श्रीधर नांदेडकर यांच्या संवेदनशीलतेची अनोखी जातकुळी त्यांच्या पहिल्या – ‘सूफी प्रार्थनांच्या किनाऱ्यावरून’ संग्रहातच ध्यानात आली होती. त्यांच्या ‘परतीचा रस्ता नाहीय’ या दुसऱ्या संग्रहात त्या संवेदनशीलतेचे आणखी अनेक स्तर दृग्गोचर होत जातात. ‘स्व’ आणि ‘इतर’ ही दोन केंद्रे त्यांच्या जाणिवांच्या मध्यभागी अखंड स्पंदन पावतात. ‘स्व’कडे आत वळलेली दृष्टी खोलवर दडून असलेल्या, बालपणापासून आठवणींशी जखडून असलेल्या भावावर्ताचा शोध घेते तेव्हादेखील ‘इतर’ त्यात गुंतलेले असतात आणि ‘इतरां’कडे बघताना ‘स्व’ त्यांच्यापासून विलग होत नाही. अशा या एकात एक गुरफटलेल्या दोन पिळांमुळे नांदेडकरांची कविता साधी, एकपदरी राहत नाही. त्यांच्या कवितेचे महत्त्वाचे बलस्थान म्हणजे अनुभूती, भावना, जाणिवा यांचे प्रतिमांमध्ये रूपांतर करण्याचे सामथ्र्य हे होय. कमालीच्या उत्कटतेने ते अनुभव ग्रहण करतात, आत जिरवून घेतात आणि प्रतिमेत स्फटिकासारखा गोठवून घेतात. त्यामुळे नेहमीचा, परिचित अनुभवदेखील संवेदनशीलतेच्या अद्भुत रंगांनी झगमगून उठतो. उदाहरणार्थ,
वीस वर्षे, कापलेल्या झाडांवर वसलेल्या
आणि दरवर्षी उडून जाणाऱ्या मुलांसमोर
तोंड न रंगवता, काळ्यावर पांढरं करत,
मी हजार भूमिका केल्या.
एरवी, मुळातल्या वास्तव दृश्यात या ओळींचे म्हणणे आहे, ‘बाकांवर बसलेल्या आणि दरवर्षी शाळा सोडून जाणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर फळ्यावर खडूने लिहीत मी वीस वर्षे शिक्षक म्हणून जगलो’ एवढेच. ‘कोणे काळच्या बछडय़ाचं शिंग’मध्ये आपले गाव आणि घरातली माणसे सोडून परदेशी गेलेल्या मित्राची आतुरतेने वाट पाहणारा ‘मी’ त्याच्या भेटीनंतरचा अनुभव असा कडवटपणे व्यक्त करतो : ‘विमानातून पाखरं उडत येतील आपल्या अंगणात म्हणून खिन्न खिडकीतून डोकावत राहतो, पिकल्या केसांचा माणूस आणि तुम्ही येता तेव्हा असे भारत लॉजवर उतरल्यासारखे, शिव्या देत इथल्या धुळीला’  किंवा ‘नाहीतर हे गाव असं धूसर झालं नसतं’मध्ये, ‘मजबुरीच्या पाठीवर बसावं लागलं. थांब म्हणाल्यावर थांबावं लागलं, चल म्हणाल्यावर जावं लागलं’ हा एके काळच्या नोकरीसाठी एका गावाहून दुसऱ्या गावाला नाइलाजाने कराव्या लागणाऱ्या वणवणीचा अनुभव आहे.
नांदेडकरांमध्ये एक कमालीचा व्याकुळ माणूस दडलेला आहे. उत्कटता, आर्तता, व्याकुळता, पण भळभळणारा हळवेपणा नाही. वाचकाला कबजात घेणारे अनोखे रसायन त्यांच्या कवितेत मिळून आलेले आहे. अलीकडे भवताली सहसा न आढळणारी ही व्याकुळता नांदेडकरांच्या कवितेला एक पिळवटून टाकणारा स्वर देते. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर हा, ‘करुणेच्या पाण्याचा आवाज’ असतो. जो या कवितेत अखंड घुमतो. भरून आलेल्या आभाळासारखी ही करुणा त्यांच्या कवितेत ओथंबून येते. त्यांच्या कवितेतली ही करुणा सर्वव्यापी आहे. या करुणेला अनेक सूक्ष्म तंतू आहेत. उदाहरणार्थ या काही ओळी बघा :
एकदा झाडावरून खाली पडून, फुटून गेलेल्या अंडय़ांकडे
आणि एकदा एकमेकांकडे पाहणाऱ्या
पारव्यांचे डोळे तळहातावर ठेवून पाहावे लागतात
पोटात आग पडल्यावर, आपल्या ताटात गरम भाकरी वाढून
धगीत घामानं डबडबलेला चेहरा पुसणारा विरलेला पदर लक्षात ठेवावा लागतो..
