02 March 2021

News Flash

रफ स्केचेस् : चटका

नागपूरच्या अमेय प्रकाशनचे पिंपळापुरे आणि मुंजे यांच्यासाठी मी बरंच काम केलं आहे.

पिंपळापुरे मामांनी वयाची चाळिशीही गाठली नव्हती हे खरं, पण त्यांच्या मिशा भारी झुपकेदार होत्या, म्हणून मी त्यांना ‘मिशीवाले मामा’ म्हणायचो.

सुभाष अवचट – subhash.awchat@gmail.com

सुभाष अवचट.. चित्रकलेच्या दुनियेत मनमुक्त विहार करणारं कलंदर व्यक्तिमत्त्व. या साप्ताहिक सदरात ते शब्दचित्रं रेखाटणार आहेत.. सहवास लाभलेल्या विलक्षण व्यक्तिमत्त्वांची आणि त्यांच्यासोबतच्या आनंदयात्रेची!

नागपूरच्या अमेय प्रकाशनचे पिंपळापुरे आणि मुंजे यांच्यासाठी मी बरंच काम केलं आहे. ते दोघं मामा-भाचे होते. मुंजे हे पिंपळापुरेंना  ‘मामा’ अशी हाक द्यायचे. पिंपळापुरे मामांनी वयाची चाळिशीही गाठली नव्हती हे खरं, पण त्यांच्या मिशा भारी झुपकेदार होत्या, म्हणून मी त्यांना ‘मिशीवाले मामा’ म्हणायचो. या मिशीवाल्या मामांचे उद्योग चिक्कार. त्यांच्या गिरण्या वगैरे आहेत असं ऐकून होतो. या अनेक व्यवसायांपैकी एक म्हणजे पुस्तक प्रकाशन! पुस्तकं काढायचे, ती पण अगदी  ऐटीत! म्हणजे एका वेळी पाच-सात पुस्तकं. करायचा तो कल्लाच!

मिशीवाले मामा नागपूरहून दादरला यायचे आणि अरोमा लॉजवर उतरायचे. येण्यापूर्वी त्यांचा फोन ठरलेला असे.  ‘मी दादरला येतोय, तू ये!’ की मी जायचो, हेही ठरलेलं असे!

एकदा असाच त्यांचा फोन आला. मी अरोमा लॉजवर पोचलो. लॉज म्हणजे काय? एकदम साधंसुधं मध्यमवर्गीय प्रकरण ते. मिशीवाले मामा नेहमी वरच्या मजल्यावरच्या शेवटच्या खोलीत उतरत. जिना चढला की कॉरिडॉर होता. लांबच लांब. त्याच्या शेवटी मामांची खोली.

मी तिथं पोचलो. नेहमीप्रमाणे नागपूरची ट्रेन लेट झालेली. आता काय? मामांची वाट पाहत थांबू या म्हणून त्यांची खोली असलेल्या मजल्यावर पोहोचलो.

तर त्या लांबलचक कॉरिडॉरमध्ये कुणीतरी दिसलं. एकदम सडसडीत अंगकाठी. चेहरा विचित्र पिळवटलेला. भराभर पावलं टाकत ते गृहस्थ तरातरा येरझारा घालत होते. तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटणं चाललं होतं. मध्येच मानेला झटके! म्हटलं, आता हे कोण?

निरखून पाहिलं तर  चिं. त्र्यं. खानोलकर. कवी आरती प्रभू!

म्हटलं, अरे तिच्या मारी!! हा एवढा श्रेष्ठ कवी इथे काय करतोय?

मग आठवलं, मिशीवाले मामा त्यावेळी जी पुस्तकं करत होते, त्यात खानोलकरांचं  ‘वारा वाहे रुणझुणा’ होतं. त्याचं कव्हर मीच करत होतो, म्हणून माहीत!  मलाच काय, आमच्या संपूर्ण पिढीला खानोलकर माहिती होते.

पण ते हे इथे असे का आहेत, हे कळेना. मी त्यांना शांत करत म्हणालो,  ‘अहो, नमस्कार. बसा जरा!’

तर कविवर्य घुश्शात!  म्हणाले, ‘आहेत कुठे तुमचे ते प्रकाशक?’

मी म्हटलं, ‘येतील हो ते. ट्रेन लेट झाली असेल. ते तुम्हाला भेटायलाच येताहेत, नाही का? मीही त्यांनाच भेटायला आलो आहे. त्यांची इतरही कामं असतील. अडकले असतील कुठेतरी! तुम्ही आधी इथं बसा तर!’

