‘पार्टीयाना’ नावाच्या इंग्रजी शृंखलेत आतापर्यंत आमच्या चार पाटर्य़ा झडल्या होत्या. प्रत्येक पार्टी वैशिष्टय़पूर्ण असावी अशी माझी धडपड असे. दूरदर्शनच्या कोष्टकाप्रमाणे त्यांना कोणत्याही lok01मालिकेचे १३ भाग अपेक्षित असत. म्हणजे बरोबर तीन महिन्यांची बिदागी पूर्ण होत असे. माझ्या डोक्यात पुढच्या आठ-नऊ संकल्पना होत्या. पुढच्या क्रमांकाचा एपिसोड मी हाती घेणार तोच एक मजेदार घटना घडली.
आमच्या दोन मांजरांचं जेवणखाण बिल्डिंगच्या खाली गॅरेजमध्ये होतं. एकदा पाहिलं तर त्यांच्या दोन बशांच्या भोवती आणखी पाच-सहा उपरी मांजरं वेटोळं करून होती. सगळी गुण्यागोविंदाने खात होती.
‘‘आजकाल ‘पार्टीयाना’ची हवा आहे ना?’’ माझी शेजारीण हसून म्हणाली, ‘‘मग? मांजरांनी का पार्टी करू नये?’’
खरी गोष्ट! मुक्या मित्रांसाठी खास पार्टी यापेक्षा अधिक नवलाईचा काय आनंदोत्सव असू शकतो? मग आधी योजलेलं वेळापत्रक मी बाजूला सारलं आणि या नव्या साहसाची तयारी सुरू केली.
पाहता पाहता मसुदा लिहून झाला. कलाकार (दोन पायांचे) तर फारसे नव्हतेच. जुहूमधलाच एक साधा हॉल शूटिंगसाठी ठरवला.
महेश ठाकूर नावाचा नट नुकताच नावारूपाला येत होता. या कडीचं संचालन करण्यासाठी त्याला ठरवलं. पण पशुपक्ष्यांच्या पंगतीमध्ये ‘करसेवा’ करायला एक फारच अवलिया कलाकार हजर झाला. रवी बासवानी. रवीला मी दिल्लीपासून ओळखत होते. आम्ही दोघांनी ‘लिट्ल थिएटर’ या संस्थेसाठी कुठल्यातरी इंग्रजी नाटकात भूमिका केल्या होत्या. ते नाटक, त्याचा प्रयोग आणि आमच्या भूमिका सगळं फारच बेकार होतं. तेव्हा त्याचा धड तपशील आठवत नाही, हे एका अर्थी ठीकच आहे. पण त्यानिमित्ताने आमची ओळख झाली, एवढं खरं. आम्ही दोघंही काहीसे आग्रही स्वभावाचे असल्यामुळे सुरुवातीला एकमेकांशी जरा फटकून वागत असू. पुढे खूप वर्षांनी मी जेव्हा दिल्लीला परत जाऊन ‘स्पर्श’ हा चित्रपट केला, तेव्हा सुदेश स्याल या आमच्या दिल्लीच्या मित्राच्या मध्यस्थीमुळे तो युनिटमध्ये शिरला. रवीचे तेव्हा दिल्लीत बऱ्यापैकी प्रस्थ होतं. तो जाईल तिथे आपल्याबरोबर चेल्यांचा ताफा घेऊन फिरत असे. सेटवर सात-आठजणांची पलटण पाहून मी जराशी गांगरून गेले. पण रवी म्हणाला, ‘‘घबराना मत. यह चिल्लर मुफ्त में है. किसी को कुछ देना नहीं पडेगा.’’ तरी पण आमच्या प्रोडय़ुसरने एक-दोघांना ठेवून बाकीच्यांना वाटेला लावले. रवीने अतिशय हुशारीने आणि कल्पकतेने ‘स्पर्श’चा साम्रगी विभाग सांभाळला. पुढे त्याने माझ्या ‘चष्मेबद्दूर’ या सिनेमात मोठी भूमिका केली. पहिल्याच सलामीत त्याने फारूख शेख आणि राकेश बेदी यांच्या खांद्याला खांदा देऊन जो जोची अवखळ आणि अवघड भूमिका मोठय़ा नजाकतीनं पेश केली. त्याच्या अभिनयाचा खूप बोलबाला झाला; पण पुढे म्हणावी तितकी त्याची कारकीर्द बहरली नाही. त्याचा रोखठोकपणा आणि वागण्यातली किंचित अरेरावी ही ‘हांजी-हांजी’ला सरावलेल्या बॉलीवूडच्या पचनी पडली नाही. त्यामुळे त्याच्याबद्दलच्या अपेक्षा तशाच राहिल्या. काही वर्षांपूर्वी मसुरीला एका फिल्मचे दिग्दर्शन करीत असताना त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा अकाली मृत्यू झाला. एक होनहार नट हरपला.
