बिहारची राजधानी पाटणा ही गंगा व शोण या नद्यांच्या संगमावर वसलेली आहे. इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात गंगेच्या उत्तर खोऱ्यातील मगध प्रदेशात गुप्त साम्राज्याचा उदय झाला. सम्राट पहिला चंद्रगुप्त, समुद्रगुप्त, दुसरा चंद्रगुप्त अशा महापराक्रमी गुप्त राजांनी बिहार व उत्तर प्रदेशचा काही भाग जिंकून साम्राज्यविस्तार केला. त्या मगध प्रदेशाची राजधानी पाटलीपुत्र म्हणजे आजचे पाटणा! कालौघात गुप्त साम्राज्याचा अस्त झाला. नंतर शेरशहा सुरी याने पाटणा शहराचे पुनर्निर्माण केले.
बिहारच्या मध्यभागातून गंगा नदी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते. गंगा नदीवरील ७.५ कि. मी. लांबीचा महात्मा गांधी सेतू हा जगातील अनेक लांब सेतूंपैकी एक समजला जातो. या पुलावरून पाटण्याहून हाजीपूरला जाता येते. या पुलावरील वाहतुकीची कोंडी आपल्याला अर्धा-पाऊण तास तरी रखडवतेच. विशालकाय गंगेच्या या पात्रात मधे मधे छोटी बेटे, घरे, शेती आढळते. हाजीपूरहून वैशालीला जाता येते. वैशाली ही प्राचीन लिच्छवी राज्याची राजधानी होती. वैशाली हे श्री वर्धमान महावीर यांचे जन्मस्थान. भगवान गौतम बुद्धाने इथे शेवटचे प्रवचन दिले व महापरिनिर्वाणाची घोषणा केली. राजदरबारातील गणिका आम्रपाली हिने इथे भगवान बुद्धांना आम्रवन अर्पण केले. भगवान बुद्धांनी जिथे शेवटचे प्रवचन दिले, तिथे पुनर्बाधणी केलेला विटांमधील एक मोठा स्तूप आहे. त्याच्यासमोर सम्राट अशोकाने उभारलेला अशोकस्तंभ आहे. एकाच अखंड लालसर सँडस्टोनमधील हा स्तंभ जवळजवळ ६० फूट उंच आहे. त्याचे वैशिष्टय़ म्हणजे त्यावर काळय़ा पाषाणातील एकच सिंह आहे. (सर्वसाधारणपणे अशोक स्तंभावर चारी दिशांना तोंड केलेले चार सिंह एकमेकांना चिकटून बसलेले असतात.) वैशाली येथील उत्खननात सापडलेल्या मातीच्या, टेराकोटाच्या अनेक मूर्ती, भांडी, तांबे व चांदी यांपासून बनविलेली नाणी तसेच काही सुवर्णप्रतिमा पाटणा इथल्या संग्रहालयात ठेवल्या आहेत.
