‘केशव’ केला, तर ‘आक्रित’मधील थंड डोक्याचा भ्रष्ट व खुनशी मुकुटराव.. तर ‘तरंग’ चित्रपटातील कुटिल कारखानी ‘राहुल’.. अशा गुंतागुंतीच्या विविध व्यक्तिरेखा अमोल पालेकरांनी आपल्या अभिनय कारकीर्दीत रंगविल्या.

मूलत: ‘म्युरल पेंटिग्ज’चे शिक्षण घेतलेल्या प्रायोगिक रंगभूमीवर महत्त्वाची कामगिरी करून, अग्रगण्य रंगकर्मी म्हणून सर्वपरिचित असणारे पालेकर सर्वाधिक लोकप्रिय ठरले ते त्यांच्या बाशू चटर्जी दिग्दर्शित ‘रजनीगंधा’ या चित्रपटातील भूमिकेपासून! तसे समांतर सिनेमाचा मराठीत प्रारंभ करणाऱ्या ‘शांतता कोर्ट चालू आहे’ या चित्रपटाद्वारे त्यांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. पण ते गाजले ते त्यांच्या ‘रजनीगंधा’तील ‘शेजारचा सखासोबती’ या लाजऱ्या-बुजऱ्या प्रतिमेमुळे!

साधासुधा, सरळ मध्यमवर्गीय नायक आणि त्याची प्रेमात उडणारी त्रेधातिरपीट हाच या प्रतिमेचा गाभा होता. याच प्रतिमेच्या सूत्राभोवती बाशू चटर्जी आणि हृषिकेश मुखर्जी या दोघा दिग्दर्शकांनी १९७४ ते १९८० या काळात अनेक चित्रपट सादर केले. मध्यमवर्गीय जीवनातील साधा, सरळमार्गी.. काहीशा चलाख, पण भाबडय़ा अशा सामान्य माणसाच्या जीवनात हरघडी घडणाऱ्या घटनांचे सूत्र पकडून अस्सल नर्म विनोदाचे भान ठेवणारे हे चित्रपट या दोघा दिग्दर्शकांनी दिले. या दोघांच्या नर्म विनोदी शैलीतल्या ‘हसऱ्या गॅलरी’चे नायक होते अमोल पालेकर.

१९७४-७५ हा देशातील अस्वस्थ काळ. हिंदी चित्रपटसृष्टीतील काही बदलाचा काळ. फ्रेश चेहऱ्याचा, स्टाइलबाज भोळाभाबडा प्रेमी हिरो राजेश खन्नाचा झंजावात ओसरण्यास नुकतीच सुरुवात झाली होती. राज कपूरच्या ‘बॉबी’तील पोरसवदा तारुण्यातील प्रणय-प्रेमाची प्रेक्षकांना भुरळ पडली होती. ‘जंजीर’, ‘दिवार’मुळे अमिताभच्या ‘अँग्री यंग मॅन’ची तेजतर्रार संतप्त प्रतिमा प्रेक्षकांवर मुक्रर होत होती. अशातच अमोल पालेकरच्या ‘बॉय नेक्स्ट डोअर’ या सरळमार्गी प्रतिमेने समकालीन उत्तुंग प्रतिमेला यशस्वी छेद दिला. ‘फॉम्र्युला’बाज सुपरस्टार प्रतिमेसमोर मध्यमवर्गीय नायक वलयांकित ठरला आणि प्रेक्षकांनीही त्याला भरभरून दाद दिली. अमोल पालेकरांनी अल्प काळ का होईना, हिंदी चित्रसृष्टीवर अधिराज्य गाजविले.

१९८० मध्ये तर ‘गोलमाल’ साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे ‘फिल्मफे अर अ‍ॅवॉर्ड’ अमोल पालेकरांना मिळाले. विशेष म्हणजे, त्याच वर्षी अमिताभला ‘काला पत्थर’ व ‘मि. नटवरलाल’ साठी, राजेश खन्नाला ‘अमरदीप’ साठी आणि ऋषी कपूरला ‘सरगम’साठी नामांकने होती. अशा मातब्बर स्टार्सच्या स्पर्धेत पालेकरांच्या पारडय़ात पडलेले बक्षीस त्यांच्या ‘अमोल’ प्रतिमेचेच कसब होते. ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ म्हणून त्यांना तीन वेळा ‘फिल्म फेअर’ मिळाले.

‘रजनीगंधा’पाठोपाठ आलेल्या ‘छोटीसी बात’, ‘चितचोर’, ‘दामाद’, ‘घरोंदा’, ‘बातों बातों में’, ‘अपने परायें’, ‘नरम गरम’ ते ‘गोलमाल’ अशा अनेक चित्रपटांतून त्यांनी आपल्याच प्रतिमेला उजागर केले व त्यांची लोकप्रियता शिगेला पोचली. तर ‘भूमिका’, ‘स्पंदन’, ‘आदमी और औरत’, ‘तरंग’ व ‘खामोश’ यांसारख्या चित्रपटांतील विविधांगी गुंतागुंतीच्या व्यक्तिरेखांमधून आपल्या सशक्त अभिनयाचे दर्शन घडविले. केवळ हिंदीतच नाही, तर मराठीसह बंगाली, कन्नड, मल्याळी व इंग्रजी भाषांतील चित्रपटांतील त्यांच्या अभिनयाचे कौतुक झाले. बंगाली चित्रसृष्टीत एक महत्त्वाचे अभिनेते म्हणून ते मानांकित आहेत.

अभूतपूर्व लोकप्रियता आणि समीक्षकांकडून मन:पूर्वक स्वागत होत असताना या चतुरस्र अभिनेत्याने १९८६ नंतर अभिनयाची कारकीर्द थांबवून ‘चित्रनिर्मिती’चा ध्यास घेतला.  संपूर्ण लक्ष दिग्दर्शनाकडे वळविले.

