मित्रों,
गत सप्ताहात लोकसभेचे शीतकालीन अधिवेशन समाप्त झाले. तुम्हांस माहीत आहे की, शीतकालात आपण तोंड उघडले की त्यातून वाफा बाहेर पडतात. हा निसर्गाचा चमत्कार आहे. प्राचीन काळापासून आपल्या पूर्वजांना हे ज्ञान होते. म्हणून ते म्हणत की, तोंडाच्या वाफा दवडू नका. या शीतकालीन अधिवेशनात मीही तेच केले. माझ्या पूर्वसुरींचे अनुकरण करून मी मौन धारण केले. मौनामध्ये खूप शक्ती असते. संस्कृतमध्ये त्याला lok03‘सर्वार्थसाधनम्’ असे म्हटले आहे. आज कदाचित आपल्याला ते समजणार नाही. परंतु जेव्हा संपूर्ण भारतवर्षांमधील सर्व पाठशालांमध्ये सातव्या कक्षेपर्यंत संस्कृत सक्तीचे करण्यात येईल तेव्हा आपल्याला त्याचा अर्थ समजेल. मौन हे खूप मौल्यवान असते. त्यात संसदेचे अनेक तास वाया घालवून लाखो रुपयांचा चुराडा करण्याची ताकद असते. मी जेव्हा संसदेत मौन धारण केले होते तेव्हा मी काय करत होतो, असा सवाल माझ्या काही विपक्षी मित्रांनी केला. असे प्रश्न ऐकून माझ्या मनाला खूप पीडा होते. खूप यातना होते. मागच्या काही दिवसांमध्ये मी काश्मीरला जाऊन आलो. कितीही भाषणे केली तरी माझा घसा बसत नाही. पण तेथील थंडीने माझा घसा बसला. हळदीचे दूध प्राशन करूनही बरा होत नव्हता. हळद हे अत्यंत गुणकारी अँटिबायोटिक्स आहे. आपल्या पूर्वजांनी ‘टर्मरिक नहीं कॉस्मेटिक’ असे जे ज्ञान दिले आहे ते आपण जपले पाहिजे. हिंदुस्थान अँटिबायोटिक्सने हळदीच्या पावडरचे उत्पादन करून ‘मेक इन इंडिया’ अभियानात आपलेही योगदान द्यावे अशी माझी सूचना आहे. तर माझा घसा दुखत असूनही मी तेव्हा मनातल्या मनात माझ्या शंभर कोटी देशवासींबरोबर ‘मन की बात’ करीत होतो.

मी मागच्या वेळी म्हणालो होतो की, मला युवा पिढीची चिंता वाटते. ऋग्वेद कालापासून सर्वानाच युवा पिढीची चिंता वाटत आलेली आहे. ही आपली महान विरासत आहे. तेव्हा मलाही त्यांची चिंता वाटते. या युवा पिढीला मी एक गोष्ट सांगेन की, तुम्ही आयुष्यात नेहमी दोन ‘एम’चे पालन करा. पहिला एम आहे मौन आणि दुसरा एम आहे मन की बात. मौन हा योगाचाच एक भाग आहे. आज जर शंभर कोटी देशवासींनी एकाच वेळी मौन पाळले तर दुनियेतली कोणतीही शक्ती भारताला ध्वनिप्रदूषणमुक्त होण्यापासून रोखू शकणार नाही. याची सुरुवात मी माझ्या सरकारपासून करणार आहे. नव्या वर्षांमध्ये केंद्रातील सर्व मंत्र्यांना मी मौन-दूत म्हणून जाहीर करणार आहे. त्यांनी मौनधर्म पाळायचा व त्याची छायाचित्रे ट्विटरवर अपलोड करायची. बाकी जे काही बोलायचे ते मी देशाचा प्रधानमंत्री म्हणून नव्हे, तर प्रधानसेवक म्हणून बोलेन.
आणखी तीन दिवसांनी साल २०१४ समाप्त होईल आणि राष्ट्रामध्ये एक नवा सूर्योदय होईल. गेल्या सात महिन्यांमध्ये देशामध्ये एक प्रकारचा बदलाव आला आहे. सतना, मध्य प्रदेशात एक श्रीमान लल्लन यादव आहेत, त्यांनी माझ्या मायगव्हवर एक मेल पाठवला. ते म्हणतात, आजकाल माझी पत्नी रोज कचरा काढताना मला मोबाइलमधून फोटो काढायला सांगते. मुलेसुद्धा तिच्या स्वच्छता अभियानास योगदान म्हणून घरात कचरा करतात. हे अतिशय आनंददायी, उमंगदायी आणि मनास संतोष देणारे चित्र आहे. मला असे सांगण्यात आले आहे की, गेल्या काही महिन्यांमध्ये झाडूचा खप दुपटीने वाढला आहे. ही एका नव्या अर्थक्रांतीचीच सुरुवात आहे असे माझे मानणे आहे.
३१ डिसेंबरच्या मध्यरात्री आपण सगळेच नववर्षांचे जोरशोराने स्वागत करणार आहोत. या नववर्षांनिमित्ताने माझी सर्व देशवासीयांना शुभकामना. यानिमित्ताने आपल्या सरकारने एक अच्छे दिन-दर्शिका तयार केली आहे. त्यात स्वच्छता दिन, सुशासन दिन, आश्वासन दिन, यूटर्न दिन, सब से सस्ता दिन असे विविध अच्छे दिन दाखवण्यात आले आहेत. ३६५ दिवस थ्री-डी म्हणजे दिन दिन दिवाळी हे या नव्या वर्षांचे घोषवाक्य असेल.
पण मला हे सांगितलेच पाहिजे की, माझ्या मनाला खूप पीडा होते की, जेव्हा मी ऐकतो की नववर्षांच्या स्वागताच्या काळात अनेक लोक प्राणांना मुकतात. अनेक कुटुंबे उघडय़ावर येतात. याला कारण आहे दोन ‘ए’. एक्सिडेन्ट आणि एडिक्शन. एडिक्शन म्हणजे व्यसनामुळे एक्सिडेन्ट होतात. अपघात ही देशाला लागलेली मोठी बिमारी आहे. आज शंभर कोटी देशवासींनी ठरविले तर जगातील कोणतीही ताकद येथे अपघात घडवू शकणार नाही. या नव्या वर्षांत आपण अपघात रोखण्याचा संकल्प करू या. त्यासाठी प्रत्येक आमदाराने एकेक गाव दत्तक घेऊन तेथे स्पीडब्रेकर आणि सिग्नल बसवावेत. प्रत्येक नागरिकाने आधी डावीकडे, नंतर उजवीकडे पाहून रस्ते ओलांडावेत, अशा काही योजना आखण्यात येत आहेत. याबाबतचे आपले सुझाव, सूचना मला पाठवा. व्यक्ती स्वयं, परिवार, इष्टमित्र, समाज, सरकार, कानून सर्वाना मिळून या दिशेने काम करावे लागणार आहे. चला, आपण सर्वच जण मिळून ३६५ दिवस थ्री-डी ही मोहीम यशस्वी करू या.
आपल्या सर्वाना नव्या अच्छा वर्षांच्या शुभेच्छा.
अच्छा!lr07