किंवा,
बाभळीच्या काटय़ात अडकलेलं कुडतं काढा झाडावरचं  
आन् मला माझ्या पोराच्या घामाचा वास घेऊ द्या
त्याच्या कुडत्यानं हे अभागी कपाळ पुसू द्या..
‘काळ्याकुट्ट लहानशा ईश्वराकडून’, ‘उसनवारीचे दूत’, ‘यास्मिन’, ‘धरण १, २’, ‘कोणत्या विहिरीतलं पाणी रिचवलंस’, ‘धुराडं’ अशा अनेक कविता वाचताना असहायता, नाइलाज, तडजोड, दारिद्रय़, तगमग, कासाविशी, भय अशा भावना-संवेदनांचे कल्लोळ गळ्यात गुदमरणाऱ्या आवंढय़ासारखे दाटून येतात. या करुणेमागचे रहस्यही त्यांनी सांगितले आहे :
जन्माचा डूख धरते दु:खाची धामीण
मग जन्माला येतं कवितेचं करुण संगीत..
परंतु करुणेने जगातले दु:ख टिपून घेताना दु:ख निर्माण करणाऱ्या घटकांची जाणीवही ठसठसत असतेच. ‘अभद्र काळ’, ‘ज्यात मी माझे पाय ओढतो कसेबसे तो तुमचा काळ’, ‘कुटुंबाच्या स्वप्नांना चूड लावणारं भ्रष्टाचं भूत’, ‘गंजलेली नैतिकतेची तलवार’, ‘निर्मम काळाचा काळोख’, ‘वस्तूंचा ध्यास घेतलेली माणसं’, ‘आपल्या झगमग जिंदगीला वाकुल्या दाखवणारे, गाडगी-मडकी विकणाऱ्या भटक्यांचे बिनतक्रार संसार’ यांसारख्या प्रतिमांमधून ते घटक लक्षात येतातच, शिवाय माणसामाणसांमध्ये निर्माण होणारे ताण, दुरावलेली नाती, हरवलेले मित्र असेही घटक असतात. परिस्थितीने निर्माण केलेली घालमेल, ताटातुटीचे कातर क्षणही असतात. अपमानाचे घाव असतात. पण,
गुरुत्वाकर्षण आहे कवितेचं
नाहीतर निसरडय़ा पहाडांवर, असं पाय रोवून उभं राहता आलं नसतं.
‘कविता’ ही नांदेडकरांच्या काळजातली दुखरी नस आहे. ‘सूफी प्रार्थनांच्या..’ या पहिल्या संग्रहात ती एवढी जाणवत नाही. ‘परतीचा रस्ता नाहीय’मध्ये ‘रस्ता’, ‘कोणती अवदसा आठवली’, ‘शब्दांचा गंडा मनगटावर बांधून घेण्याआधी’, ‘मरणाच्या बैलगाडीत बसलेली म्हातारी’, ‘निघताना काही ठरवलं नव्हतं’, ‘भाकरीच असते कविता म्हणजे’, ‘सगळी माणसं कवितेच्या गुहेत थांबतील’, ‘गुरुत्वाकर्षण असतं कवितेचं’, ‘हे माझ्यातलं मुंगूस’, ‘आग लपवण्याचं रूपक’ अशा अनेक कवितांतून त्यांचे ‘कविते’संबंधीचे अनेकपदरी नाते उलगडत जाते. त्यात कधी ‘कोणती अवदसा आठवली की, माझ्या भाषेतल्या काही लोकांनी जरीकाठाचे सदरे लेवून व्यासपीठावर गाणी म्हटली.. आणि एका नदीसारख्या परंपरेच्या काठावर नंगानाच करून फुलं उधळू घेतली अंगावर टाळ्यांची..’ असा तीव्र संताप असतो, किंवा ‘शब्दांच्या किमयागार मित्राला नटव्या स्त्रियांच्या घोळक्यात सामील होण्याचे निरोप धाडले जातात.. आणि मित्र सामील होतो’ याचे अपार दु:ख वाटते, किंवा सगळ्या ‘अपघातांवर माती लोटून आल्यानंतर कवितेचा पदर असतो शिल्लक, ज्याचा बोळा तोंडात कोंबून आतल्या आत थोपवता येतो, पृथ्वीच्या पोटातून येणारा अनावर हुदका..’ अशी समज असते.
जगण्यातली कवितेची महत्ता कळलेली हा कवी ‘रस्ता’ या कवितेत म्हणतो,
या भाडोत्री कवींच्या जळत्या रिंगणातून डोंबाऱ्याचा सूर मारून निघशील,
..तर कवितेची पाऊलवाट तुला जखमी जनावराच्या डोळय़ांतल्या पाण्याजवळ घेऊन जाईल, तू मुक्या दु:खाचं धड खांद्यावर वाहून नेशील तर तुझ्या केसांत आशीर्वादाचा खडबडता हात फिरेल..