मुक्या सोबत्यांच्या ‘पार्टीयाना’मध्ये त्याने फारच बहारदार पात्र रंगवलं. प्रो. पशुपती यांचं. या प्रोफेसर महाशयांना सर्व पशुपक्ष्यांच्या भाषा येतात. पार्टीची वार्ता कळताच ते आवर्जुन उपस्थित होतात. त्यांची एंट्री पण फार बहारदार होती. चक्क उंटावरून!
हॉलमध्ये आल्या आल्या प्रोफेसर पशुपती वर बघून वळचणीतल्या कबूतरांशी वार्तालाप करतात. बराच वेळ गुटरगूं केल्यावर सांगतात, ‘‘माणसे जिकडे तिकडे फार घाण करतात अशी त्यांची तक्रार आहे.’’
मधेच बाहेरून कुत्र्यांच्या भुंकण्याचा जोरजोरात आवाज येतो. तेव्हा लगेच खिडकीबाहेर डोकं काढून त्या भुंकण्यात ते आपला आवाज मिसळतात. बाहेरची कुत्री गप्प होतात.
‘‘काही विशेष नाही,’’ ते सांगतात- ‘दोन टोळ्यांचं सरहद्दीवरून भांडण चालू आहे. Territorial gang war! आज संध्याकाळी त्याच्याबरोबर जुहू बीचवर सभा ठरवली आहे. वाटाघाटी झाल्यावर प्रश्न मिटेल अशी आशा आहे. पाहू या.’’
प्रा. पशुपतींनी कार्यक्रमात दाखवण्यासाठी एक खास लघुपट आणला होता. त्यात जनावरांचे नित्याचे विभिन्न परिपाठ टिपले होते आणि प्रत्येक दृश्यावर मानवी आवाजात ‘डब’ केलेले समर्पक असे पाश्र्वसंवाद जोडले होते. या ध्वनिपरिणामामुळे लघुपटाला खूप मजेशीर कलाटणी मिळाली होती. वानगीदाखल काही दृश्ये :
म्हशींचा कळप संथपणे चालला आहे. एकजण म्हणते, ‘‘तुझा चेहरा मलूल का दिसतो? फेशिअल करून घे ना!’’ त्यावर दुसरी उत्तरते, ‘‘फेशिअल कशाला? मी तर बोटोक्स करून घेणार आहे.’’
शंभरेक गाढवांची रांग ओळीने चालली आहे. अधूनमधून एखादा रंगरूट मान उंचावून आवाज करतो. साऊंडट्रॅकवर दमदार आरोळ्या आहेत.. ‘‘हमारी मांगे पूरी करो..’’ ‘‘अत्याचार हम नहीं सहेंगे- नही सहेंगे!’’ ‘‘शेरूभाई, आगे बढो.. हम तुम्हारे साथ है..’’ इ.
उन्हामध्ये एक गबदुल मांजरी डोळे मिटून बसली आहे. तिच्याभोवती दोन पिल्ले बागडताहेत. मधेच एक पिल्लू म्हणते, ‘‘ए, दंगा नको करूस. आई मेडिटेशन करते आहे.’’
एक डुकरीण सुस्त पडून आपल्या आठ-दहा पिल्लांना पाजते आहे. बाजूला दोन छोटी पिल्लं उभी आहेत. त्यातला एक म्हणतो, ‘‘आई, माझ्याकडे पिंटय़ा आला आहे. तो पण आमच्याबरोबर जेवला तर चालेल का?’’
एका झाडावर दोन कावळे या फांदीवरून त्या फांदीवर उडय़ा मारताहेत.
कावळीण : मला आवडला बाई फ्लॅट. हवेशीर आहे. छान.
कावळा : अगं, पण किंमत ठाऊक आहे का? रु. २०००० पर स्क्वेअर फूट. नाही परवडणार आपल्याला.