– तिथं त्या कॉरिडॉरमध्ये एक बाकडं होतं. मला वाटलं, बसतील जरा! पण त्यांनी मानेला झटका देऊन ठाम नकार नोंदवला आणि  बडबड सुरू ठेवली..  ‘ही काय पद्धत आहे का? मला घरी जायचं आहे..’ वगैरे सुरू होतं. मी त्यांना ‘बसा’ म्हणालो. ‘चहा घ्या’ म्हणालो. शेवटी हतबल होऊन ‘आपण खाली जाऊ या का?’ असंही विचारलं. पण त्यांचा नन्नाचा पाढा!

आरती प्रभू माझे आवडते कवी. जीव ओवाळून टाकावा अशा विलक्षण प्रतिभेचा माणूस! पण हे काहीतरी वेगळंच चाललं होतं. या टोकापासून त्या टोकापर्यंत अशा तरातरा येरझारा सुरू होत्या. संताप आवरत नव्हता. चालताना भिंतीला धक्का बसत होता, त्याचंही त्यांना भान नव्हतं.

पंधरा-वीस मिनिटांनी मिशीवाले मामा आले. म्हटलं, बापरे! आता स्फोटच होणार! मी आपला पटकन् पुढे जाऊन मामांना म्हणालो, ‘मामा, आरती प्रभू आले आहेत आणि खूप चिडले आहेत! जरा सांभाळून बरं!’

मामा ढिम्म. शांतपणे म्हणाले, ‘मला माहिती आहे का चिडलेत ते!’

खांद्यावरची पिशवी सांभाळत त्यांनी लॉजची खोली उघडली, हातातली बॅग आत ठेवली. अंगातला कोट काढला, बाजूला सोफ्यावर ठेवला. खानोलकरांना शांत करत ‘बसा’ म्हणाले.. तरी खानोलकर आपले उभेच! मामांनी फार आग्रह केला नाही. बाजूला ठेवलेली बॅग उघडली. बॅगेतून एक कागदी एन्व्हलप काढलं आणि खानोलकरांच्या हाती ठेवलं.

चकारही शब्द न बोलता खानोलकरांनी ते एन्व्हलप घेतलं आणि पाठीमागे वळून न बघता ते तसेच तरातरा निघूनही गेले.

मी चाट! बघतच राहिलो.

मामांना म्हटलं, ‘मामा, ही काय भानगड? किती पैसे दिलेत?’

मामा म्हणाले, ‘दीड हजार रुपये दिले!’

म्हणजे? त्या दीड हजार रुपयांसाठी आरती प्रभू इतके अस्वस्थ झाले होते? मला कळेना. मामा उत्तरले, ‘अहो, मला ते तुमचं लेखकांचं काही समजत नाही. मी त्यांना पैसे देणार असं म्हणालो होतो आणि त्यासाठीच आलो होतो!’

गप्पांच्या ओघात कळलं, त्या पुस्तकाची रॉयल्टी वगैरे असणार नव्हती. मामांनी एक विशिष्ट रक्कम ठरवून खानोलकरांशी व्यवहार पक्का केला होता. त्या रकमेतला शेवटचा हप्ता म्हणजे ते दीड हजार रुपये.

ते हातात पडताच खानोलकर वाऱ्यासारखे  तिथून निघून गेले होते.

माझ्या पोटात तुटलं. ज्या माणसाच्या कवितांवर जीव टाकला, ज्याच्या लेखनाच्या गूढ डोहात कोण जाणे किती रात्री बुडून पडलो; त्याची प्रत्यक्ष भेट.. ही अशी? कसल्यातरी अशुभाचा चटका लागावा तसा मी भिरभिरलोच एकदम.

मग पुढे ओळख झाली. दोस्तीही झाली खानोलकरांशी. त्यांच्या पुस्तकांची कव्हरंही मीच केली. त्यानिमित्ताने भेटीही झाल्या. पण प्रत्येक भेटीत चटका हा ठरलेला. असं काहीतरी करायचे, बोलायचे, की मी जागच्या जागी अक्षरश: थिजून जायचो.

एकदा खानोलकर पुण्यात माझ्या स्टुडिओत अवतीर्ण झाले. अंगात रेशमी कुर्ता, पांढरा पायजमा, तोंडात पान, डोळ्यांवर चष्मा लावलेली त्यांची ती कृश देहयष्टी. चेहरा  पिळवटलेला नव्हता. हसूही होतं त्यांच्या त्या पातळ ओठावर.