‘मर्ढेकरची बकरी’, ‘अरुण कोलटकरचं कासव’ या कविताही या संदर्भात मुळातून वाचल्या पाहिजेत. कवितेविषयीचा कवीचा कळवळाही अनेक प्रकारे व्यक्त होत राहतो-
ज्ञानेश्वरानं भाषेचा दिवा ठेवला आणि स्वत:साठी भुयारातला चिरंतन अंधार.. याच भाषेतून तुकारामाचं विमान उडालं, तर या नदीच्या पात्रात स्वत:च्या शिदोरीतली भाकरी सोडून दिली..
आठशे वर्षे दिवा विझला नाही, चारशे वर्षे भाकरी संपली नाही..
‘सूफी प्रार्थनांच्या किनाऱ्यावरून’मध्ये सतत नको असताना घर सोडून जाण्याची, आपली माणसे दूर जाण्याची, एकाकीपणाची जाणीव पुन:पुन्हा व्यक्त झाली आहे. त्या वेळी ‘काळाच्या वाटोळ्या, नात्यांच्या चक्राकार, विश्वाच्या वर्तुळाकार, सुखदु:खाच्या गोलाकार, खरखरीत सहाणेवर’ होत असलेली झीज आता थांबली आहे. एकाकीपणा, रितेपण, आत्मपीडा, खिन्नता, आत्मर्भर्त्सना, अपराधभाव, ‘या जमिनीवरून झेपावता येत नाही दुसऱ्या प्रदेशात, पाठ फिरवता येत नाही इथल्या भल्याबुऱ्या माणसांकडे, म्हणून या साऱ्यांचा निमूट स्वीकार’ ही असहायता या संग्रहात नाही. तरीपण, ‘हजार  दृश्यं रक्तात लुकलुकत राहण्याचा’ स्वभाव बदललेला नाही. ‘प्रेम’ही अधिक स्पष्टपणे उमटलेले आहे. ‘जमीन आणि पाण्याच्या दरम्यान’, ‘काजव्यासारखं प्रेम उडून जातं अचानक’, ‘तुझ्या कपाळावर लिहिलेली गोष्ट’, ‘आगीची आच’, ‘घिरटय़ा’, ‘काजव्याएवढा उजेड’, ‘तहान’, ‘मी हे शरीर..’ या काही कविता, ज्या नेहमीसारख्या ‘प्रेमकविता’ या साच्यात बसणाऱ्या नसूनही प्रेमकविताच आहेत. तरल आणि अलवार. नांदेडकरांच्या पक्षी-प्राण्यांसंबंधी कविताही लक्षवेधी आहेत. ‘बैल’, ‘रावा’, ‘दिवाभीत’ (सूफी प्रार्थनांच्या..) तशाच, मासे, पक्षी, मांजर, चिमणी, मुंगूस, बकरी अशा प्रतिमा कशा आणि कोणत्या जागी येतात तेदेखील अभ्यासण्यासारखे आहे. सर्वव्यापी करुणेचा हा उद्गार आहे.
मुलांना नुसती शस्त्रं दाखवून, निर्भय बनवण्याचे मनसुबे रचता येत नाहीत.
जगण्यावरच्या श्रद्धेसाठी त्यांना झरे, झाडं आणि पाखरं दाखवावी लागतात.
नांदेडकरांचा हा नवा संग्रहदेखील वाचकांपर्यंत त्यांच्यातली तगमग, तडफड, हातातला आधार सुटू न देण्यासाठी चाललेली धडपड, जननांतर सौहार्दाशी गुंतलेले भाव व्यक्त करण्याची असोशी पोहोचवतो. पण या संग्रहाला स्वत:चा एक आवाज आहे. एक भूमिकाही आहे :
चेंगराचेंगरी होते, तेव्हा तुम्ही तुमच्या हातातलं मूल सोडून देता का?
आग लागते तेव्हा, बिछान्यातल्या मुलीचं काय करता?
दोन दिवसाचं बकरीचं पिल्लू हौदात पडतं तेव्हा?
..जिला मी माझी ताकद मानतो आणि हे जग कमजोरी मानतं ती जिवाशिवाच्या भेटीची आळवणी करणारी कविता धूर आणि विष पसरलेल्या हवेत श्वासासाठी धडपडताना सगळे कविलोक काय करायचं ठरवतात?
..हातातलं मूल, बिछान्यातली पोर, बकरीचं पिल्लू.. दम तोडणारी कविता
शपथेवर सांगतो, मी कोणाचंच बोट सोडणार नाही.
ही भूमिका आज दिलासा देणारी आहेच. ‘मोलाची एकच गोष्ट असावी उशाला जाताना, अद्भुत शब्दांचं एक गाठोडं असावं लहानसं.. कुणीही बघावं की यातली एखादी चिमूट उचलून आपल्या दु:खावर फुंकर मारता येते की नाही.’- असे म्हणणाऱ्या कवीकडून मिळणारा दिलासाही खूपच मोलाचा आहे.
‘परतीचा रस्ता नाहीय’ – श्रीधर नांदेडकर, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, पृष्ठे – १४८, मूल्य – २२५ रुपये.