25 February 2020

News Flash

‘पार्टियाना’- पुनर्भेट संमेलन

मुंबईच्या फाइव्ह गार्डन्सच्या प्रसन्न आणि सुशान्त इलाख्यामध्ये एक प्रतिष्ठित पारसी मदरसा आहे. या संस्थेचा मोठा हॉल सभा-समारंभ, इ. साठी भाडय़ाने मिळत असे.

| November 9, 2014 01:28 am

मुंबईच्या फाइव्ह गार्डन्सच्या प्रसन्न आणि सुशान्त इलाख्यामध्ये एक प्रतिष्ठित पारसी मदरसा आहे. या संस्थेचा मोठा हॉल सभा-समारंभ, इ. साठी भाडय़ाने मिळत असे. सिनेमाच्या शूटिंगसाठी मात्र जागा lok01द्यायला ते फारसे उत्सुक नसत. कारण फिल्मी लोकांचा एकूण रवैया त्यांच्या कोष्टकात बसण्यासारखा नव्हता. आम्ही वागायला कसे चोख आहोत, शिस्तप्रिय आहोत हे त्यांना पटवून दिल्यानंतरच आमच्या ‘पार्टियाना’च्या चित्रणासाठी त्यांचा हॉल खुला झाला. या खेपेला काही पारसी कलाकार आमच्या युनिटमध्ये होते, त्याचाही निश्चित उपयोग झाला.
‘पार्टियाना’ची शृंखला इंग्रजीमधून होत असल्यामुळे बरेचसे कलाकार आम्ही मुंबईच्या इंग्लिश थिएटरमधून निवडले. महाबानू कोतवाल, आलू हिरजी, मेहर जहांगीर या नामांकित कलाकारांनी ही कडी भूषविली. याखेरीज पूजा लड्डा, बकुळ ठक्कर, विनी, विक्रम शहा, इ. मंडळी ‘Help! Murder!!’ (धावा! खून!!) या एपिसोडमध्ये चमकली. सूत्रसंचालन केले नवोदित विनोदसम्राट साजिद खान याने. त्याने नंतर हृषिकेश मुखर्जीच्या ‘झूठ बोले कव्वा काटे’मध्ये छान मध्यवर्ती भूमिका केली, आणि अलीकडे ‘हमशकल’ हा सिनेमा दिग्दर्शित केला. शबानाने त्याचं नाव मला आग्रहानं सुचवलं होतं.
‘धावा! खून!!’ या कडीची गुंफण एका मजेदार खेळाभोवती विणली होती. नटसंचामधल्या दोघांवर राज्य असते. त्या दोघांनी मिळून (म्हणे) कुणा ‘क्ष’ व्यक्तीचा खून केलेला असतो. पण खून झाला त्या नेमक्या वेळी आपण तिसरीकडेच असल्यामुळे हा गुन्हा संभवत नाही, सबब हा आरोप बिनबुडाचा आहे, हे या आरोपींनी पटवून द्यायचे असते. या दोघांची वेगवेगळी तपासणी होते. (दुसरा त्यावेळी खोलीबाहेर.) त्यांच्या जबानीमध्ये जरासुद्धा तफावत असता कामा नये, हे महत्त्वाचे. आपसात संगनमत करायला त्यांना दहा मिनिटं दिली जातात. या अवधीत आपली अक्कलहुशारी पणाला लावून त्यांना भक्कम तयारी करावी लागते. कारण त्यांना सापळ्यात पकडायला इतर सगळे टपून बसलेले असतात. बहुतेककरून हे आरोपी शब्दात किंवा तपशिलात पकडले जातातच. मग त्यांची निर्भर्त्सना करून न्यायाधीश त्यांना सजा ठोठावतात.
सरतेशेवटी या खेळात सूत्रसंचालक साजिदवरच बचावाची पाळी आली. असंख्य असयुक्तिक मुद्दे असलेल्या त्याच्या लंगडय़ा समर्थनामुळे त्याच्यावरचा खुनाचा आरोप शाबीत झाला. न्यायाधीश महाशयांनी कठोर शब्दांत त्याला फैलावर घेतले- ‘तुमच्या केविलवाण्या बचावात तुम्ही आपल्या बालबुद्धीचे प्रदर्शन केलेत. तेव्हा त्या आविष्काराला साजेल अशी सजा तुम्हाला ठोठावण्यात येत आहे. तुम्ही तान्ह्या बाळाचे सोंग वठवून दाखवा.’