मी मजेत विचारलं, ‘काय, आज रागावणार बिगावणार नाही की काय  तुम्ही? आज आरडा नाही, ओरडा नाही. तरातरा चालत नाही आहात तुम्ही?’

खानोलकर विचित्रसे हसून म्हणाले, ‘नाही.. नाही. आज मस्त आहे. तुम्हाला भेटायला आलोय!’

मी हसून उगीच त्यांची चेष्टा करत म्हणालो,  ‘मग आज मजा आहे तुमची!’

तर खिशावर हात थोपटत मला म्हणाले, ‘अवचट, आज ‘अवध्य’ नाटकाचे पैसे मिळालेत. बसू का तुमच्या इथं? जरा विश्रांतीला आलोय!’

– एक विचित्रशी अजिजी होती त्या तेजस्वी कवीच्या शब्दांत.

पुन्हा तो चटका.

क्षणभरानंतर जरा आणखी चुळबुळत म्हणाले,  ‘मला थोडंसं लिहायचं आहे. तुम्हाला त्रास नाही ना होणार?’

मी म्हणालो, ‘नाही हो, खुशाल लिहीत बसा इथे. त्रास कसला त्यात? मला काहीही डिस्टर्ब वगैरे होणार नाही!’

माझ्या होकारानंतर लगेचच जणू सुटकेचा सुस्कारा टाकल्याच्या गडबडीने खानोलकर तिथल्याच टेबलाशेजारी खुर्ची ओढून पटकन् बसले. मी त्यांच्यासमोर कागदांची चळत ठेवली. तिथलंच पेन उचलून त्यांनी घाईघाईत कागद पुढे ओढत लिहायला सुरुवात केली.

..अवघ्या काही क्षणांत चित्र बदललं. ती अजिजी गेली, विचित्रसा अवघडलेपणा गेला. खानोलकर आजूबाजूचं सारं विसरले. सगळे त्रास विसरले. एरवीची पैशाची चणचण विसरले. खिशातले ‘अवध्य’चे पैसे विसरले. मलासुद्धा विसरले. त्यांच्या डोक्यात कसलेतरी ज्वालामुखी फुटत असावेत. त्यातला तो लाव्हा समोरच्या कागदावर झरझर उतरत राहिला. एकटाकी काहीतरी लिहीत होते. या कृश माणसाच्या फाटक्या झोळीत देवाने ओतलेल्या ‘नक्षत्राच्या देण्या’चा भार पेलण्याची ताकद अचानक कुठूनतरी त्यांच्या अंगात सळसळत्या विजेसारखी उतरलेली मला दिसत राहिली.

मी गप्प राहिलो. माझं काम चालू होतं. दोनेक तास असेच गेले. माझ्या स्टुडिओत नि:शब्द शांतता पसरलेली. मला विचित्रशी भीती वाटत राहिली समोरच्या माणसाची. वाटे, चुकून हातातून काहीतरी पडलं, कसलातरी आवाज झाला आणि याची ही तंद्री भंगली तर?

पुष्कळ वेळाने खानोलकरांनी लिहिणं थांबवलं आणि एकदम हवा गेलेल्या फुग्यासारखे सैल, लिबलिबीत होत खुर्चीवर बसल्या बसल्या मागे वळले. पुन्हा तीच अजिजी, तोच  असहायपणा.. तीच ती सदाची भूक!

मी म्हणालो, ‘चहा मागवतो.’

तर ओशाळे होत म्हणाले, ‘चहा नको. मला अ‍ॅसिडिटी होते हो!’

मी म्हटलं, ‘बरं, मग चहा नको. खाली उसाचा रस मिळेल ताजा ताजा. तो प्या. बरं वाटेल तुम्हाला!’

पण त्यांना रसही नकोच होता.

आता काय करावं, हे न कळून मी थोडा अवघडलो, तर एखाद्या लहान मुलाने हट्ट करावा तशा आवाजात खानोलकर हळूच मला म्हणाले,  ‘तुमच्या स्टुडिओच्या खाली ती कल्पना भेळ मिळते, ती मागवता का? मला फार भूक लागलीय!’

भेळ आली. गप्पा मारत मारत त्यांनी ती चवीनं खाल्ली. मग म्हणाले, ‘आता मी झोपतो!’

माझ्या स्टुडिओत भिंतीजवळ गादी पसरलेली होती. खानोलकर शांतपणे झोपी गेले. अडीच तासांनी ताडकन उठले. म्हणाले, ‘अवचट, आता मला जायला हवं. ‘अवध्य’ची तालीम आहे. निघतो मी!’