१९१७ मध्ये पाटणा वस्तुसंग्रहालयाची स्थापना तत्कालीन लेफ्टनंट जनरल एडवर्ड गेट यांनी केली. प्राचीन हडप्पा संस्कृती, मौर्य, कुशाण, गुप्त, पाल अशा अनेक कालखंडांतील संस्कृती, समाजव्यवस्था, उत्कृष्ट कला यांचे दर्शन येथे कांस्य-मूर्ती, टेराकोटाच्या मूर्ती, तांब्यापासून बनविलेल्या अनेक वस्तू यांतून होते. पाटणा, नालंदा, कटक, बंगाल, ओरिसा, आंध्र प्रदेश अशा निरनिराळ्या ठिकाणी सापडलेल्या पुराणवस्तूंचा संग्रह अतिशय उत्तम पद्धतीने इथे जतन केलेला आहे. ५० हजारांहून अधिक वस्तूंचा हा संग्रह १२ वेगवेगळय़ा विभागांत ठेवला आहे.  १९१७ मध्ये पाटण्यातील दिदारगंज इथे गंगाकिनारी मौर्य काळातील एक सुंदर शिल्प सापडले. उजव्या हातात चवरी घेतलेल्या यक्षिणीचे हे शिल्प चकचकीत पॉलिशच्या लालसर दगडामधील आहे. दुर्दैवाने या शिल्पाचा डावा हात नाही. पण बाकी संपूर्ण उभी मूर्ती अत्यंत देखणी आहे. तिचे वस्त्र, अलंकार, मेखला, कांकणे, केशभूषा आणि सुडौलपणा पाहण्यासारखा आहे. अशीच लालसर, गुळगुळीत दगडातील, डाव्या हाताने शाल वृक्षाची (सालवृक्ष) फांदी पकडलेली एका नवयौवनेची कमनीय मूर्ती चेहऱ्यावरील मुग्ध भावांमुळे लक्ष वेधून घेते. मौर्य-शुंग काळातील ही मूर्ती आहे. भगवान गौतम बुद्धांच्या जीवनातील त्यांच्या जन्मापासूनचे विविध प्रसंग दर्शविणाऱ्या अनेक सुंदर शिल्पाकृती निळसर राखाडी रंगाच्या दगडांमध्ये कोरलेल्या आहेत.
कुशाण राजवटीतील बलराम, वासुदेव, बोधिसत्त्व यांच्या मूर्ती, गुप्तकाळातील सूर्य, विष्णू, ब्रह्मा, अग्नि, नृत्यमग्न कार्तिकेय, गौरी, गणेश, हरिहर असे शिल्पकलेचे उत्तमोत्तम नमुने या संग्रहालयात आहेत. डाव्या पायाच्या चवडय़ावर उभी असलेली, अंगावर पोपट खेळवणारी एक सुंदर स्त्री तिच्या मुखावरील प्रसन्न, मिश्कील हास्याने बघणाऱ्याचे लक्ष वेधून घेते. विष्णुपूर (गया) इथे मिळालेल्या मूर्तीमधील अवलोकितेश्वर, मैत्रेय बुद्ध, बोधिसत्त्व, तारा, मंजुश्री, विष्णू, सप्तमातृका, नवग्रह, उमा-महेश्वर अशा अनेक अनुपम मूर्ती इथे ठेवलेल्या आहेत.
सोने, चांदी, तांबे, लोह, कांस्य अशा मिश्र धातूंनी बनविलेल्या अनेक जैन र्तीथकरांच्या मूर्ती, कल्पवृक्ष, धर्मचक्र, बुद्ध, कुबेर, पार्वती अशा सहाव्या ते आठव्या शतकांतील कलाकृती म्हणजे त्या काळातील हिंदू, बौद्ध आणि जैनधर्मीयांचे गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या, दुसऱ्या धर्माचा आदर राखणाऱ्या सहअस्तित्वाच्या प्रतीक वाटतात. टेराकोटामधील रामायणातील प्रसंग, कमनीय नर्तकी, लहान मुले, पशुपक्षी, वृक्ष, नाणी यांचा गुप्तकाल आणि पाल साम्राज्यकाळातील मोठा संग्रह या ठिकाणी जतन केलेला आढळतो.
राजस्थानी, मोगल, पहाडी शैलींतील अनेक पेंटिंग्ज कला- विभागात आहेत. हस्तिदंत, अभ्रक यांवरील चित्रेही त्यात आहेत. रामायण, राधा-कृष्ण, युद्धदृश्य, सामान्य जनजीवन चित्रित करणारी पेंटिंग्ज त्यात आहेत. १०० वर्षांपूर्वी महान पंडित राहुल सांकृत्यायन यांना तिबेटमधील चिनी आक्रमणाच्या काळय़ा, अशुभ सावलीची पूर्वकल्पना आली होती. त्यांनी तिबेटमधील बौद्ध मठांतून जमतील तेवढे ज्ञानग्रंथ, हस्तलिखिते, चित्रे खेचरांवर लादून लपूनछपून भारतात आणली. सिल्क व सुती कापडांवर नैसर्गिक रंगांनी काढलेल्या या चित्रांना ‘थंका’ असे म्हणतात. या चित्रांचे विषय मुख्यत्वे बुद्ध, बोधिसत्त्व, लामा, धर्मगुरू, मठ असे आहेत. पंडित राहुल सांकृत्यायन यांनी आणलेल्या अशा थंकांचा भलामोठा संग्रह पाटणा संग्रहालयात आहे.
