27 May 2020

News Flash

भ्रष्ट व्यवस्थेतील शोकात्म नायक

कादंबरीत साधारणत: दहा-बारा वर्षांपूर्वीचे राजकीय, सामाजिक आणि सहकारी चळवळीच्या वास्तवाचे चित्रण आले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

अश्विनी धोंगडे

‘पिढीजात’ ही श्रीकांत देशमुख यांची पहिलीच कादंबरी. यापूर्वी त्यांचे तीन कवितासंग्रह, ललित गद्य पुस्तके, वैचारिक लेखन प्रसिद्ध झाले आहे,  ग्रामीण वास्तव आणि शेतकरी हा त्यांच्या सर्वच लिखाणाचा केंद्रिबदू. ही कादंबरीदेखील त्याला अपवाद नाही.

कादंबरीत साधारणत: दहा-बारा वर्षांपूर्वीचे राजकीय, सामाजिक आणि सहकारी चळवळीच्या वास्तवाचे चित्रण आले आहे.  ‘पिढीजात’ या नावानेच लेखकाने सूचित केले आहे की, काळ बदलला, पिढी बदलली, सरकार बदलले तरी पिढय़ान् पिढय़ा चालू असलेली येथील भ्रष्ट व्यवस्था आणि गरीब शेतकऱ्याची पिळवणूक ही पिढीजात असल्यासारखी कायम तशीच चालू राहणार. एका गरीब शेतकरी कुटुंबातून आलेला नवनाथ हा राज्य सरकारच्या प्रशासन सेवेतील तरुण अधिकारी आहे. आपल्या हातून शेतकऱ्यांचे, कामगारांचे काही भले व्हावे म्हणून त्याने आपल्या गावाकडील एका शहरी भागात जिल्हा उपनिबंधकाची म्हणजे डीडीआरची जागा मागून घेतली आहे. त्याच्या दोन-तीन वषार्ंच्या काळात पद्मश्री साखर कारखाना, मार्केट कमिटी, गंगाबाई जिल्हा सहकारी बँक आणि इतर अनेक छोटय़ा-मोठय़ा  प्रश्नांना तोंड देताना आलेले अनुभव, त्या अनुषंगाने भेटलेली शेकडो माणसे, अन्य अधिकाऱ्यांकडून कळलेल्या अनेक घटना यांचे प्रभावी चित्रण हेच या कादंबरीचे मध्यवर्ती कथानक आहे.  कादंबरीचे वैशिष्टय़ म्हणजे लेखकाने ठाशीवपणे चांगले विरुद्ध वाईट असे काळे-पांढरे चित्र इथे रंगवलेले नाही. त्याची मध्यवर्ती व्यक्तिरेखा नवनाथ ही प्रत्येक माणसाच्या आणि घटनेच्या तळाशी जाऊन मूळ कारणांचा विचार करते. तो माणसाच्या जगण्यातले विचार आणि विकार समजून घेतो. व्यवस्था बदलण्याचा अभिनिवेश न बाळगता तो आपल्यापुरते स्वच्छ आणि प्रामाणिक आयुष्य जगतो.

लेखकाने सहकार क्षेत्रात काम करणाऱ्यांचे अत्यंत वास्तव चित्रण यात केले आहे. सहकारी संस्था निर्माण करताना सामान्यांना दाखवलेल्या आशा व नंतर त्यांचा होणारा भ्रमनिरास, सामान्य शेतकरी कामगारांचं देशोधडीला लागणं- याचं विदारक चित्रण नायक नवनाथपुढे स्पष्ट होऊ लागतं. उद्योगांसाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी धाक दाखवून घेतल्या गेल्या त्यांना ना पैसे मिळाले, ना कारखान्यात नोकरी. गरीब शेतकरी कुटुंबातून आल्यामुळे नवनाथ त्यांची दु:खं समजून घेतो पण खरंतर त्याचं निराकरण करणं त्याला शक्य होत नाही. वरपासून खालपर्यंत एक भ्रष्टाचाराची अशी साखळी इथे तयार झालेली आहे की, स्वार्थी दृष्टीने स्वत:ची तुंबडी भरून घेणाऱ्या या व्यवस्थेतील उतरंड त्याला कोणतेही  निर्णय घेऊ देत नाही.

लालफितीतला कारभार करताना प्रामाणिक प्रशासकीय अधिकाऱ्यांची होणारी कुंचबणा, मानसिक ताणतणाव या कादंबरीतून नेमकेपणाने समोर येतात. बदल्यांचा ससेमिरा, निलंबन अशी शस्त्रं वापरुन अशा अधिकाऱ्यांना नामोहरम करण्याची भ्रष्ट संस्कृती इथं कशी रुजली आहे, यावर कादंबरी भाष्य करते.

सहकारी बँका, पतसंस्था, सूत- गिरण्या, साखर कारखाने इ. मधील भ्रष्टाचार, अनियमितता, हितसंबंधांसाठी आपल्याच माणसांची त्यावर केली जाणारी नेमणूक, सत्तेचा अमर्याद वापर करुन केली जाणारी अफरातफर, त्यामुळे होणारं सामान्य ठेवीदारांचं नुकसान, शेतकरी- कामगारांचं नुकसान असे कथानकाचे अनेक पदर लेखकानं बारकाईने रंगवले आहेत.

प्रशासकीय सेवेत असलेल्या कित्येक स्वार्थलोलूप लोकांची व्यक्तिचित्रे लेखकाने अतिशय प्रभावीपणे रेखाटली आहेत. सडलेल्या राजकीय व्यवस्थेत या लोकांनी स्वत:ची एक नीतिभ्रष्ट संस्कृती इतक्या भक्कमपणे उभी केली आहे की, नवनाथसारख्यांनी या व्यवस्थेला टक्कर देणे म्हणजे स्वत:चा कपाळमोक्ष करून घेणे. नवनाथ अत्यंत संवेदनक्षम आणि विचारी असल्याने तितक्याच निर्ममपणे तो स्वत:ची चिरफाड करू शकतो. नवनाथने आत्महत्या केली? तो मेला की जिवंत आहे? हे सगळे प्रश्न लेखकाने धूसर ठेवले आहेत. मात्र आधुनिक साहित्यकृतीतून शोकात्मिका संपलेली नाही, याची ग्वाही देणारी ही खऱ्या अर्थाने महाकादंबरी आहे.

पिढीजात – श्रीकांत देशमुख.

राजहंस प्रकाशन,

पृष्ठे- ६०४, किंमत – ६०० रुपये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 6, 2019 12:07 am

Web Title: pidhijat by shrikant deshmukh book review abn 97
Next Stories
1 नाटकवाला : जादूचा लोटा
2 संज्ञा आणि संकल्पना : दृष्टीआडची सृष्टी
3 गवाक्ष : ऋण..
Just Now!
X