साजिद मग तोंडात बोथी आणि अंगात आंगडं- टोपडं अशा थाटात मजेत स्टुडिओभर रांगत फिरला. या खुनी खेळाला दर्शकांची पावती मिळाली; पण स्पॉन्सर अद्याप पडदानशीनच होते. मालिका इंग्रजी असल्यामुळे प्रायोजक मंडळी बिचकून असतील, असे काही तज्ज्ञांचे मत पडले. पण मला या युक्तिवादात फारसे तथ्य वाटले नाही. मी नेटाने पुढच्या तयारीला लागले.
खूप दिवस डोक्यात घोळत असलेल्या एका कथाबीजाला फुलवून मी कागदावर उतरवले.. Reunion.माझ्या थोडक्या सरस कलाकृतींमध्ये मी या टेलिप्रवेशाची गणना करीन. अर्थातच नेहमीच्या सरावाप्रमाणे काम झाल्यावर लिखाण आणि टेप- दोन्ही अडगळीत जमा झाली. त्यांचा काही मागमूसही शिल्लक उरला नाही. जेवढं आठवतं, तेवढं तरी लिहून काढू म्हणून मी यामितीला प्रयत्नशील आहे, पण स्मृतिपटलाला मोठी भगदाडं पडली आहेत. त्यातून बरंच काही निसटून गेलं आहे. या कडीत काम केलेल्या दोघा-तिघांना भेटून त्यांच्या सोबतीनं थोडं मागे वळून पाहण्याचा प्रयत्न केला. फ्लॅशबॅक! पण आठवणी कसल्या वस्ताद! चाळवल्या, उजळल्या नाहीत. असो. जेवढं स्मरतं तेवढं तरी- तेही पहाटेच्या स्वप्नाप्रमाणे विरून जाण्याआधी- उतरवून काढते.
तब्बल ५० वर्षांनंतर कॉलेजात एकाच वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे ‘पुनर्भेट संमेलन’ ठरते. त्याकाळी वर्गाचा म्होरक्या असलेला वृंदावन देसाई पुढाकार घेऊन हा सोहळा ठरवतो. पण स्वत: आजारी असल्यामुळे तो आपला वर्गमित्र रणधीर कश्यप याची मदत घेतो. किंबहुना, या कडीचं सूत्रसंचालन रणधीरच करतो.
सुरुवातीला जमणाऱ्या सर्व मुलामुलींचे (सत्तरीच्या) तरुणपणचे फोटो दाखवून त्या- त्या व्यक्तीची रणधीरने मार्मिक ओळख करून दिली..
‘हा विश्वनाथ उडगीकर. संस्कृत स्कॉलर. पहिला नंबर कधी सोडला नाही. त्याच्याबद्दल सर्वाच्या- प्रिन्सिपलसकट- फार मोठय़ा आकांक्षा होत्या. पण त्याने पुढे एका मागास भागात आदिवासी मुलांसाठी आश्रमशाळा चालवली. ..के. माधवन. कॉलेजचा सारंगी उस्ताद. पुढे फिल्म इंडस्ट्रीमध्ये संगीत दिग्दर्शक म्हणून बऱ्यापैकी जम बसवला. ..हा टेरन्स पिंटो. दरवर्षी ‘वन्समोर’ घेत घेत पास झाला. पण पुढे मोठय़ा कंपनीत मोठय़ा हुद्दय़ावर काम करून रिटायर झाला. ..ही तल्लख, तडफदार पिलू नानावटी. तिनं करिअर केलं. IAS झाली. पुढे बरीच वर्षे ती राज्याची शिक्षण सचिव होती. तिनं लग्न केलं नाही. ..कॉलेजचा NCC प्रमुख स्पाइक मोहिते. पुढे सैन्यात भरती झाला. सरहद्दीवर पराक्रम गाजवून कर्नल म्हणून रिटायर झाला. .HVK हा बडे बाप का बेटा. त्या काळातही आपली मोटर उडवीत कॉलेजला यायचा. कायम पोरींच्या घोळक्यात असायचा. एका लफडय़ामुळे रस्टिकेट व्हायची पाळी आली होती. पण वडिलांनी केमिस्ट्री लॅबला देणगी देऊन प्रकरण मिटवलं. HVK पुढे अमेरिकेला गेला. तिथे मोठा उद्योगपती झाला. एकापाठोपाठ एक- तीन लग्ने केली. तो या स्नेहसंमेलनासाठी मुद्दाम शिकागोहून येणार आहे. .