ग्रीक, कुशाण, शक, गुप्त, मौर्य आणि मोगल काळातील सोने, चांदी, तांबे या धातूंतून बनविलेल्या तब्बल २२ हजार नाण्यांचा संग्रह इथे आहे. त्याशिवाय मूर्तजीगंज (पाटणा) इथे मिळालेली टेराकोटामधील २३ चक्रे आहेत. या चक्रांवर मातृदेवता, पशुपक्षी, वृक्ष, चंद्रकोर, कमळे असे कोरीवकाम आढळते. वैशाली इथल्या उत्खननात सापडलेल्या पवित्र बुद्ध अस्थींचे अवशेष येथे एका वातानुकूलित कक्षात ठेवण्यात आले आहेत. एका कक्षात वेगवेगळी खनिजे, दगड हे उल्कापातात सापडलेले पाषाणनमुने ठेवले आहेत. १९२७ मध्ये आसनसोलजवळ सापडलेला २० कोटी वर्षांपूर्वीचा पाईन वृक्षाचा ५३ फूट लांबीचा जीवाश्मही इथे आहे. सर्वसाधारण परिस्थितीमध्ये प्राणी अथवा वनस्पती मृत झाल्यावर त्यांचे विघटन होते. पण एखाद्या आकस्मिक घटनेमध्ये- म्हणजे भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक इत्यादी नैसर्गिक आपत्तींमध्ये झाडे, प्राणी क्षणार्धात गाडले जातात. त्यावेळी ऑक्सिजन व जीवजंतूंच्या अभावी त्यांच्यात कुजण्याची प्रक्रिया न होता या मृत अवशेषांमध्ये हळूहळू खनिजकण भरले जातात. कालांतराने तो जीव किंवा वनस्पती यांचे दगडामध्ये परिवर्तन होते. यालाच ‘जीवाश्म’ (Fossil) असे म्हणतात.
भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांना त्यांच्या कार्यकाळात मिळालेल्या देश-विदेशातील भेटींचे एक वेगळे दालनही या संग्रहालयात आहे.
पाटणा संग्रहालयाच्या इमारतीत तळमजल्यावर भारतीय रिसर्च इन्स्टिटय़ूट आहे. तिथल्या दालनात भिंतीजवळील मांडण्यांवर शेकडो प्राचीन ग्रंथ व हस्तलिखिते आहेत. चार बुद्धिस्ट रिसर्च स्कॉलर्स काही हस्तलिखिते वाचण्यात त्या ठिकाणी मग्न होते. मी तिथल्या अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन या विद्वानांशी थोडीशी बातचीत केली. त्यांचे फोटो काढले. लाल कापडांत बांधलेली साधारण सहा इंच रुंदीच्या लांबट आकारातील ती हस्तलिखिते तिबेटी, संस्कृत व पाली भाषेतली होती. त्या ग्रंथांतील विषयांची ते सूची बनवीत होते. हे ग्रंथ पंडित राहुल सांकृत्यायन यांनी १०० वर्षांपूर्वी तिबेटहून जे ग्रंथ आणले त्यातील होते. त्या ज्ञानखजिन्यातील काही ग्रंथ सारनाथ इथे आहेत. या विद्वानांनी सांगितले की, ‘हे ग्रंथ गणित, विज्ञान, खगोलशास्त्र, व्याकरणशास्त्र, धर्मशास्त्र, वैद्यक अशा अनेक विषयांवरचे आहेत. आम्ही फक्त त्यांची विषयवार सूची बनवीत आहोत. या ग्रंथांचा अभ्यास करायला खूप वर्षे लागतील.’ शिलालेखांच्या फोटोंचे वाचनही तिथे चालले होते.