मग नदीचे दृश्य आहे. पुन्हा म्हशी! त्या पाण्यात डुंबताहेत. पोरींच्या हसण्या-खिदळण्याचा आवाज. थोडय़ा वेळाने या शॉटवर एक आडवी सूचना उमटते.. ‘Censored!’
दोन सुंदर छोटे कनेरी पक्षी (canaries) आपल्या सुबकशा तारेच्या घरात तेवढय़ातल्या तेवढय़ात इकडून तिकडे उडय़ा मारीत आहेत. पाश्र्वगीत सुरू होतं- ‘हम तुम इक पिंजरे में बंद होऽऽऽ’
त्या काळात ‘बूझो’ नावाचा एक लॅबड्रोर कुत्रा ‘बेताब’ आणि इतर काही सिनेमांमधून गाजत होता. त्याची मुलाखत या कार्यक्रमासाठी अतिशय उचित होईल असं वाटलं आणि मग बूझोच्या मालकाचा छडा लावण्याच्या मी मागे लागले. बूझो आता ‘स्टार’ झाला असल्यामुळे त्याला शोधायला काहीच अडचण पडली नाही. चर्चगेटला एका छानशा फ्लॅटमध्ये, एका छानशा कुटुंबात तो राहत होता. एखाद्या राजकुमारासारखे त्याचे लाड होत. त्याची आई (मालकीण) प्राण्यांवर प्रेम करीत असल्यामुळे आमचे दोघींचे छान जमले.
बूझोचे विक्रम सांगताना अभिमानाने तिचे डोळे लकाकत. ओव्हलच्या मैदानावर ट्रेनरबरोबर पळणे, व्यायाम करणे, आदेश समजून घेऊन त्यांचे पालन करणे, पौष्टिक, पण नेमकाच आहार घेणे अशा गोष्टींचा त्याच्या दैनंदिनीमध्ये समावेश होता. त्याची शूटिंगला जातानाची खास बॅग होती. त्या बॅगेत त्याचा ब्रश, औषधे, पट्टा, बिस्किटांचा पुडा असा सरंजाम असे. सेटवर एका कोपऱ्यात खुर्चीवर ती बॅग असे. डायरेक्टरने ‘पॅकअप्’ असा परवलीचा आदेश दिला, की बूझो धावत जाऊन आपल्या बॅगचे हँडल तोंडात पकडून घरी जायला सज्ज होई. या ‘पॅकअप्’ प्रकाराचे आम्ही शॉट्स घेतले आणि दाखवले.
बूझोची मुलाखत घेणाराही तसाच जबर हवा होता. अमीन सयानींपेक्षा उजवा कोण सापडणार? त्यांच्या ‘बिनाका गीतमाला’च्या खुराकावर एक अवघी पिढी पोसली होती. मी त्यांना भेटले. त्यांना कल्पना खूप आवडली. पण डोकं खाजवून ते म्हणाले, ‘आजपर्यंत कैक मुलाखती घेतल्या. पण कुत्र्याशी वार्तालाप कधी केला नाही. Anyway there is always a first. आणि हो. मी खूप प्रश्न विचारीन. पण तो उत्तर कसं देणार? अधूनमधून त्यानं तोंड तर उघडलं पाहिजे ना? नाहीतर साऊंड ट्रॅकवर उत्तरं येत आहेत, पण त्याचं तोंड मात्र घट्ट मिटलेलं- असं नको.’
सिनेमाला पाळीव प्राणी पुरवणारा एक इसम बूझोच्या तैनातीसाठी होता. त्याने एक युक्ती सांगितली. कुत्र्याच्या दाढेला च्युइंगम किंवा टॉफी दाबून बसवायची. कुत्रा त्रासून तो चिकट ‘गोंद’ काढायचा नानापरी प्रयत्न करतो. जबडा उघडमिट करणं, मान जोरजोरात हलवणं, इ. प्रकार तो करून पाहतो. बूझोनं असंच केलं. त्यामुळे तोंड उघडून तो बोलतो आहे असं वाटलं. परिणाम अगदी नेमका साधला खरा; पण आता वाटतं, की हा एक प्रकारचा दुष्टपणाच झाला. आपल्या सोयीसाठी, रंजनासाठी, मौजेसाठी आपण आपल्या मुक्या सोबत्यांचा छळ करायला जराही मागेपुढे पाहत नाही.