सौदामिनी विश्वास! ही नि:संशय कॉलेजची सौंदर्यसम्राज्ञी. आम्ही सगळेच तिच्या प्रेमात होतो. पण तिने HVK बरोबर लग्न ठरवलं. पण साखरपुडय़ाच्या दिवशीच तो पठ्ठय़ा पसार झाला. मग तिनं वर्गातल्याच ‘जी जानसे’ तिच्यावर प्रेम करणाऱ्या एका सधन बागाईतदाराशी विवाह केला. दोघांनी सुखानं संसार केला. पण तो गेल्या वर्षी निवर्तला. सौदामिनी आता द्राक्षांचे मळे चालवते. ..हिम्मत मनचंदा. हा गडी आमचा फुटबॉल कॅप्टन. काय त्याचा खेळ! काय त्याचा डौल! एखाद्या वायुपुत्राप्रमाणे तो बॉलच्या मागे सुसाट धावत असे. त्यानं कॉलेजला असंख्य पेले मिळवून दिले. बऱ्याच दिवसांत या हीरोची खबर नाही. पण तो पार्टीला नक्की येणार असं गोवर्धन म्हणाला. ..यमुना मंगलमूर्ती. ही आमच्यातली टॉम बॉय. दंगा करण्यात, आंदोलनं चालवण्यात, संप पुकारण्यात पहिला नंबर. सध्या ती महिला विकासकार्याशी निगडित असलेला NGO चालवते आहे. ..राहता राहिला वृंदावन देसाई. नि:संशय सगळ्यात अधिक लोकप्रिय विद्यार्थी. त्याची करणीच तशी होती. पीडाग्रस्तांसाठी फंड जमवणं, गुंडांचा समाचार घेणं, गरीब विद्यार्थ्यांना पुस्तकं मिळवून देणं, अशासारखे त्याचे उद्योग बिनबोभाट चालू असत. अभ्यासात तो हुशार होताच; पण अभ्यासेतर कार्यक्रमांतही तो अग्रणी असे. मुलांचा काही कार्यक्रम ठरला की व्यवस्थापनाची जबाबदारी आपोआप त्याच्या गळ्यात येऊन पडे. आजचा हा पुनर्भेट सोहळा हे पण त्याचेच दिवास्वप्न. आजारी असूनही त्यानं सगळी चोख व्यवस्था करून ठेवली आहे. तो येईपर्यंत मात्र मला इथे नाममात्र बुजगावणं म्हणून उभं केलं आहे.’
रणधीरची ओळख संपल्या संपल्या फोटोमधले कलाकार (आता ५० वर्षांनी वय वाढलेले!) एकेक करीत उगवू लागतात. एकमेकांना पाहून सगळे हर्षभरित होतात. पुरुष दोस्त एकमेकांना मिठय़ा मारतात. बायकांना सभ्यपणे नमस्कार करतात. जुन्या आठवणींना उधाण येते. चालू वर्तमान-वार्ताची देवाणघेवाण होते. कायमचा निरोप घेऊन पंचत्वात विलीन झालेल्या वर्गमित्रांबद्दल हळहळ व्यक्त केली जाते. आपापल्या व्याधी, तक्रारी आणि इलाज यावर सविस्तर चर्चा होते. ऐटबाज बेरे घालून आलेला स्पाइक मोहिते यमुनाला म्हणतो, ‘तू आहेस तश्शीच आहेस. जरासुद्धा बदलली नाहीस.’ ती हसून उत्तरते, ‘तूही जरासुद्धा नाही बदललास. तस्साच थापाडय़ा आहेस.’
HVK  येतो तेव्हा थोडी खळबळ उडते. तो सरळ सौदामिनीकडे जातो. तिचा हात हातात घेऊन विचारतो, ‘तू कशी आहेस?’ सगळे क्षणभर श्वास रोखून दोघांकडे पाहत राहतात. आपला हात सोडवून घेऊन सौदामिनी शांतपणे म्हणते, ‘माझा नवरा गेल्याच वर्षी मला एकटीला मागे टाकून वर गेला, म्हणून दु:खात आहे. पण बाकी तशी ठीक आहे.’ सामूहिक श्वास सोडला जातो.