पाटण्यातील सुप्रसिद्ध गांधी मैदानाच्या पश्चिमेला ‘गोलघर’ नावाचे स्तुपाच्या आकारातील भलेमोठे धान्यकोठार आहे. २५ मीटर उंच व १२५ मीटर घेर असलेले हे अवाढव्य बांधकाम १७८६ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीचा इंजिनीअर व आर्किटेक्ट असलेला कॅप्टन जॉन गार्सिन (John Garstin) याने पूर्ण केले. एक कोटी लोकांचा घास घेणाऱ्या १७७० मधील बंगाल व बिहारमधील महाभयानक दुष्काळानंतर दोन लाख टन धान्य साठविण्याची सोय करण्यासाठी तत्कालीन गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज यांच्या आदेशावरून हे बांधकाम केले गेले. या धान्यकोठाराच्या गोल चढत जाणाऱ्या तिरक्या १४५ पायऱ्या चढून आतील निरनिराळय़ा कप्प्यांमध्ये धान्य ओतण्याची सोय केली होती. आज हे रिकामे गोलघर फक्त बाहेरून पाहता येते.
शिखांचे दहावे गुरू गोविंदसिंग यांचा जन्म पाटण्यात झाला. तख्त श्री हरमंदिरसाहिब हे भव्य, कलापूर्ण गुरुद्वार इथे आहे. गुरू नानक व गुरू तेगबहादूर यांनी पाटण्याला अनेकदा भेट दिली होती. पाटण्यातील खुदाबक्ष ओरिएंटल लायब्ररीमध्ये पर्शियन व अरेबिक हस्तलिखितांचा दुर्मीळ संग्रह आहे.
बिहारचे मधुबनी पेंटिंग्ज जगप्रसिद्ध आहे. कापड, हँडमेड पेपर, कॅनव्हास यावरील निसर्गचित्रे व धार्मिक प्रसंगांवर आधारित चित्रे या शैलीत केलेली आढळतात. भोजपूर, गया, मधेपुरा, मुंगेर, वैशाली, दरभंगा, सीतामढी आणि पश्चिम चंपारण्य विभाग ही ठिकाणे रामायणकाळाशी संबंधित आहेत असे मानले जाते. मुंगेर हे ठिकाण तर आता आंतरराष्ट्रीय योगविद्या केंद्र झाले आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद व सुप्रसिद्ध शहनाईवादक भारतरत्न बिस्मिल्ला खान हे बिहारचेच! गंगा व गंडकी नद्यांच्या संगमावर पाटणा शहरासमोर सोनपूर इथे दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आशियातील सर्वात मोठा गुरांचा बाजार भरतो. शहरामध्ये पाटण देवीचे मंदिर व कालिमाता (दुर्गा) मंदिर आहे. छटपूजा, तीज, चित्रगुप्त पूजा, बिहुला-बिसरी पूजा असे अनेक उत्सव साजरे होतात. विपुल पाण्याचे वरदान असलेल्या या घनदाट लोकवस्तीच्या प्रदेशात तांदूळ, गहू, डाळी, फळे, भाज्यांचे चांगले उत्पन्न होते.
अनेक अज्ञात प्रतिभासंपन्न कलाकारांच्या अलौकिक कलेचे पाटणा संग्रहालयातील दर्शन व प्राचीन ग्रंथांच्या रूपात असलेला अमूल्य ठेवा हे फार मोठे सांस्कृतिक वैभव आपल्याला अभिमान वाटावा असे आहे.                                                   
pushpajoshi56@gmail.com