मुलाखतीतला काही भाग आठवतो तो असा-
अमीन : बूझोजी, तुमचा पहिलाच सिनेमा खूप गाजला. तुमची नेमकी काय भूमिका होती?
बूझो : मी हीरो होतो. माझी हिरॉइन होती एक नवीन नायिका अमृता सिंह. शिवाय सनी देवल पण सहकलाकार होता.
अमीन : तुम्ही हाणामारी, दुश्मनांशी दोन हात वगैरे प्रसंग फार उठावदार केलेत. मोटारीमागे सुसाट पळताना भीती नाही वाटली?
बूझो : छे! उलट मजा आली. एरवी आई मला रस्त्यात पळू देत नाही. पण शूटिंगमध्ये मनसोक्त मस्ती करता येते.
(इथे सिनेमामधला एक थरार प्रसंग दाखवला गेला.)
अमीन : पण हे सगळे ताकदीचे प्रयोग करायला तयारी करावी लागते..?
बूझो :  हो तर! ओव्हलच्या मैदानात मी रोज तासभर पळतो. कसरत करतो. माझा ट्रेनर खूप दामटतो मला. म्हणून तर हे सगळे ताकदीचे प्रयोग जमतात.
(इथे पुन्हा बूझोच्या पळापळीची- ओव्हलच्या मैदानात केलेल्या चित्रणाची थोडी झलक दाखवली.)
अमीन : तुम्हाला जिथे तिथे लोक ओळखतात. त्याचा त्रास होत असेल, नाही?
बूझो : छे छे! उलट, आनंद वाटतो. माझ्याबरोबर लहान मुलं फोटो काढतात. माझी स्वाक्षरी घेतात.
अमीन : आं? स्वाक्षरी घेतात? ती कशी काय?
एवढय़ात एक छोटी मुलगी स्टुडिओत येते. बूझोपुढे आपली छोटी स्वाक्षरीची वही धरते. तिच्याकडे एक इंकपॅड पण आहे. बूझो इंकपॅडवर आपला पंजा दाबतो. तिच्या वहीच्या पानावर त्याच्या पंजाचा छान निळा ठसा उमटतो. मुलगी आनंदाने उडय़ा मारीत जाते.
अमीन : वा, बूझोजी! कमाल है. बरं, जरा नाजूक प्रश्न विचारतो. आता तुम्ही कमावू लागलात, तेव्हा दोनाचे चार- आपलं, चाराचे आठ हात करणार की नाही?
यावर बूझो उत्तर देत नाही. लाजून खाली पाहतो.
अमीन : लाजू नका. लाजू नका. काहीतरी विचार केला असेलच ना?
बूझो : ते मी आईवर सोपवलं आहे.
अमीन : पण तुमच्या काही अपेक्षा असतीलच ना! म्हणजे अमुक धर्माची असावी, तमुक जातीची-
बूझो : (गोंधळून) धर्म? जात? म्हणजे काय?
अमीन : ओऽऽ! बूझोजी, तुम्हाला जात, धर्म, वर्ण, वर्ग या गोष्टी माहीत नाहीत तेच बरं आहे. त्या फंदात नकाच पडू तुम्ही.. ठीक आहे. सुखी राहा.