उडगीकरने सर्व वर्गमित्रांसाठी त्याच्या शाळेतल्या आदिवासी मुलांनी बनविलेल्या बांबूच्या छोटय़ा भेटवस्तू आणल्या आहेत. त्या वाटण्याचा कार्यक्रम होतो. तेवढय़ात मनचंदाचा फोन येतो- ‘ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो. आता खाली लिफ्टबाहेर उभा आहे. लिफ्ट वर गेली आहे. आलोच!’ मग सगळेजण हिम्मत मनचंदाच्या तडफदार खेळाच्या सुरस आणि चमत्कारिक कथा सांगण्यात दंग होऊन जातात. मग टेरन्स पिंटो येतो. त्याच्याबरोबर एक स्मार्टसा तरुण आहे. ‘हा डेव्हिड..’ टेरन्स अभिमानाने सांगतो, ‘नातू माझा. आय. आय. टी.ला आहे. कायम पहिला नंबर पटकावतो.’ ‘नक्की तुझाच नातू ना?’ के. माधवन् खटय़ाळपणे विचारतो. त्याच्या पाठीत गुद्दा घालून टेरन्स विचारतो, ‘कोरम पुरा झाला? फुटबॉल चॅम्पियन कुठे आहे? आणि उत्सवमूर्ती?’ ‘वृंदावन कामं आटपून थोडा उशिरा येणार आहे,’ रणधीर सांगतो, ‘पण मनचंदा येतोच आहे. लिफ्टमधून यायला एवढा वेळ का बरं लागावा?’
आणि मग हिम्मत मनचंदा येतो. चाकाच्या खुर्चीमधून. एक तरुण मुलगी त्याची गाडी ढकलत आत आणते. आपल्या हीरोला अशा असहाय स्थितीत पाहून सगळे गडबडतात. ‘अरे, जरा हसायला काय घ्याल?’ हात उंचावून मनचंदा म्हणतो, ‘जरा हाथ तो मिलाओ, यार.’
मग सगळेजण स्वत:ला सावरून त्याला प्रेमभराने भेटतात. बरोबर आलेल्या मुलीकडे निर्देश करून मनचंदा ओळख करून देतो, ‘ही नात माझी. आणि नर्स. आणि गार्डियन एंजल.. चिंटी.’
‘चिन्मयी आजोबा.’ मुलगी गाल फुगवून सांगते.
‘अरे हो. चिन्मयी.’
‘मग निघू मी? दूर जायचं आहे.’
‘हो. हो. खुशाल जा. I am in good hands. आपलीच टीम आहे ही.’
‘किती वाजेपर्यंत चालेल पार्टी?’
‘मध्यरात्र तर नक्कीच होईल. ५० वर्षे भरून काढायची आहेत.’
‘कुठल्या बाजूला जायचं आहे तुला?’ इतका वेळ गप्प असलेला डेव्हिड विचारतो, ‘मी सोडतो तुला.. ओ. के. ग्रँड पॉप. बी गुड. डोंट ड्रिंक टू मच.’
आणि मग दोघं पोरं हसत हसत जातात.
‘काय हल्लीचे बच्चे!’ टेरन्स पिंटो कौतुकाने म्हणतात- ‘पटकन् दोस्ती जमते त्यांची. पिलूला नुसतं ‘चहा प्यायला चलशील का?’ विचारायला मी वर्षभर अवसान गोळा करीत होतो.’