मागे वळूनसुद्धा न बघता त्यांच्या त्या झिजलेल्या चपला पायात सरकवून खानोलकर गेलेसुद्धा!

संध्याकाळी उशिरा ‘अवध्य’च्या तालमीतला कोणीतरी निरोप घेऊन आला की, खानोलकरांनी तुम्हाला बोलावलं आहे.

त्यावेळी खानोलकर पेशवे पार्कजवळ अजंठा लॉजमध्ये उतरले होते. मी सारं आवरून तिथं गेलो, तर दुपारी माझ्याकडून हट्ट करून कल्पना भेळेचे लाड पुरवून घेणारे हे गृहस्थ खाली बारमध्ये बसलेले होते. अंगात तो रेशमी कुर्ता वगैरे तसाच.

मी त्यांना मजेत विचारलं, ‘काय खानोलकर, रागावणार नाही, चिडचिड नाही?’

ते पुन्हा विचित्रसे अजिजीने हसले. ते असे हसले की त्यांच्या डोळ्यातलं काहीतरी खोल चमकत असे. त्यात एक चटका होता. भाजणारा चटका!

खानोलकरांनी थोडय़ाशा अवघडल्या आवाजात अचानक मला विचारलं, ‘काय, बीअर घेणार का?’

मी हसून म्हणालो, ‘वा! आज खुशीत दिसताय. एकदम बीअर वगैरे..’ तर ते पुन्हा ओशाळून हसले.

मी म्हणालो, ‘मी बीअर घेत नाही. मी रम घेणार आणि पैसेही मीच देणार!’

त्यांच्या परिस्थितीची मला कल्पना होती.

खुर्चीतल्या खुर्चीत जरा सैलसे बसत खानोलकर म्हणाले, ‘मग तर काय फारच छान!’

नंतर मध्ये बराच काळ गेला.

एकदा मुंबईला गेलो होतो. श्री. पु. भागवतांकडे उतरलो होतो. दुपारी श्रीपुंनी विचारलं, ‘अवचट, वेळ आहे का?’

आता श्रीपुंना कोण नाही म्हणणार?

मी निमूट मान हलवली. तसे ते म्हणाले,  ‘माझ्याबरोबर येणार का?’

मी पुन्हा मान हलवत विचारलं, ‘जायचं कुठे पण?’

श्रीपु म्हणाले, ‘चला, जरा आरती प्रभूंना भेटून येऊ!’

मी काय, तयारच होतो. म्हटलं, ‘चला!’

खानोलकर मुंबईच्या उपनगरात दूर कुठेतरी राहत होते. दुपार उलटून गेली होती. मी आणि श्रीपु लोकल ट्रेनने निघालो होतो. त्या काळात आजच्यासारखी गर्दी नसायची. त्यात बरोबर श्रीपु. या माणसाला कायम खुर्चीत बसलेला पाहिला होता मी.. आज त्यांच्याबरोबर पहिल्यांदाच प्रवासाला वगैरे निघालो होतो.

एरवीही श्रीपु शांत, गप्पगप्पच असत. पण आज नेहमीपेक्षा जास्त गंभीर दिसत होते. म्हटलं, असेल काहीतरी! आता श्रीपुंना कोण विचारणार?

फारसं बोलणं झालं नाही आमचं. लोकल सगळ्या स्टेशनांवर थांबत थांबत सावकाश सरपटत चालली होती.

..उन्हं उतरता उतरता आम्ही एका स्टेशनावर उतरलो. कोणतं स्टेशन होतं, ते आता आठवत नाही. बाहेर आलो. समोर एक खाद्यपदार्थाचं दुकान होतं, त्यात श्रीपु शिरले. मागोमाग मी. मला चक्कर यायचीच बाकी होती. दुकानात शेव, कुरमुऱ्याचे ढीग लागलेले. फरसाण वगैरे सगळा तेलकट, तिखट, चटपटीत मामला. साजूक तुपातले श्रीपु या असल्या दुकानात कशाला जातील?

– पण माझ्या डोक्यात काही शिरण्याअगोदर त्या दुकानात शिरलेल्या श्रीपुंनी भराभर एकेक पदार्थ विकत घ्यायला सुरुवात केली होती. शेव, फरसाण, फापडा, चुरमुरे, लाडू असलं सगळं..  हे एक किलो द्या, ते दोन किलो द्या, वगैरे! भराभर पुडय़ा बांधल्या जाऊ लागल्या, पिशव्या भरल्या गेल्या.

दोन पिशव्या झाल्या. एक पिशवी माझ्या हातात, एक श्रीपुंच्या हातात. श्रीपुंच्या मागोमाग मी निमूट दुकानातून बाहेर पडलो.