‘आक्रित’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने पालेकर यांनी चित्रपट दिग्दर्शनाच्या क्षेत्रात प्रथम पाऊल ठेवले. त्याकाळी महाराष्ट्रात गाजलेल्या ‘मानवत हत्याकांडा’च्या सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट लक्षवेधी ठरला. त्यात हत्या अथवा खून न दाखविता भयाचं रौद्र दृश्यस्वरूप दाखविण्याचं पालेकरांचं कौशल्य वेधक होतं. फ्रान्सच्या ‘नान्त’ आंतरराष्ट्रीय चित्रमहोत्सवात ‘स्पेशल ज्युरी’ पारितोषिक पटकाविणारा हा पहिला मराठी चित्रपट.

‘आक्रित’पाठोपाठ ‘अनकही’, ‘थोडासा रुमानी हो जाए’, ‘दायरा’, ‘कैदी’, ‘कल का आदमी’, ‘पहेली’, ‘दुमकटा’ हे हिंदी चित्रपट, तर ‘बनगरवाडी’, ‘ध्यासपर्व’, ‘अनाहत’, ‘थांग’, ‘समांतर’, ‘धूसर’ असे अनेक मराठी चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. ‘थोडासा रुमानी..’ आल्हाददायक होता. ‘दायरा’जगभर गाजला. ‘पहेली’ भारतातर्फे ऑस्करला पाठविला गेला, तर ‘ध्यासपर्व’ अधिक थेट होता. त्यांच्या अनेक चित्रपटांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पारितोषिके मिळाली.

स्त्रीचे भावनिक विश्व व त्याची तरलपणे केलेली मांडणी हा त्यांच्या चित्रपटातील मुख्य रोख! विशेषत: स्त्रीच्या संवेदनशील व्यक्तिरेखेचा विस्तार त्यांच्या चित्रपटात पाहावयास मिळतो. रखेलपणाविरुद्ध बंड करणारी ‘आक्रित’मधील रुही, स्वत:च्या लैंगिक भावनांची जाणीव व्यक्त करणारी ‘अनाहूत’मधील राणी शीलावती, आपला नवरा नाही हे माहीत असूनदेखील त्याच्यासारख्या दिसणाऱ्या प्रियकराला स्वीकारणारी ‘पहेली’तील लच्छी, समलिंगी नवऱ्यास नाकारणारी ‘थांग’मधील सुशिक्षित सई, संततीनियमनाच्या एकांडय़ा ध्यासात स्वत:च्या मातृत्वाला तिलांजली देणारी ‘ध्यासपर्व’तील मालती कर्वे.. अशा एक ना अनेक व्यक्तिरेखा, त्यातील स्त्रीचे स्वयंपण, तिच्या अपारंपरिक जाणिवा व तिच्या स्वीकार-नकारातील ताणतणावांचे सर्जनशील चित्रण त्यांनी आपल्या चित्रपटांतून केले. त्यासाठी त्यांनी कधी जी. ए. कुलकर्णी, व्यंकटेश माडगुळकर, चिं. त्र्यं. खानोलकर व विजयदान देथा अशा साहित्यिकांच्या अभिजात साहित्यकृतींचा आधार घेतला. तर कधी, समाजातल्या ज्वलंत भिडणाऱ्या मुद्दय़ांभोवती गुंफलेल्या कलाकृती निर्माण करून समाजभाषेशी चित्रपट भाषेचा मेळ घातला. त्यांच्या लोकप्रिय हलक्या फुलक्या प्रतिमेला छेद देणाऱ्या गंभीर कलाकृती त्यांनी दिग्दर्शक या नात्याने निर्माण केल्या.

चित्रपटांव्यतिरिक्त ‘कच्ची धूप’, ‘नकाब’, ‘मृगनयनी’ व ‘पाऊलखुणा’ अशा दूरचित्रवाणी मालिकाही त्यांनी दिग्दर्शित केल्या. ‘पाऊलखुणा’ मालिकेत त्यांनी मराठी साहित्यातील अनेक सशक्त कथा छोटय़ा पडद्यावर आणल्या. ‘मामी’ चित्रमहोत्सव व ‘प्रभात चित्र मंडळ’ अशा संस्थेत कार्यरत राहून चित्रपट संस्कृती प्रसाराच्या कार्यातही योगदान दिले. कलाकृतीवरील सेन्सॉरशिपच्या विरोधातील लढा सर्वोच्च न्यायलयापर्यंत लढविला.

रंगभूमी, चित्रपट, चित्रवाणी आणि चित्रकला अशा बहुविध क्षेत्रांत स्वैर संचार करणारी त्यांची कामगिरी बहुआयामी आहे. पालेकर म्हणतात, ‘‘निव्वळ अपघाताने मी नट झालो, दुसरा मार्गच नाही म्हणून सक्तीने निर्माता बनलो.. दिग्दर्शक मात्र ठरवून.. समजून-उमजून झालो!’’ त्यांच्या या विधानात आपसूक उमजले ते- साध्यासुध्या मध्यम वर्गाला आपली छबी वाटावी असा नायक लाभला. सक्तीमुळे एक निराळ्या ठेवणीचा निर्माता मिळाला आणि समांतर सिनेमाचे स्वतंत्र बिरुद म्हणावे असा दिग्दर्शक लाभला!

satishjakatdar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2019 4:12 am

Web Title: parallel cinemas independent heritage abn 97
Next Stories
1 प्रयोगशील रंगकर्मी
2 टपालकी : बालपण नको रे बाप्पा!
3 विशी..तिशी..चाळिशी.. : इन्शाल्ला..
Just Now!
X