स्नेहसोहळय़ाच्या कडीसाठी मातब्बर शिष्यवृंद जमवायला बराच खटाटोप करावा लागला. पण त्याचं चीज झालं. पी. जयराजसारख्या जुन्या, मुरब्बी कलाकाराने व्हीलचेअरमधल्या मनचंदाचे काम मोठय़ा आवडीने केले. त्यांचं व्यक्तिमत्त्व प्रभावी होतं. तेव्हा तरुणपणी त्यांनी ‘नेट’ला अनेक ‘गोल’ चारले असणार, हे अगदी पटण्यासारखं होतं. जयराज हे अच्युतमामाचे (अच्युत रानडे- सिनेदिग्दर्शक) जवळचे मित्र. मी आठ वर्षांची असताना अच्युतमामाच्या गच्चीमध्ये जयराज आणि सिनेनट डेव्हिड (‘बूटपॉलिश’ फेम) यांना भेटल्याचं छान स्मरतं. ‘पार्टियाना’नंतर आम्ही भेटत राहिलो. ते अतिशय सुसंस्कृत आणि बहुश्रृत होते. त्यांनी मला आपल्या ग्रंथसंग्रहामधली १००-१५० पुस्तके भेट दिली- चित्रपट आणि नाटक या विषयांना वाहिलेली. ‘पुस्तकांची कदर असलेल्या व्यक्तीच्या हातात हा माझा ठेवा जातो आहे ही केवढी समाधानाची गोष्ट!,’ असं ते म्हणाले. त्यांच्या अमोल संग्रहाएवढेच या त्यांच्या उद्गारांचे मला मोल वाटले. तरला मेहता ही गुजराती रंगमंच आणि रजतपटावरची गुणी अभिनेत्री. तिने धर्मेद्रबरोबर एक हिंदी चित्रपट पण केला होता. मला वाटतं- ‘हरियाली और रास्ता.’ तरलाची एक मोठी बहीण शांता गांधी मला दिल्लीच्या National School of Drama मध्ये नाटय़शास्त्र शिकवीत असे. दुसऱ्या भगिनी दीना पाठक या बॉलीवूडच्या सुपरिचित चरित्र अभिनेत्री होत्या. दिल्ली सोडून मी मुंबईला आले तेव्हा तरलाच्या पारसी कॉलनी परिसरातल्या छानशा बंगल्यात गच्चीवरच्या एका खोलीत भाडय़ाने राहत असे. पण आमची खरी ओळख म्हणजे तिनं माझ्या ‘जास्वंदी’ नाटकाचा गुजराती अनुवाद करवून घेऊन त्यात प्रमुख भूमिका केली होती. तरलाने सौदामिनीची भूमिका केली; पण काहीशा नाखुशीने. माझ्या आग्रहास्तव. डॉ. हेमू अधिकारी उडगीकरच्या भूमिकेसाठी निश्चित ठरले आणि विजू खोटे यांनी कर्नल स्पाइक मोहिते वठवला. माझे पुण्याचे दोन बालमित्र डॉ. प्रमोद काळे आणि S. P. (तात्या) रानडे हे दोघे या वर्गात दाखल झाले. प्रमोद हा के. नारायण काळे या चोखंदळ चित्रपट चिकित्सकांचा मुलगा. तोही प्रसारण माध्यमाचा अभ्यासक होता. लहानपणी आम्ही दोघे एकाच बसमधून नवीन मराठी बालशाळेत जात असू. तात्या हा पुण्याचा एक श्रेष्ठ पर्यायी ऊर्जातज्ज्ञ असून माझ्या जिवलग मैत्रिणीचा- मीराचा तो नवरा. जुन्या ओळखी उपयोगी पडतात त्या अशा. पिलू नानावटी सादर केली आलू बूचावाला या इंग्रजी थिएटरच्या एका अभिनेत्रीने. HVK चं काम करणारा नोशेर जहांगीर हा पण तिथलाच पाईक. तामीळ नाटय़संस्थांबरोबर संपर्क साधून मी के. माधवन्साठी राघवाचारींची निवड केली आणि यमुना मंगलमूर्तीची भूमिका कमला सेठीकडे सुपूर्द केली. कमला जुहूला माझी शेजारीण. तिचा मुलगा अरुण F.T.I.I.  मधून कॅमेरामन म्हणून बाहेर पडला. माझ्या बऱ्याच कलाकृतींमधून त्याने छान कामगिरी केली. तो आणि आता त्याची आईही आमच्या फिल्मी गोतावळय़ामध्ये सामील झाली. सूत्रसंचालक रणधीर कश्यपचं काम परीक्षित साहनीनं छान सहजतेनं केलं. बारबाला डिलायलासाठी ‘फरीटा’ ही नृत्यांगना कुणी आणली ते आता आठवत नाही. पण कुणीतरी जाणकार असणार खास! असो.
हॉलमध्ये मेळाव्याला आता रंग चढला आहे. ५० वर्षे केव्हाच विरून गेली आहेत. स्पाइक आपली बॅग खोलतो आणि आतून तीन बाटल्या काढून त्या ऐटीत टेबलावर ठेवतो. ‘गडय़ांनो, आपल्या पार्टीला माझा थोडासा हातभार. आर्मी रम आहे. खास!’