मग बूझो शेकहँडसाठी आपला पंजा पुढे करतो. मुलाखत संपते. आतापर्यंतची प्राणीयानाची भातुकली हसतखेळत पार पडली. पण मग थोडंसं अंतर्मुख होण्याची वेळ येऊन ठेपली. मुक्या सोबत्यांची कैवारी आणि त्यांच्या स्वास्थ्यासाठी झटणारी त्यांची हितचिंतक मुंबईत आली होती. मेनका गांधी. त्यांना आम्ही आमंत्रण केले. ‘मला काम टाकून तुमच्या स्टुडिओत येणं जमणार नाही. पण तुम्ही आमच्या कर्मभूमीत जर आलात तर आपल्याला बोलता येईल..’ असा त्यांचा उलटा निरोप आला. मग आम्ही कॅमेरा उचलून परळच्या बैलघोडा हॉस्पिटलमध्ये गेलो. पशू पेशंट पाहता पाहता मी त्यांच्याबरोबर गप्पा मारत फिरले. लहान मुलांच्या हिताच्या साध्या-सोप्या आणि सहज पटणाऱ्या अशा कितीतरी गोष्टी त्यांनी ऐकवल्या. अलीकडे आपल्याकडे, विशेषत: तरुण पिढीत परदेशी अनुकरणाची लाट आली आहे. त्यांचा पेहेराव, त्यांची बोली, त्यांचे संगीत या सगळय़ाचे भ्रष्ट अनुकरण ठायी ठायी आढळते. पण त्यांची शिस्त, वक्तशीरपणा, नागरी जागरूकता यांच्या नावाने मात्र रामा शिवा गोविंदा! (का Tom, Dick and Harry?) एकमेकांना एकदाचे ‘डय़ूड’ म्हणून संबोधले, की टेकले आभाळाला हात! पाश्चिमात्य देशांत अगदी लहानपणापासून प्राण्यांवर प्रेम करायला शिकवतात. त्यांच्या घराघरांतून बहुधा पाळीव मांजरं-कुत्री असतात. अगदी कुटुंबीय सदस्य म्हणून. त्यांच्या कथा-कहाण्यांमधून तर प्राणी पानापानागणिक बागडतात. Lassie Come Home; My Friend Flica; Winnie the pooh; Dr. Doolittle (प्रा. पशुपतिंचा मूळ अवतार!) अशा दर्जेदार पुस्तकांचं मला बाळकडू लाभलं होतं. दुर्दैवाने आपल्या घरांमधून या मुक्या दोस्तांवर प्रेम करणं सोडा; पण ‘मार भूभूला’, ‘हात् कर माऊला’ असंच शिकवलं जातं. मनेकाने दिल्लीजवळ बेवारशी जनावरांसाठी एक मोठा प्रकल्प चालवला आहे. ज्या कुटुंबामध्ये एखादा तरी पाळीव प्राणी आहे, ते कुटुंब म्हणे अधिक सुखी असतं, असा शास्त्रज्ञांचा शोध आहे. हा पाळीव मित्र सर्व कुटुंबाला सांधणाऱ्या दुव्याचं काम करतो. बाईंचे राजकारण मला जरी फारसे भावले नाही, तरी त्यांनी प्राणिमात्रांसाठी केलेली कामगिरी थोर आहे यात शंका नाही.
तर ही ‘प्राणी’यानाची कडी एका वेगळय़ाच स्तरावर संपली. आतापर्यंत पाचही भाग वेगवेगळय़ा रंगांनी बहरले होते. आता मात्र अवघ्या शृंखलेचा रंग उडू लागला होता. अद्याप आम्हाला प्रायोजक मिळाला नव्हता. नुसत्याच कोरडय़ा कौतुकावर अवसान टिकू शकत नाही, हा महाग धडा मी शिकले. प्रकाशवाणीवरून ओवाळून टाकायला आता पुंजी शिल्लक उरली नव्हती. मालिकेचे पाच भाग बनवून, वर ते प्रक्षेपित करण्याचं धाडस (मूर्खपणा) मी केलं होतं. पण अक्कलखाती किती खर्च करायचा त्याला मर्यादा असतेच. जड अंत:करणाने मी शृंखला बंद केली.
..आणि मग पाच दिवसांनी एक आणि पुढे दहा दिवसांनी एक अशा दोन प्रायोजकांची आग्रहाची मागणी आली. पण एव्हाना मी दुसरीकडे वळले होते. ‘पार्टीयाना’चं दार घट्ट बंद केलं होतं. त्याला भलंभक्कम कुलूप लावलं होतं, आणि किल्ली फेकून दिली होती.  lok02  

Nigerian citizen, Arrested in Nalasopara, Drugs Worth 57 Lakhs, cocaine, mephedrone, drugs in nalasopara, crime in nalasopara, marathi news, crime news,
नालासोपार्‍यात ५७ लाखांचे अमली पदार्थ जप्त
Harsha Bhogle's reaction to Hardik Pandya
IPL 2024 : ‘त्याची चूक काय…’, हार्दिकवर होणाऱ्या टीकेवर दिग्गज समालोचक संतापला, टीकाकारांना दाखवला आरसा
youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू
JSW Group announces partnership with China MG Motor
‘ई-व्ही’ आखाड्यात नवीन स्पर्धक; जेएसडब्ल्यू समूहाची चीनच्या एमजी मोटरशी भागीदारी