आम्ही दोघे चालत चालत निघालो. बरंच अंतर चालल्यावर एक अगदी गरीब वस्ती लागली. श्रीपु त्या वस्तीत शिरले.

इथे? मराठीतला अलौकिक प्रतिभेचा एक सर्वश्रेष्ठ कवी इथे राहतो?

– माझ्या मूर्ख डोक्यात वास्तवाचा प्रकाश पडेपर्यंत श्रीपु एका झोपडीच्या दारात उभे राहिलेले होते.

मागोमाग मी.

आत कसं जाणार? जागाच नव्हती आत!

झोपडीच्या दारात भुकेल्या नजरेची पाच-सहा मुलं. काटकुळी. अंगाला पाणी लागलं नसावं, केसाला तेलाचं बोट नसावं, पोटात अन्नाचा कण नसावा, अशी! एवढी मुलं? ही खानोलकरांची मुलं? अशी? त्यांना त्र्यंबक नावाचा एक मुलगा आहे, हे मला माहिती होतं. पण मग ही बाकीची मुलं कोण?

डोक्यात भणभण सुरू झाली.

उंचेपुरे श्रीपु झोपडीच्या दारातून वाकून आत शिरले. मीही त्यांच्यामागून घुसमटल्यासारखा आत सरकलो.

अगदी छोटीशी खोली. जेमतेम दहा बाय दहाची असावी. एका बाजूला मोरी. किडूकमिडूक सामान पसरलेलं. खोलीच्या त्या चिमूटभर कुबट पसाऱ्यात एका बाजूला टीचभर खिडकी. त्या खिडकीला लागून एक डुगडुगतं टेबल होतं. मागच्या सगळ्या पसाऱ्याकडे पाठ करून त्या टेबलाशी बसलेले खानोलकर मान खाली घालून काहीतरी लिहीत होते.

इथे?

आत एक स्त्री होती. त्या कोण, हे कळलं नाही. मी विचारलंही नाही. श्रीपुंना पाहताच त्या लगबगीने, आदराने पुढे आल्या. श्रीपुंनी दोन्ही पिशव्या त्यांच्या हातात दिल्या. त्यांनी त्या न बोलता घेतल्या. नजरेत कृतज्ञता दिसली, तेवढीच. बाकी शब्द नाही.

तोवर सगळी मुलं आत आलीच होती. आमच्यादेखतच त्यांनी त्या दोन्ही पिशव्या उघडून आतले पदार्थ बाहेर काढून लगोलग खायला घेतले.

आम्ही तिथंच अवघडून उभे राहिलो. श्रीपु, त्यांच्या मागे दातखीळ बसलेला मी. एखाद्याने धावत सुटावं तशी भान विसरलेली ती भुकेली मुलं खात सुटली होती. या मुलांकडे पाठ करून त्या छोटय़ाशा खिडकीशेजारी एवढुशा टेबलावर बसून हा कवी ‘नक्षत्रांचं देणं’ लिहू शकतो? केव्हढी विलक्षण प्रतिभा होती ती!

खानोलकरांनी बसल्या जागेवरून मान वर करून आमच्याकडे फक्त निसटतं पाहिलं. जाड भिंगाच्या चष्म्याआडून त्यांचे डोळे लुकलुकले.

मिशीवाल्या मामांची वाट बघताना खानोलकर एवढे का चिडले होते, ते त्या एका प्रसंगाने मला थोबाडीत मारल्यासारखं शिकवलं.

**

आयुष्यभर खानोलकर कायम अर्धपोटी राहिले होते. ओशाळेपण आणि हलाखी या जणू त्यांच्या कपाळावर कोरलेल्या भळभळत्या जखमा होत्या. अश्वत्थाम्यासारख्या! तेच बहुधा प्राक्तन होतं त्यांचं. आणि तेच त्यांच्या अलौकिक प्रतिभेचं मूळही असावं कदाचित!

प्रसिद्धी आली, मागोमाग थोडा पैसा आला. खानोलकरांना पोटभर जेवण मिळू लागलं. तेच बहुधा त्यांच्या पोटाला मानवलं नसावं.

भूक संपली, तसे खानोलकरही संपले. गेलेच ते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2021 7:00 am

Web Title: pimpalapure rough sketches dd70
Next Stories
1 अरतें ना परतें.. : जन्मानुजन्मांचे सोयरे
2 मोकळे आकाश.. : कांचनमृग
3 अंतर्नाद : धर्मसंगीताची अफू
Just Now!
X