‘अरे हो! बरी आठवण झाली..’ HVK उडी मारून उठतो. ‘मी पण तुमच्यासाठी काही आणलं आहे.. डय़ुटी फ्रीमधून.’ आणि तो दिमाखात टाळ्या वाजवतो. एक मोठी क्रेट घेऊन दोन सेवक आत येतात.
‘स्कॉच आहे. सिंगल माल्ट. प्या लेको. तुम भी क्या याद रखोगे?’
स्पाइकचा चेहरा पडतो. पण तो हसून म्हणतो, ‘तुझ्या स्कॉचने माझ्या रमचा पार ‘सोडा’ करून टाकला HVK.’ पण त्याचा कडवटपणा फार काळ टिकत नाही. लगेच त्याचा उत्स्फूर्त अवखळपणा उचल खातो. कागदाचा बाण करून तो नेम धरतो आणि पिलूच्या भुरभुरीत केसात बाण अचूक रुतून बसतो.
‘सराव राहिला आहे का हे पाहत होतो.’
‘म्हातारपणी कशाला हवेत हे तरुणपणचे उद्योग?’ उडगीकर गंभीरपणे विचारतात, ‘त्यापेक्षा आता आपलं हे दुसरं बालपण सुरू आहे, तेव्हा एखादा खेळ खेळू या छान.’ आणि मग सगळे बालकांच्या उत्साहाने ‘पुतळे’ खेळतात. सगळ्यांनी रिंगणात गोल धावायचं. शिट्टी वाजली की एखाद्या मुद्रेमध्ये गोठून उभं राहायचं. मनचंदाची खुर्ची ढकलण्यासाठी बायकांच्यात चढाओढ होते. हसण्या-खिदळण्याने हॉल दुमदुमून जातो.
आणि मग अचानक एक पाहुणी टपकते. डिलायला! ही चक्क बारबाला असते आणि पाहुण्यांचे मनोरंजन करायला तिला बोलावलेले असते. उडगीकर तर तिला हात जोडून ‘बाई, तुम्ही भलतीकडे आलात..’ असं म्हणून बोळवायला बघतात; पण मग रणधीर खुलासा करतो की, ती खास वृंदावनच्या आमंत्रणावरून आली आहे. ‘शाम जरा रंगीन हो जाये’ म्हणून हा खटाटोप केला आहे. एवढा खुलासा झाल्यावर मग सगळे नाइलाजाने (!) बाईंचा नाच बघायला तयार होतात. सराईत डिलायला मग धमाल उडवून देते. आळीपाळीने सगळ्यांना नाचात ओढते. तालात मनचंदाच्या खुर्चीबरोबर गिरक्या मारते. पाहता पाहता यमुना, पिलूदेखील मैदानात उतरतात. नाच संपतो. अजून वृंदावनचा पत्ता नाही. कुरकुर सुरू होते.
‘आता मात्र हे अति झालं.’
‘He’s playing hard to get.’
‘वेळेवर ये, म्हणून मला किती वेळा बजावलं त्यानं, आणि स्वत:..?’
मग रणधीर गंभीरपणे उभा राहतो. घसा खाकरून सांगतो, ‘मित्रहो! आज वृंदावन येऊ नाही शकणार, कारण तो आता नाही राहिला आपल्यात.He is no more! कालच सकाळी हॉस्पिटलमध्ये त्यानं जगाचा निरोप घेतला. कुणाला आधी कळवणार नाही, असं त्यानं वचन घेतलं होतं माझ्याकडून. या पार्टीची तयारी करण्यात त्याचे अखेरचे दिवस फार मजेत गेले, असं तुम्हाला कळवायला सांगितलं आहे. एकेक गोष्ट त्याच्या आदेशानुसार घडली आहे. घडते आहे. ती पाहा-’
एक सेवक ट्रेमधून भलाथोरला चॉकलेट केक घेऊन येतो. त्यावर ५० छोटय़ा मेणबत्त्या तेवत आहेत. ‘Happy Birthday to you…’ या गाण्याचे सूर उमटतात. सगळेजण आपापले ग्लास उंचावतात. मनचंदा सुरी उचलतो आणि भरल्या डोळय़ांनी चॉकलेट केक कापू लागतो..      lr03

First Published on November 9, 2014 1:28 am

Web Title: partiyana
Next Stories
1 एकाच जगातील दोन ‘जगं’
2 युद्ध..
3 दही.. एक जगणे
Just Now!
X